ब्रोकन बट ब्युटीफुल भाग 10

 



किमया बाहेर खुर्चीवर विनस्क अवस्थेत बसली होती. तिचे डोळे सतत झरत होते. सम्यक तिच्या शेजारी जाऊन बसला. किमयाने त्याला पाहिलं आणि डोळे पुसले.


किमया,“ तो ठीक आहे ना आता?त्याला कधीपर्यंत शुद्ध येईल भैय्या?” तिने विचारलं.


सम्यक,“  डॉक्टरांनी तुझ्याचसमोर सांगितलं ना की तो आउट ऑफ डेंजर आहे म्हणून. आणि त्याला संध्याकाळपर्यंत शुद्ध येईल असं म्हणत होते डॉक्टर पण तो ठीक आहे का हे तर तो शुद्धीवर आल्यावरच कळेल आपल्याला.” तो दीर्घ श्वास घेत म्हणाला.


किमया,“ भैय्या माझं चुकलं आहे पुन्हा. तो मला वाचवण्यासाठी आला होता पण मी त्याच्याशी पुन्हा भांडले त्याला नको ते बोलले.मी पुन्हा त्याच्यावर नको ते आरोप केले आज.” ती रडत बोलत होती.


सम्यक,“ किमया तुला मी आधीच सांगितलं होतं आणि समजावलं ही होतं की तुझ्या डोळ्यावरची पट्टी काढून त्याच्याकडे बघ. सावर स्वतःला पण तू नाही ऐकलेस माझे. आज त्याने तुझा जीव वाचवायला जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घातला. एक मिनिटं ही विचार केला नाही त्याने स्वतःचा. आज मला खात्री पटली की तुझ्यावर अपूर्व इतकं प्रेम जगात कोणीच करणार नाही. पण तू कमनशिबी निघालास तुला नाही कळली त्याच्या प्रेमाची किंमत. तू स्वतःच त्याला गमावले आहेस.” तो बोलत होता आणि किमया रडत होती. तोपर्यंत तिथे पोलीस इन्स्पेक्टर आले.


इन्स्पेक्टर,“ मॅडम तुमचा जाब आम्हाला लिहून घ्यायचा आहे. आम्ही घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. आणि हो मिस्टर मुजुमदारांनी वेळीच आम्हाला कळवल्याने त्या शार्प शुटरला पकडण्यात आम्हाला यश आले आहे. इथे पोलीस  सिक्युरिटी टाईट आहे. तुम्ही निश्चिन्त रहा. पवार साहेब शुद्धीवर आल्यावर त्यांचा जबाब आपण घेणार आहोत.” तो बोलत होता.


किमया,“ ठीक आहे मी देते जबाब पण इथं नको आपण बाहेर जाऊ.” ती म्हणाली आणि इन्स्पेक्टरने होकारार्थी मान हलवली आणि  दोघे बाहेर गेले.

★★★


    अपूर्व जवळ दिवसभर शामराव बसून होते. बाहेर बाकी सगळे होते. अपूर्वने  संध्याकाळी सहा वाजता डोळे उघडले. शामरावांनी ते पाहिलं आणि ते त्याच्या केसातून मायेने हात फिरवत म्हणाले.


शामराव,“ कसं वाटतंय तुला अप्पू? मी डॉक्टरांना बोलावतो.”


अपूर्व,“ मी ठीक आहे डॅड.मी किती वेळ झोपून होतो? किती वाजले?” त्याने इकडे तिकडे पाहत विचारलं.


शामराव,“ संध्याकाळचे सहा वाजले आहेत बच्चा. तू जास्त बोलू नकोस आराम कर.” 



   ते म्हणाले आणि त्यांनी बेल दाबली थोड्याच वेळात नर्स आली आणि तिने अपूर्वला उठलेलं पाहून डॉक्टरांना बोलावून आणले. डॉक्टरांनी त्याला तपासले.आणि नर्सला काही सूचना देऊन ते रूमच्या बाहेर आले.


शामराव,“ डॉक्टर काळजीचे काही कारण नाही ना?” 


