जाऊबाईचा स्वॅग 1

     




  अनिकेत आणि अनिता दोघे ही इंजिनिअर होते. आणि गेल्या पाच वर्षांपासून एकाच ऑफिसमध्ये कामाला होते.पहिल्यांदा दोघांची ओळख झाली मग मैत्री आणि गेल्या तीन वर्षांपासून दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. अनिकेत सुभेदार मूळचा सातारा जिल्ह्यातील एका खेडे गावचा होता. तो नोकरी निमित्त पुण्यात आला होता तर अनिता मूळची पुण्याचीच होती. अनिताचे कुटुंब म्हणजे तिचे आई- वडील आणि ती, त्यांची एकुलती एक मुलगी होती त्यामुळे जास्तच लाडाकोडात वाढलेली आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली तरुणी होती. तर अनिकेत गावाकडचा एकत्र कुटूंबात वाढलेला मुलगा; त्याच्या घरात आई- वडील आणि तीन वर्षे आधीच लग्न झालेला मोठा भाऊ आणि वहिनी. त्यांच्या घरात सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची परंपरा होती. त्यामुळे त्याचे वडील देशसेवा करून सैन्याततुन निवृत्त झालेले. तर मोठा भाऊ देखील सैन्यात त्याचे देशसेवेचे कर्तव्य  बजावत होता. 


      अनिकेतचे वडील सैन्यात असल्याने तो कडक शिस्तीत वाढला होता. त्याच्या वडिलांचा घरात आणि गावात देखील दबदबा होता. त्यामुळे अनिकेत घरी त्याच्या आणि अनिताबद्दल सांगायला घाबरत होता. अनिताच्या घरी मात्र तिच्या आई- वडिलांनी लग्न कर म्हणून तिच्या मागे तगादा लावला होता.रोज ऑफिस सुटल्यातवर दोघे एका कॅफेत भेटायचे. आज देखील ते असेच कॅफेत भेटले. अनिकेतने दोन कॉफी ऑर्डर केल्या.


अनिता,“ तू काय ठरवले आहे अनिकेत आपल्याबद्दल? तू किती दिवस लावणार आहेस तुझ्या फॅमेलिला सांगायला? माझे मॉम आणि डॅड आता वेट करायला तयार नाहीत. तुझं काय ते सांग मला. नाही तर मला फ्री कर.” ती रागाने बोलत होती.


अनिकेत,“ अनिता तुझ्या घरचे फॉरवर्ड विचारांचे आहेत त्यामुळे त्यांनी आपले रिलेशन लगेच एक्सेप्ट केले पण माझ्या घरी तसं नाही. माझे अण्णा (वडील) आणि आई तसे जुन्या विचारांचे त्यात अण्णांचा खूप दरारा आहे घरीच काय पण गावात देखील. मला त्यांच्यासमोर आपला विषय काढायला भीती वाटते.” तो बोलत होता.


अनिता,“ मग आयुष्यभर असाच घाबरून राहणार आहेस का? लेट्स फरगेट इट! तुझ्याकडून काही होणार नाही. मी तुला फ्री केलं असं समज आणि फरगेट मी.” ती रागाने म्हणाली.


अनिकेत,“ प्लिज यार ऍनी ट्राय टू अंडरस्टॅण्ड मी! मी जाणार आहे गावाकडे विकेंडला तेंव्हा आईशी आपल्याबद्दल बोलतो आणि तिला अण्णांशी बोल म्हणून गळ घालतो. शिवाय वहिनी ही आहेतच.” तो तिचा हात धरून म्हणाला.

.

अनिता,“ ओके पण हा तुझा शेवटचा चान्स समज!” ती तोऱ्यात म्हणाली.


अनिकेत,“ हो मॅडम. बरं निघुयात का?” तो हसून म्हणाला आणि दोघे आपापल्या घरी निघून गेले.


