तिला जाग आली तेंव्हा ती तिच्याच हॉस्पिटलच्या स्पेशन रूममध्ये होती. एका हाताला लावलेली ड्रिप संथ गतीने तिच्या शरीरात झिरपत होती. तिने डोळे उघडले तर सगळी रूम तिच्या भोवती गरगर फिरत होती.तिने पुन्हा डोळे झाकून घेतले. थोड्या वेळाने पुन्हा तिने डोळे उघडले ते कोणाच्या तरी कुजबुजण्याच्या आवाजाने. तिचा नवरा आणि तिचीच सहकारी डॉक्टर काही तरी बोलत होते.
ती म्हणजे डॉ.वृषाली लिमये. डॉ. वृषाली म्हणजे एक नावाजलेली गायनॉकोलॉजिस्ट होती.डॉ. नीरज म्हणजे तिच्या नवऱ्याने तिचे चेकअप केले आणि तिला हळू आवाजात तो म्हणाला.
नीरज,“ वृषाली जरा उठ आणि ज्यूस घे. मग हवं तर पुन्हा झोप.”
वृषाली,“ हुंम! किती वाजले? मी किती वेळ बेशुद्ध होते? काय झालं मला नक्की?” ती डोळे किलकिले करून बोलत होती.
नीरज,“ तू फक्त आराम कर. आपण नंतर बोलू. हा ज्यूस घे उठ.” तो म्हणाला आणि वृषालीला उठवून बसवत त्याने तिला ज्यूस पाजला आणि ती पुन्हा आडवी झाली.
डॉ.वृषालीचे शहरात स्वतःचे मॅटरनिटी हॉस्पिटल होते तर नवरा डॉ. नीरज हा न्यूरोसर्जन होता.त्याचे ही स्वतःचे हॉस्पिटल होते. दोघांची स्वतंत्र प्रॅक्टिस छान चालू होती. दोघांच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती आणि दोघांना ऋचा आठ आणि वेद सहा वर्षांची दोन मुले होती.घरी सासू- सासरे आणि हे चौघे असे सहा माणसांचे कुटुंब होते. आज दुपारी वृषाली हॉस्पिटलमध्ये एका पेशंटला तपासताना स्वतःच चक्कर येऊन पडली होती.
डॉ. सुनयना,“ मॅडमचे ब्लड रिपोर्ट्स आले आहेत सर हिमोग्लोबिन पाच आहे फक्त आणि बाकी पॅरामिटरर्स ही हलले आहेत. बी.पी खूप वाढला आहे.” ती वृषालीचे रिपोर्ट्स पाहत बोलत होती.
नीरज,“ हुंम तिने काही दिवस ब्रेक घ्यायला हवा. वृषालीला आरामाची खूप गरज आहे.” तो म्हणाला.
वृषाली तीन दिवस हॉस्पिटलमध्ये राहून आज घरी आली होती. मुलांनी तिला पाहिले आणि तिच्याकडे धावली. तशा तिच्या सासूबाई म्हणजे मालतीबाई कडाडल्या. तशी दोन्ही मुले घाबरून मागे वळली.
मालतीबाई,“ जवळ जाऊ नका तिच्या हॉस्पिटलमधून आली आहे ती. माहीत आहे ना आपल्या घरातला नियम आई अंघोळ करत नाही तोपर्यंत तिच्या जवळ जायचं नाही. सोवळे असते आपल्यात. आज हिच्या हॉस्पिटलमध्ये चार बायका डिलव्हरी झाल्या आहेत त्यांचे सोयर आपल्याला लागायला नको.”
नीरज,“ आई वृषालीची कंडिशन नाही अंघोळ करण्याची प्लिज.”
मालतीबाई,“ डॉक्टर आहे ना ही मग स्वतःची काळजी घेता येत नाही का? पेशंटचा काय इलाज करत असेल देवच जाणे.मग जावा तुमच्या रूममध्ये उद्या गणेश जयंती आहे. आता गणपतीची सगळी तयारी मलाच मेलीला करावी लागणार.” त्या रागाने तणतणत होत्या.
