मराठी लघुकथा तिच्या प्रेमाची परवड




 सुमेधा घरातुन कोणाला ही न सांगता गुपचूप चोरून घरातून बाहेर पडली होती. ती चालत चालत एका झाडाखाली येऊन उभारली. पावसाळ्याचे दिवस होते नुकताच पाऊस पडून गेला होता. जिकडे - तिकडे हिरवेगार दिसत होते. निसर्ग मुक्त हस्ताने आपले रंग उधळत होता. आणि हवेत चांगलाच गारवा होता . सुमेधा आजूबाजूचा परीसर न्याहाळत होती. पण तिचे मन विचलीत होते. ती सारख रस्त्याकडे पाहत उभी होती. तिची नजर चारी बाजूने भिरभिरत होती.जणू तिने काही तरी चोरी केली होती आणि आपण पकडले जावू अशी भिती वाटावी असेच तिच्या चेहऱ्याकडे पाहुन वाटत होते. ती कोणाची तरी वाट पाहत असावी कदाचित. तितक्यात तिला समोरून कोणी तरी येताना दिसले तिने निरखून पाहिले तर तो प्रविणच होता. ज्याची ती वाट पाहत होती. प्रवीण आला आणि बोलू लागला.


" सुमेधा इतक्या तातडीने का बोलावलेस मला ?"


सुमेधा,"प्रविण माझ्या घरच्यांना आपल्याबद्दल कळालय आणि ते खूप चिडलेत माझ्यावर आणि माझ्या लग्नाची घाई करत आहेत. उद्याच मला एक मुलगा पाहायला येणार आहे पण मला तुझ्याशिवाय कोणाशी ही लग्न नाही करायचं."


प्रवीण ," अगं तुझ्या घरी कधी ना कधी कळणारच होतं. बरं तू घाबरू नकोस जर त्यांनी खूप विरोध केला आपल्या लग्नाला तर आपण पळून जाऊन लग्न करु मग तर झालं?"


हे ऐकून सुमेधा प्रवीणला बिलगली पण लगेच भानावर आली आणि प्रवीणचा निरोप घेवून घरी गेली प्रवीण ही त्याच्या घरी परतला.


हि गोष्ट आहे ८० च्या दशकातील जेव्हा लोकांवर जाती- पातीचा पगडा खूपच जास्त होता. आणि प्रेम करणे म्हणजे एक अक्षम्य अपराधच समजला जायचा. त्या काळात सुमेधा आणि प्रवीण एकमेकानच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.


सुमेधा दिसायला ' सावळी आंगने सडपातळ लांबसडक केसांची एक वेणी नाकी-डोळी नीटस. ती या वर्षी दहावीत जाणार होती. म्हणजेच किशोरवयीन नवतरुणी होती पंधरा- सोळा वर्षाची . तिच्या घरी आई-बाबा,भाऊ आणि एक बहीण होती.सुमेधाच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. रोज दोन टाईम जेवायला मिळत होते. इतकेच काय ते समाधान.


प्रवीण दिसायला राजबिंडा होता.गोरापान, सरळ नाकाचा उंचा पुरा. त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. कोणत्याही मुलीने प्रेमात पडावे असाच तो. सतरा वर्षांचा होता.त्याचे वडील रेल्वे कर्मचारी होते. आणि हा एकुलता एक मुलगा. प्रवीण सधन कुटूंबातला होता.


 पण तो खालच्या जातीचा होता व सुमेधा उच्चजातीची. म्हणूनच सुमेधाच्या घरच्यांचा तिच्या प्रेम प्रकरणाला विरोध होता.पण सुमेधा प्रवीणशी लग्न करण्यावर ठाम होती.


असो आज सुमेधाला पाहायला मुलगा आला होता आणि सुमेधाचे दुर्दैव आणि तिच्या घरच्यांचे सुदैव त्या मुलाने तिला पसंती दर्शवली होती.आणि आठ दिवसातच साखरपुडा होता. मुलगा चांगला सरकारी नोकर होता. तिच्या घरचे त्यामुळे खुश होते व साखरपुडा करण्याच्या तयारीला लागले होते पण सुमेधाच्या जीवाची घालमेल सुरू होती.


