अपूर्व किमयाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्याने तिच्याच भाषेत तिला उत्तर दिलं होतं. त्यामुळे किमयाला हार मानावी लागली होती. त्यानंतर तर जणू किमयाने अपूर्वच्या वागण्याचा धसकाच घेतला होता. पुढचे पंधरा दिवस ती शांत बसली. शामरावांकडे फोन करून ती त्याच्या तब्बेतीची चौकशी मात्र सातत्याने करत होती.
अपूर्वचे आज रुटीन चेकअप होते. सम्यक ही त्या दोघांबरोबर हॉस्पिटलमध्ये गेला होता पण किमयाला माहीत होते की सम्यक तिला अपूर्व विषयी काही सांगणार नाही त्यामुळे त्याला विचारण्यात काही अर्थ नव्हता. आजही तिने नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या वेळी शामरावांकडे अपूर्वच्या तब्बेतीची चौकशी करायला फोन केला होता.
किमया,“ काका आज अपूर्वचे रुटीन चेकअप होते ना? मग काय म्हणाले डॉक्टर तो ठीक आहे ना आता? मेन म्हणजे त्याच्या दंडाची जखम भरली का? काका महिना होत आला खरं तर त्याची जखम लवकर भरायला हवी होती ती भरायला वेळ का लागत आहे तुम्ही विचारलंत का?” ती प्रश्नांवर प्रश्न विचारत होती.
शामराव,“ ये प्रश्नांची बुलेट ट्रेन जरा दम घे बाई! आणि हो अप्पू आता पूर्णपणे ठीक आहे. त्याची जखम ही आता भरली आहे. विकनेस ही आता नाही तरी ही काही सप्लिमेंट्स पुढचे काही दिवस कंटीन्यू करायला सांगितले आहेत. बाकी काळजीचे काही कारण नाही. दोन दिवसांनी तो ऑफिसला ही जाऊ शकणार आहे.” ते सांगत होते.
किमया,“ मस्त! म्हणजे आपली काळजी मिटली म्हणायची.बरं मी तुम्हाला निवांत फोन करते.” ती म्हणाली.
★★★
दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला किमया रूममधून आली नाही म्हणून सुधा तिच्या रूममध्ये तिला बोलवायला गेली तर रूमचे दार उघडेच होते पण किमया रूममध्ये नव्हती. त्यांनी सगळीकडे तिला पाहिलं पण ती कुठेच नव्हती. तिचा मोबाईल देखील बेडवर पडलेला होता. सुधा मात्र घाबरली आणि नाश्ता करत असलेल्या सम्यक आणि जयेशरावांजवळ आली.
सुधा,“ किट्टू कुठेच नाही घरात. तिचा फोन देखील तिच्या रुममध्येच आहे. मला खूप भीती वाटतेय.” त्या रडत बोलत होत्या आणि त्यांचे बोलणे ऐकून सम्यक आणि जयेशराव देखील काळजीत पडले.
सम्यक,“ कुठे जाणार आहे ती आई? गेली असेल ट्रस्टमध्ये किंवा एखाद्या मैत्रिणीकडे.” तो त्यांना समजावत म्हणाला.
सुधा,“ मोबाईल घरात ठेवून ती कुठेच जात नाही सम्यक. तू ट्रस्टमध्ये आणि तिच्या मैत्रिणींना फोन कर आणि ती कुठे आहे ते बघ ना रे!” त्या म्हणाल्या.
जयेशराव,“ या मुलीने नुसता जीवाला घोर लावला आहे. रोज काही तरी नवीन असते हिचे. आता कुठे गेली आहे देव जाणे.” ते काळजीने बोलत होते.
सम्यक,“ तुम्ही दोघे जरा शांत व्हा. मी बघतो ती कुठे आहे.”
असं म्हणून त्याने फोन लावायला सुरुवात केली. पण ना ती ट्रस्टमध्ये गेली होती ना कोणत्या मैत्रिणीकडे. त्यामुळे सम्यकही आता काळजीत पडला.
