मराठी लघुकथा चार दिवस सुनेचे

 




     आज अंजलीच्या घरात भिशी पार्टी होती. तिला या महिन्यातली सोसायटीमधील लकी भिशी लागली होती आणि भिशीचा नियम असा होता की ज्याला भिशी लागेल त्याने स्वतःच्या घरी नाश्त्याची पार्टी द्यायची. त्यामागे उद्देश हा असायचा की सगळ्या सोसायटीमधील स्त्रियांचे महिन्याला छोटे गेट-टू-गेदर व्हावे. आणि या महिन्यात अंजलीच्या घरी सगळे जमणार होते. तिने रविवारी संध्याकाळी बायकांना घरी बोलावले होते. अजिंक्य तिचा नवरा नाश्त्यासाठी बाहेर एखाद्या पदार्थाची ऑर्डर देऊया म्हणत होता पण अंजलीला ते मान्य नव्हते कारण सगळ्याच बायका तेच करायच्या आणि सगळ्यांच्यात तेच तेच पदार्थ असायचे. म्हणून तिने घरीच काही तरी करण्याचा घाट घातला आणि तिच्या सासूबाई म्हणजे विद्याला थालिपीठे करण्याची गळ घातली विद्या ही लगेच तयार झाली.


  आणि आज सगळ्या बायका संध्याकाळी नटून अंजलीच्या घरी संध्याकाळी पोहोचल्या.अंजली ही त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात रमली पण तिच्या सासूबाई  मात्र किचनमध्ये थालिपीठं करण्यात अडकल्या. त्यांना  अंजलीने मदतनिस दिली होती पण ती कोलड्रिंक्स देण्यात आणि थालिपीठं हॉलमध्ये  नेऊन पोहोच करण्यात अडकली. 


  सगळ्या बायका दह्याच्या चटणीबरोबर मिटक्या मारून थालिपीठांवर ताव मारत होत्या. सारीका अंजलीची खास मैत्रीण ती थालिपीठ खात म्हणाली.


सारिका,“ मला माहित होतं अंजू तुझ्या घरी आज काही तरी वेगळं आणि भन्नाट खायला मिळणार. तुझ्या सासूबाई काय सुग्रास जेवण बनवतात गं.” ती मनापासून स्तुती करत म्हणाली.


मीरा,“ हो ना त्यांच्या हाताला खूप चव आहे गं.” दुसरीने तिला दुजोरा दिला.


अंजली,“ हो ना. त्याशिवाय त्यांना येतंच काय? गावठी आहेत त्या अशिक्षित बायका स्वयंपाक घरात रमतात गं त्यात काही विशेष नाही. माझ्यासारखी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर काम करणारी बाई नाही रमू शकत ना स्वयंपाक घरात.” ती तोऱ्यात म्हणाली आणि काही तरी विचारायला आलेल्या विद्याने तिचे बोलणे ऐकले तरी ती काहीच न बोलता स्वयंपाक घरात निघून गेली.


सारिका,“ तरी ही लकी आहेस तू. रोज तुला सुग्रास जेवण तेही आयते मिळते.” 


अंजली,“ आयते? अगं मी त्याबदल्यात त्यांना पोसते ना? जगात काहीच फुकट मिळत नसते डिअर.( ती हसून  म्हणाली. तोपर्यंत बाहेर गेलेले  उमेशराव घरी आले होते. ते त्यांच्या रूमकडे निघाले.) बाबा थालीपीठ तुमच्या रूममध्ये पाठवून देते.” त्यांना पाहून ती म्हणाली.


उमेशराव,“ नको मला भूक नाही.” ते म्हणाले आणि निघून गेले.


