जाऊबाईचा स्वॅग भाग २ अंतिम

 




      आज पूजा  होती. पूजेला नववधू आणि नवरदेव बसले होते. अनिता सुंदरच दिसत होती. गावातले लोकं सून सुंदर मिळाली म्हणून कौतुक करत होते पण तरीही सगळ्यांच्या जिभेवर मात्र एकच नाव होते सुजाता. अनिताला मात्र ते खटकत होते. सुजाता आणि अविनाशची सकाळपासून धावपळ सुरू होती.संध्याकाळपर्यंत सगळे पाहुणे वगैरे निघून गेले. रात्रीची जेवणं झाली. तोपर्यंत सुजाता आणि अविनाशने अनिता- अनिकेतची रूम सजवली होती. 


आई,“अनिताला सोडून ये वर सुजाता मग  तू आणि अवी जेवण करून घ्या आणि जा आता तुम्ही ही झोपायला बाकी मी पाहते सगळं.”


सुजाता,“ चल अनिता मी घेऊन जाते तुला आणि  आई मी आवरू लागते. तुम्हाला एकटीने वेळ लागेल ना!” ती म्हणाली आणि अविनाश निघून गेला. अनिता तिथेच होती.


अनिता,“ नको मी जाईन माझी मी.” ती म्हणाली.


सुजाता,“ बरं जा तू आणि हा दुधाचा ग्लास घे.” ती दुधाचा ग्लास तिच्या हातात देत म्हणाली. पण अनिता दुधाचा ग्लास घेऊन तिथेच उभी राहिली होती. सुजाता मात्र पदर खोचून कामाला लागली.


आई,“, ऐकत जा तू. एक तर अवी सहा महिन्यांनी आला आहे तेही पंधराच दिवसांच्या सुट्टीवर त्यातले तर दहा दिवस लग्नाच्या धावपळीत गेले. तू फक्त या घरची सून नाहीस तर माझ्या अवीची बायको आहेस हे विसरू नकोस.(त्या बोलत होत्या आणि त्यांचे लक्ष अनिताकडे गेले.) आरे अनिता तू अजून इथेच? जा ना की मी येऊ सोडायला? की अनिकेतला हाक मारू? भीती वाटतेय का? अगं अनिकेत समजूतदार आहे. तुला तसं काही वाटत असेल तर आज माझ्याचजवळ झोपतेस का?” त्या मायेने विचारत होत्या.


अनिता,“ नको…तसं काही नाही. मी जाते.” ती अडखळत म्हणाली. सुजाता मात्र कामं आवरण्यात गुंतलेली होती.



आई,“बरं! सुजा जा तू अवी वाट पाहत असेल तुझी आणि  या वेळी मला तर बाबा गोड बातमी हवी. बास झालं तुमचं प्लॅनिंग बिनिंग! पाच दिवस आहेत हा अजून वाटलं तर उद्या अनिकेत अनिताला घेऊन फिरायला गेला की तुम्ही ही जा. आमच्या म्हाताऱ्यांची  अडचण होत असेल तर!” त्या सुजाताला हसून बोलत होत्या आणि अनिता दुधाचा ग्लास घेऊन थोडं पुढे जाऊन त्यांचे बोलणे ऐकत उभी होती.


सुजाता,“ आई तुमचं आपलं काही तरीच.” ती लाजून म्हणाली.


आई,“ बाई ..बाई लग्नाला तीन वर्षे होऊन गेली तरी अजून माझी सून लाजतेय? असं लाजून काही उपयोग होणार नाही या वर्षी मला तर बाबा नातवंड हवं. जा आता तो वाट पाहत असेल आणि उद्या मला सांग हा! ” त्या पुढचं वाक्य  हळूच तिच्या कानात म्हणाल्या.


सुजाता,“ तुम्ही पण ना आई सासू कमी आणि मैत्रीण जास्त आहात. आणि मी बरं असंच सांगेन उद्या तुम्हाला काही.” तीही हसून म्हणाली आणि आईही हसायला लागल्या. 