★★★


   अनिकेत शनिवारी रात्रीच त्याच्या गावी  पोहोचला. त्याचे घर म्हणजे जुन्या धाटणीचा चौपदरी वाडा होता. समोर चौक, दारातून आत गेलं की मोठा सोफा आत माजघर, एका बाजूला स्वयंपाक घर आणि देव घर, दोन खोल्या आणि मागच्या बाजूला संडास, बाथरूम आणि छान अशी परस बाग होती.चौकातून वर जायला जिना आणि वरच्या मजल्यावर ही चार खोल्या होत्या. त्याच्या आईला त्याला पाहून आनंद झाला. अनिकेतची आई म्हणजे नव्वारी साडी नसणारी डोक्यावरून पदर घेणारी आणि कपाळावर रुपया एवढे ठसठशीत कुंकू लावणारी वयानुसार थोडी स्थूल पण दिसायला देखणी बाई!  वहिनी म्हणजे सुजाता ही होतीच. अण्णा बाहेर गेले होते कदाचित.


सुजाता,“ काय भाऊजी खूप दिवसांनी आमची आठवण झाली. तिथं पुण्यात कोणी मन रमवणारी भेटली वाटतं तुमचं!” ती चिडवत म्हणाली.


अनिकेत,“ असं काही नाही वहिनी आणि आठवण यायला आधी विसरायला हवं ना. बाकी आमचे कॅप्टन दादा कधी येणार आहेत? फोन आणि व्हिडीओ कॉल करून भागत नाही असं म्हणत होता दादा.” तो ही तिला चिडवत म्हणाला आणि सुजाता लाजली ती निघून गेली. तोपर्यंत अण्णा घरी आले.


अण्णा,“ आलं वाटतं आमचं शेंडेफळ! काय रे आलं की लगेच सुरू झालं का तुझं वहिनीला चिडवायला?” ते हसत म्हणाले.


आई,“ काही नाही हो चालायचं. अनिकेत आला की घर भरल्यासारखं वाटतं नाही तर दिवसभर तुम्ही शेतात किंवा गावात घरात आम्ही दोघीच सासू- सुना. बरं अनिकेत जा बाळा हात-पाय धुवून ये मी चहा करते.” त्या म्हणाल्या आणि अनिकेत होकारार्थी मान हलवून निघून गेला.


अण्णा,“ बरं पिशवी द्या आज मटणाचा बेत करा. अगदी धाकल्याला आवडतो तसा झणझणीत!” ते हसून म्हणाले आणि तोपर्यंत सुजाता चहा आणि पिशवी घेऊन हजर झाली. 


आई,“ बघा सून असावी तर अशी.आधीच ओळखलं तुमच्या मनातलं सुजूने.” त्या कौतुकाने म्हणाल्या.


अण्णा,“ देवाने आपल्याला लेक नाही दिली पण सुजूने ती कमी पूर्ण केली बघा. बरं मी चहा घेऊन निघतो. पण तू लग्नाबद्दल विचार बाई त्याला. लोकं विचारत आहेत. स्थळं पण सांगून येत आहेत. यावेळी मे महिन्यात अविनाश सुट्टीवर आला की चांगली मुलगी पाहून बार उडवून.” ते म्हणाले.


आई,“ हो बोलते मी त्याच्याशी.” त्या म्हणाल्या तोपर्यंत अनिकेत फ्रेश होऊन आला.


  रात्री त्याला अपेक्षित होते त्याप्रमाणे मटणाचा फक्कल बेत होता. चौघांनी जेवण केलं आणि अण्णा गावाच्या पारावर फेरफटका मारायला निघून गेले. अनिकेत, सुजाता आणि त्याची आई चौकात निवांत बसले होते. त्याच्या आईने विषयाला हात घातला.


आई,“ अनिकेत तुझे अण्णा म्हणत होते की आता तुझं बी लग्न केलं पाहिजे. लोकं विचारत्यात आणि पोरी बी सांगून यायला लागल्या आहेत.एखादी चांगली पोरगी बघून मे महिन्यात अवी सुट्टीवर आला की तुझं लग्न करायचा विचार आहे त्यांचा.” त्या म्हणाल्या आणि अनिकेतने आवंढा गिळला.त्याने मनोमन शब्दांची जुळवाजुळव केली आणि घसा साफ करून बोलायला सुरुवात केली.