           उमेशराव म्हणजे उमेश शिंदे रेल्वे कर्मचारी होते आणि सेवानिवृत्त नंतर ते आज पाच वर्षे झालं  त्यांचा एकुलत्या एक मुलगा अजिंक्यकडे राहायला आले होते. अंजली आणि अजिंक्य त्यांचा मुलगा आणि सून दोघेही पुण्यात कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. त्यांना वाणी नावाची चार वर्षांची  एक मुलगी होती. असे पाच माणसांचे कुटुंब एका हाय-फाय सोसायटीमध्ये राहायला होते. वरकरणी पाहता सगळे आलबेल सुरू होते पण अंजली तिला तिच्या उच्चशिक्षित असल्याचा आणि कमाईचा घमंड होता. त्यामुळे तिला विद्याबाईची कधीच किंमत वाटली नाही. ती कायम विद्याबाईला कमी लेखे आणि त्यांचा अपमान करे. विद्याबाई म्हणजे शांत आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व! त्या मुलाच्या आणि नातीच्या प्रेमापोटी अंजलीच्या वागणुकीकडे दुर्लक्ष करत.आजही त्यांनी तेच केलं होतं. 

   

   रात्री सगळी आवरा-आवर करून विद्याबाई रूममध्ये गेल्या. त्या खूप थकलेल्या दिसत होत्या. चेहराही उतरला होता त्यांचा.


उमेशराव,“ आलीस? झालं वाटतं सगळं करून? का वागतेस तू विद्या असं? तुला अंजलीला नाही म्हणता आले नाही का? ती तुझा खूप गैरफायदा घेते. वरून तुझी तुझ्या प्रेमाची आणि कष्टाची तिला किंमत नाही. बसा पाय दुखत असतील ना आज, तेल लावून देतो पायांना.” ते नाराजीने बोलत होते.


विद्याबाई,“ जाऊ द्या ओ. मी अजिंक्य आणि वाणीसाठी करते सगळं आणि अंजली म्हणजे आपली हट्टी आणि खोडकर मुलगी आहे असं समजायचं. देवाने आपल्याला मुलगी नाही दिली. मला मुलीची खूप हौस होती पण अजिंक्य झाला आणि वर्षभरात माझ्या गर्भाशयावर गाठ आली म्हणून ते काढून टाकावे लागले. मग काय अजिंक्यलाच सगळं काही मानले आपण पण मी ठरवले होते की सुनेलाच मुलगी मानायचं आणि तिचे सगळे लाड करायचे.” त्या बेडवर बसून बोलत होत्या.


उमेशराव,“ हो तू लाख मानशील तिला मुलगी पण तिने तुला आई मानले पाहिजे ना? ती तिच्या आईशी असं वागली असती का? आज काय म्हणत होती तिच्या मैत्रिणींना  माहीत आहे का? तू गावठी आणि आडाणी आहेस म्हणे आणि तुला एकच काम चांगलं जमतं स्वयंपाक करणे. तिला तिच्या उच्च शिक्षणाचा खूपच घमंड आहे विद्या.(ते नाराजीने बोलत होते आणि त्यांचे लक्ष विद्याबाईंच्या हाताकडे गेले.) हे काय गं? चांगलंच भाजलं आहे की मनगटाला तुझ्या.” ते त्यांच्या हातावरची भाजलेली जखम पाहून काळजीने बोलत होते.


विद्याबाई,“ ते आज थालिपीठ करताना तवा भाजला. इतकं काही विशेष नाही आणि मी ऐकले आहे तिचे बोलणे ती म्हणाली म्हणून मी काय गावठी आणि आडाणी खरंच होणार आहे का? तुम्ही पण छोट्या छोट्या गोष्टी घेऊन बसता.” ती त्यांना समजावत म्हणाली.


उमेशराव,“ तू कधीच सुधारू नकोस.आण तो हात मी मलम लावून देतो तुझ्या हाताला.” ते रागानेच म्हणाले.

★★★


  आदल्या दिवशी झालेली धावपळ आणि हाताला चांगलेच भाजले असल्याने विद्याला रात्रीतून  चांगलाच ताप भरला. त्यामुळे रोज लवकर उठून अजिंक्य आणि अंजलीचा डबा आणि नाश्ता  करणाऱ्या त्या आज उठल्याच नाहीत. अंजली आठ वाजता उठून बाहेर आली. ती किचनमध्ये गेली तर  तिथे ना विद्याबाई होत्या ना कसली तयारी दिसत होती. उमेशराव हॉलमध्ये  पेपर वाचत बसले होते.