सुमेधाने प्रवीणला निरोप पाठविला व नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलावले. सुमेधा आणि प्रवीण त्याच गुलमोहराच्या झाडाखाली भेटले. सुमेधाने त्याला सगळे सांगितले. प्रवीणने तिला पळून जाण्याची तयारी करायला सांगितली. सुमेधाच्या सारखरपुड्याच्या एक दिवस आधी सुमेधा प्रवीणबरोबर पळून गेली.सुमेधा आणि प्रवीणने लग्न केले. पण सुमेधाच्या घरच्यांची त्यामुळे नाचक्की झाली. त्यांनी सुमेधाशी सगळे संबंध तोडले.


प्रवीणच्या घरच्यांनी मात्र सुमेधाला सुन म्हणून स्वीकारले . प्रवीण आणि सुमेधाचा संसार सुरू झाला. सुमेधाने प्रत्येक मुली प्रमाणे खूप सारी स्वप्न पाहिली होती. ती प्रवीणशी लग्न करून खूप खुश होती .पण तिला पुढे नियतीने काय वाढून ठेवलेय याची कल्पना नव्हती.


लग्न झाल्यामुळे सुमेधाची शाळा बंद झाली. प्रवीणने तर नववितूनच शाळा सोडली होती.


आणि तो मित्रांनबरोबर फिरण्याशिवाय कोणतेही काम करत नव्हता. त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले होते. प्रवीणचे वडील आता निवृत्त झाले होते. व ते पेंन्शनवर घर चालवत होते. सुमेधा आणि प्रवीणच्या लग्नाला आता एक वर्ष झाले होत. या एका वर्षांत प्रवीणची आई अल्पशा आजाराने मरण पावली. त्यामुळे प्रवीण चांगलाच बिथरला होता.तो आईचा खूपच लाडका होता. एकुलता एक असल्याने आई त्याला खूपच जपायची. प्रवीण आईच्या जाण्याचे दुःख पचवू शकला नाही आणि व्यसनाच्या आधिकाधिक आहारी गेला. सुमेधा त्याला सावरण्यात असफल झाली होती.


वडीलांचा त्याला जरा धाक होता. त्यामुळे तो थोडा नियंत्रणात होता. वडील त्याला समजावत होते. पण त्याचा कोणताच परिणाम प्रवीणवर दिसत नव्हता. सुमेधाशी ही तो आता खूपच वाईट वागत होता. अशातच सुमेधाला दिवस गेले. तिला वाटले आता प्रवीण जबाबदार होईल, सुधारेल आणि कामाधंद्याला लागेल.पण तिच्या आशा फोल ठरल्या. प्रवीणवर या गोड बातमीचा काही परिणाम झाला नाही. सुमेधाने यथावकाश एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिला आता फक्त तिच्या सासऱ्यांचा आधार होता.पण त्यांचीही प्रकृती प्रवीणच्या काळजीने खालावत चालली होती. आणि एक दिवस तेही हे जग सोडून गेले. सुमेधावर तर आभाळच कोसळले. ज्यांचा तिला आधार होता असे तिचे सासरे ही आता नव्हते. सासरे गेल्यामुळे पेंन्शन बंद झाली. आता पोटापाण्यासाठी काय करायचे?  हा यक्ष प्रश्न सुमेधासमोर होता. प्रवीणला आता वडिलांचा धाकही राहिला नव्हता. त्यामुळे तो रोज दारु पिऊ लागला. सुमेधाला मारझोड करु लागला. शेवटी सुमेधाने काम करण्याचा निर्णय घेतला.  तिचे शिक्षण फक्त नववीच झाले होते. मग तिला चांगली नोकरी कुठे मिळणार होती. सुमेधाने नोकरी मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. दोन महिने ती नोकरीसाठी पायपीट करत होती. पण प्रवीणला त्याचे काही सोयरे - सुतक नव्हते.


त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली होती. प्रवीणच्या वडीलांनी ठेवलेले प्रोविडंट फंडचे पैसे प्रवीण दारुमध्ये उडवत होता. तेही पैसे संपले. घरात आता खायला देखील काही राहिले नव्हते व पैसा संपला. सुमेधाने नाईलाजाने लोकांची धुणीभांडी करायला सुरुवात केली. आणि ती घर चालवू लागली प्रवीण अधिकाधिक व्यसनी होत चालला होता. तो सुमेधाला धमकावून वेळ पडल्यास मारझोड करुन दारुसाठी पैसे घेऊन जात असे. सुमेधा संसाराचा गाडा कसोशीने ओढत होती. तिच्या लग्नाला आता आठ वर्षे झाली होती. सुमेधाने आणखीन दोन मुलांना जन्म दिला. तिच्या पदरात आता दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन मुले होती .सुमेधा लवकर उठून घरकाम आवरून सकाळीच कामाला निघत असे.