   दोघींचं बोलणं ऐकून अनिताचा मात्र तिळपापड झाला. ती दुधाचा ग्लास घेऊन निघून गेली पण मनात मात्र विचार करत होती.


‛ इथं नव्या सुनेचे कौतुक नाही आणि शिळ्या कडीला उत आला आहे. मम्मा म्हणाली की सगळ्यांची मनं जिंकून स्वतःचे स्थान निर्माण कर घरात. पण तिला काय माहित इथं आधीच कोणीतरी सगळी जागा अडवून बसले आहे. असो मला काय त्याचे उद्या फिरायला जायचं आणि तिकडच्या तिकडे माहेरी मांडव परतणीला. पुण्यात आधीच रेंटवर फ्लॅट घ्यायला लावला आहेच अनिकेतला डारेक्ट तिथेच जाणार नंतर… बसा म्हणावं सासू सुनाला गुळपीठ करत.’ ती या विचारातच रूममध्ये गेली.


    इकडे सुजाताला ही आईंनी जबरदस्तीने वर पाठवून दिलं. ती गेली तर अविनाश मोबाईल चाळत बसला होता. तिला आलेलं पाहून हसून तो म्हणाला.


अविनाश,“ आईने हाकलून दिले वाटतं?” 


सुजाता,“ हो ना!” ती तोंड फुगवून बेडवर बसत म्हणाली.


अविनाश,“ तरीच मॅडम इतक्या लवकर आल्या. सुजा आज तू खूप सुंदर दिसत होतीस.” तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला.


सुजाता,“ म्हणजे आता दिसत नाही का?” 


अविनाश,“ लॉ मी केलं आहे की तू गं? मला तर वाटतं तू उगीच एम फिल आणि पी.एच.डी वगैरे करत बसलीस. वकील झाली असती तर छान वाद घातला असतास.” तो तिचा हात हातात घेऊन बोलत होता.


सुजाता,“ हो का? पण मी काय म्हणते ऑल रेडी इतका ट्रेस असतो तुम्हाला. एक तर संवेदनशील क्षेत्रात ड्युटी आहे. मग एल.एल.एमचा अभ्यास करून कशाला अजून ट्रेस वाढवून घेताय तुम्ही? तुमच्या तब्बेतीवर परिणाम होईल अशाने. इथं मला काळजी वाटते ना तुमची.” ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलत होती.


अविनाश,“ ट्रेसच काय तो तर तुला बोलल्यावर पळून जातो आणि माझी बायको डॉक्टरेड होणार मग मी कमीत कमी  पोस्ट ग्रॅज्युएट असायला नको का मिसेस फैजी?” त्याने विचारलं.


सुजाता,“ हुंम म्हणजे मला काँपिटीशन देण्यासाठी चालले आहे तर सगळं.” ती म्हणाली.


अविनाश,“ तसं समज हवं तर पण सुजा मला अनिता थोडी घमंडी वाटली. अनिकेतची काळजी वाटते. मला कदाचित पुढच्या तीन महिन्यात प्रमोशन मिळेल आणि माझी पोस्टिंग तीन वर्षांसाठी आसामला होईल. त्यामुळे मी तुला तिकडे घेऊन जाण्याचा विचार करत होतो. मला वाटले होते की आई- अण्णा पुण्यात राहतील थोडे दिवस अनिकेतबरोबर पण अनिताला पाहून ते शक्य वाटत नाही.” तो काळजीने बोलत होता.


सुजाता,“ इतकी आनंदाची बातमी आणि अशी तोंड पाडून देताय. आणि अनितासाठी सगळं नवीन आहे. इतक्या माणसांची सवय नाही तिला, बिचारी गांगरून गेली असेल ना. आपण ती कशी आहे ते लगेच नाही ना ठरवू शकत.” ती त्याला समजावत म्हणाली.


अविनाश,“ हुंम तुझं ही बरोबर आहे.”