अनिकेत,“ मला ही तुमच्या दोघींशी जरा बोलायचं आहे. ते माझ्याबरोबर अनिता सरपोतदार म्हणून मुलगी काम करते. तिचं आणि माझं प्रेम आहे एकमेकांवर. मला तिच्याशी लग्न करायचं आहे आई.” त्याने  डोळे घट्ट मिटले आणि  एका दमात सगळं बोलून मोकळा झाला.


आई,“ काय? काय बोलतो आहेस तू अनिकेत? आपल्या सात पिढ्यात कोणी प्रेम विवाह केला आहे का?” त्या आश्चर्य मिश्रित रागाने म्हणाल्या आणि अनिकेतने सुजाताकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं.


सुजाता,“ किती दिवस झालं तुमचं हे प्रेम प्रकरण सुरू आहे?”


अनिकेत,“ तीन वर्षे झाली.”


आई,“ आणि तू आत्ता आम्हाला सांगतोयस हे? तुझ्या अण्णांना हे पटणार नाही माहीत आहे ना तुला?” त्या रागाने तणतणत होत्या आणि अनिकेतचा चेहरा खर्रकन उतरला.


सुजाता,“ आई तुम्ही शांत व्हा बरं. आणि आजकाल हे कॉमन झालं आहे. तरी बरं भाऊजींनी  आपल्याला योग्य वेळी सांगितलं.” ती  त्यांना समजावत म्हणाली.


आई,“ सुजा अगं पण गाव काय म्हणेल? आणि मुळात यांना हे पटणार आहे का?” त्या काळजीने बोलत होत्या.


अनिकेत,“ मग तू वहिनी आणि दादा पटवा ना अण्णांना आई. अनिता सुंदर आणि सुशिक्षित आहे. शिवाय आपल्या जातीची. तिच्या घरी तिच्या आई-वडिलांना हे लग्न मान्य आहे. वहिनी प्लिज माझ्यासाठी इतकं कर ना.” तो काकुळतीला येऊन बोलत होता.


सुजाता,“ इतका मस्का मारायची गरज नाही. आई भाऊजी इतकं म्हणतायत तर एकदा अण्णांना समजवायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि भाऊजी सुखी झाले या लग्नाने! मुलगी समजूतदार आणि आपल्यात मिसळणारी असली की झालं ना?” ती त्यांना पुन्हा समजावत होती.


आई,“ तू आणि हा काय गोंधळ घालायचा तो घाला. मी या सगळ्यात पडणार नाही.” त्या म्हणाल्या.


अनिकेत,“ असं काय करतेस गं आई! प्लिज ट्राय टू अंडर स्टॅंड!” तो रडकुंडीला येऊन म्हणाला.


सुजाता,“ आई आपण समजावूत ना अण्णांना मी यांच्याशी बोलते आजच; तेही बोलतील ना अण्णांशी.” ती अजिजीने बोलत होती. 


आई,“ बरं ठीक आहे. पण मुलीची सगळी चौकशी करणार आम्ही कोण कुठली? घरचे कसे सगळं बघणार.” त्या म्हणाल्या.


अनिकेत,“ हो बाई सगळं बघा. मग तर झालं.” तो खुश होत म्हणाला.

 

  अनिकेत रविवारी राहून सोमवारी सकाळी पुण्याला निघून गेला.

★★★★


     इकडे अनिकेतच्या आईने आणि सुजाताने अनिताचा विषय अण्णांना सांगितला. त्यांना आधी थोडा रागच आला  पण अविनाशने फोनवरून ‛आजकाल हेच चालते आपण ही काळाप्रमाणे बदलायला हवं.’  असं म्हणून   अण्णांची समजूत घातली. आणि ते तयार झाले. पुण्यात जाऊन मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. अनिता होतीच सुंदर त्यामुळे ती पाहता क्षणी सगळ्यांना आवडली. मे महिन्यांपर्यंत न थांबता पुढच्याच दीड महिन्यात  लग्न करायचं ठरलं. अण्णांनी स्पष्ट सांगितलं होतं अविनाशला सुट्टी मिळाली तर लग्न होणार नाही तर नाही पण अविनाशला कर्मधर्म संयोगाने पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.



