रात्रीचे दहा वाजले होते आणि रितेश नेहमीप्रमाणे ऑफिसमधून उशिराच घरी आला होता. त्याची आई वैशाली त्याचीच वाट पाहत बसली होती. रितेश येऊन बसतो न बसतो त्यांनी तक्रार सुरू केली.
वैशाली,“ रितेश मला बाबा वैजू (त्यांची मुलगी) कडे नेऊन सोड. तुझ्या बायकोला मी इथं नकोच आहे.” त्या बोलत होत्या.
रितिका,“ आई त्याला श्वास तरी घेऊ द्या जरा. बिचारा आत्ताच आला आहे ऑफिसमधून.” रितेशची बायको त्याला पाण्याचा ग्लास देत. वैशालीला म्हणाली.
वैशाली,“ आता मी माझ्या मुलाला कधी काय बोलायचं हे पण तू ठरवणार का?” त्या उचकल्या.
रितेश,“थांब रितिका तू; हा बोल आई काय झालं आता?” त्याने पाणी पिऊन विचारलं.
वैशाली,“ आज माझ्या बी.पीच्या गोळ्या संपतात. हिला म्हणाले की घेऊन ये जाऊन तर म्हणाली की रुताची तब्बेत ठीक नाही. ती खूप किरकिर करत आहे तर तुम्हीच घेऊन या. मला मेलीला जायचं असतं तर हिला सांगितलं कशाला असतं मी? माझे पाय आजकाल जाम दुखतात रे. ते काही नाही तू मला वैजूकडे सोडून ये.” त्या डोळ्याला पदर लावून बोलत होत्या.
रितेश,“ रितिका तू घेऊन आली असतीस गोळ्या तर काय बिघडणार होते का तुझे?” त्याने थोडे रागातच विचारलं.
रितिका,“ मी जाते म्हणाले फक्त रुताकडे लक्ष द्या. तर तिला घेऊन जा म्हणाल्या या.एवढासा जीव तो तिची छाती सर्दीने जाम भरली आहे रे.आणि असल्या पावसाळी वातावरणात तिला घेऊन गेले तर अजून त्रास होईल ना तिला. एक तर दिवसभर नुसती किरकिर करत होती. मी घरातली सगळी कामं तिला कडेवर घेऊन केली.”
वैशाली,“ मला तुझी पोरगी नाही आवरत बाबा! खूप चुळबुळी आहे आणि त्याहून माझ्याकडे राहत पण नाही ती.” त्या तोंड वाकडं करत म्हणाल्या.
रितिका,“ का वैजू ताईंचा विनू तर सहज आवरतो की तुम्हाला आणि तुम्ही कधी तरी माझ्या रुताला प्रेमाने जवळ घेतले का? मग कशी येईल ती तुमच्याजवळ?” तिचा ही तोल आता ढळला होता.
वैशाली,“ बघ तू समोर असताना ही कशी बोलते मग तू ऑफिसला गेल्यावर कशी वागत असेल माझ्याशी विचार कर?” त्या कांगावा करत म्हणाल्या.
रितेश,“ कुठला विषय तू कुठे घेऊन जात आहेस रितिका? आणि घेऊन गेली असतीस रुताला मेडिकलमध्ये तर इतकं आभाळ कोसळले नसते गं.” तो रागाने म्हणाला.
रितिका,“ काय? तुला बायको म्हणून माझी किंमत कधीच नव्हती पण बाप म्हणून रुताची काळजी असेल असं वाटत होतं मला पण तो माझा भ्रम होता. ती अवघ्या चार वर्षांची आहे रे. आणि सात वर्षे झालं मी तुझ्या आईची आणि बहिणीची आरेरावी सहन करत आहे. तुला वडिलांची सरकारी नोकरी दिली. म्हणून दोघी कायम मला घालून पाडून बोलतात. खाजगीत का असे ना मी पण नोकरी करत होते. लग्न झालं आणि सहा महिन्यात यांनी घरचं कोण करणार? म्हणून मला घरी बसवलं. या नुसत्या बसून असतात. घरातलं सगळं मी करायचं. बाहेरच आणणे- ठेवणे तेही मीच करायचं. त्यांना माझी नाही तर त्यांच्याच नातीची सुद्धा कणव येत नाही. गेल्या महिन्यात मी रुताकडे लक्ष द्या मी दळण आणि भाजी घेऊन येते म्हणून बाहेर गेले तर या यांच्या बेडरूममध्ये फोनवर बोलत बसल्या आणि रुता हॉलमध्ये खुर्चीवर चढायला जाऊन पडली. तरी बरं तिला जास्त लागलं नाही. वैजूताई समोर माझ्या कुचाळक्या करतात आणि त्या म्हणतील तसं आई वागतात. हे मला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला आई?” ती ही आता रागाने बोलत होती.