सुजाता,“ तुम्हाला तर प्रमोशन मिळणार आहे अभिनंदन मिस्टर फैजी! पण आईंना ही प्रमोशन हवं आहे आता आजीचे.” ती लाजून म्हणाली.


अविनाश,“ इतकंच ना मग देऊ की लवकरच.” तो हसून तिला मिठी मारत म्हणाला.

★★★


     अनिता आणि अनिकेत फिरायला म्हणून गेले आणि मांडव परतनी करून. अनिता गावी न जाता  डायरेक्ट पुण्यातल्या फ्लॅटवर राहायला गेली. तिच्या आई - वडिलांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की कमीत कमी महिनाभर तरी गावी राहायला हवे पण तिने कोणाचेच ऐकले नाही. इकडे अण्णा आणि आईंना देखील तिचे आणि अनिकेतचे वागणे आवडले नव्हते पण ते तसं काही बोलले नाहीत. अविनाश पुन्हा ड्युटीवर निघून गेला. 


दोन महिने असेच गेले आणि  सुजाताला मात्र इकडे बाळाची चाहूल लागली. आई आणि अण्णांना आनंद झाला. तिला डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या. आणि त्या पुण्यातील आर्मी हॉस्पिटलमध्ये करायच्या होत्या म्हणून एक दिवस अण्णांनी अनिकेतला फोन केला.


अण्णा,“ हॅलो! अनिकेत तुझ्याशी जरा बोलायचं होतं.”


अनिकेत,“ हा बोला ना अण्णा आणि वहिनीची तब्बेत कशी आहे?सगळं ठीक आहे ना? आईकडून मला बातमी कळली.” तो आनंदाने बोलत होता.


अण्णा,“ हो सुजू ठीक आहे पण तिला काही टेस्ट करायला सांगितल्या आहेत डॉक्टरांनी आणि त्या पुण्यातल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये करायच्या आहेत. आधी आम्ही पुण्यात आल्यावर तुझ्या मावशीच्या घरी राहायचो पण आता तुझं घर तिथे असताना तिच्या घरी जाणे अवघड वाटते. आम्ही तिथे काही दिवस येऊन राहीलं तर चालेल ना? नाही म्हणजे तुझ्या घराजवळून हॉस्पिटल देखील जवळ आहे. पोरगी अवघडली आहे तर जास्त दगदग नको व्हायला. नाही तर मी हॉस्पिटलजवळच असलेल्या आर्मी रुम्समध्ये  व्यवस्था करेन आमची तिथले डॉक्टर माझे मित्र आहेत.” ते बोलत होते आणि ते असं परक्यासारखं बोलत आहेत ते पाहून अनिकेतचा कंठ दाटून आला.


अनिकेत,“ असं परक्यासारखं  काय विचारताय अण्णा! मला माहित आहे मी असाच तुम्हाला न सांगता इथं निघून आलो म्हणून तुम्ही सगळे नाराज आहात पण अनिताच्या हट्टासमोर माझे काही चालले नाही. असो पण हे घर देखील तुमचेच आहे अण्णा आणि वहिनीच्या पोटातील बाळ माझा पुतण्या किंवा पुतणी आहे. तुम्ही कधी येताय सांगा मी येतो तुम्हाला स्टॅण्डवर घ्यायला.” तो आपुलकीने बोलत होता.


अण्णा,“ नको आम्ही गाडी करून येत आहोत. मग आम्ही तिघे परवा येतो.” ते म्हणाले आणि त्यांनी फोन ठेवला.


  अनिता अनिकेतचे फोनवरचे बोलणे ऐकत होती. 


अनिता,“ काय गरज होती तुला त्यांना इथं राहायला बोलवायची? एक तर आपण वन.बी.एच.के मध्ये राहतो. त्यांना कुठं ठेवणार डोक्यावर का?” ती चिडून म्हणाली.


