असाच एक महिना निघून गेला जो-तो आप- आपल्या कामात व्यस्थ होता. सम्यकचे लग्न ठरले होते आणि अपूर्वने अजून तरी मुलगी पसंत केली नव्हती. शामराव त्याला मुली दाखवून आता कंटाळले होते. तरी ते हार माणणाऱ्यातले नक्कीच नव्हते किमयाचे ही तिचे समाज सेवेचे काम जोरात सुरू होते. सकाळची वेळ होती अपूर्व ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन नाश्ता करत होता. तर शामराव पेपर वाचत होते.
शामराव,“ अप्पू तू बातमी तर ऐकलीच असेल त्या प्रेमनगरच्या झोपडपट्टील्या कॉलेजला जाणाऱ्या एका गरीब तरुणीवर त्या आमदार मंगेश पाटीलच्या मुलानी आणि त्याच्या चार मित्रांनी सामूहिक बलात्कार केला म्हणे. ती मुलगी कोमात आहे पण तिला कॉलेजमधून उचलून नेतानाची सी.सी.टी. व्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली आहे.” ते पेपर वाचत बोलत होते.
अपूर्व,“ हो ऐकली आणि वाचली ही आहे मी बातमी. त्या नराधमांना कठोर शिक्षा व्हायला हवी डॅड.”
शामराव,“ खरं आहे पण पोलीस म्हणत आहेत की ते पाच आरोपी फरार झाले आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे पण सगळ्यांना माहीत आहे की ते शहरातच कुठेतरी लपून बसले आहेत.”
अपूर्व,“ हुंम पोलिसांना पैसा चारला असेल त्या पाटलाने दुसरे काय.” तो थोडा चिडून म्हणाला.
शामराव,“ हो पण आपली किमया गेले दोन दिवस झाले त्या मुलीच्या आई-वडिलांना आणि तिथल्या लोकांना तसेच त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना घेऊन त्याच कॉलेजमध्ये आंदोलनाला बसली आहे. त्या आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी म्हणून.हे बघ आज बातमी छापून आली आहे.” ते त्याला पेपर दाखवत म्हणाले.
अपूर्व,“ हुंम! बरं मी जातो.” त्याने किमयाचे नाव ऐकून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.
शामराव,“ किती वेळा सांगितलं तुला जातो नाही येतो म्हणायचं.”
अपूर्व,“ बरं येतो. आणि दुपारी जेवण वेळेवर कर आणि मेडिसीन्सही वेळेवर घे. मी लंच ऑफिसमध्येच करेन.बाय.” तो म्हणाला आणि निघून गेला.
अपूर्व ऑफिसमध्ये त्याच्या कामात मग्न होता. सम्यक एका मिटिंगसाठी ऑफिस बाहेर गेला होता. अपूर्वचा मोबाईल वाजला.
अपूर्व,“ तुमचा चेक तुम्हाला मिळाला आहे. इथून पुढे हे काम तुम्ही माझ्यासाठी करायचं नाही म्हणून मी तुम्हाला कळवलं आहे मग तुम्ही का फोन केला आहे मला?” त्याने फोन घेऊन थोडे चिडूनच त्या व्यक्तीला विचारले.
समोरून ती व्यक्ती,“ हो पण खबरच अशी आहे की मला तुम्हाला द्यावी लागत आहे. तुम्ही आमचे चार वर्षांपासून क्लायंट आहात.मला आत्ता खबर मिळाली आहे आणि खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला पुढच्या एक तासात हलचाल करावी लागेल नाही तर तुमच्या मैत्रिणीचा जीव वाचणे केवळ अशक्य आहे.” ती व्यक्ती बोलत होती.
अपूर्व,“ काय? बोला लवकर.” तो काळजीने म्हणाला.
समोरील व्यक्ती,“ मला थोड्यावेळापूर्वीच कळले आहे की तुमची मैत्रीण किमया मुजुमदार त्या आमदारांच्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना अटक व्हावी म्हणून त्या एस.एस कॉलेजमध्ये आंदोलन करत आहे त्या आंदोलनाची दखल मिडीयाने ही घेतली आहे त्यामुळे पोलीस देखील अडचणीत आले आहेत तर तिच्या नावाची सुपारी एका शार्प शूटरला त्या पाटलाने दिली आहे. आत्ता एक वाजला आहे दोन वाजता तिच्यावर एस.एस.कॉलेजमध्ये गोळीबार होणार आहे. जेणे करून लोक घाबरतील आणि हे प्रकरण दाबले जाईल. किमया मुजुमदारचा जीव धोक्यात आहे पवार साहेब.” त्याने सांगितले.
