ब्रोकन बट ब्युटीफुल भाग 11

    




    अपूर्वला घरी येऊन आठ दिवस झाले होते आणि तो आता बरा होता तरी अजून जखम पूर्णपणे भरायची होती आणि अजून ही त्याच्या अंगात  अशक्तपणा होताच. सुधा आठ दिवस राहून शामरावांच्या सांगण्यावरून घरी निघून गेली. शामराव मात्र डोळ्यात तेल घालून अपूर्वची काळजी घेत होते. डॉक्टरांनी सांगितलेला डाएट आणि त्याच्या औषधांच्या वेळ काटेकोरपणे पाळत होते.


  इकडे किमयाला तिच्या अपूर्ववरील प्रेमाची जाणीव झाली होती पण अपूर्व तिच्यावर नाराज असल्याने तिने आधी त्याला मनवायचं आणि मग त्याच्यावरच तिचे असलेले प्रेम व्यक्त करायचे असे मनोमन ठरवले होते. 


 किमया सध्या घरातच असायची ती आज मनात काही तरी ठरवून सकाळीच घरा बाहेर पडली. आणि ती अपूर्वच्या घरी जाऊन धडकली. शामराव पेपर वाचत बसले होते. त्यांना इतक्या सकाळी किमयाला आलेलं पाहून आश्चर्य वाटलं.


किमया,“ गुड मॉर्निंग काका.” ती त्यांच्यासमोर जात म्हणाली.


शामराव,“ गुड मॉर्निंग किमया पण तू इतक्या सकाळी इथे?” त्यांनी विचारलं.


किमया,“ आले असंच. अपूर्व उठला नाही का अजून? आणि त्याची तब्बेत कशी आहे आता?” तिने विचारलं.


शामराव,“ नाही उठला गं तो. आजकाल औषधांमुळे त्याला लवकर जाग येत नाही आणि डॉक्टरांनी ही आराम करायला सांगितला आहे ना त्याला म्हणून मीही उठवत नाही. आणि त्याची तब्बेत तशी ठीक आहे पण जखम भरायला अजून वेळ लागेल आणि विकनेस ही आहे अजून बराच. तू बोल तू कशी आहेस? आणि खरंच तू तुझे समाजसेवेचे काम बंद केलंस का?” त्यांनी विचारलं.


किमया,“ हुंम! जखम भरायला आणि विकनेस ही कमी व्हायला वेळ तर लागेलच ना काका. आणि सध्या तरी मी ट्रस्टमध्ये जात नाही दोन महिने सुट्टी टाकली आहे. बाबा या घडणेमुळे खूप घाबरले आहे म्हणून थांबले आहे पण अजून काम पुढे करायचं की सोडून द्यायचं ते मात्र ठरवलं नाही.” 


शामराव,“ बाप म्हणून जयेशचे घाबरणे साहजिक आहे किमया. पण तू जे काम करतेयस ते खूप चांगले आहे. तुझ्यामुळे आज ते नराधम गजाआड आहेत. तू तुझं काम नको सोडूनस बेटा. बरं तू चहा घेणार की कॉपी? सुनीता इकडे ये” 


किमया,“ कॉफी! थँक्स काका पण माझ्या याच कामामुळे मला वाचवायला जाऊन  अपूर्वचा जीव धोक्यात आला होता. मी त्यादिवशी त्याचे ऐकायला हवे होते. तो मला वाचवायला आला होता आणि पुन्हा मी त्याच्याच वर आरोप केले त्याला पुन्हा दुखावलं.मला त्याची माफी मागायची होती आणि आहे पण त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये त्याने मला समोर ही उभं केलं नाही. त्याला त्रास नको म्हणून मी पुन्हा त्याच्यासमोर येण्याचा प्रयत्न केला नाही पण मी किती दिवस मनात हे गिल्ट घेऊन फिरू? या आधी ही मी त्याचा आणि तुमचा अपमान गेला त्याबद्दल ही त्याची मला माफी मागायची आहे. म्हणून म्हणले आज प्रयत्न करावा त्याच्याशी बोलण्याचा.” तो डोळ्यातले पाणी अडवून बोलत होती.तोपर्यंत सुनीता कॉफी घेऊन आली.


शामराव,“ कॉफी घे. किमया अप्पू खूप मनस्वी आहे. त्यात तू त्याला खूप दुखावलेस तो तुला सहजासहजी माफ करेल असं मला वाटत नाही. तुला खूप एफर्ड घ्यावे लागतील त्यासाठी.” ते तिला पाहत म्हणाले.


