ब्रोकन बट ब्युटीफुल भाग 17(अंतिम)

  



      किमया आणि अपूर्वच्या लग्नाला पाच दिवस राहिले होते. पण एक महिन्या  दरम्यान दोघेही एकमेकांना भेटत होते आणि दोघांचे बऱ्याच वेळा संबंध आले होते. लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात होती खरेदी आणि बाकी तयारी तर होत आली होती. सगळ्या बिझनेस सर्कल आणि पाहुणे तसेच बाकी लोकांना दोन्हीकडून आमंत्रणे गेली होती. एक पंचतारांकित हॉटेल आणि तिथलाच लॉन लग्नासाठी बुक करण्यात आला होता.



   सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. सम्यक आणि अपूर्वही आता रीलॅक्स होते कारण अपूर्वच्या खबऱ्याकडून दहा दिवस आधीच कळले होते की पाटील त्याची बायको मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आजारी पडली होती आणि  म्हणून तो त्याच्या बायको आणि मुलीला घेऊन विदेशात गेला होता. सम्यक आणि अपूर्वला पाटील किमयाला इजा पोहोचवेल किंवा लग्नात अडथळा निर्माण करेल अशी भीती होती पण तोच बाहेर निघून गेला म्हणल्यावर कोणताही दगा फटका होण्याचा चान्सच नव्हता. 



   मुहूर्तमेंढ रोवून, हळद दळण्यात आली. गेले आठ दिवस झाले दोन्ही घरे पाहुण्यांनी नुसती फुलून गेली होती. जयेशरावांना संगीत, मेहंदी वैगरे अपारंपरिक चोचले पटत नव्हते त्यांच्या मतानुसार लग्न हा एक पवित्र संस्कार आहे तो आपल्याच रितीरिवाजानुसार व्हायला हवा त्यामुळे किमयाला घरातच मेहंदी लावण्यात आली. पाहता पाहता लग्नाचा दिवस उजाडला. किमया अजून झोपलीच होती की अपूर्वचा फोन तिला सकाळ सकाळ आला.


किमया,“ हॅलो. बोल.” ती आळसावलेल्या आवाजात म्हणाली.


अपूर्व,“ तू अजून झोपली आहेस? आज आपलं लग्न आहे मॅडम.”


किमया,“ हो माहीत आहे मला पण ते संध्याकाळी आहे. आणि आत्ता सकाळचे सहा वाजले आहेत अपूर्व.” ती त्याच आवाजात घड्याळ पाहत बोलत होती.


अपूर्व,“ हो पण तुला काही माझी आठवण वगैरे येते की नाही?” त्याने  लहान मुलासारखं विचारलं.


किमया,“ अपूर्व आपण पाच दिवसांपूर्वीच भेटलो आहोत आणि तुला जे हवं होतं ते तुला मिळालं आहे. विसरलास का? रात्री दोन वाजता घरात इतके पाहुणे असताना  मी कशी घरात घुसले मला माहित.” ती बोलत होती.


अपूर्व,“ हो जसं काही सगळं मलाच एकट्याला हवं असतं तुला काहीच नको असते ना! आणि पाच दिवस झाले त्या गोष्टीला. तब्बल पाच दिवस झालं तुझा चेहराही मी पाहिला नाही.” तो बोलत होता.


किमया,“ आणि रात्री व्हिडीओ कॉलवर कोण बोललं मला? आणि हो बाबा मला ही सगळं हवं असतं. पण जरा दम खा आज आपलं लग्न झालं की मी तुझ्याबरोबरच असणार आहे ना कायमची.” ती हसून त्याला समजवत म्हणाली.


अपूर्व,“ हो बरं ठेवतो मी डॅड ना नुसती धावपळ करत आहे. त्याला एका जागेवर बस म्हणून किती वेळा सांगितलं पण ऐकत नाही. अशाने याची तब्बेत बिघडायची मी पाहतो काय करतोय तो.” तो म्हणाला.


किमया,“ ओके बाय आणि लव यु.” ती म्हणाली 


अपूर्व,“ बाय अँड हेट यु.” तो हसून म्हणाला आणि त्याने फोन कट केला.