अपूर्व,“ काय? खबर पक्की आहे ना?” त्याने उठून उभे राहून विचारलं.
समोरून व्यक्ती,“ आजपर्यंत मी चुकीची बातमी दिली आहे का साहेब. तुम्ही किमया मुजुमदारला इथून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी हलवा.” तो म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.
अपूर्व घाईतच केबिनमधून बाहेर आला आणि त्याने सुरेंद्रला गाडी काढायला सांगितली. त्याने किमयाला फोन लावला. ती कॉलेज कॅंपसमध्ये असल्याने आणि तिथे जामर लावले असल्याने तिला फोन लागत नव्हता. त्याने सम्यकला फोन केला.
अपूर्व,“भाई लवकरात लवकर एस.एस कॉलेजमध्ये पोहच तिथे किमया आंदोलन करत आहे आणि थोड्याच वेळात तिथे तिच्यावर गोळी झाडणार आहेत. तिचा जीव धोक्यात आहे भाई!”तो गाडीत बसत सम्यकशी बोलत होता.
सम्यक,“ काय? मी निघतोय. पण मी थोडा लांब आहे त्या लोकेशनपासून प्लिज अप्पू तू सांभाळून घे. किट्टूला काही होता कामा नये.” तो काळजीने बोलत होता.
अपूर्व,“ हो भाई मी पोहोचतोय तिथे तू काळजी करू नकोस मी किमयाला काही होऊ देणार नाही. तू फक्त पोलिसांना फोन कर.” तो म्हणाला.
अपूर्व एस.एस कॉलेजमध्ये पोहचला. किमया आंदोलन करत असलेल्या ठिकाणी मिडिया धरून पाचशे -सहाशे लोकं होते. कॉलेज आणि शाळा अशा दोन बिल्डिंग्स सामोरा-समोर होत्या आणि मध्ये छोटे मैदान होते. अपूर्व सगळ्या घोळक्यातून वाट काढत स्टेजवर असलेल्या किमयापर्यंत पोहोचला. किमयाला त्याला तिथे पाहून आश्चर्य वाटले. अपूर्वने तिचा हात धरला आणि तिला म्हणाला.
अपूर्व,“ किमया आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चल. इथे एक मिनटंही थांबायचे नाहीस तू.”
किमया,“ अपूर्व आंदोलन सुरू आहे इथं. आज मिडियाही आली आहे. जोपर्यंत पोलीस त्या नराधमांना पकडत नाहीत तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही.” ती त्याचा हात झटकत म्हणाली.
अपूर्व,“ तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? चल किमया इथून..” तो ओरडला.
किमया,“ पण का? महिना होऊन गेला मी माफी मागायला आले तर मला माफ केले नाहीस मग आताच तू इथं का आला आहेस आणि असा आंदोलनातुन मला नेण्यात तुझा काय फायदा आहे अपूर्व? की तू ही त्या आमदाराला मिळाला आहेस? त्याने काय दिले तुला पैसा की एखादे प्रोजेक्ट?” ती चिडून म्हणाली.
अपूर्व,“ मूर्ख आहेस का तू? …”
तो पुढे बोलणार तर त्याला लाल रंगाची लेझर रे किमयाच्या शरीरावर दिसली आणि त्याचे लक्ष समोरच्या इमारतीच्या टेरेसवर किमयावर नेम धरून उभ्या असलेल्या शार्प शूटरवर गेले आणि त्याने किमयाला ढकलून दिले आणि गोळी झाडल्याचा आवाज झाला.गोळीच्या आवाजाने तिथे धावपळ सुरू झाली. तोपर्यंत सम्यक पोलीस घेऊन तिथे पोहचला होता. अपूर्वने ढकलून दिल्याने किमया खाली पडली होती पण किमयाला वाचवण्याच्या धडपडीत अपूर्वच्या दंडाला गोळी लागली होती आणि त्यातून रक्त येत होते. किमया उठून उभी राहिली. अपूर्वला ती हात लावणार तर त्याने तिचा हात झटकला.