तिच्या चांगल्या कामाच्या जोरावर तिला बरीच कामं मिळाली. काम कष्टाचे होते. सुमेधा संध्याकाळी काम करून थकून घरी येत असे.एक चांगली गोष्ट होती. ती म्हणजे तिची सात वर्षांची मुलगी  परिस्थितीमुळे बरीच समंजस झाली होती. ती सुमेधा कामावरून येवू पर्यंत शाळेतून येवून बरेचसे घरकाम उरकत असे व स्वयंपाकात ही सुमेधाला मदत करत असे .


आता प्रवीण पूर्णपणे व्यसनाच्या जाळ्यात अडकला होता. तो सतत दारूच्या नशेत राहत होता. दारु नाही मिळाली तर तो वेडापिसा होत होता. सुमेधाकडून पैसे घेऊन. तो दारू पित असे तर कधी काही काम करून ते पैसे दारुत उडवत असे.


   एक दिवस त्याला संध्याकाळपर्यंत कुठेच काम नाही मिळाले. मग काय दारु प्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते तो दारुशिवाय राहूच शकत नव्हता पाण्याशिवाय मासा जसा तडपडतो तसा तो दारुशिवाय तडपडू लागला. तो संध्याकाळी सहा वाजता सुमेधाकडे आला व सुमेधाला दारुसाठी पैसे मागू लागला . सुमेधाने त्याला पैसे नाहीत म्हणून सांगितले. तो सुमेधाला भांडू लागला. प्रवीणच्या भांडण्याला सुमेधाने मात्र कोणतीच दाद दिली नाही. आता ती प्रवीणकडून मार देखील खाल्ला नाही. सुमेधाने प्रवीणला घरातून बाहेर काढले व दार लावून घेतले.


प्रवीण बाहेर निघून गेला आणि रात्री दहा वाजता परत आला सुमेधाने दार उघडून खूप मोठी चूक केली होती. प्रवीण तिला पुन्हा पैशासाठी भांडू लागला तिने पैसे नाहीत म्हणून पुन्हा सांगितले पण प्रवीणला तिच्यावर विश्वास नव्हता तो मित्राकडून पैसे उसने घेऊन आधीच पिऊन आला होता. तरी त्याला अजून दारु पाहिजे होती. सुमेधा आपल्याला दाद देत नाही हे पाहून प्रवीण चांगलाच बिथरला. सुमेधाने तिच्या तीन मुलांना जेवायला घालून झोपवले होते. सुमेधा प्रवीणला समजावत होती पण तो कोणतीच गोष्ट समजून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. प्रवीणने जवळच पडलेला रॉकेलचा डबा घेतला व सुमेधाला म्हणाला


“ तू जर मला पैसे नाही दिले तर मी पेटवून घेईन.”


    सुमेधाला वाटले तो नुसती धमकी देत आहे. प्रवीणने पुन्हा विचारले 


“सांग देतेस की नाही पैसे?”


 सुमेधाने ठाम नकार दिला. प्रवीणने रॉकेल अंगावर ओतून घेतले आणि सुमेधाला काही कळण्या आधिच आगकाडी ओढून पेटवून घेतले. सुमेधा प्रवीणला पेटलेले पाहत होती.


प्रवीण पूर्ण पेटला व शरीर जळताना सहन न होवून घरातून अंगणात आला. सुमेधा त्याच्या जवळ जावून त्याच्या अंगावर माती टाकून आग विजवण्याचा प्रयत्न करू लागली  आणि प्रवीणने तिला जळते शरीर घेऊन मीठी मारली. आता दोघे ही जळू लागले ,ओरडू लागले ओरडण्याच्या आवाजाने मुले जागी झाली.ती लहान असल्याने त्यांना काही कळत नव्हते काय सुरू आहे. ती घाबरून नुसती रडत होती. लोकही आता गोळा झाले व त्यांनी दोघांना लागलेली आग पाणी ओतून विझवली आणि एब्युलंस बोलावून दोघांना दवाखान्यात नेले.