अंजली,“ बाबा आई उठल्या नाहीत का अजून? नाही म्हणजे अजून नाश्ता आणि डबे ही रेडी झालेले नाहीत.


उमेशराव,“ तिला ताप आला आहे त्यामुळे ती झोपली आहे.”


अंजली,“ काय? मग हे आधी नाही का सांगायचं. मी माझं करून घेतले असते.” 


उमेशराव,“ आजारपण काय सांगून येते का? आणि तुला आधीच सांगायला तू रूममधून  बाहेर येतेस का आठ शिवाय?” ते थोडे रागाने म्हणाले.


अंजली,“ हो कारण मी दिवसभर काम करून थकते. त्यांना काय काम असते म्हणा. सगळ्याला तर आम्ही बाई लावली आहे. स्वयंपाकाला ही लावत होते मी पण त्यांनाच पुढे पुढे करायचं असतं. नको लावू म्हणाल्या बाई त्या.” ती उद्धटपणे बोलत होती आणि अजिंक्य तिच्या मागे उभं राहून तिचे बोलणे ऐकत होता.


अजिंक्य,“ हे कोणत्या भाषेत बोलत आहेस तू अंजली बाबांशी?” त्याने रागाने विचारलं आणि ती चपापली.


अंजली,“ आरे तूच बघ आता त्या आजारी पडल्या ना? त्यांच्याच काळजी पोटी बोलत होते मी. सगळे तेच तेच बाहेरून मागवत असतात म्हणून मी वेगळं काही तरी करावे म्हणाले तर त्यांनीच थालिपीठाचा घाट घातला आता बघ पडल्या ना त्या आजारी? ” ती नाटकीपणे बोलत होती.


अजिंक्य,“  पण मग आईला तू मदत का केली नाहीस? आणि बाबा आईला काय झालं? खूप बरं नाही का तिला? मी आज रजा टाकतो आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ.” तो काळजीने बोलत होता.


अंजली,“ तुला काय वाटतं की मी सगळी कामं तुझ्या आईला लावून मी आराम करते का? काल त्यांनी स्वतःच सगळं करायचं म्हणून केलं. काही रजा काढायची गरज नाही साधा ताप तर आला आहे त्यांना. नुसतं सतत अटेंन्शन हवं असतं. आता वाणीला मला माझ्या आईकडे सोडावे लागेल. यांची नवीनच नाटकं असतात रोज.” ती रागाने बोलत होती. इतका वेळ शांतपणे दोघांचे संभाषण ऐकणारे उमेशराव आता भडकले.


उमेशराव,“ बास खूप बोललीस अंजली.आणि तिला कोणाचे अटेंन्शन घ्यायची गरज पडत नाही तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि सुग्रास जेवणामुळे सगळे आपोआप अटेंन्शन देतात तिला.  आणि तिला ताप कालच्या धावपळीमुळे आणि हाताला भाजल्यामुळे आला आहे. अजिंक्य तुझ्या या बायकोने काल तुझ्या आईला कोणतीच मदत केली नाही. कालच काय पण ती कधीच तिला कोणतीच मदत करत नाही. वरून हिचे अपमानित बोलणे आणि तोरा सहन करायचा. मी आजपर्यंत गप्प बसलो. तुला काहीच सांगितलं नाही कारण मला घरात कलह नको होता पण आता नाही. पण अजिंक्य आपल्या घरात काय चालते याकडे तुझे देखील लक्ष असायला हवे ना?” ते रागाने बोलत होते आणि भांडणाचा आवाज ऐकून विद्याबाईंची झोप चाळवळी  आणि  रूममधून बाहेर आल्या.


विद्याबाई,“ अहो   सकाळ सकाळ तुम्ही पण कोणत्या गोष्टी घेऊन बसलात? उगीच भांडणतंटा नको या घरात.” त्या म्हणाल्या आणि अजिंक्यचे लक्ष त्यांच्या भाजलेल्या हाताकडे गेले.


अजिंक्य,“ आई किती भाजलं आहे तुला? आणि तापपण आहे चांगलाच.” तो काळजीने त्यांना खुर्चीवर बसवत म्हणाला.