डॉक्टर,“ काळजी करण्याचे तसे काही कारण नाही पण काळजी घ्यावी लागेल. चार दिवस पेशंटला हॉस्पिटलमध्ये राहावे लागेल. ब्लड लॉस झाल्यामुळे अशक्तपणा जाणवू शकतो पण पौष्टिक डाएट फॉलो केलं तर महिन्याभरात ते रिकव्हर होतील. दंडाला जखम आहे त्याचे ड्रेसिंग दोन दिवसातून एकदा करावे लागेल. हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर आमची नर्स येऊन ड्रेसिंग करून देईल. पंधरा दिवस सक्तीची विश्रांती घ्यावी लागेल. बाकी ही इज ऑल राईट! त्यांना नाश्ता द्या दुपारी जेवण केलेलं दिसत नाही त्यांनी. आणि तुमच्या पैकी  एकच व्यक्ती इथे थांबू शकते बाकी घरी जा.” 


सम्यक,“ आम्ही त्याला भेटू शकतो का?”त्याने विचारले.


डॉक्टर,“ हो भेटू शकता पण एकदम नाही. एक दोन जण भेटा.” ते म्हणाले आणि निघून गेले.


शामराव,“ तुम्ही अप्पूला भेटा आणि घरी जा.” ते म्हणाले.


जयेशराव,“ हो आम्ही भेटतो त्याला पण शाम तू आमच्याबरोबर चल सम्यक थांबेल अप्पू बरोबर.”


सम्यक,“ हो काका मी थांबतो तुम्ही जाऊन आराम करा.”


शामराव,“ नको तुम्ही सगळे जा. माझ्या अप्पूला अशा अवस्थेत हॉस्पिटलमध्ये सोडून मला घरी चैन नाही पडणार. त्यापेक्षा मी थांबेन इथंच त्याच्याजवळ” ते आवंढा गिळत म्हणाले.


सुधा,“ काय बोलावे यावर भाऊजी. या आमच्या  मूर्ख मुलीने तुमचा आणि अप्पूचा इतका अपमान करून ही हिला वाचवायला जाऊन आज अप्पू हॉस्पिटलमध्ये आहे. त्याने उपकार केले आहेत आमच्यावर आणि तरी तुम्ही एका शब्दाने काही बोलला नाहीत.की दूषण देखील लावले नाही.” त्या रडत हात जोडून म्हणाल्या.


शामराव,“ काय आणि कोणाला दूषणे देऊ मी वहिनी? माझाच मुलगा चुकीच्या ठिकाणी जीव लावून बसला आहे आणि त्याने जे केलं त्याचा अभिमानच आहे मला. त्याने किमयाचा जीव वाचवला म्हणजे काही तुमच्यावर उपकार नाही केले. त्याने त्याची मैत्री निभावली.” ते म्हणाले आणि किमया रडायला लागली.


किमया,“ माझं चुकलं काका मी कायम अपूर्वचा अपमान केला त्याच्यावर चुकीचे आरोप केले पण आज त्याने माझ्यासाठी त्याचा जीव धोक्यात घातला.” 


शामराव,“ ही वेळ हे सगळं बोलण्याची नाही. ते बघा वॉर्डबॉय नाश्ता घेऊन आला. मी अप्पूला खायला घालतो. तुम्ही त्याला भेटा आणि घरी जा.” ते म्हणाले.


सुधा,“ बरं पण रात्रीचे तुमच्या दोघांचे जेवण मी सम्यककडे पाठवून देईन आणि सम्यक ही थांबेल तुमच्याबरोबर रात्री.” 


सम्यक,“ हो काका मी बोलून घेतो हॉस्पिटल मॅनेजमेंटशी आणि थांबतो रात्री.” तो म्हणाला.


 सुधा आणि जयेशराव अपूर्वला भेटले मग सम्यक आणि किमया त्याला भेटायला गेले. अपूर्व बेडवर बसला होता. त्याच्या डाव्या हाताला मोठी पट्टी बांधून हात गळ्यात बांधला होता. उजव्या हाताला ड्रिप लावलेली होती. आणि शामराव त्याला भरवत होते. अपूर्वने दोघांना पाहिलं पण किमयाला समोर पाहून त्याची नाखुशी चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तरी तो काही बोलला नाही.