सम्यक,“ आई तू तिचा मोबाईल घेऊन ये. त्यात आपल्याला माहीत नसलेले तिचे मित्र-मैत्रिणी आहेत कदाचित ती त्यांच्या पैकी कोणाकडे गेली असेल.”
तो म्हणाला आणि सुधा किमयाचा मोबाईल घेऊन आल्या. दोन तीन पॅटर्न ट्राय केल्यानंतर तिचा मोबाईल अनलॉक झाला.साम्यकने त्यातल्या काही लोकांना फोन करून किमया विषयी चौकशी केली पण कुणालाच माहीत नव्हतं ती कुठे आहे. आता सुधाचा धीर खचला आणि त्या रडायला लागल्या.
सुधा,“ या पोरीने काही वेडेवाकडे पाऊल तर उचलले नसेल ना? काही दिवस झालं ती खूप अपसेट होती. त्यात तुम्ही दोघे तिच्याशी खूप कठोरपणे वागला. मला माझी किट्टू हवी आहे.”
जयेशराव,“ असं काही होणार नाही. आपली किट्टू खूप स्ट्रॉंग आहे. ती असा विचार ही नाही करणार. मी शामला फोन लावून पाहतो. मध्ये एकदा ती अपूर्वची माफी मागायला त्याच्या घरी गेली होती. तीन-चार तास तिथेच होती. कदाचित आता ही इथेच असेल.”
सम्यक,“ हो करा फोन पण डायरेक्ट नका विचारू ते दोघेही टेंन्शनमध्ये येतील. अशीच मोगम चौकशी करा बाबा.” तो म्हणाला.
जयेशराव,“ हो( त्यांनी शामरावांना फोन केला आणि स्पिकर वर टाकला.) हॅलो शाम काय सुरू आहे मग आणि अप्पू काय करतोय?” त्यांनी चौकशी केली.
शामराव,“ अरे सगळं निवांत आहे बघ. आणि अप्पू आता ठिक आहे सम्यकने सांगितलंच असेल ना? शिवाय किमयाचा ही काल संध्याकाळून फोन आला होता अप्पूची चौकशी करायला. तिनेही सांगितलं असेलच की.” ते बोलत होते.
जयेशराव,“ हो सम्यकने सांगितलं पण म्हणलं आपण ही चौकशी करावी. आणि किमया काय म्हणत होती?”
शामराव,“ काही नाही. उलट म्हणाली की आपली काळजी मिटली. अप्पू आता बरा आहे हे ऐकून खुश वाटत होती.”
जयेशराव,“ बरं मग मी ठेवतो आता मी आणि सुधा भेटायला येऊ दोन तीन दिवसात.” ते म्हणाले आणि फोन ठेवला.
सम्यक,“ म्हणजे किट्टू त्यांच्या घरी देखील नाही.” तो आता चांगलाच काळजीत पडला.
जयेशराव,“ सम्यक चल किट्टू कुठे कुठे जाऊ शकते त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू. कुठे तरी भेटेल ती आपल्याला.” ते काळजीने बोलत होते.
सम्यक,“ हुंम चला नाही भेटली तर मिसिंग कंप्लेट करावी लागेल तिची. पण पोलीस ही चोवीस तास होण्याची वाट पाहतात.”
सुधा,“ माझी पोरगी कुठं असेल? तिने जीवाचे काही बरे वाईट करून घेतले ना तर मी तुम्हा दोघांना माफ करणार नाही.” त्या रडत बोलत होत्या.
जयेशराव,“ उगीच काही तरी बरळू नकोस तू. ती असं काही करणार नाही.” ते चिडून म्हणाले पण तेही आता गर्भगळीत झाले होते.