वैशाली,“ माझ्यावर आणि माझ्या मुलीवर उगीच बिनबुडाचे आरोप लावू नकोस तू! अहो पाहताय ना तुम्ही? तुमच्याबरोबर मलाही का घेऊन गेला नाहीत तुम्ही. अकाली तुझे वडील गेले आणि आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.पण मी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून तुम्हाला वाढवलं.” त्या रडत बोलत होत्या.
रितिका,“ काय बोलताय आई अहो बाबा गेले तेंव्हा रितेश ग्रॅज्युएट झाला होता आणि वैजूताईंचे तर लग्न ठरले होते.” ती आश्चर्याने बोलत होती.
वैशाली,“ हो तरी हे गेल्यावर रितेशच्या कामासाठी खटपट कोण केली? त्याला नोकरीला कोणी लावले? वैजूचे आणि तुमच्या दोघांचे लग्न कोण केलं?माझ्या मुलाला सरकारी नोकरी आहे म्हणून तर तुझ्या बापाने तुला आमच्यात दिलं ना? काही नाही हिने त्या कार्टीला खूप लाडावून ठेवले आहे. नुसतं माझी रुता माझी रुता! आम्हाला मुलं होती की नाही? आणि तिच्या नावाखाली हिलाही कामचोरपणा करायला मिळतो ना! ऐतखाऊ कुठली!” त्या तणतणत होत्या.
रितिका,“ माझ्या मुली विषयी एक शब्द ऐकून घेणार नाही मी अहो चार वर्षांचे लेकरू आहे ते. तिच्या विषयी तुमच्या मनात इतकं विष? आणि मी कामचोर आणि ऐतखाऊ नाही, तुम्ही आहात कामचोर आणि ऐतखाऊ.” तिचा ही तोल आता ढळला होता. रितेश मात्र रितिकाचे बोलणे ऐकून चांगलाच संतापला आणि त्याने तिच्या कानाखाली एक लागवून दिली.
रितेश,“ तोंड सांभाळून बोलायचं माझी आई आहे ती.” तो ओरडला.
रितिका,“ हो त्या तुझ्या आई आहेत आणि मी आणि रुता तुझ्या कोणीच नाही ना? आज तू तुझी हद्द पार केली रितेश मला वाटलं होतं तू तरी मला समजून घेशील पण नाही. तुही तसाच निघालास. मी एक क्षण ही इथं थांबणार नाही. माझ्या मुलीला घेऊन मी जाते.”
ती रडत म्हणाली आणि बेडरूममध्ये गेली तिने कपटातले हाताला येतील ते कपडे भराभर बॅगेत भरले आणि रुताला घेऊन आहे त्या अवतारात निघाली. रितेश तिच्या मागोमाग गेला.
रितेश,“ थांब रितिका इतक्या रात्री कुठे निघालास एकटी? सॉरी माझं चुकलं. मी तुझ्यावर हात उचलायला नको होता.” तो तिला समजावत म्हणाला.
रितिका,“ हा विचार तू आधी करायला हवा होतास रितेश. मला आता तुझ्या आईबरोबर आणि तुझ्याबरोबर एका घरात राहणे शक्य नाही. तुला घटस्फोटाची नोटीस लवकरच मिळेल. आणि आमची काळजी तुला करायची गरज नाही. तू बस तुझ्या आईला घेऊन.”
ती रडत झोपलेल्या रुताला कडेवर घेत म्हणाली आणि घरातून बाहेर पडली. रितेश तिच्या पाठोपाठ निघाला.
वैशाली,“ कुठे निघालास तू? आरे कुठे जाणार आहे ती? येईल चार दिवस माहेरी राहून.” त्या फणकाऱ्याने म्हणाल्या.
रितेश,“ आई प्लिज आता तरी जरा शांत हो ना.” तो चिडून म्हणाला आणि रितिकाच्या मागे गेला.