अनिकेत,“ अनिता आधीच ते आपल्यावर नाराज आहेत. आणि अण्णांनी कुठेही सोय केली असती त्यांची. त्यांच्या आणि दादाच्या ही इथं ओळखी कमी नाहीत. पण आपलेही काही कर्तव्य आहे की नाही? मला आज अण्णा परक्यासारखे बोलले त्याचे वाईट वाटत आहे. आणि तुला इतकीच अडचण होत असेल तर काही दिवस तू जा तुझ्या माहेरी.” तो डोळे पुसत पण रागाने म्हणाला आणि निघून गेला.


अनिता,“ अरे वा मी बरी जाईन माझेच घर सोडून.” तीही चिडून म्हणाली.

★★★


    ठरल्याप्रमाणे आई- अण्णा आणि सुजाता अनिताच्या घरी राहायला आले. सुजाताच्या सगळ्या टेस्ट होऊन त्याचे रिपोर्ट्स यायला आणि तिला पुढची  ट्रिटमेंट द्यायला आठ दिवस तरी लागणार होते. दुसऱ्या दिवशीच तिच्या टेस्ट झाल्या. सुजाताला सतत मळमळ होत होती. तिला काही खावेसे वाटत नव्हतं. आई तिची सगळी काळजी घेत होत्या. अनिता मात्र दोन तीन दिवस अनिकेतच्या भीतीने त्यांच्याशी नीट वागली पण आता तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. सकाळी  फक्त तिचा आणि अनिकेतच्या डब्या पुरता स्वयंपाक करून घेऊन जाणे. संध्याकाळी आल्यावर काहीच काम न करणे.स्वतःचे कपडे मशीनला लावणे. पण आईंना मशीन वापरता येत नसल्याने त्या हाताने कपडे धुवून टाकत. असं ती वागायला लागली.  आई निमूटपणे कोणाला काहीच न बोलता सगळं करत होत्या. त्यांनी मनोमन ठरवले होते की चार पाच दिवसांचा प्रश्न आहे कसे तरी काढून निघून जायचं. पण अनिताच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. चार दिवस असेच निघून गेले 


  आज रविवार होता. अनिकेत आणि अण्णा त्यांच्या कामानिमित्त आर्मी ऑफिसला गेले होते.कालच सुजाताचे आणि पोटातल्या बाळाचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले होते त्यामुळे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता. आज रविवार असल्याने सोमवारी डॉक्टरांनी पुढची ट्रिटमेंट देण्यासाठी बोलावले होते. पण आज सकाळपासूनच  सुजाताची तब्बेत तशी ठीक नव्हती. तिला सतत मळमळ करत होते म्हणून ती झोपून होती. आईनी किचनमधून तिच्यासाठी मेतकूट भात घेतला आणि त्या हॉलमध्ये निघाल्या. तोच अनिता किचनकडे आली.


अनिता,“ मेतकूट भात वाटतं? पण आई तुम्ही का करत आहात हे सगळं वहिनीसाठी? तुम्ही सगळे तर रितिरिवाजाचे पक्के आहात ना मग रिती प्रमाणे हे सगळं तर वहिणींच्या आईने करायला हवं ना?” तिने मुद्दाम विचारलं.


आई,“ हो ना. पण सुजूची आईच सतत आजारी असते त्यांना संधिवात आहे आणि मीही तिची आईच आहे की मग मी केलं तिच्यासाठी तर कुठं बिघडलं.” त्या म्हणाल्या.


अनिता,“ तेही आहेच म्हणा सगळं आयतं होत असेल तर कोणाला नको वाटतं ना! असो आज माझ्या काही मैत्रिणी येणार आहेत भिशीची पार्टी आहे आज घरी. मी सगळं बाहेरून मागवलं आहे पण घर आवरून घ्यायचं आहे तेवढं घ्या आणि वाढायला वगैरे तेवढी माझी मदत कराल प्लिज? सहा वाजता येणार आहेत सगळ्या आणि वहिनीला म्हणावं आज तेवढं बेडरूममध्ये आराम करा.” ती नाटकीपणे हसून म्हणाली आणि निघून गेली.   आईनी सुजाताला थोडे खायला घातले.