उमेशराव,“ नाही तुझी आई तर नाटक करते ना! तिला अटेंन्शन हवे असते सगळ्यांचे. आणि विद्या तुझ्या सांगण्यावरून मी आजपर्यंत गप्प बसलो पण आता पाणी डोक्यावरून गेले आहे. अजिंक्य ही तुझी बायको तुझ्या आईला गावठी आणि अडाणी समजते. इतकंच काय ही आम्हाला या घरात पोसते बाबा!” ते बोलत होते आणि अंजली आता चपापली.


अंजली,“ उगीच काही तरी बोलू नका बाबा मी असं काही म्हणले नाही. अजिंक्य हे माझ्यावर खोटे आरोप लावत आहेत.” ती उसनं अवसान आणत म्हणाली.


उमेशराव,“ मी तुला चांगलं ओळखून आहे अंजली. तुझ्या कार्पोरेट जगातलं राजकारण तू पाच वर्षांपासून या घरात खेळत आहेस इतकं न  समजण्या इतका मूर्ख नाही मी. अजिंक्यसमोर तू विद्याशी इतकंच काय कधी कधी माझ्याशी ही वेगळं वागतेस आणि त्याच्या मागे वेगळं वागतेस. आजपर्यंत मी गप्प होतो माझ्या मुलाच्या आणि त्याच्या आईच्या प्रेमापोटी पण आज तू तुझ्या सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या आहेत. तुझ्या बोलण्याचे रेकॉर्डिंग आहे मोबाईलमध्ये माझ्याकडे. काल जेंव्हा तू सारिका आणि मीराशी बोलत होतीस ना तेंव्हा मी दारात उभा होतो आणि तुमचे सगळे बोलणे ऐकत आणि रेकॉर्ड देखील करत होतो.( असं म्हणून त्यांनी फोन मधले रेकॉर्डिंग ऐकवले. अजिंक्य चकित होऊन सगळं ऐकत होता.) आणि तुला काय वाटतं की तू आम्हाला पोसतेस? तर तुझा गैरसमज दूर कर. मी रेल्वेत अधिकारी होतो बरं का आणि मला चाळीस हजार पेन्शन आहे. रोजचा भाजीपाला आणि वर खर्च मी करतो दहा हजार महिना. तुझा नवरा नुसता महिन्याचा माल भरतो. आणि हा फ्लॅट घ्यायला सगळे पैसे मी दिले आहेत आणि हा फ्लॅट विद्याच्या नावाने आहे. तू जिला नोकर समजतेस ना ती खरं तर या घरची मालकीण आहे. आणि गावठी, अडाणी कोणाला म्हणतेस?  डी. एड आहे विद्या! बरीच वर्षे तिने गरीब विद्यार्थ्यांचे क्लास घेतले आहेत  तेही फुकट, तिने मनात आणले असते ना तर नोकरी करू शकली असती किंवा क्लासेस उभे केले असते खूप मोठे पण तिने तसं केलं नाही. तर तुझ्या उच्चशिक्षित असल्याचा घमंड ना तुझ्याजवळच ठेव.” ते रागाने तणतणत होते आणि अंजली आता पुरती गारद झाली होती.


अजिंक्य,“ हाऊ डेअर  यु? तू माझ्या मागे माझ्या आई-बाबांशी अशी वागत होतीस? खास करून माझ्या आईशी. ती प्रेमळ आणि सुस्वभावी असल्याचा तू असा गैरफायदा घेतला? गेट आऊट फ्रॉम माय हाऊस!” तो रागाने ओरडला.


अंजली,“ प्लिज अजिंक्य माझं ऐकून तर घे आय एम सॉरी मी चुकले. पण मला असं घरातून जायला सांगू नकोस.” ती गयावया करत बोलत होती.


विद्याबाई,“ अजिंक्य इतका टोकाचा निर्णय घेण्याची काही गरज नाही. संसार म्हणले की थोडं कमी जास्त होणारच ना म्हणून तू काय संसार मोडणार का?” त्या त्याला समजावत होत्या.