रितिकाने रोडवर जाऊन टॅक्सी बोलावली आणि ती रितेश तिथे पोहचेपर्यंत निघून ही गेली. रितेश आणि रितिकाचे लग्न होऊन सात वर्षे झाली होती. रितेशचे वडील मुंबई महानगर पालिकेत चांगल्या पदावर कार्यरत होते. रितेश नुसताच बी.कॉमची डिग्री घेऊन बाहेर पडला होता. त्याला एम.बी.ए करायचे होते पण अचानक त्यांच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. आणि घरची सगळी जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. वैजयंती म्हणजे त्याची मोठी बहीण तिचे लग्न ठरले होते. आई- बहीण यांच्या जबाबदारी पोटी त्याने पुढच्या शिक्षणाची इच्छा मनातच मारली. वडिलांचा फंड वगैरे मिळाला त्यात वैजयंतीचे लग्न झाले. रितेशला अनिच्छेने का असेना वडिलांची अनुकंपातत्वावर मिळालेली नोकरी स्वीकारावी लागली. त्या नोकरीबरोबर वडिलांनी घरासाठी काढलेलं कर्ज देखील आलेच.
नोकरी लागून दोन वर्षे झाली आणि रितिकाचे स्थळ त्याला सांगून आले. देखणी आणि हुशार रितिका त्याला पाहता क्षणीच आवडली. रितिका एम.कॉम झालेली आणि एका कंपनीत नोकरी करणारी मुलगी होती. पण वैशाली ताईंना आणि वैजयंतीला इतकी शिकलेली मुलगी पसंत नव्हती. पण रितेशच्या हट्टापाई दोघींना हार पत्करावी लागली. आणि रितिका त्यांच्या घरात सून म्हणून आली पण वैशाली आणि वैजयंती ती घरात आल्यापासून तिला पाण्यात बघत होत्या. वैशालीने तर तिला नोकरी सोडायला लावली आणि रितेशच्या प्रेमा खातर तिने सोडली ही. रितेशला त्याची आई वैशाली रितिकाशी वाईट वागते हे दिसत होतं. पण एक तर वैशाली त्याला वडिलांची नोकरी दिली म्हणून कायम इमोशनल ब्लॅकमेल करायच्या. त्याला सतत वैशाली आणि वैजयंती वडिलांची नोकरी तुला दिली याची जाणीव करून देऊन त्याच्यावर दबाव आणायच्या त्यामुळे रितेशची भावनिक घुसमट व्हायची पण तो आईला काही बोलू शकायचा नाही. रितिका मात्र सात वर्षे फक्त सहन करत राहिली होती फक्त आणि फक्त रितेशच्या प्रेमा खातर. रितेश तिला प्रेमाने कायम समजावून सांगायचा आणि गप्प करायचा.
घरात मात्र वैशाली सतत खुसपट काढून भांडण करायची. रितिका कशी कुचकामी आहे हे बोलून दाखवायची आणि रितेशला वडिलांची सरकारी नोकरी मिळाली आहे म्हणून तिने त्याच्याशी लग्न केलं आहे असं म्हणून हिनवायची. रितिकाला गोंडस मुलगी झाली आणि तिला तसेच रितेशला वाटले होते की आता तरी वैशालीचा स्वभाव बदलेल पण ती बदलली नाहीच उलट स्वतःच्या नातीला चार वर्षांच्या चिमुरड्या रुतालाही पाण्यात पाहू लागली होती. रितेश मात्र रोजच्या कटकटीमुळे वैतागला होता. एक तर ऑफिसमधले टेन्शन त्यात दोन तास लोकलचा आणि एक तास टू व्हीलर असा तीन तास प्रवास करून तो दहा वाजता वैतागून आणि थकून घरी यायच आणि आलं की रोज नवीन भांडण समोर असायचे. रितिका आधी वैशालीला गप्प बसायची उलट उत्तर द्यायची नाही पण रुता झाल्यापासून तिच्यातली आई तिला गप्प बसू द्यायची नाही.
आजही रुताला भयंकर सर्दी झाली होती. आणि वैशाली तिच्या मागे लागली औषधं घेऊन ये म्हणून, रितिका तयार ही झाली जायला पण वैशाली रुताला ठेवून घ्यायला तयार नव्हती आणि पावसाळी वातावरणात रितिकाला रुताला घेऊन जायचं नव्हतं. आणि तमाशा करायला वैशालीला इतके कारण पुरेसे होते. तिने रितेश आला की भांडण उकरून काढले. आणि आज मात्र तिने भांडणात रुताला ही ओढले आणि रितिका गप्प बसली नाही. आधीच थकून आलेला रितेश मात्र वैतागला आणि त्याचाही ताबा सुटला. त्याने रागाच्या भरात आज रितिकावर हात उचलला होता.आणि रितिका ते सहन करू शकली नाही आणि रुताला घेऊन निघून गेली.