आई,“ सुजू तू थोडावेळ बेडरूममध्ये आराम कर. अनिताच्या मैत्रिणी येणार आहेत आज. काय ती भिशी पार्टी का काय आहे तिची.” 


सुजाता,“ आई माझी तब्बेत ठीक आहे आता. झोपूनही मला कंटाळा आला आहे चला मी तुम्हाला मदत करते.”


आई,“ बरं बाई चल.” त्या म्हणाल्या.


  दोघींनी मिळून घर आवरले. अनिता तोपर्यंत नाश्त्याचे सामान घेऊन आली. आणि तयार व्हायला गेली. तोपर्यंत तिच्या मैत्रिणी यायला सुरुवात झाली होती. सगळ्यांचे हसण्या खिडळण्याचे आवाज येऊ लागले. सुजाता किचनमधून नाश्ता आणि कोल्ट्रीक्सच्या प्लेक्स भरून देत होती आणि आई त्या बाहेर पोहोच करत होत्या. त्या आता चांगल्याच थकलेल्या दिसत होत्या. दोघींना वाटले होते की अनिता मदत करेल पण ती मैत्रिणींशी गप्पा मारण्यात व्यस्त होती.


सुजाता,“ आई तुम्ही बसा इथे मी देऊन येते आता नाश्ता.” ती काळजीने त्यांना पाणी देत म्हणाली.


आई,“ नको गं. मी करते ना. तूच बस जरा.एक तर या सगळ्या वासाने तुला मळमळत असेल.” त्या म्हणाल्या.


सुजाता,“ असं काही नाही.” ती म्हणाली आणि 



   आई ट्रे घेऊन गेल्या तर एक मैत्रीण  अनिताला विचारत होती.


एक मैत्रीण,“ काय गं नवीन मोलकरीण ठेवलीस का?” 


अनिता,“ माझं नशीब कुठं इतकं आणि ये बाई हळू बोल त्या ऐकतील ना. त्या सासूबाई आहेत माझ्या.” ती म्हणाली.


दुसरी मैत्रीण,“ व्हॉट! लूक ऍट हर! किती गांवढळ आहे ती आणि आणखीन एक बाई आहे किचनमध्ये अशीच गांवढळ ती कोण आहे?”


अनिता,“ ती का माझी जाऊ आहे.व्हॉट कॅन आय डू!दे आर इललिट्रेट पीपल्स! केम फ्रॉम व्हिलेज. आता त्यांना कोण शिकवणार स्टॅण्डर्ड अँड ऑल दॅट!” ती खांदे उडवत म्हणाली.


दुसरी मैत्रीण,“ हाऊ चिप! बाय द वे व्हॉट डस युवर ब्रदर इन लॉ डू?” ती तोंड वाकडं करत म्हणाली.


अनिता,“ ही डू सम जॉब इन मिल्ट्री! यु नो दे हॅव नो चॉईज बीकॉज दे आर नॉट वेल एज्युकेटेड सो गो इन मिल्ट्री!” ती बोलत होती आणि इतका वेळ शांतपणे किचनच्या दारात उभं राहून  सगळं ऐकणारी सुजाता आईंना घेऊन तिथे आली.


सुजाता,“ डू यु रिअली थिंक दॅट? दॅन यु आर मेंटली सिक अनिता! डू यु नो हिस एज्युकेशन? इव्हन डू यु नो माय एज्युकेशन अँड आईज एज्युकेशन? अँड व्हॉट डू यु मीन बाय दॅट ही हॅव नो चॉईज? माय हजबंड गो इन मिल्ट्री बाय हिज वोन चॉईज अँड बाय द वे ही इस लॉयर बाय एज्युकेशन बट सोल्जर बाय प्रोफेशन. अँड उई ऑल प्राउड ऑफ हिम! काय समजतेस गं तू स्वतःला चार वाक्य इंग्रजीमध्ये बोलता आली की तू खूप शिकलेली झालीस काय? आणि माझा नवरा तिथे सीमेवर रोज लढत असतो ना म्हणून तुम्ही इथं असल्या पार्ट्या करता हे लक्षात ठेव आणि तो कोण आहे माहीत आहे का? कॅप्टन आहे तो तुझ्यापेक्षा कैक पटीने मोठ्या हुद्द्यावर आहे तो. तुम्ही दोघे नवरा बायको दोघे मिळून जितका पगार घेता ना तितका तो एकटा घेतो. तो तिथे आहे म्हणून तू इथं सुरक्षित आहेस. आणि तू तर त्यालाच कमी लेखत आहेस की चिप आम्ही नाही तू आणि तुझ्या या फालतू मैत्रिणी आहात.” ती रागाने तणतणत होती आणि तोपर्यंत अनिकेत आणि अण्णा आले.