प्रवीण नव्वद टक्के भाजला होता तर सुमेधा साठ टक्के भाजली होती. प्रवीण दोनच दिवसात मरण पावला. सुमेधा मृत्यूशी झगडत होती. तिच्या मुलांना तिचे नातेवाईक त्यांच्या घरी घेऊन गेले. इतकं सगळं घडल्यावर सुमेधाची आई व भाऊ नसते आले तरच नवल! सुमेधाचा भाऊ आता चांगल्या सरकारी नोकरीला लागला होता. त्याने सुमेधाच्या उपचारांची सगळी जबाबदारी घेतली . त्याने सुमेधाला सरकारी दवाखान्यातून एका चांगल्या  खाजगी दवाखान्यात नेले. तिथे सुमेधाला चांगले उपचार मिळाले. सुमेधाच्या भावाने तिची चांगली काळजी घेतली.


सुमेधा हळूहळू बरी होऊ लागली. ती सतत भावाजवळ प्रवीणची विचारणा करत असे. तिचा भाऊ मात्र काही तरी उत्तर देवून सुमेधापासून सत्य लपवत होता .आता सुमेधा पूर्ण बरी झाली.मग तिच्या भावाने तिला प्रवीण गेल्याचे सत्य सांगितले. सुमेधाला प्रवीण गेल्याचा धक्का बसला ती खूप रडली. तिने प्रवीणवर खरं प्रेम केले होते. प्रवीणने मात्र तिला प्रेमाच्या बदल्यात तिच्या शरिरावर जळल्याचे व्रण व मनात खूप सारे घाव दिले होते.


सुमेधा मुलांकडे पाहून लवकरच सावरली . एका वर्षातच ती पूर्ण बरी झाली आणि पुन्हा आपल्या मुलांबरोबर आपल्या घरी राहू लागली. सुमेधाचा भाऊ तिला काय हवे कायनको ते  पाहत होता. पण सुमेधाचे मन तिला खात होते. किती दिवस ती भावाकडून मदत घेणार होती? आधीच सुमेधाच्या भावाने तिच्या उपचारांसाठी खूप खर्च केला होता. आता सुमेधा पूर्ण म्हणून तिने भाऊ नको म्हणत असताना पुन्हा धुणीभांडी करू लागली.


तिची मुले हळूहळू मोठी होत होती. असेच पंधरा वर्षांचा कालावधी निघून गेला. आता सुमेधाची मोठी मुलगी लग्नाला आली होती. सुमेधाने तिच्यासाठी चांगले स्थळ पाहून तिचे लग्न करून दिले. तिचा मुलगा ही आता मोठा झाला होता. तो ही सुमेधाला काम करुन हातभार लावू लागला. शाळा करून तो पार्टटाईम काम करत होता. सुमेधाने तिच्या लहान मुलीचेही तिच्या परिणे चांगले स्थळ पाहून लग्न करून दिले.


आता ती मुलाबरोबर सुखाने राहू लागली. मुलाचेही योग्य मुलगी पाहून सुमेधाने लग्न केले. आणि सुमेधा तिच्या जबाबदारीतून मोकळी झाली.


सुमेधाने मनापासून प्रवीणवर प्रेम केले होते. तिने त्याच्याशी लग्नही केले, पण प्रवीण तिच्या प्रेमास, तिच्या विश्वासास पात्र ठरला नाही. त्याने सुमेधाला आयुष्यभर दु:ख दिले. आणि शेवटी जग सोडून जातानाही त्याने सुमेधाच्या मनावर व शरीरावर कधीही न मीटू शकणारे व्रण दिले. सुमेधाने प्रवीणवर नि:स्सीम प्रेम केले आणि  प्रवीणने सुमेधाच्या प्रेमाची परवड केली....

   

हि माझी पहिली वहिली कथा आहे जी पाच वर्षांपूर्वी मी लिहली होती. ही कथा सत्य असून सुमेधा( नाव बदलले आहे.) अजून जिवंत आहे आणि सुखाने जगत आहे. आपल्या समाजात चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून आयुष्याची माती करून घेणाऱ्या अनेक सुमेधा आजही आपल्याला पाहायला मिळतात.

©Swamini chougule 


अशाच मनोवेधक कथा वाचण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.
Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post