रितिका माहेरी निघून गेली आणि रितेश हताश होऊन घरात आला तर वैशाली त्याला म्हणाली.
वैशाली,“ गेली वाटतं? जाऊ दे किती दिवस माहेरी राहील येईल स्वतःच परत.(ती तोऱ्यातच म्हणाली आणि रितेशला काहीच न बोलता त्याच्या बेडरूममध्ये जाताना पाहून म्हणाली.) जेवायचं नाही का तुला? साडे अकरा वाजून गेले.”
रितेश,“ नाही. तू जेव म्हणून तो रूममध्ये निघून गेला.
★★★
दुसऱ्या दिवशी रितेश ऑफिसला निघाला त्याने खरं तर रात्रीपासून रितिकाला अनेक वेळा फोन केला होता पण तिने त्याचा फोन घेतला नाही. तो खाली पार्किंगमध्ये आला तर त्याच्याच वयाचा त्याचा शेजारी आणि मित्र अंकुश त्याला भेटला.
अंकुश,“ काय झालं रितेश? रात्री तुझ्या घरातून भांडणाचा आवाज येत होता. आणि त्यानंतर वहिनी रुताला घेऊन निघून गेलेल्या दिसल्या.” त्याने विचारलं.
रितेश,“ रोजचंच तेच तेच भांडण मी ना वैतागलो आहे या सगळ्याला अंकुश. एक तर ऑफिसमधले पॉलिटिक्स आणि कामं त्यात बाईक वरून एक तास आणि लोकलचा दोन तास प्रवास मी थकून घरी येतो रे आणि आलं की यांचं ऐका. असं वाटत घरीच येऊ नये.” तो उदास होऊन बोलत होता.
अंकुश,“ पण भांडण रोज उकरून कोण काढते? मला माझी आई आणि सुनीता(बायको) सांगत होती की काकू रितिका वहिनीला एक मिनिटं बसू देत नाहीत. वरून रुताला ही हिडीस पिडिस करतात. बिचारी वहिनी किती सहन करेल? तरीही काही तरी मोठ्ठ घडल्याशिवाय त्या असं तडकाफडकी घर सोडणार नाहीत. काय झालं सांग?”
रितेश,“ माझंच चुकलं आहे अंकुश मी काल तिच्यावर हात उचलला. मी तर काय करू रे? माझी देखील घुसमट होते. एका बाजूला आई सारखं मला तुला नोकरी दिली म्हणून सूनावत असते. आणि खरंच तर आहे मी बाबांची नोकरी घेतली म्हणजे आई आणि वैजू माझी जबाबदारी आहे. किती वेळा रितिकाला सांगितलं आईच्या नादाला लागू नकोस पण तीही ऐकत नाही आणि दोघींमध्ये माझी मात्र फरपट होते रे. आता धमकी देऊन गेली आहे घटस्फोट देईन म्हणून खूप फोन केले पण एकही उचलला नाही.”तो रडकुंडीला येऊन बोलत होता.
अंकुश,“ चुकलास तू रितेश तू वाहिनींवर हात उचलायला नको होता. तू म्हणतोस की तुझी आई आणि बहीण तुझी जबाबदारी आहेत मग वहिनी आणि रुता कोणाची जबाबदारी आहे? नोकरी तुला दिली म्हणजे उपकार नाही केला त्यांनी; त्या नोकरीबरोबर लोनही आले आहे तुझ्या डोक्यावर. त्यात रितिका वहिनीचा जॉब काकूंनी सोडवला आणि स्वतःच्या पेन्शनमधला एक छदाम ही त्या तुला देत नाहीत. लोनचे हप्ते भरून उरलेल्या पगारात तू कसा घर चालवतोस हे मला माहित नाही का? तरी वहिनी समजूतदार आहेत. त्यांनी परिस्थिती पाहून मदतनीस काढून टाकली. काटकसरीने संसार करतात. त्यांच्या साथीने तुझा संसार सुरू आहे बाबा. बघ विचार कर अजूनही वेळ गेलेली नाही. वहिनीची माफी मागून त्यांना परत घेऊन ये. आणि काकूंना जरा समजाव असं वागू नका म्हणून.” तो त्याला समजावत बोलत होता.