अनिता,“ माईंट युवर टंग…आणि तुला चार वाक्य इंग्रजी बोलता आली म्हणजे तू माझ्या लेव्हलची होत नाहीस कळलं का? मी इंजिनिअर आहे. गावंढळ कुठली.” ती तोऱ्यात म्हणाली.


सुजाता,“ भाऊजी तुमच्या बायकोला आमच्याबद्दल  तुम्ही काहीच सांगितलेलं दिसत नाही. काय इंजिअर असल्याच्या फुशारक्या मारतेस गं! मी काय शिकले तुला माहीत आहे का? आय एम अ डॉ. सुजाता अविनाश सुभेदार! गेल्याच महिन्यात मला डॉक्टरेड मिळाली. तुझ्यापेक्षा कैक पटीने उच्चशिक्षित आहे मी. आणि यांना तू आणि तुझ्या मैत्रिणी अडाणी म्हणत होता ना? या ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी लग्नानंतर दोन मुलांना सांभाळून शिक्षण पूर्ण केलं आहे. आणि तुझ्या नवऱ्याला देखील यांनीच शिकवलं आहे बरं का! त्यांना तुम्ही काय बोलत होता हे समजत नव्हतं असं नाही पण भांडण नको म्हणून त्या गप्प होत्या.


   आणि तुम्ही शहरात राहणारे लोक काय समजता खेड्यात राहणाऱ्या लोकांना? आम्ही साधं राहतो. साधं वागतो म्हणजे आम्ही चिप का? आणि तुम्ही? हे असं दिखाव्याच जगता. आम्ही किती शिकलेले आहेत याचे प्रदर्शन मांडता म्हणजे खूप भारी का? यु स्टुबीड उमन यु डोन्ट नो अबाउट एज्युकेशन! यु डोन्ट नो अबाउट कल्चर अँड यु डोन्ट नो अबाउट युवर ओन फॅमिली अल सो!  भाऊजी सॉरी पण तुमचा चॉईज चुकला आहे. मला अविनाश तेंव्हाच म्हणले होते की ही मुलगी योग्य वाटत नाही. अँड ही व्हॉज राईट! ही फक्त वरच्या रंगला भुलणारी आहे.” ती बोलत होती.


अनिता,“ चॉईज चुकला म्हणजे? तुला काय म्हणायचं आहे? मी अनिकेतच्या योग्य नाही? हाऊ डेअर यु…..” ती पुढे बोलणार तर अनिकेत ओरडला.


अनिकेत,“ गप्प बस अनिता! मला माहित होतं की तुला वहिनी आणि आई आवडत नाहीत पण मी तुला समजून घेतलं कारण माझं प्रेम होतं तुझ्यावर आणि लग्न करून तुझी जबाबदारी घेतली होती मी पण तू इतक्या खालच्या पातळीवर जाशील माझ्या आईचा, वहिनीचा आणि दादाचा देखील अपमान करशील असं वाटलं नव्हतं मला. तू या खेड्यातील आहेत म्हणून यांना कमी लेखलेस मग मी पण खेड्यातूनच आलो आहे ना?” तो आता रागाने बोलत होता.