★★★



   संध्याकाळी  साडे सहाचा मुहूर्त होता. किमया आणि त्यांचे बाकी वऱ्हाड दुपारी तीन वाजताच हॉटेलवर पोहोचले होते. अपूर्वचे काही नातेवाईक आधीच हॉटेलमध्ये गेले होते तर काही घरून निघणाऱ्या अपूर्वच्या  वरातीबरोबर पोहोचणार होते. पाच वाजल्यापासून पाहुणे यायला सुरुवात झाली. सम्यक आणि जयेशराव सगळ्यांचे जातीने  स्वागत करत होते. हिरव्यागार लॉनच्या मधोमध एक छोटे तळे होते.त्या ताळ्यावर छोटे बेट तयार केले होते  आणि तिथे फुलांचा सुंदर मंडप सजवण्यात आला होता. सम्यकने  वरात निघाली का म्हणून अपूर्व आणि शामराव बिझी असतील म्हणून त्यांच्या एका नातेवाईकाला फोन केला तर त्यांनी वरात निघाली आहे असं सांगितलं.लागलीच सम्यक वर किमयाच्या रूममध्ये गेला. पार्लरवाली तिचा मेकअप करत होती.


सम्यक,“ आवर किट्टू वरात निघाली आहे. सहा वाजेपर्यंत सगळे पोहोचतील.”


सुधा,“ मी पण तेच सांगायला आले आहे.”


किमया,“ हो आवरते मी तुम्ही जा. तुम्ही गेल्याशिवाय मी तयार होणार आहे का? अजून शालू नेसायचा आहे मला.”


सम्यक,“ हो बाई जातो. चल आई!” तो हसून म्हणाला आणि सुधाला घेऊन गेला.



दोन तासानंतर….


   किमया तयार होऊन कधीचीच बसली होती. आता मुहूर्ताची वेळ सुद्धा टळून गेली होती तरी अजून ना अपूर्वचा पत्ता होता ना वरातीचा. तिने, सम्यक आणि सुधा-जयेशरावांनी आधी त्याचे नातेवाईक मग अपूर्व आणि शामरावांना अनेक वेळा फोन लावले होते पण कोणीच फोन उचलत नव्हते. सगळेच चिंतीत होते किमयाच्या मनात नानाविध शंका येत होत्या आणि ती सतत रडत होती.आता आठ वाजून गेले होते आणि लग्नासाठी जमलेले पाहुणे वैतागून एक एक करून निघून जात होते. शेवटी सम्यक म्हणाला.


सम्यक,“ मीच अपूर्वच्या घरी जाऊन पाहून येतो काय झालं आहे ते?” तो म्हणाला आणि अपूर्व एकटाच लॉनच्या प्रवेशद्वारातून आत येताना दिसला. तसं किमयाची कोणी तरी बहीण धावत किमयाला अपूर्व आला आहे म्हणून सांगायला गेली आणि किमया धावतच लॉनकडे निघाली.


        पण अपूर्वला पाहून सगळे चकित झाले होते कारण तो नवरदेवाच्या रुपात तिथे आलाच नव्हता. ना अंगावर शेरवानी होती ना कपाळाला मुंडावळ्या. तो थ्रिपिस फॉर्मल कपडे घालून आला होता.


सम्यक,“ हे काय अप्पू तू एकटाच आलास? काका आणि बाकी वऱ्हाडी कुठे आहेत? आणि तू एकटा असे कपडे घालून का आला आहेस?” त्याने आश्चर्याने विचारलं.


अपूर्व,“ अरे जरा थांब ना. तुझ्या बहिणीला  तर येऊ दे.” तो बोलत होता. 



   तोपर्यंत किमया तिथे आली. किरमीची रंगांची काष्ठा घालून नसलेली नव्वारी पैठणी तिचा गोरा रंग खुलवत होती, केसांचा खोपा, गालांवर रुळणारे मुंडावळ्यांचे टपोरे मोती,कानात मोठे झुमके ,हातात हिरवाकंच चुडा,गोऱ्या हातावर गहिरी चॉकलेटी रंगलेली मेंहंदी,गळ्यात पारंपरिक दागिने पण चेहऱ्यावरचा मेकअप रडून अर्धवट पुसलेला आणि डोळे रडून सुजून लाल झालेले. अशा अवतारातली किमया अपूर्वसमोर उभी होती. तिने अपूर्वला पाहिलं आणि तेवढ्या लोकांमध्ये त्याला मिठी मारली ती लहान मुलीसारखं रडत बोलत होती.  

  

किमया,“ कुठे होतास तू अपूर्व? माझ्या मनात किती शंकाकुशंका आल्या. मला वाटलं तुला काही झालं तर नसेल ना? पण इतका वेळ का लावला तू? बघ मुहूर्ताची वेळ देखील टळून गेली.” 