सम्यक,“ मग काय हिरो बरा आहेस ना?” 


अपूर्व,“ हो मी बरा आहे भाई.आणि तुम्ही अजून इथेच का, घरी जा.”


सम्यक,“ असं कसं घरी जाणार ना. मी तर रात्री इथेच झोपायला येणार बाबा. तेवढाच चेंज.” तो मुद्दाम नाटकीपणे म्हणाला.


अपूर्व,“ भाई हे हॉस्पिटल आहे पिकनिक स्पॉट नाही.” तो हसून म्हणाला.


सम्यक,“ हो पण मी बोर झालो आहे ना. मग हॉस्पिटल का असे ना मला चेंज मिळेल.” तो हसून म्हणाला आणि अपूर्व ही हसायला लागला. इतका वेळ बाजूला उभं राहून त्यांचे संभाषण ऐकणारी किमया हिम्मत करून  अपूर्वच्या थोडी समोर आली आणि बोलू लागली.


किमया,“ सॉरी अपूर्व माझ्यामुळे तुला गोळी लागली. तू मला तिथे वाचवायला आला होतास आणि मी तुला नाही नाही ते बोलले.” ती खाली मान घालून कातर आवाजात बोलत होती.


अपूर्व,“ डॅड हिला इथून जायला सांग. मला ही माझ्या समोर  नको आहे. ही मला नेमकं कोण समजते? हिच्या मनाला  वाट्टेल ते आणि तसे आरोप करते ही. मला ही माझ्या नजरेसमोर ही नको आहे.” तो रागाने ओरडून बोलत होता.


शामराव,“ अप्पू प्लिज तू शांत हो बेटा. तुला त्रास होईल.” ते त्याला शांत करत म्हणाले.


किमया,“ प्लिज अपूर्व ….” ती पुढे बोलणार तर सम्यकने तिचे बोलणे मध्येच थांबवले.


सम्यक,“ अपूर्व तू शांत हो. किमया चल बाहेर. त्याला अजून त्रास व्हायला नको.” तो म्हणाला आणि किमयाला रूम बाहेर घेऊन गेला. अपूर्वने केलेला आरडाओरडा बाहेर उभ्या असलेल्या सुधा आणि जयेशरावांनी ऐकला होता.


सुधा,“ झाले तुझे समाधान त्याला आणखीन त्रास देऊन. मी तुला म्हणाले होते किमया की नको जाऊस त्याच्यासमोर पण तुला कधी कोणाचे ऐकायचं असतं का? आजही तू अपूर्वचे थोडे ऐकले असतेस तर पुढचा अनर्थ टळला असता. तरी देवाच्या कृपेने थोडक्यात निभावले सगळे. पण तुला वाचवायला जाऊन अप्पूला काही झाले असते त्याचा जीव धोक्यात आला असता तर शाम भाऊजींना आम्ही काय तोंड दाखवणार होतो?” त्या रागाने बोलत होत्या.


जयेशराव,“  हिला सांग सुधा हिची समाजसेवा आता बंद कर म्हणून .हिला किंवा अप्पूला आज काही झाले असते तर आपण काय करणार होतो? बास झाली हिची मनमानी.” ते चिडून बोलत होते. किमया मात्र नुसती रडत होती.


सम्यक,“ घरी चला आणि मग बोला काय ते. इथं तमाशा नको आणि किमया प्लिज तू अपूर्वला भेटायला येऊ नकोस पुन्हा.” तो म्हणाला.


  आणि सगळे घरी गेले.

★★★


अपूर्वला चार दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. पण तो कमीत कमी पुढचे पंधरा दिवस तरी ऑफिसला जाऊ शकणार नव्हता. सम्यक एकटाच ऑफिस सांभाळत होता. महत्त्वाच्या कागदपत्रांवर अपूर्वच्या सह्या घरी येऊन घेऊन जात होता. सुधा अपूर्वकडे काही दिवस त्याची काळजी घ्यायला राहायला आली होती. 