सम्यक आणि जयेशरावांनी ट्रस्टपासून प्रेमनगरच्या झोपटपट्टी पर्यंत किमया जिथे कुठे म्हणून जाऊ शकत होती. ती सगळी ठिकाणे पिंजून काढली. तसेच तिचे सगळे मित्र-मैत्रिणी त्यांचे मित्र-मैत्रिणी सगळ्यांची घरं फिरली. या सगळ्या गडबडीत सम्यकला ऑफिसमध्ये तो येणार नाही हे देखील कळवण्याचे लक्षात आले नाही. दोन वाजता सुरेंद्रचा फोन आला आणि त्याने तेंव्हा तो आज ऑफिसमध्ये येणार नाही आणि हे अपूर्वला सांगू नको असे बजावून सांगितले. त्यातच सुधा दोघांना अर्ध्या अर्ध्या तासाने फोन करत होत्या आणि किमया अजून सापडली नाही हे ऐकून रडत होत्या. आता संध्याकाळचे पाच वाजले होते. सम्यक आणि जयेशराव आता हतबल झाले होते.
सम्यक,“ बाबा आपल्याला आता पोलीस कंप्लेन्ट करावी लागेल. चला पोलीस स्टेशनमध्ये.”
जयेशराव,“ कुठं गेली असेल पोरगी? सम्यक आता मलाही भीती वाटायला लागली आहे तिने स्वतः चे काही बरे वाईट तर करून घेतले नसेल ना? मी तिच्याशी खूप कठोर वागलो का रे?” त्यांनी रडत सम्यकला विचारलं आणि सम्यकने त्यांना मिठी मारली.
सम्यक,“ असं काही नाही होणार बाबा आपली किट्टू इतकी लेचीपेची नाही. तिला काही होणार नाही. चला तुम्ही आणि उगीच काही तरी मनात शंका नका आणू.” तो त्यांना समजावत होता पण त्यालाही आता किमयाने काही चुकीचं पाऊल उचलले असेल का म्हणून भीती वाटत होती. दोघे पोलीस स्टेशनमध्ये गेले.
ऑफिसमध्ये मात्र आज महत्त्वाची मिटिंग होती आणि ती मिटिंग सम्यक न गेल्याने झाली नव्हती. आणि त्याचमुळे अपूर्वला तक्रार करण्यासाठी त्या क्लायंटने फोन केला होता. अपूर्वला आज सम्यक ऑफिसमध्ये गेला नाही याचे आश्चर्य वाटले कारण तो ऑफिसमध्ये नसताना आणि त्याला न कळवता सम्यक असा ऑफिसला काही तरी गंभीर कारण असल्याशिवाय येणार नाही.असे होणार नाही. हे त्याला चांगलं माहीत होते म्हणून त्याने सम्यकला फोन लावला. पण तो पोलीस स्टेशनमध्ये असल्याने त्याने फोन उचलला नाही.त्यामुळे अपूर्वच्या मनात आणखीनच संशय निर्माण झाला. तो शामरावांच्या रूममध्ये गेला.
अपूर्व,“ डॅड आज सम्यक भाई ऑफिसमध्ये गेला नाही. त्याने तो जाणार नाही असं काहीच मला कळलं नाही. तो असा वागत नाही. मी त्याला फोन केला पण तो फोन उचलत नाही. काही तरी गंभीर घडलं आहे डॅड. तुम्ही जयेश काकांना फोन करा आणि विचारा.” तो काळजीने बोलत होता.
शामराव,“ बरं मी करतो फोन (त्यांनी फोन केला पण जयेशराव देखील पोलीस स्टेशनमध्ये असल्याने त्यांनी ही फोन उचलला नाही.) तो फोन उचलत नाही रे अप्पू. सकाळी ही त्याचा फोन आला तेंव्हा तो जरा टेंन्शनमध्ये वाटत होता. मी सुधा वहिनीला फोन करतो.(असं म्हणून त्यांनी सुधाला फोन केला आणि त्यांनी फोन उचलला. अपूर्वने स्पिकर ऑन करा म्हणून इशारा केला त्यांनी फोन स्पिकरवर केला.) हॅलो सुधा वहिनी सम्यक आज ऑफिसमध्ये गेला नाही. त्याला फोन केला तर तो उचलत नाही जयाला केला तर तोही उचलत नाही. काय झालं आहे वहिनी.” ते काळजीने विचारत होते.