अपूर्व,“ ये सोड मला आधी आणि लांब राहायचं माझ्यापासून उगीच नसती लगड करायची नाही आ.” तो किमयाला धक्का देत तिला झिडकारून म्हणाला. बेसावध किमया पडणार तर सुधाने तिला सावरले.


जयेशराव,“ हे काय आणि कसं  बोलतो आहेस तू अपूर्व? आणि किमयाशी असं का वागत आहेस तू? शाम कुठे आहे? तू एकटाच कसा आलास?” ते रागाने विचारत होते


अपूर्व,“ सांगतो सांगतो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील.(असं म्हणून त्याने तिथलीच एक खुर्ची घेतली आणि त्यावर तो ऐटीत पायावर पाय देऊन बसला. सगळे लोक आणि किमया त्याला नुसती अवाक होऊन पाहत होती.) डॅड येणार नाही त्याने मला तुला काय करायचं ते कर म्हणून सांगितलं आहे. आणि  तुम्ही मला विचारताय की मी तुमच्या मुलीशी असा का वागत आहे ते? तुम्ही विसरलात तुमची ही मुलगी माझ्याशी माझ्या डॅडशी देखील कशी वागली आहे ते?” तो रागाने म्हणाला.


सम्यक,“ नेमकं तुला म्हणायचं काय आहे अपूर्व?” त्याने विचारलं.


अपूर्व,“ हुंम तू ना सम्यक भाई हुशार आहेस पॉईंटचे बोलतोस. तुम्हाला आणि या तुमच्या मुलीला काय वाटलं की माझा हिने पदोपदी अपमान केल्यावर इतकंच काय माझ्या डॅडचा देखील अपमान केल्यावर मी हिच्यावर तरीही प्रेम करेन आणि हिच्याशी लग्न करेन? हाऊ फुलीश यु आर!” तो कुच्छितपणे हसून म्हणाला.


सुधा,“ पण तूच किमयाशी लग्न करणार म्हणालास ना अपूर्व?” त्यांनी विचारलं.


अपूर्व,“ हो म्हणालो ना! कारण मला तुमच्या या किमयाचा अहंकार हिचा घमंड तोडायचा होता. ही स्वतःला समजते कोण? चार आंदोलनं काय केली आणि चार नारे काय लावले की ही मदर टेरेसा झाली का? हिला नोबेल मिळायला? हिने सतत माझा माझ्या भावनांचा अपमान केला पण अम्मूने माझी आई गेल्यावर मला आईचे प्रेम दिले माझ्यावर मायेची पाखरण केली त्या ऋणात राहून मी गप्प बसलो. पण हिने हद्द तर तेंव्हा पार केली जेंव्हा हिने माझ्या डॅडचा अपमान केला. माझा डॅड माझ्यासाठी सर्वस्व आहे. तो माझा मान आहे आणि त्याच्याशी असं बोलायची हिम्मत त्या दिवसापर्यंत कोणीच केली नव्हती. आणि रक्ताच्या नात्यापुढे मानलेलं नातं फोल ठरलं त्याच दिवशी मी या उद्दाम आणि उद्धट मुलीला धडा शिकवण्याचा चंग बांधला. मला हिला असा धडा शिकवायचा होता की हिने आयुष्यभर लक्षात ठेवायला हवा.