वृषाली मात्र डोळ्यातले पाणी आडवत तिच्या रूममध्ये निघून गेली. हे तिच्यासाठी नवीन नव्हते. गेल्या दहा वर्षाच्या संसारात तिने फक्त ऐकून घेतले होते. डॉक्टर असून पहाटे चार वाजता उठून सोवळ्यात देवपूजा करायची. त्यानंतर सगळ्यांचा स्वयंपाक रांधायचा. भांडी धुवून ठेवायची. मग हॉस्पिटलमध्ये जायचं! संध्याकाळी आल्यावर ही तेच अंघोळ करून पुन्हा सगळी कामं करायची. का तर मालतीबाईंना किचनमध्ये पर स्त्री आलेली चालत नसे. वर्षातला प्रत्येक सण साग्रसंगीत साजरा करायचा. हॉस्पिटल आणि घर यात तिची कुत्तर ओढ होत असे. त्यातच सण आला की तिच्या अंगावर काटे येत. काही दिवसांपूर्वीच संक्रांत झाली आणि त्यानंतर तिला न विचारता मालतीबाईंनी हळदी कुंकू ठेवले. ती रात्री दहा वाजता आल्यावर उद्या हळदी कुंकू आहे तर तिळाचे लाडू आणि बाकी सगळी तयारी करून ठेव आणि उद्या हॉस्पिटलमधून लवकर ये म्हणून फर्मान सोडले. रात्री तिला सगळं आवरून झोपायला दोन वाजले त्या दिवशी. ती दुपारी तीन वाजता घरी आली तर मालतीबाईंनी काहीच तयारी केली नव्हती. तिने सगळी तयारी केली. मालतीबाई मात्र नटून नुसत्या बसून होत्या. वृषाली मात्र तिच्या भिडस्त स्वभावामुळे सगळे सहन करत होती. शरीराची आणि मनाची होणारी कुचंबणा सहन करत होती. पण शरीर तरी होत असलेली हेळसांड किती दिवस सहन करणार? शेवटी शरीराने बंड केले आणि ती आजारी पडली.
दोन दिवस तिने आराम केला. मालतीबाईंच्या तोंडाची टकळी मात्र बंद नव्हतीच. पण तिने आता काही तरी मनाशी पक्के ठरवले होते. तिने तिला बरं वाटायला लागले आणि सगळ्यांना एकत्र बोलावले मुलांना खेळायला बाहेर पाठवून दिले.
मालतीबाई,“ कशाला बोलावले आहेस गं आम्हाला? कामं पडली आहेत खूप तू काय बाई आता अजून आठ दिवस उठणार नाहीस. तुला निमित्तच झाले ना.” त्या खवचटपणे म्हणाल्या.
.वृषाली,“ काळजी करू नका तुम्हाला माझा त्रास जास्त होणार नाही आता.” ती म्हणाली.
नीरज,“ वृषाली तू आराम कर.”
वृषाली,“ आराम करू? तुझी आई मला आराम करू देईल का? तीन दिवस झाले यांची तोंडाची टकळी सुरू आहे. मी आजारी पडले तर त्यांना माझी नाही तर आता माघी गणपतीचे कसे करायचे याची काळजी. त्यातून मी डॉक्टर मग मला तर आजारी पडायचा ही अधिकार नाही. गेले दहा वर्षे माझ्या भिडस्त स्वभावाचा खूप गैरफायदा घेतला यांनी पण आता नाही. मला ही आता सहन होत नाही.” ती डोळे पुसून म्हणाली.
मालतीबाई,“ बघ नीरज तुझी बायको कसं बोलतेय. काय गैरफायदा घेतला रे मी हिचा?” त्या रागाने म्हणाल्या.