उमेशराव,“ बरोबर बोलतेय तुझी आई अजिंक्य! मी आज हे सगळं बोललो; तुझ्यासमोर हिचे खरे रूप आणले ते तू तुझा संसार मोडवा म्हणून नाही बेटा. पण ही विद्याच्या स्वभावाचा जास्तच गैरफायदा घ्यायला लागली आणि दिवसेंदिवस तिची हिम्मत वाढायला लागली म्हणून. अंजलीला तिची चूक कळली तर उत्तमच पण नाही कळली तरी ती तिच्या कर्माची! पण मी एक निर्णय घेतला आहे.” ते बोलत होते.


अजिंक्य,“ कसला निर्णय बाबा?” त्याने आवंढा गिळून विचारलं.


उमेशराव,“  अंजलीची ही अशी वागणूक पाहून मी या आधीच आमचे नाव एका वृद्धाश्रमात नोंदवले होते. मी आणि विद्या तिथे राहायला जाणार आहोत. मी वृद्धाश्रम पाहून आलो आहे पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर एका निसर्गरम्य ठिकाणी आहे ते. महिना पंधरा हजार दोघांची फी आहे. अगदी छान वातावरण आणि लोकंही चांगली आहेत तिथे शिवाय आमच्याच वयाची. आम्ही कुठे तरी दुसरे घर घेऊन ही राहू शकतो पण दोघांनाच करमणार नाही म्हणून हा पर्याय निवडला आहे मी. तुम्ही दोघे सुखाने संसार करा बेटा.” ते शांतपणे बोलत होते.


 अजिंक्य,“ बाबा तुमचे हक्काचे घर असताना तुम्ही वृद्धाश्रमात राहायला जाणार? अजिबात नाही. मी हे घर सोडतो हे तुमचे घर आहे. अंजली आणि वाणीला घेऊन मी भाड्याच्या घरात राहीन. तुम्ही दोघे कुठेही जायचं नाही. आणि अंजली तू आज मनातून पूर्ण उतरलीस माझ्या, केवळ माझे संस्कार आणि माझ्या आई-बाबांची इच्छा आणि आपल्या मुलीसाठी मी तुझ्याबरोबर संसार करेन पण तो मनापासून नसेल इतकं लक्षात ठेव. आणि जा सामान भरायला घे.” तो रागाने म्हणाला


विद्याबाई,“ थांब अंजली! अजिंक्य हे सगळं आम्ही तुझ्याचसाठी कमवलं आहे बेटा. स्वतःचा थ्रि. बी.एच.के  मोठा फ्लॅट असताना तू भाड्याच्या घरात राहायला जाणं मला मान्य नाही.” 


अजिंक्य,“ मग मला ही मी जिवंत असताना तुम्ही दोघे वृद्धाश्रमात राहायला जाणे मान्य नाही.मग ते किती ही चांगले असू दे. मला मान्य आहे बाबा की तुम्हाला माझी गरज नाही पण मला आणि वाणीला तुमच्या दोघांची गरज आहे. मला वाणीच्या भविष्याची चिंता वाटते ही बाई माझ्या मुलीला काय संस्कार देणार आहे देव जाणे? आणि आई बाबांनी वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला आहे हे तुला माहीत होते ना?  ” त्याने विचारलं.


 

विद्याबाई,“ एक तर तोंड सांभाळून बोल अजिंक्य, अंजली चुकली असली तरी ती तुझ्या मुलीची आई आहे आणि ती आमच्याशी जे वागली त्यात तुझी देखील चूक आहे कारण घरात काय चालले आहे तुझी बायको, आई, वडील काय करतात याकडे तू गेल्या पाच वर्षात किती लक्ष दिले? जर तुझे लक्ष घरात असते तर तू तिला वेळीच समज देऊ शकला असतास. अंजलीने तुझे लक्ष घरात नाही हे ताडले आणि तिची हिम्मत दिवसेंदिवस वाढत गेली. आणि तशी तर माझी ही चूक आहे मी तिच्या वागण्याकडे कानाडोळा केला तिचे वागणे सहन केले आणि गोष्टी इतक्या विकोपाला गेल्या. मी देखील तिला वेळीच समज द्यायला हवी होती म्हणजे ती अशी वागली नसती आणि हो हे बोलले होते मला याविषयी पण निर्णय वगैरे घेतला नव्हता आम्ही . यांनी माझ्यासमोर अट ठेवली होती की अंजली सुधारली नाही आणि तिचे वागणे अजून वाईट झाले तर त्यांच्याबरोबर मला वृद्धाश्रमात जावे लागेल. मला वाटलं होतं की माझ्या प्रेमाने मी तिला सुधारेन तिला कळेल माझ्या प्रेमाची भाषा पण तसं न होता ती दिवसेंदिवस उद्धट होत गेली. पण आता बास कोणालाच त्रास नको. आम्हाला जाऊ दे वृद्धाश्रमात!” त्या म्हणाल्या आणि इतका वेळ खाली मान घालून सगळ्यांचे बोलणे ऐकणारी अंजली आता विद्याबाईंच्या पायात पडली आणि रडत बोलू लागली.