   आणि नियतीचे फासे माझ्या बाजूने पडत गेले. हिच्यावर गोळीबार होणार हे मला कळलं आणि मग काय मी पोहोचलो हिरो बनून हिला वाचवायला. झालं गोळी माझ्या दंडाला चाटून काय गेली ही किमया माझ्या प्रेमात पडली. हा मला माझे रक्त सांडावे लागले त्यासाठी पण युद्धात रक्त तर सांडणारच ना!मग काय लागल्या मॅडम माझ्या मागे पुढे  करायला. माझ्या रूमबाहेर आंदोलनासाठी काय बसल्या. मग गायब काय झाल्या मला चांगलं माहीत होतं ही कुठे जाऊ शकते ते म्हणून मग हिला मी त्यादिवशी घ्यायला गेलो. तिला घेऊन मी घरी सोडणार होतो. मला फक्त हिला प्रेमाचं नाटक करून लग्नाचा घाट घालून हिचा अपमान करून हिला सोडून द्यायचे होते. पण त्या रात्री ही मूर्ख मुलगी ऐकायलाच तयार नव्हती. एक तर जंगल गाडीच्या कडेने कोल्हे गोळा झाले आणि मला हिला घेऊन गाडीच्या छतावर चढावे लागले. तिथे ही माझ्या गळ्यातच पडली. मी हिला समजावलं पण ऐकेच ना. स्वतःला रोखण्याचा प्रयत्न केला कारण अम्मूने केलेली माया पण मीही एक पुरुष आहे शेवटी माझा कंट्रोल सुटला. मग काय मलाही हिच्याबरोबर मजा यायला लागली. त्यानंतर ही तुम्हा सगळ्यांना चोरून माझ्याबरोबर किती वेळा झोपली विचारा तिला. जी मुलगी लग्नाआधीच एका मुलांबरोबर झोपते तिला काय म्हणतात माहीत….” तो पुढे बोलत होता आणि सगळे तिथे उरलेले पाचशेच्यावर लोक ऐकत होते . तो पुढे बोलणार  तर त्याच्या गालावर एक सणसणीत झापड बसली. त्याला वाटलं किमया असेल पण किमया तर त्याच्यासमोर गुडघ्यावर बसून रडत होती सुधाने त्याला मारलं होतं. किमया उठली आणि त्याच्याजवळ गेली आणि बोलू लागली.


किमया,“ मग आत्तापर्यंत आपल्यात जे होते जे झाले ते काय होते अपूर्व? तू दाखवलेलं प्रेम ते नाटक होतं का सगळं?” तिने रडत विचारलं.


अपूर्व,“ अगं बिनडोक मुली आत्तापर्यंत मी काय  बोलत होतो तुला नाही कळलं का? मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही मी जे केलं तो माझा सूड होता. मी तुला कधी तरी आय लव यु म्हणालो का? मी तर तुला खरंच सांगत होतो ना आय हेट यु म्हणून पण तुला नाही कळलं ते तर त्यात माझा काय दोष? तुला मला वापरायचं नव्हतं. पण तूच माझ्या गळ्यात पडलीस. तुला मी म्हणालो देखील होतो यु आर ब्रोकन मी! आणि एकदा  तुटलेला व्यक्ती फक्त तोडू शकतो जोडू शकत नाही. म्हणून मीही तुला ब्रोक केलं. पण यु नो दॅट यु आय ब्रोकन बट स्टील ब्युटीफुल! मी तुझ्याबरोबर रंगवलेल्या रात्री कधीच विसरणार नाही आणि मला माहित आहे तुही विसरू शकणार नाहीस. आणि अम्मू मला मारून सत्य बदलणार आहे का? तुमच्या मुलीने लग्ना आधीच तोंड काळं केलं आहे. आणि अशा मुलींना आपला समाज काय म्हणतो तुम्हाला माहित आहे ना?” तो कुच्छितपणे गाल चोळत म्हणाला आणि किमया पायातून बळ गेल्यासारखी खाली बसली आणि रडायला लागली. तिच्या कानात अपूर्वचा एक एक शब्द सिशाचा  उकळता रस ओतावा तसा तप्त असल्यासारखा शिरत होता. तिच्या काळजावर ओरखडे उठवत होता.सुधाला मात्र त्याचे बोलणे सहन झाले नाही आणि तिने त्याच्या दुसऱ्या गालावर ही पाच बोटे उमटवली.


सुधा,“ खरबरदार पुढे एक शब्द काढशील तर? आणि पुन्हा माझा उल्लेख अम्मू म्हणून करशील तर! ज्या अप्पूला मी छातीशी लावून सांभाळले तू तो अप्पू राहिला नाहीस कळलं तुला? आणि हो माझी किमया आहे उद्धट पण ती उद्दाम नाही. तिने केला आहे तुझा अपमान पण तो तिच्या गैरसमजातून.तिचे चुकलं आणि तिने त्यासाठी तुझी अनेक वेळा माफी देखील मागितली. तिने शाम भाऊजींचा अपमान केला तर तिच्या बाबांनी तिला मारलं तिच्याशी बोलणं टाकलं. तिला तिच्या चुकीची शिक्षा मिळाली. आणि तिची चूक ही तिला कळली. माझी किमया भोळी आहे रे तिला नाही कळत छक्के पंजे. तिने तुझ्यावर प्रेम केलं तुझ्यावर विश्वास ठेवला. तिचे सर्वस्व तुला दिलं  पण तू  त्या लायकीचा निघाला नाहीस. बिन आईचे आणि बिन बहिणीचा; रानटी पुरुषांसारखा  वाढलेला तू! तुला काय कळणार स्त्रीचे हळुवार मन तिच्या भावना. तुला माझ्या किमयाचे मन नाही दिसले फक्त शरीर दिसले आणि त्याचा उपयोग तू स्वतःचा पुरुषी अहंकार शमवण्यासाठी केलास? मला लाज वाटते की मी तुला मुलगा मानलं तुला आईचे प्रेम देण्याचा प्रयत्न केला पण तू कशाच्याच लायक नाहीस. ना प्रेमाच्या ना मायेच्या! म्हणूनच तुझी आई तुझ्या लहानपणीच देवाने नेली.