वृषाली,“ हे तुम्ही विचारताय सासूबाई मला? अहो संस्कृती - संस्कार , सोवळे-ओवळे म्हणून तुम्ही मला नुसतं राबवून घेतले. तुमच्या किचनमध्ये पर स्त्री नको म्हणून पहाटे चार वाजता मला उठून स्वयंपाक, भांडी करावी लागतात. संध्याकाळीही तेच आणि त्यातही कोणता सण आला तर विचारायलाच नको. तुम्ही नुसता हुकूम सोडून मोकळ्या होता आणि राबवे मात्र मला लागते.संक्रांतीचे हळदकुंकू तुम्ही मनानेचे ठेवून मोकळ्या झालात. रात्री दहा वाजता मला सांगितलं यांनी. बरं बाहेरून काही आणायचं नाही. त्या रात्री तिळाच्या लाडूपासून सगळं करून झोपायला मला तीन वाजले. पुन्हा दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून आले तर काहीच तयारी केली नाही यांनी. मग काय यांच्या नियमानुसार अंघोळ करून दारात रांगोळी काढण्यापासून सगळं मीच केलं. यांच्या मैत्रिणी माझं कौतुक करत होत्या. तुझी सून डॉक्टर असून स्वतः सगळं करते. तर या काय म्हणाल्या माहीत आहे का? कशाची डॉक्टर आहे. आमच्या वेळी सुईनी डिलिव्हरी करत होत्या.आणि सुनेकडून सगळं करून घेण्याची कला अवगत असावी लागते गं! मी एम.डी. डॉक्टर आहे. महिना लाखो रुपये कमावते आणि यांना मी सुईन दिसते का? चूक यांची नाहीच मुळी चूक माझी आहे. मी गेली दहा वर्षे सगळं सहन केलं पण आता नाही.” ती मनातलं सगळं बोलून थांबली.
मालतीबाई,“ मग आपली संस्कृती आणि सण, सोवळे कोण करणार? आम्ही केलं नाही का सगळं की तूच करतेस? आणि सहन करणार नाही म्हणजे? काय करणार आहेस तू?” त्यांनी तोऱ्यात विचारलं.
नीरज,“ आई प्लिज तू शांत हो ना! वृषाली तू ही जरा समजून घे ना. तुला माहीत आहे ना आईचा स्वभाव.” तो दोघींना समजावत म्हणाला.
वृषाली,“ हो सणवार साजरे करायला हवेत पण त्यांचे अवडंबर करून आणि घरातल्या एकाच व्यक्तीला त्रास देऊन नाही. आणि अजून किती समजून घ्यायचं मी नीरज? तू सतत मला सांगत आलास की समजून घे यांना किती दिवसाच्या आहेत या आणि थोडे दिवस गेले की थकतील बसतील गप्प. पण आज दहा वर्षे झाले की या थकल्या नाहीत मीच थकले आणि यांच्या दबावामुळे माझीच मरायची वेळ आली या कसल्या मरतात.” ती आता रागाने म्हणाली.
मालतीबाई,“बघा बघा कशी बोलतेय ही. माझ्या मरणाची वाट पाहतेय ही नीरज.” त्या कांगावा करत म्हणाल्या.
नीरज,“ माईंड युवर टंग वृषाली.” तो ही रागाने म्हणाला.
वृषाली,“ ओ मीच माईंड करू का अजून ही! तुला काय जाते रे समजून घे म्हणायला. मीच मूर्ख आहे तुझ्या प्रेमा खातर गप्प बसले. मला वाटायचं की तुझं ही माझ्यावर प्रेम आहे पण तू… तू स्वार्थी निघालास तुला आई ही हवी आणि बायको ही म्हणून मग बायकोलाच गप्प करायचं. तिला सहन कर म्हणायचं. तिच्याशी गोड बोलायचं. आणि तिकडे आईला ही दुखवाच नाही. म्हणजे तू कसा मधल्यामधी निवांत! तुझे माझ्यावर खरंच प्रेम असते ना तर तू तुझी आई पहिल्यांदा माझ्याशी चुकीचं वागली तेंव्हाच विरोध केला असता. इतकंच काय माझ्या मुलांनी पण यांच्या जाचाखाली राहायचं. मोठ्याने बोलायचे नाही हसायचं नाही. यांच्या शिस्तीच्या नावाखाली अत्याचार सहन करायचे. स्वतःच्या मुलांशी तुझी आई अशी वागली तरी तुझे तोंड उघडले नाही. तुझा काय दोष म्हणा मीच चुकले आहे. असो मला माझा जीव आणि माझ्या मुलांचे बालपण प्रिय आहे. म्हणून मी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. माझ्या मुलांना मी सांभाळायला सक्षम आहे. तू आणि तुझी आई काय करायचं ते करा.” तिने ठामपणे सांगितले.