किमया,“ ते मला ही माहीत आहे. मी त्याची माफी आणि मैत्री …खरं तर प्रेम(ती मैत्रीनंतरचे शब्द तोंडाल्या तोंडात पुटपुटत.) पुन्हा मिळवण्याचा  पुरेपूर प्रयत्न  करेन. पण काका त्यासाठी मला तुमची परवानगी लागेल.” ती कॉफी घेत म्हणाली. शामरावांनी मात्र तिने तोंडात पुटपुटलेले शब्दही ऐकले होते.


शामराव,“ त्यासाठी तुला माझी परवानगी कशाला हवी. तू आणि तुझा मित्र पाहून घ्या बाबा. मी काय  तुमच्यामध्ये पडणार नाही.” ते खांदे उडवत म्हणाले.


किमया,“ थँक्स काका. मी पनीर घेऊन आले आहे. अपूर्वला पनीर पराठे खूप आवडतात आणि त्याच्या हेल्थसाठी देखील ते चांगले आहेत. मी बनवू का?” तिने पुन्हा विचारलं.


शामराव,“ आरे नेकी और पुछ बुझ? किचन तुझेच आहे आणि हो मलाही हवेत आ पराठे. साडे नऊ वाजले थोड्याच वेळात अप्पू येईल नाश्त्याला.” ते म्हणाले.


किमया,“ हो तुमच्यासाठी पण करणार आहे.” ती हसून म्हणाली आणि किचनकडे वळली.


   थोड्याच वेळात अपूर्व त्याच्या रूममधून हॉलमध्ये आला. शामराव कसले तरी पेपर्स वाचत बसले होते.


अपूर्व,“ गुड मॉर्निंग डॅड.”तो हसून म्हणाला.


शामराव,“ व्हेरी गुड मॉर्निंग बच्चा आणि आता हात कसा आहे तुझा? दुखतोय का अजूनही खूप?” त्यांनी काळजीने विचारलं.


अपूर्व,“ इतका नाही पण दुखतोय अजूनही दिवसभर नाही पण रात्री झोप लागे पर्यंत ठणका जाणवतो डॅड.” तो म्हणाला.


शामराव,“ हुंम. गोळी लागल्याची जखम आहे बेटा मग दुखणारच ना. म्हणूनच म्हणतो तुला की आराम कर. आता आज नर्स येईल ड्रेसिंगला तेंव्हा मी डॉक्टरांना फोन लावून विचारतो की आणखीन एखादी गोळी देता येईल का ते?” 


अपूर्व,“ नको डॅड आधीच आहेत त्या गोळ्या कमी आहेत का? तीन वेळा गोळ्या आहेत त्याच खाऊन वैताग आला आहे त्यात आणखीन भर नको.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.


सुनीता,“ नाश्ता तयार आहे साहेब.” 


शामराव,“ चल नाश्ता कर तुला औषधं घ्यायची आहेत ना सकाळची.” ते म्हणाले. 


   अपूर्व आणि ते किचनला लागून असलेल्या डायनींग हॉलमध्ये गेले. तिथे किमया डायनींग टेबलवर प्लेट्स लावत होती. तिला पाहून अपूर्व भडकला.


अपूर्व,“ ही इथे का आली आहे डॅड?” त्याने रागाने विचारलं.


किमया,“ अपूर्व त्यांना नको विचारू. मी सांगते ना. मी तुझी माफी मागायला आले आहे इथं. पहिल्यांदा नाश्ता कर औषधं घे मग आपण निवांत बोलू.” ती त्याला समजावत म्हणाली.


अपूर्व,“ मला कोणाशीही काहीच बोलायचं नाही.”


  तो रागाने म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. किमया त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली.


शामराव,“ मी बाहेर जात आहे बघा बाबा किमया मॅडम आता मित्राची कशी माफी मागायची ते.” ते म्हणाले आणि निघून गेले.


 किमया त्याच्या पाठोपाठ त्याच्या रूमकडे गेली तर अपूर्वने त्याच्या रूमचे दार लावून घेतले होते. 


किमया,“ अपूर्व प्लिज माझं ऐकून तरी घे ना. एकदा दार उघड ना. मला माहित आहे माझं चुकलं आहे पण मला माझी बाजू मांडण्याची आणि माफी मागण्याची एक संधी तरी दे ना रे.” ती दारावर थाप मारत बोलत होती.