                तुला काय वाटलं असं माझ्या मुलीला भर समाजात अपमानित करून तू जिंकलास? तर लक्षात ठेव द्रौपदीला ही कौरवांनी अपमानित केलं आणि ते जिंकले असं वाटलं त्यांना पण प्रत्यक्षात ते हरले. तूही तसाच हरणार आहेस. तुला आयुष्यात कधीच सुख मिळणार नाही. तू कायम प्रेमासाठी आणि मायेसाठी भुकेला राहशील पण तुला दोन्ही मिळणार नाही. तू तुझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत एकटा राहशील आणि एकटा मरशील. तू ज्या स्त्रीचा तिच्या चारित्र्याचा तिच्या प्रेमाचा, समर्पणाचा अपमान केलास तिचा सहवास तुला कधीच लाभणार नाही. हा एका आईचा शाप आहे. तळतळाट आहे तुला! निघ आता. माझ्या मुलीला मी या सगळ्यातून सावरेन आणि पुन्हा उभं करेन. पण तुझी कर्म तुला भोगावी लागतील अपूर्व पवार!” त्या तळतळून बोलत होत्या.


 अपूर्व,“ हो बघू ना इतके गुण उधळल्यावर तुमची मुलगी कशी उभी राहणार आहे पुन्हा मिसेस मुजुमदार आणि हे सातयुग नाही शाप वगैरे फळायला. हे कलयुग आहे. आणि हो मी काही चुकीचं केलं नाही. ही तुमची मुलगीच बळेच माझ्या गळ्यात पडली निर्लज्ज कुठली!” तो कुच्छितपणे बोलत होता आणि सम्यक त्याच्या अंगावर त्याला मारायला गेला तर त्याच्याबरोबर आलेल्या चार बॉडीगार्डनी त्याला अडवलं.


जयेशराव,“ सम्यक बाजूला हो! याला मारून तू का तुझा हात घाण करून घेत आहेस? पण मला शामशी बोलायचं आहे इतक्या वर्षांची मैत्री आणि त्याचा मुलगा माझ्या मुलीशी असा वागला? तो खरं तर इथं हजर हवा होता.” ते बोलत होते.


सम्यक,“ कोणत्या तोंडाने येणार आहेत ते बाबा? यानेच त्यांना गप्प बसायला भाग पाडले असेल. शेवटी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे ना हा! त्यांच्याशी बोलून काही उपयोग नाही. तुमचा सगळ्यांचा बिनपैशाचा तमाशा पाहून झाला असेल तर निघा आता. आणि तू अपूर्व पवार गेट लॉस्ट!” तो रागाने ओरडला.


 अपूर्व जसं काही घडलेच नाही अशा अविर्भावात निघून गेला.त्याच्या पाठोपाठ तिथे जमलेली लोकं एकमेकांशी दबक्या आवाजात चर्चा करत निघून गेली आता लॉनमध्ये फक्त चौघे राहिले होते.


   किमया खाली बसून लहान मुलीसारखी हुंदके देऊन रडत होती.सुधाने तिला जाऊन कुशीत घेतलं.


            ★★समाप्त★★


  अरे रुको जरा सबर करो. कहानी अभी बाकी है मेरे दोस्त! किमयाचे पुढे काय झाले? अपूर्वला सुधाने दिलेला शाप फळला का? शामराव अपूर्वच्या अशा चुकीच्या वागण्यावर देखील गप्प का होते की सम्यक म्हणाला तसं एकुलत्या एक मुलाच्या पुढे त्यांना झुकावे लागले होते? ये हिरो तो व्हिलन निकला रे बाबा!


पाहुयात ब्रोकन बट ब्युटीफुल सिझन 2 मध्ये लवकरच….

©swamini chougule 







  

  



      

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post