अपूर्व,“ डोन्ट डेअर टू टच मी.” तो रागाने ओरडला. तोपर्यंत सम्यक स्टेजवर पोलीस घेऊन पोहचला होता.
सम्यक,“ अप्पू ss काय केलंस तू हे? बघ रक्त किती वाहतंय.सुरेंद्र किमयाला गाडीत बसव. आपल्याला अपूर्वला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल.”
तो म्हणाला आणि सुरेंद्रने किमयाचा हात धरून तिला गाडीत नेऊन बसवले. सम्यकने अपूर्वच्या दंडाला त्याचा रुमाल काढून बांधला आणि त्याला त्याने किमयाच्या शेजारी नेऊन बसवले. किमयाने पुन्हा अपूर्वला हात लावण्याचा प्रयत्न केला पण त्याने पुन्हा तिचा हात झटकला.
अपूर्व,“ हात लावायचा नाही आ मला तू.” तो रागाने म्हणाला.
किमया,“ किती रक्त येतंय अपूर्व! प्लिज मला स्कार्प बांधू दे ना.” ती रडत म्हणाली.
अपूर्व,“ काही गरज नाही. सम्यक भाई डॅडला बोलव प्लिज.” तो कसाबसा म्हणाला.
सम्यक,“ हो मी करतो कॉल काकांना पण तू प्लिज किमयाकडून स्कार्प बांधून घे ना.” तो त्याला मागे पाहत म्हणाला सुरेंद्र गाडी चालवत होता.
अपूर्व,“ मी नाही म्हणालो ना एकदा.” तो पुन्हा चिडून म्हणाला.
थोड्याच वेळात चौघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले.काही पोलीस त्यांच्या पाठोपाठ होते त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जास्त चौकशी न करता अपूर्वला ओ. टी मध्ये नेण्यात आले. सगळ्या न्यूज चॅनलवर गोळीबाराची आणि त्यात अपूर्व जखमी झाल्याची बातमी होती त्यामुळे शामराव, जयेशराव आणि सुधा पर्यंत ही बातमी पोहोचली होती. अपूर्वला कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेले आहे हे मात्र सम्यकला फोन करून शामरावांनी विचारून घेतले. तिघे एकदमच हॉस्पिटलमध्ये पोहोचले.किमया सुन्न होऊन एका खुर्चीत बसून होती. तिच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहत होते.
शामराव,“माझा अप्पू कुठं आहे सम्यक? त्याला काही होणार तर नाही ना?” ते रडत विचारत होते.
सम्यक,“ काका त्याला ओ. टीमध्ये नेले आहे. त्याच्या दंडाला गोळी लागली आहे.” तो म्हणाला.
तासाभराने डॉक्टर बाहेर आले.
शामराव,“ माझा मुलगा कसा आहे डॉक्टर? त्याला काही होणार तर नाही ना?” त्यांनी काळजीने विचारले.
डॉक्टर,“ नाही पेशंटच्या जीवाला तसा धोका नाही. सुदैवाने गोळी दंडाला नुसती घासून गेली आहे. हा पण ब्लड लॉस बराच झाला आहे त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागेल. आम्ही त्यांना रूममध्ये थोड्याच वेळात शिफ्ट करतोय. ते बेशुद्ध आहेत संध्याकाळपर्यंत त्यांना शुद्ध येईल.काळजी करण्यासारखे काही नाही सो डोन्ट व्हरी!” ते म्हणाले आणि निघून गेले.डॉक्टरांच्या बोलण्यामुळे सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.
थोड्या वेळात अपूर्वला रूममध्ये शिफ्ट केले. शामराव त्याच्याजवळ जाऊन बसले. जयेश, सुधा आणि सम्यकने त्याला पाहिलं. किमया मात्र त्याला रूमच्या दारातून पाहत होती. गोळी लागल्यावर अपूर्व ज्या प्रकारे तिच्याशी वागला त्यामुळे तिची हिम्मत त्याच्याजवळ जाण्याची होत नव्हती.
किमया अपूर्वला मनवू शकेल का? आणि अपूर्व तिला माफ करू शकेल का?
©swamini chougule