रितेश,“ हो आज ऑफिसमध्ये जाऊन हाफ डे घेतो आणि रितिकाच्या घरी जातो.” तो म्हणाला.
रितेश ऑफिसमध्ये हाफ डे टाकून सरळ रितिकाच्या घरी पोहोचला. त्याला दारात पाहून रुता बाबा म्हणून येऊन त्याला बिलगली. त्याने रुताला उचलून घेतले आणि तो घरात आला. रितिका त्याला पाहून काहीच बोलली नाही उलट आत निघून गेली.
रितिकाचे बाबा,“ या बसा. रितिकाची आई जरा चहा पाण्याचे बघा.”
रितेश,“ मला काहीच नको बाबा .मी रितिका आणि रुताला घरी परत घेऊन जायला आलो आहे. मला माहित आहे माझ्याकडून चूक झाली. मी रितिकावर हात उचलायला नको होता.” तो नम्रपणे बोलत होता.
रितिकाचे बाबा,“ तुमची चूक तुम्हाला कळली. पण रितेशराव मी माझी मुलगी तुम्हाला दिली ती सुखी होईल म्हणून पण ती तुमच्या घरात सुखी नाही. तुमची आई माझ्या मुलीला इतकच काय छोट्या रुताला ही पाण्यात बघते. परिस्थिती आज सुधारेल उद्या सुधारेल म्हणून सात वर्षे झाली पण काही बदलले नाही. आता रितिका जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. आम्ही सगळे तिच्या पाठीशी आहोत.” ते म्हणाले.
रितेश,“ मला माहिती आहे पण आई माझी जबाबदारी आहे…” तो पुढे बोलणार तर चहा घेऊन आलेली रितिका मध्येच म्हणाली.
रितिका,“ त्या तुझी जबाबदारी आहेत आणि मी आणि माझी मुलगी तुझी जबाबदारी नाही? माझा निर्णय झाला आहे. मला आता परत यायचं नाही. तुझ्या आईला घेऊन तू सुखी रहा. लवकरच कोर्टात भेटू तुला तशी नोटीस येईलच. आणि पुन्हा इथं यायची तसदी घेऊ नको. आणि रुतापासून जितका लांब राहशील तितका तिला त्रास कमी होईल कारण कदाचित तिच्या नशिबात तिच्या बाबांचं प्रेम नाही.” असं म्हणून तिने रितेशच्या मांडीवर बसलेल्या रुताला उचलून आत नेले.
रितेश मात्र डोळ्यातले पाणी लपवत तिथून निघून गेला. असेच काही दिवस निघून गेले. वैशालीला मात्र काहीच फरक पडलेला दिसत नव्हता. कामं करावी लागतात म्हणून तिने रितेशच्या मागे बाई लावायला पैसे दे म्हणून तगादा मात्र लावला होता. रोजच्या प्रमाणे रितेश ऑफिसला गेला आणि शिपायाने त्याच्या नावाने आलेले कोर्टाचे संमस त्याच्या हातात दिले. रितेशला ज्याची भीती होती तेच घडले होते. रितीकाने कोर्टात घटस्फोटासाठी खटला दाखल केला होता आणि त्याच्याच तारखेचे कोर्टाचे संमस त्याला आले होते. आधीच मनातून कोलमडलेला रितेश रितिकाच्या अशा वागण्याने आणखीनच खचला. त्याचे कामात तर लक्ष लागणार नव्हतेच म्हणून तो रजा टाकून घरी पोहोचला. दार उघडेच होते त्यामुळे तो बेल न वाजवता घरात गेला तर वैशालीच्या रूममधून तिचा आणि वैजयंतीच्या बोलण्याचा आवाज येत होता आणि तो तिथेच थबकला.