अंजली,“ आई माझं चुकलं. मी खूप वाईट वागले तुमच्याशी आणि बाबांशी. मी खूप दळभद्री आहे मला नाही कळलं तुमचं प्रेम. तुमची प्रेमाची भाषा. मी माझ्याच तोऱ्यात वागत राहिले. मला माझी चूक कळली आहे. शिक्षण, पैसा या सगळ्या गोष्टी गौण असतात. खरं तर माणसाचे मन आणि वागणूक चांगली हवी. मी तुम्हाला अडाणी समजत होते पण खरी अडाणी तर मीच होते. प्लिज एकदा मला माफ करा. इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. प्लिज तुम्ही दोघे कुठेच जाऊ नका. तुमची मुलगी समजून माझ्या चुका पोटात घाला आणि मी आयुष्यात पुन्हा कधीच अशी वागणार नाही.” ती रडत बोलत होती.


विद्याबाई,“ उठ अंजली अगं मी तुला माझी मुलगीच समजत आले हट्टी आणि उद्धट मुलगी म्हणून तर तुझं चुकीचं वागणं सहन केलं ना. आणि आता जर मला गुणी आणि समंजस मुलगी मिळणार असेल तर मग मी कशाला कुठं जाईन.” त्या हसून तिचे डोळे पुसत म्हणाल्या.


अजिंक्य,“ माझं पण चुकलं आई-बाबा मी घरात लक्ष द्यायला हवं होतं पण इथून पुढे अशी चूक होणार नाही. अंजली तुझ्यावर माझी नजर असेल आता.बाबा प्लिज ऐका ना नका ना जाऊ कुठे.” तो डोळ्यात पाणी आणून त्यांना म्हणाला.


उमेशराव,“ आता तुझी आईच माझ्याबरोबर यायला तयार नाही तर मी एकटा कुठं जाणार आहे. पण तुम्हा दोघांना ऑफिसला जायचं नाही का?” त्यांनी हसून विचारलं.


अजिंक्य,“ मी आज रजा घेत आहे. आईची तब्बेत ठीक नाही आणि तुम्हाला एकट्याला वाणी ऐकणार नाही खूप आगाऊ आहे ती.” तो म्हणाला.


अंजली,“ मी ही फोन करून आज माझी रजा म्हणून ऑफिसमध्ये कळते. आणि नाश्ता करून आणते.” ती म्हणाली आणि किचनकडे वळली.


 घरातल्या  एखाद्या व्यक्तीच्या वाईट वागण्याला आपण फक्त त्याच व्यक्तीला जबाबदार धरू शकत नाही कारण घरात ती व्यक्ती वाईट वागते हे सगळ्यांना दिसत असते पण कोणाच्या तरी प्रेमाखातर  विद्याबाईंसारखं त्या व्यक्तीच्या वागण्याकडे  कानाडोळा केला जातो तर कधी अजिंक्यसारखं  घरात काय सुरू आहे हेच घरातल्या काही लोकांना माहीत नसते. खरं तर प्रेम म्हणून कानाडोळा न करता त्या व्यक्तीला वेळीच खडसवायला हवे आणि घरातल्या पुरुषांचे देखील घरात लक्ष हवं.


  कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच मनोवेधक कथा वाजण्यासाठी आपल्या शब्द मंथन फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.


©swamini chougule








 

 


  

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post