  लग्न पुण्यात होते. सगळे लग्नाच्या आदल्या दिवशीच कार्यालयात पोहोचले साखरपुडा आधीच झाला होता. आज लग्न होते लग्न लागले.  अविनाश आणि सुजाता सगळ्यांची आपुलकीने विचारपूस करत होते. अविनाश  म्हणजे रुबाबदार व्यक्तिमत्त्व उच्चा-पुरा, नाकी-डोळी नीटस, गव्हाळ वर्ण, पिळदार शरीरयष्टी, सैन्यात असल्याने त्याच्या चलण्या बोलण्यात देखील एक रुबाब होता. तर सुजाता म्हणजे गोरी गोमटी, चवळीची शेंग असली तरी उंचीपुरी होती. दोघांचा जोडा अगदी शोभत होता. त्याच्या मानाने अनिकेत तसा डावाच होता. उंचीला अविनाश पेक्षा कमी आणि दिसायला ही वडिलांचा सावळा रंग घेऊन आलेला मुलगा.


  अनिताच्या मैत्रिणी स्टेजवर तिची थट्टा मस्करी करत होत्या. पण सगळ्यांचे लक्ष मात्र सुजाता - अविनाशवर होते. 


एक मैत्रीण,“ काय गं ते तुझे जाऊ आणि दिर वाटतं? कसला हँडसम आहे गं तुझा दिर आणि जाऊ पण सुरेख आहे बरं का त्याला साजेशी! यार त्याचे लग्न झालं नसते तर मीच प्रपोज केलं असतं त्याला.” ती हसून मस्करी करत बोलत होती.


दुसरी मैत्रीण,“ बघ बाई ऍनी.  तिच्याशी किती आपुलकीने सगळे नातेवाईक बोलत आहेत. मोठी जाऊ आहे बघ तुझी! तुझ्यावर रुबाब झाडणार.” ती म्हणाली.


अनिता,“ गप्प बसा तुम्ही! काय इतकी सुंदर नाही ती. आणि आता तो सैन्यात आहे म्हणल्यावर रुबाबदार तर दिसणारच ना? बाकी तिथं काय करतो काय माहिती आणि ही गावंढळ कुठली! ती काय रुबाब झाडणार माझ्यावर?” ती रागाने मान झटकत म्हणाली 


पहिली मैत्रीण,“म्हणजे तुला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नाही? असं कसं गं? तुझी जाऊ किती शिकली आहे. तुझा दिर किती शिकला आणि तो सैन्यात कोणत्या हुद्द्यावर आहे? काहीच माहिती कशी घेतली नाहीस तू?” तिने आश्चर्याने विचारलं.


अनिता,“ अनिकेत सांगत होता पण मी दुर्लक्ष केलं. मला काय करायच्या गं त्यांच्या चौकशा! सुजाता खेड्यात राहते म्हणजे असेल दहावी नाही तर जास्तीत जास्त बारावी आणि अविनाश तो ही काही फार शिकलेला मला वाटत नाही सैन्यात काय बारावीवाल्यांना ही घेतात.” ती कुच्छितपणे बोलत होती आणि तिच्यापासून काही अंतरावर मित्रांशी बोलण्यात गुंतलेला अनिकेत तिच्याजवळ आला तसा त्यांनी विषय बदलला. 


    लग्न झालं आणि अनिता गावी आली. तिचे गावी जंगी स्वागत झाले. 


      अनिता समजते तसं अविनाश आणि सुजाता खरंच कमी शिकलेले असतील का? आणि सुभेदारांच्या घरात अनिता साखरेसारखी विरघळेल की मिठाचा खडा टाकेल?

©swamini chougule

क्रमशः


  अशाच मनोवेधक कथा वाचण्यासाठी लाईक आणि फॉलो करा आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला      




 



   

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post