नीरज,“ घटस्फोट? वृषाली तू कोणता विषय कुठे घेऊन जात आहेस? माझं तुझ्यावर आणि आपल्या मुलांवर खूप प्रेम आहे. मी मान्य करतो की माझं चुकलं आई तुझ्याशी चुकीचं वागते ते मला समजत उमजत होतं. तरी मी सगळ्याकडे दुर्लक्ष केलं. आय एम सॉरी! पण घटस्फोटाचा इतका मोठा निर्णय घेऊ नकोस. वाटलं तर आपण वेगळं राहू. मला तू आणि आपली मुलं हवी आहेत वृषाली प्लिज.” तो आता रडकुंडीला येऊन बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून मालतीबाई चपापल्या.
मालतीबाई,“ हे काय बोलतोयस तू नीरज? हिच्यासाठी तू आम्हाला सोडणार?”
नीरज,“ हो आई कारण चूक तुझी आहे आणि माझी ही! तू वेळीच स्वतःला आवर घातला असतास किंवा मीच तुझ्या चुकीच्या वागण्याला वेळीच विरोध केला असता तर ही वेळच आली नसती. पण तुला तू कशी डॉक्टर सुनेवर हुकूमत गाजवतेस हे लोकांना दाखवून द्यायचं असायचं आणि त्यातून तू वृषालीवर सतत अत्याचार करत राहिलीस आणि मी निमूटपणे तो पाहत राहिलो पण आता नाही. वृषाली इथून पुढे तू म्हणशील तसं होईल.” तो वृषालीचा हात धरत म्हणाला.
नीरजचे वडील,“ झालं का मालती तुझ्या मनासारखं? मी कायम तुला समजावत आलो वृषालीच्या सहनशील आणि दुर्मुख स्वभावाचा गैरफायदा घेऊ नकोस. रबर आपण जितका जास्त ताणतो तो तितका जास्त ताणला जातो आणि एक वेळ तुटतो. तुही तेच केलं स्वतःची एकहाती सत्ता गाजवण्याच्या नादात तू वृषाली आणि तुझ्यातले नाते तुटेल इतकं ताणलेस आणि परिणामी ते तुटले. आता तिच्याबरोबर नाते तुटले आणि त्याबरोबर नीरजबरोबर देखील.” ते बोलत होते.
मालतीबाई,“ माझं चुकलं मी इथून पुढे असं नाही वागणार. पण वृषाली तू घर सोडून जाऊ नकोस. नीरज प्लिज तू समजाव तिला.” त्या आता काकुळतीला येऊन बोलत होत्या.
वृषाली,“ मी तुमच्या मुलाला माझ्याबरोबर चल असं म्हणणार नाही पण मी इथं राहणार नाही. तुमचे आणि माझे नाते कधीच तुटले आहे. मी आता स्वतःचा अपमान सहन करू शकणार नाही आणि तुम्ही काही दिवस शांत बसाल पण तुमचा हुकूम गाजवणारा मूळ स्वभाव पुन्हा उफाळून येणार. त्यामुळे मी आता इथं राहून स्वतःवर आणि माझ्या मुलांवर अन्याय करू शकत नाही.” ती म्हणाली आणि तिच्या खोलीत निघून गेली.
थोड्याच वेळात ती तिचे आणि मुलांचे कपडे घेऊन बाहेर आली आणि तिच्या पाठोपाठ नीरज देखील. मालतीबाई मात्र हतबल होऊन वृषाली आणि तिच्या पाठोपाठ नीरज आणि नातवंडांना जाताना पाहत होत्या.
ही कथा एका डॉक्टर स्त्रिची आहे तुम्हाला ही कथा काल्पनिक वाटू शकते कारण डॉक्टर असलेली आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेली स्त्री सासूचा असा पराकोटीचा जाच सहन करणार नाही असं तुम्हाला वाटेल पण ही कथा वास्तव आहे.आपल्या समाजात डॉक्टर, इंजिनिअर आणि अनेक ठिकाणी मोठी पदे भूषवणाऱ्या! समाजात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या अनेक स्त्रिया अजून ही स्वतःच्या घरात अशी पिळवणूक सहन करतात कधी प्रेमापोटी तर कधी आपण फारकत घेतली तर समाज काय म्हणेल या भितीपोटी! आणि याचाच फायदा मालतीबाई सारख्या बायका आणि नीरजसारखे नवरे घेत असतात.
स्त्रिने नुसते आर्थिक सक्षम असून चालत नाही तर तिने मानसिक दृष्ट्या देखील कणखर असायला हवे.
©swamini chougule