वैजयंती,“ बरं झालं आई पीडा गेली एकदाची. नाही तर घरीदारी सगळीकडे रितिकाचे कौतुक ऐकून वीट आला होता. रितिका रांगोळी चांगली काढते तिला बोलवूयात. रितिका मेहंदी चांगली काढते तिलाच बोलवा. माझी सासू माझ्या जावे समोर रितिकाच्या स्वयंपाकाचे आणि हुशरीचे गुणगान गात होती. म्हणे इतकी शिकलेली मुलगी पण खूप छान आहे स्वभावाने आणि स्वयंपाक बाकी घरकाम ही खूप छान करते. मुलीवरही ती छान संस्कार करत आहे नाही तर हा विनू नुसता लाडाने वेडा झाला म्हणे. आता हिची पोरगी पण हिच्यासारखीच निघणार. आमच्या नात्यात एक मुलगी आहे घटस्फोटीत आहे जरा बिनडोकच आहे पण तुझ्या ताब्यात राहील. एकदा या रितिकाने रितेशला मोकळं केलं की उडवून देऊ बार आपण.” ती हसून बोलत होती.
वैशाली,“ हो ना म्हणून तर या रितेशला मी ती रितिका नको म्हणत होते. ती पळून जावी म्हणून किती त्रास दिला मी तिला पण चिवट मेली सात वर्षे टिकली आणि एक मुलगी पण काढून ठेवली बाईने…”ती बोलत होती आणि रितेश बेडरूमचे दार ढकलून त्यांच्यासमोर गेला तशा दोघी चपापल्या.
वैजयंती,“ तू… तू कधी आलास?”
रितेश,“ जेंव्हा तुम्ही दोघी माझ्या बायको आणि फक्त चार वर्षांच्या निरागस मुलीबद्दल विष ओकत होता तेंव्हा. आई वाटलं नव्हतं गं की तू इतक्या खालच्या पातळीला जाशील. रितिकाला या घरातून आणि माझ्या आयुष्यातून घालवण्यासाठी तू इतके मोठे षडयंत्र रचशील. रितिका किंवा मी सोड पण तुला तुझ्या चार वर्षांच्या नातीची पण दया आली नाही का गं? आणि तू वैजू ताई? ताई म्हणायला लाज वाटते मला. तुझ्या मनात माझ्या रितिका विषयी इतके विष असेल असे वाटले नव्हते. हे तू नाही तुझ्यात असलेली जेलसी बोलतेय कारण रितिका तुझ्यापेक्षा सरस आहे सगळ्याच बाबतीत. तुम्ही तर माझ्या चार वर्षांच्या निरागस रुताला ही सोडले नाही. आणि हो बरं झालं ती तिच्या आईसारखी आहे तुमच्यासारखी नीच नाही. आणि अभिनंदन तुम्हाला हवं तेच झालं रितिका मला घटस्फोट देत आहे. पण लक्षात ठेवा इथून पुढे तुमच्या मनासारखं घडणार नाही कारण मी कोणाशीच लग्न करणार नाही” तो कोर्टाचे संमस दोघींच्या अंगावर फेकून रागाने बोलत होता. त्याच्या डोळ्यातून कढ वाहत होते पण डोळे मात्र आग ओकत होते. त्याचा तो अवतार पाहून दोघींच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. तो मात्र रागातच त्याच्या रूममध्ये गेला आणि दार लावून घेतले.
तो दुपारपासून रात्री रूमच्या बाहेर तर आलाच नाही पण त्याने मनाशी काही तरी ठरवलं होतं. तो दुसऱ्या दिवशी वैशालीला काहीच न बोलता निघून गेला. आणि त्याचा मित्र आणि एल.आय.सी एजंट असलेल्या शिरीषच्या ऑफिसमध्ये गेला. त्याने शिरीषकडे बरीच चौकशी केली आणि तिथून निघून गेला. शिरीषला मात्र त्याची मनःस्थिती आणि त्याने केलेली विम्या विषयी चौकशी दोन्ही ठीक वाटली नाही. त्याने रितिकाला फोन लावला.
शिरीष,“ वहिनी मी बोलतोय शिरीष आज रितेश ऑफिसमध्ये आला होता. तो त्याच्या नावावर असलेल्या पॉलिसी विषयी खूप विचित्र चौकशी करत होता.तुमच्यात सगळं ठीक आहे ना?” त्याने काळजीने विचारलं.
रितिका,“ कसली चौकशी करत होता?”
शिरीष,“ म्हणे जर एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली तर त्याच्या कुटुंबाला पॉलिसीची रक्कम मिळते का? किंवा जर एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला किती पैसे मिळतात वगैरे.”