सुधा,“ भाऊजी माझी किट्टू सकाळपासून घरात नाही. तिचा मोबाईल ही घरातच आहे. तिच्या सगळ्या मित्र-मैत्रिणी, कलीग सगळ्यांना फोन केला पण ती कुठेच नाही. मग सम्यक आणि हे तिला शोधायला बाहेर पडले पण सगळे मित्र-मैत्रिणी तिची कामाची सगळी ठिकाणं सगळीकडे तिला शोधले पण ती कुठेच नाही. आता दोघे पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत मिसिंग कंप्लेट करायला म्हणून त्यांनी फोन उचलला नसेल. या काही दिवसात खूप काही घडलं. घरात पण तिच्याशी कोणी नीट वागत नव्हतं. तिने स्वतःच काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना?” त्या रडत बोलत होत्या.
शामराव,“ वहिनी असं काही होणार नाही. किमया खूप स्ट्रॉंग मुलगी आहे ती असा विचारही करणार नाही. सकाळपासून हे सगळं घडतंय आणि तुम्ही मला आत्ता सांगत आहात?”
सुधा,“ ते सम्यक म्हणाला की तुम्हाला आणि अप्पूला काही सांगू नको म्हणून.” त्या रडत बोलत होत्या आणि फोन अपूर्वने घेतला.
अपूर्व,“ किती तास झाले तिला घरातून गायब होऊन अम्मू?” त्याने विचारलं.
सुधा,“आमच्या लक्षात आले तेंव्हापासून साधारण नऊ दहा तास झाले असतील मग ती सकाळी केंव्हा निघून गेली माहीत नाही. अप्पू मला खूप भीती वाटतेय.” त्या रडत म्हणाल्या.
अपूर्व,“ अम्मू तू काळजी नको करुस काही होणार नाही तिला आणि मी डॅडला पाठवून येतो. तू रडणं बंद कर.” तो त्यांना समजावत होता पण खरं तर तोही काळजीत पडला होता.
त्याने शामरावांना किमयाच्या घरी पाठवून दिले. त्याने पहिल्यांदा किमयाच्या मागावर सोडलेल्या डिटेक्टिव्हला फोन लावला पण त्याच्याच सांगण्यावरून त्या डिटेक्टीव्हने किमयाचा माग काढणे बंद केलं होतं. तरीही त्याने त्या डिटेक्टिव्हला किमयाला शोधायला सांगितले. आणखीन दोन- तीन ठिकाणी फोन करून त्याने किमयाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.तो सोफ्यावर विचार करत बसला.
‛ यार किमया कुठे आहेस तू? अम्मूला भीती वाटते ती खरी तर ठरणार नाही ना? नाही … नाही असं काही होणार नाही. शी इस स्ट्रॉंग गर्ल. फायटर आहे ती असं भेकडासारखं पाऊल उचलणार नाही. पण तिच्याशी काही दिवस झाले कोणीच नीट वागत नाही. मी … मी सुद्धा तिच्याशी कसा वागलो? आजकाल माणसाचे काही सांगता येत नाही.. वेडा आहेस का तू अपूर्व असं काही घडलं नसणार. ती कुठे तरी गेली असणार… पण कुठे जाऊ शकते ती…(त्याने थोडा विचार केला.) एक ठिकाण आहे जिथे ती जाऊ शकते. तिथेच सापडणार ती. माझ्या हे आधीच लक्षात यायला हवं होतं.’
असं म्हणून तो उठला आणि गाडी घेऊन निघाला.
किमया खरंच कुठे गायब झाली असेल? अपूर्व तिला शोधू शकेल का?
वाचूया पुढच्या भागात
क्रमशः
©swamini chougule