अनिता,“ तसं नाही अनिकेत. आणि मला माहित होती का यांची शिक्षणं आणि ऑल दॅट? मला तर वाटलं होतं की यांना इंग्रजी देखील…” 


अण्णा,“ की या तर खेड्यातून आल्या आहेत  यांना काय कळणार आहे  इंग्रजी? मग काहीही बोलू शकतो आपण यांना यांच्यासमोर  यांच्या विषयी हो ना?” त्यांनी विचारलं.


अनिता,“ तसं नाही अण्णा..” ती शरमेने खाली मन घालून म्हणाली.


अनिकेत,“ मग कसं? तुला मी खूप वेळा  सांगितलं सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या कुटूंबा विषयी पण तुला ऐकण्यात इंटरेस्ट नव्हता त्याचे कारण आज मला कळले. तू तर तुझ्या मनात ठरवून मोकळी झाली होतीस की माझ्या घरातले सगळे कमी शिकलेले गांवढळ आहेत. खरं तर वहिनी आणि दादा तुझ्या-माझ्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत. आई आणि अण्णा सुद्धा पदवीधर आहेत पण कधी कोणीच त्याचा मोठेपणा नाही मिरवला तुझ्यासारखा सॉरी आई- अण्णा, वाहनी! खरंच माझी चॉईज चुकली कदाचित! तुम्ही सगळ्या जाऊ शकता इथून.” तो गुडघ्यावर बसून अश्रू ढाळत बोलत होता.  सगळ्या बायका निघून गेल्या.


सुजाता,“ आई- अण्णा चला आपण पण निघू.” ती डोळे पुसून म्हणाली.


अनिता,“ सॉरी! मला माफ करा माझं खरंच चुकलं. मी पुन्हा असं कधीच वागणार नाही.” ती हात जोडून रडत बोलत होती. इतका वेळ शांतपणे सगळं ऐकून घेणाऱ्या आई आता बोलू लागल्या.


आई,“ अनिता माफी मागितली आणि चूक कबूल केली की सगळं ठिक होतं असं प्रत्येक वेळी होत नसतं. मी तू माझा केलेला अपमान एक वेळ विसरेन पण सुजाता आणि माझ्या अवीचा केलेला अपमान मी आई म्हणून नाही विसरू शकत. मला तू सकाळी विचारलंस ना की सुजाताला माहेरी का पाठवत नाही म्हणून तर ऐक तिच्या या नाजूक अवस्थेत खरं तर बाईला नवरा जवळ हवा असतो पण माझा मुलगा तिथे सीमेवर आपल्याच संरक्षणासाठी उभा आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. सैनिकाची बायको असणं काय असतं ते मी अनुभवलं आहे म्हणून या अवस्थेत मला सुजाताला तिच्या माहेरीच काय पण कुठेच सोडायचं नाही. या सगळ्या गोंधळात एक आनंदाची बातमी द्यायची राहिलीच आजच अविनाशचा फोन आला होता. त्याला प्रमोशन मिळाले आहे. तो आता मेजर झाला. मेजर अविनाश सुभेदार! आणि त्याची पोस्टिंग तीन वर्षांसाठी आसामला झाली आहे तर आम्ही तिघे ही जाणार आहोत तिकडेच. बाळाच्या बारशाला फोन करेन मी अनिकेत तुझ्या बायकोत काही सकारात्मक बदल झाला तर घेऊन ये तिकडे हिला. म्हणजे सैनिक काय असतो. तो कसा राहतो आणि त्याची फॅमिली कशी रुबाबात जगते ते हिला पहायला मिळेल. म्हणजे पुन्हा बाप जन्मात ही सैनिक आणि त्यांच्या पत्नीला कमी लेखणार नाही. सुजाता मी आपल्या बॅगा घेऊन आले.” त्या अभिमानाने म्हणाल्या.


   आपण कोणाच्या राहणीमानवरून कोणाचे शिक्षण किती आहे आणि कोण कोणत्या पदावर आहे हे ठरवू शकत नाही. 


©swamini chougule


अशाच मनोवेधक कथा वाचण्यासाठी फॉलो आणि लाईक करा आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला

   .









   









        


Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post