रितिका,“ काय? आता तो कुठं गेला आहे काही माहीत आहे का तुम्हाला?” तिने काळजीने विचारलं
शिरीष,“ नक्की माहीत नाही पण तो आत्ताच गेला आहे म्हणजे ऑफिसमध्ये रजा असणार त्याची कारण आत्ता एक वाजले आहेत. मग कदाचित घरी गेला असेल.”
रितिका,“ थँक्स भाऊजी मी ठेवते. तुम्हाला नंतर फोन करते.” असं म्हणून तिने फोन कट केला आणि रितेशला फोन लावला. त्याने फोन उचलला.
रितेश,“ तू पाठवलेला संमस मला मिळाला आहे रितिका.” ती काही बोलणार तर तोच बोलून मोकळा झाला.
रितिका,“ तू कुठं आहेस ते सांग आधी?” तिने रागाने विचारलं.
रितेश,“ का? मी घरी आलो आहे आत्ताच.”
रितिका,“ मग थांब तिथेच मी येतेय.”
ती रागाने म्हणाली आणि माहेरहून टॅक्सी करून डायरेक्ट घरी पोहोचली. रितेश त्याच्या रूममध्ये होता. तिला पाहून वैशालीच्या कपाळावर आट्या आल्या.
वैशाली,“ तू का आली आहेस परत?” तिने रागाने विचारलं.
रितिकाने वैशालीच्या बोलण्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलं आणि ती बेडरूममध्ये पोहोचली.
रितिका,“ नेमकं काय सुरू आहे तुझं?” तिने रागाने विचारलं.
रितेश,“ कुठे काय.”
रितिका,“ खोटं बोलू नकोस तू! आज शिरीष भाऊजींना काय आणि का विचारत होतास तू? तुझ्या मनात नेमकं काय आहे?” तिने ओरडून विचारलं.
रितेश,“ ते काही नाही सहजच.” तो नजर चोरत म्हणाला
रितिका,“ आत्महत्या केली तर विमा क्लेम करता येतो का? अपघाती मृत्यू झाला तर विमा क्लेम करता येतो का असल्या चौकशा सहज करतात का? खोटं बोलु नकोस तू माझ्याशी; काय सुरू आहे तुझ्या मनात.” तिने पुन्हा त्याची कॉलर धरून विचारलं आणि रितेशने इतका वेळ आणलेलं उसनं अवसान गळून पडलं. तो लहान मुलासारखा तिच्या कमरेला मिठी मारून रडायला लागला.
रितेश,“ मी विचार केला की आजपर्यंत तुझी आणि रुताची जबाबदारी नीट पार पाडू शकलो नाही. कदाचित मी मेलो तर तुमच्या काही तरी कामी येईन. आज सात वर्षे ज्यांच्यासाठी तुझ्यावर ते करत असलेला अन्याय निमूटपणे पाहत आलो. तुलाही प्रतिकार करू दिला नाही. तीच माझी आई आणि बहीण माझा संसार मोडण्यासाठी षडयंत्र रचत होत्या कारण काय तर तू हुशार आणि सद्गुणी आहेस. त्यांनी आपल्या छोट्या रुताचा ही विचार नाही केला गं आणि मी मात्र बाबांची नोकरी मी घेतली तर त्या दोघी माझी जबाबदारी आहेत. इतकंच नाही तर दोघी माझ्या आहेत आपल्या आहेत त्यांचे माझ्यावर प्रेम- माया आहे या भ्रमात जगत राहिलो पण त्या नाहीत माझ्या. आपली माणसं अशी वागतात का गं रितिका शत्रूसारखी? माझी होणारी घुसमट. माझी होणारी आर्थिक कोंडी आणि माझी तुझ्यात आणि आईच्या भांडणात होणारी फरफट त्यांना कधीच दिसली नसेल का गं? मी मात्र माझे आहेत म्हणून मूर्खांसारखा यांना गोपाटत गेलो. आईच्या चुका पोटात घालत गेलो आणि ती मात्र माझ्या संसारात रादर आपल्या आयुष्यात स्वार्था पोटी विष कालवत राहिली. मी सगळ्या बाजूंनी हरलो.मग मरण्याशिवाय माझ्याकडे कोणता पर्याय शिल्लक राहिला सांग ना?” तो रडत बोलत होता.