अपूर्व,“ तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जस्ट गो फ्रॉम हिअर! मला ना तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट आहे ना तुझे काही ऐकून घेण्यात.” तो दार न उघडताच आतून ओरडला.


किमया,“ ठीक आहे. मग ऐक जोपर्यंत तू दार उघडत नाहीस आणि माझं ऐकत नाहीत तोपर्यंत मी इथेच तुझ्या रूमच्या दारात बसून राहते.” ती ठामपणे म्हणाली.


अपूर्व,“ जस्ट डू व्हॉट यु वॉंट!” तो रागाने म्हणाला.


किमया,“ ठीक आहे.” ती म्हणाली आणि ती खरंच त्याच्या रूमच्या बाहेर बसली.



    तासाभराने शामराव घरी आले. त्यांना वाटले होते की अपूर्व आणि किमयामध्ये आत्तापर्यंत कमीत कमी बोलणे तर झाले असेल त्यांना माहीत होते की अपूर्व किमयाला लगेच माफ नाही करणार पण कमीत कमी तो किमयाचे म्हणणे तरी ऐकून घेईल अशी त्यांना अपेक्षा होती पण त्यांची ही अपेक्षा फोल ठरली होती. ते अपूर्वच्या रूमकडे आले तर रूमचे दार बंद होते आणि किमया दारात बसलेली त्यांना दिसली.


शामराव,“ काय गं तू इथे का बसली आहेस?” 


किमया,“ अपूर्वने माझे काहीच ऐकून न घेता दार लावून घेतले काका. पण मी त्याच्याशी बोलणे झाल्या शिवाय नाही जाणार.” ती म्हणाली.


शामराव,“ म्हणजे इतकावेळ झालं तो दार बंद करून बसला आहे? त्याने नाश्ता ही नाही केला ना?( त्यांनी विचारलं आणि किमयाने नकारार्थी मान हलवली.) अप्पू दार उघड काय वेडेपणा लावला आहेस तू? अकरा वाजून गेले तरी अजून तू काही खाल्लं नाहीस म्हणजे औषधं ही घेतली नसशील?” त्यांनी दारावर थाप मारूत विचारलं आणि त्यांचा आवाज ऐकून अपूर्वने दार न उघडताच उत्तर दिलं.


अपूर्व,“ हिला जायला सांग इथून. तिला काय वाटते की हिने असं धरणे आंदोलन केलं तर मी हिला माफ करेन? ही काही हिची ट्रस्ट किंवा फिल्ड नाही.” तो रागाने तणतणत होता.


किमया,“ मी म्हणत नाही अपूर्व की तू मला माफ कर पण कमीत कमी माझे म्हणणे तरी ऐकून घे.” ती अजिजीने म्हणाली.


अपूर्व,“ मला काहीच ऐकायचं नाही. आणि तुला तुझीच भाषा समजत असेल तर डॅड ही जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत मी दार तर उघडणार नाहीच पण अन्न-पाणी आणि औषधं ही घेणार नाही.” तो रागाने म्हणाला.


शामराव,“काय वेडेपणा आहे हा अप्पू? थोड्याच वेळात नर्स ड्रेसिंगला येईल. आणि तू काही खाल्लं नाहीस औषधं घेतली नाहीस  तर अजून विकनेस येईल ना बच्चा! अशाने तुझी तब्बेत अजून बिघडेल.” ते काळजीने त्याला समजावण्याच्या सुरात बोलत होते.


अपूर्व,“ होऊ दे काय व्हायचं ते. जोपर्यंत ही इथून जात नाही तोपर्यंत मी दार उघडणार नाही.” 


किमया,“ काय मूर्खपणा आहे हा अपूर्व? मी काय इथं धरणे आंदोलन वगैरे करायला आलेली नाही. दुखावल्या गेलेल्या माझ्या मित्राची माफी मागायला आले आहे मी. ज्याला मी खूप हर्ट केलं आहे.” ती आवंढा गिळत म्हणाली.


अपूर्व,“ डॅड हिला इथून जायला सांग.” तो पुन्हा म्हणाला.