   या सगळ्या घटनेमुळे आणि अपूर्वसारखा नामांकित बिझनेसमन गोळीबारात जखमी झाल्यामुळे ती सामूहिक बलात्काराची केस हायप्रोफाईल झाली होती आणि त्यामुळे पोलिसांना त्या पाटलाच्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना अटक करावी लागली. पाच आरोपी आज गजाआड झाले होते. तरी किमया आणि अपूर्वला पोलिसांनी सिक्युरिटी देऊ केली पण दोघांनी ही ती नाकारली होती.


 या सगळ्यात किमया मात्र एकटी पडली होती. जयेशरावांनी काही दिवस तिला घरातून बाहेर पडायचे नाही म्हणून सांगितलं होतं आणि तिला ट्रस्टमधील तिच्या पदाचा राजीनामा दे म्हणून बजावले होते. किमया  आता घरातच होती. तिच्या मनात अपूर्वबद्दल सतत विचार घोळत होते. तिला अपूर्वबद्दल तिने करून घेतलेल्या गैरसमजांचा पश्चात्ताप तर होतच होता पण या एका घटनेने अपूर्वबद्दल तिच्या भावना बदलत चालल्या होत्या. ती तिच्या रूममध्ये बसली होती. 


‛ खरंच अपूर्वबद्दल आपण मनात किती गैरसमज घेऊन बसलो होतो. तो माझा बेस्टफ्रेंड होता. पण त्याने मला सपोर्ट केला नाही म्हणून मी त्याच्यापासून दूर झाले. कॉलेजमध्ये ही त्याचे म्हणणे ऐकून न घेता त्याच्याबद्दल नको तो विचार केला. त्याला सतत दुखवत आले.त्याच्यावर नको ते आरोप केले. पण त्याने त्याने कायम त्याची मैत्री? मैत्री की प्रेम? निभावले. त्याला काही झाले असते तर? त्याचे प्रेम आहे माझ्यावर आणि माझे? माझं काय? त्या दिवशी पूनम त्याला पटवण्याचा विचार करत होती. त्याची स्तुती करत होती आणि मला तिच्या राग आला? पण का? की मी ही मनोमन नकळत त्याच्यावर प्रेम करतेय? त्यानंतर काकांनी त्याला लग्नासाठी पाहिलेल्या मुलींचे फोटो मला दाखवले त्या दिवशीही मला ते आवडले नाही. खूप राग आला मला काकांचा! माझ्या हातून काही तरी अमूल्य निसटून जाईल अशी भीती वाटली मला. एक वेगळीच हुरहूर मनाला लागली. त्याला गोळी लागली आणि त्याला कायमचं गमावण्याच्या विचारानेच मी मुळापासून हादरून गेले. आताही त्याला सतत भेटावेसे वाटते. माझ्या मनात त्याच्याबद्दल तिरस्कार असेल तर मग या भावना कोणत्या आहेत? पण आधी  काकांनी स्वतःच मला मागणी घातली होती पण मीच त्यांचा, अपूर्वचा अपमान केला मग मला आता असं का वाटतंय या कोणत्या भावना आहेत? की माझ्या मनात आधीपासून या भावना होत्या? कारण शाळेतही अपूर्वशी कोणत्याही मुलीने बोलेलं मला आवडत नव्हतं. कॉलेजमध्येही मुली त्याच्या मागेपुढे करायच्या त्यांचा मला राग यायचा? पण का? माझ्या मनात त्याच्याबद्दल नेमक्या कोणत्या भावना आहेत? 


   कदाचित माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आधीपासूनच होते पण माझा इगो ते प्रेम स्वीकारू देत नव्हता. आणि त्यातूनच मी अपूर्ववर सतत राग काढत होते का? कारण माझ्या प्रगट  मनाला त्याच्यावर असलेलं सुप्त प्रेम स्वीकारायचं नव्हतं. म्हणून कारणं काढून मी त्याच्यापासून लांब पळत होते का? कदाचित हो!’