रितिका,“ उगीच काही तरी अभद्र बोलू नकोस. म्हणे मरण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिला नाही. म्हणजे अजूनही तू माझ्यावर आणि रुतावर अन्यायच करणार का? रितेश मला आणि आपल्या मुलीला तुझी गरज आहे. मला दिसत होती रे तुझी होणारी घुसमट म्हणून मी शक्य होईल तितके सहन केलं. माझ्यातली बायको गप्प बसली पण माझ्यातली आई नाही गप्प बसू शकली ती बंड करून उठली. आय एम सॉरी! तुझ्या या अवस्थेला मीही कुठे तरी जबाबदार आहे. रितेश आपली माणसं तोपर्यंत आपली असतात जोपर्यंत ती स्वार्थापोटी आपल्या सुखाचा घास घेत नाहीत ज्या दिवशी ती आपल्या सुखावर उठतात ना त्यादिवशी ती आपली राहत नाहीत. आणि नेमकं तुला हेच कळत नव्हतं. असो उठ आता परक्या आणि स्वार्थी लोकांमध्ये राहायची तुला काही गरज नाही.” तिने रडतच त्याचे अश्रू पुसले आणि त्याचा हात धरून ती निघाली.इतका वेळ दारात उभं राहून दोघांचे बोलणे ऐकणारी वैशाली आता बोलू लागली.
वैशाली,“ काय बोलते आहेस तू? मी त्याची आई आहे आणि मला परकी म्हणतेस? हे असंच घडणार मला माहित होतं म्हणून मला तू नको होतीस या घरात. रितेश कुठे निघालास तू? आणि विसरू नकोस तू तुझ्या बाबांची नोकरी घेतली आहेस. या घरचा कर्ता पुरुष तू आहेस. माझी आणि वैजूची जबाबदारी तुझ्यावर आहे.”
रितिका,“ कोणत्या मातीच्या बनला आहात हो तुम्ही? तुमच्या जवळ काळीज आहे का? इथं तुमचा मुलगा तुमच्याच अशा वागण्याने जीव द्यायला निघाला होता आणि तुम्हाला त्याचे काहीच वाटत नाही? तुम्हाला मुलगा नाही तर एक मशीन हवे पैसे कमावून तुमच्या म्हणण्यानुसार वागणारे! पण रितेश हाडामासाचा माणूस आहे. तो माझा नवरा आणि माझ्या मुलीचा बाप आहे कळलं तुम्हाला? आजपर्यंत जबाबदारी, कर्तापुरुष या मोठंमोठ्या शब्दांचा वापर करून तुम्ही त्याचा खूप कोंडमारा केला. त्याची इतकी घुसमट केली की तो जीव द्यायला निघाला. तरी तुम्हाला घाम फुटला नाही आई आहात की कोण तुम्ही? आणि नोकरीचं म्हणाल तर उद्याच मी त्याला राजीनामा द्यायला लावते नोकरीचा मग तुम्हाला त्या नोकरीचं काय करायचं ते करा. माझ्या नवऱ्यापेक्षा मला तुमच्या नवऱ्याची सरकारी नोकरी प्रिय नाही. आम्ही मोलमजुरी करू पण सुखी राहू.” ती रागाने म्हणाली आणि रितेशला जवळजवळ ओढतच घेऊन गेली.तिच्या अशा बोलण्याने वैशाली मात्र निरुत्तर झाली होती.
ही कथा काल्पनिक असली तरी देखील वास्तविक स्थितीवर आधारित आहे. जेंव्हा एखाद्या मुलाचे वडील सरकारी नोकरी करत असताना मरतात तेंव्हा त्या घरातील मोठा मुलगा किंवा मग घरात असणारा एकमेव मुलगा (मुलगा नसेलच तर मुलगी) अनुकंपातत्त्वावर नोकरीला लागतो. पण त्या नोकरी मागोमाग अनेक जबाबदाऱ्याही त्याच्यावर येऊन पडतात आणि त्या जबाबदारीच्या जोखडाखाली त्या मुलाची घुसमट होते. त्याला सतत तुला वडीलांची नोकरी मिळाली आहे असं म्हणून त्याला आणि त्याच्या बायकोला देखील दाबलं जाते. प्रत्येक ठिकाणी असं घडतेच असं नाही. पण काही ठिकाणी मात्र अशा मुलांची रितेशसारखी घुसमट होत असते.
अशाच मनोवेधक कथा वाचण्यासाठी लाईक आणि फॉलो करा शब्द मंथन पेजला आणि रिव्ह्यू लिहून फाईव्ह स्टार द्यायला देखील विसरू नका.
©swamini chougule