  शामरावांची  अवस्था मात्र कात्रीत सापडल्या सारखी झाली. एकीकडे किमया आणि दुसरीकडे अपूर्व. तरी त्यांना त्यांच्या मुलाचे सुख कशात आहे हे माहीत होते. अपूर्व किमयाला शिक्षा देण्याच्या हट्टापाई स्वतःलाच शिक्षा देत आहे त्याच्या मनात  किमया विषयी राग कमी आणि दुःख जास्त आहे आणि त्या दुःखावर फुंकर फक्त किमयाच घालू शकते हे त्यांना चांगलंच माहीत होते. म्हणून ते  किमयाला काहीच न बोलता तिथून निघून गेले त्यांना माहीत होते की तासाभरात नर्स ड्रेसिंगला येईल आणि तिच्यासाठी अपूर्वला दार उघडावे लागेल तेंव्हा ते त्याची समजून काढून त्याला खायला घालू शकतात आणि किमयाही त्याच वेळी त्याच्याशी बोलू शकते. किमया ही त्यांच्या पाठोपाठ गेली.


किमया,“ काका मी जाते. अपूर्व असं काही वागेल असं मला वाटलं नव्हतं. आधीच मी त्याला खूप त्रास देऊन झाला आहे. माझ्याच मुळे तो या अवस्थेत पोहचला आहे. मला त्याला अजून त्रास द्यायचा नाही. आत्ता त्याची तब्बेत माझे त्याच्याशी बोलण्यापेक्षा महत्त्वाची आहे.” ती डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली.


शामराव,“थांब तू किमया. तो तुझ्याशी असं वागून स्वतःला आणखीन त्रास करून घेत आहे. त्याच्या मनात तुझ्या विषयी रागापेक्षा तू त्याला दुखावल्याचे दुःख आहे आणि त्या दुःखावर तूच फुंकर घालू शकतेस. अजून तासाभरने नर्स येईल ड्रेसिंगला तेंव्हा त्याला दार उघडावे लागेल तेंव्हा मी त्याला समजावून खायला घालेन आणि तुला त्याच्याशी बोलताही येईल. आत्ता जसं सुरू आहे तसं सुरू राहू दे.” ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.


किमया,“ थँक्स काका मला समजून घेतल्याबद्दल!” ती म्हणाली आणि पुन्हा अपूर्वच्या रूमबाहेर जाऊन बसली.


    एका तासाने अपेक्षेप्रमाणे नर्स ड्रेसिंगला आली.


शामराव,“ दार उघड अप्पू नर्स आल्या आहेत ड्रेसिंगला.” ते दार वाजवत म्हणाले.


अपूर्व,“ त्यांना जायला सांग तू. आज ड्रेसिंग करून घेणार नाही मी. कारण ती अजून दाराबाहेर आहे माझ्या.”तो चिडून म्हणाला.


शामराव,“ काय मूर्खपणा आहे हा अप्पू. ड्रेसिंग नाही केलं तर जखम चिघळेल तुझी. दार उघड खूप झाले तुझे.”तेही आता रागाने म्हणाले.


अपूर्व,“नाही उघडणार.” तोही रागाने म्हणाला. 


किमया,“ अपूर्व दार उघड मी जातेय. माझ्यामुळे तुझ्या तब्बेतीची हेळसांड नको व्हायला. दोन वाजले काका त्याने काहीच खाल्ले नाही अजून औषधं ही घेतली नाहीत ड्रेसिंग झाल्यावर त्याला जेवायला लावा आणि औषधं द्या. सॉरी अपूर्व माझ्यामुळे पुन्हा तुला त्रास झाला पण मला तुला त्रास द्यायचा नव्हता. मी जाते.” ती कातर आवाजात म्हणाली आणि निघून गेली. ती गेली आणि अपूर्वने दार उघडलं.


     शेवटी किमयाने अपूर्वच्या हट्टा पुढे हार मानली आणि ती निघून गेली होती.  आधी किमया अपूर्वबद्दल नको ते गैरसमज घेऊन बसली होती आणि आता अपूर्व तिचे काहीच ऐकून घ्यायलाच काय  पण  तिलासमोर ही उभं करून घ्यायला तयार नव्हता.  किमयाने आत्ता तर हार मानली होती पण ती इतक्या सहज हार मानणार होती का? आता तर तिला तिचे त्याच्यावर असलेलं प्रेमही उमगले होते पुढे ती काय करेल? 


वाचूया पुढच्या भागात

क्रमशः

©स्वामिनी चौगुले 








 





Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post