   किमयाला कदाचित तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो पण आपला इगो ते मान्य करू देत नाही आणि आपले सुप्त मन देखील त्या भावनांचे प्रगटीकरण होऊ देत नाही. ते आपल्याला त्या व्यक्तीपासून लांब राहा म्हणून बजावत राहते. मग तेच प्रेम दडपून टाकण्यासाठी आपण त्या व्यक्तीपासून लांब पाळतो. कधी त्या व्यक्तीला झिडकारतो तर कधी त्याच्याबद्दल  तिरस्काराचा मुखवटा धारण करतो. त्या व्यक्तीचा तिरस्कार करण्याची कारणे शोधतो.त्यातून  त्याच्याबद्दल मनात गैरसमज आपले आपण निर्माण करून घेतो. खरं तर हे सगळे आपल्याच मनाचे खेळ असतात आणि त्या खेळांना आपण बळी पडतो. स्वतःला सतत बजावत राहतो की ती व्यक्ती चांगली नाही आणि व्यक्तीबद्दलच्या खऱ्या भावना दडपून टाकतो. मानवी मन असतेच विचित्र. पण कधी कधी आपल्या आयुष्यात अशा घटना घडतात की त्या व्यक्तीबद्दल असलेल्या आपल्या सुप्त भावना सुप्त मनातून प्रगट मानत येतात आणि आपला आपल्याच भावनांबद्दल गोंधळ उडतो. आपल्यालाच कळत नाही की आत्तापर्यंतचा तिरस्कार खरा होता की आत्ता वाटणारे प्रेम? 


  अशाच मानसिक गोंधळात किमया आता अडकली होती आणि बऱ्याच विचार मंथनानंतर तिला तिच्या भावनांचा खरा अर्थ उमगला होता.


 मानवी मन एखाद्या गूढ आणि खोल तळ्यासारखे असते. जसे आपण पाण्यात खोल उतरू तसे आपल्याला त्या पाण्याचे खरे अंतरंग कळतात त्यात काय काय दडले आहे ते कळते म्हणजे वरवर पाहताना तळ्यातले पाणी शांत आणि स्वच्छ दिसते पण आपण त्यात उतरलो की आपल्याला कळते की पाणी शांत नाही तर त्याला एक प्रवाह आहे. मग आणखीन खोल सूर मारला की कळले की आरेच्चा हे पाणी आपण समजतो तसे नितळ नाही तर यात तर चिखल माती आहे तसेच मासे आणि वनस्पती ही आहेत. आपण आणखीन खोल गेलो की आपल्याला त्या तळ्याचा दगडगोटे आणि चिखल माती असलेला खोल तळ लागतो. अगदी तसेच मानवी मनाचे असते वरवर प्रगट मन शांत असते. पण जरा खोल गेलं की भावना आणि विचारांची अनेक आंदोलने आपल्याला जाणवतात आणखीन जरा खोली गाठली की आपल्याला जाणवते की आपण अहंकार, द्वेष किंवा मग आपली गृहीतके यामुळे आपल्या सुप्त मनातील भावना दडपतो त्यांना वर येऊ देत नाही. त्या तशाच आपल्या सुप्त मनात राहून जातात आणि आपले प्रगट मन आपल्याला जसा आदेश देईल तसे आपण वागतो पण त्या भावना वरवरच्या असतात आणि खोल सुप्त मनाच्या तळाशी असलेल्या भावना या खऱ्या असतात आणि त्या भावना समजून घ्यायला किंवा उफाळून यायला वेळ लागतो कारण त्या खोलवर दडलेल्या असतात.


  अपूर्वबद्दलच्या त्याच भावना आज किमयाला उमगल्या होत्या पण  सम्यक म्हणाला तसं आता बराच उशीर झाला होता. अपूर्व खोलवर दुखावला गेला होता. आता किमया हार मानून तिचे प्रेम जाऊ देणार होती की अपूर्वच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालून त्याला आपलेसे करणार होती?


वाचूया पुढच्या भागात

क्रमशः

©swamini chougule




 

 


Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post