आज तीन दिवस झाले रुद्राक्ष झोपून होता. तो कुठे आहे? आसपास काय चालले आहे त्याला इतकं काही कळत नव्हतं. फक्त सगळे त्याच्या आसपास असलेले त्याला जाणवत होतं. कोण आपल्याला काय खायला प्यायला देतंय हे ही त्याला नीटसं कळत नव्हतं. अशक्तपणा आणि तापाची ग्लानी त्याचा परिणाम होता तो.
आज तिसऱ्या दिवशी संध्याकाळच्या वेळी त्याला जरा हुशारी जाणवत होती. तो उठून बसला तर सविता आणि आद्या त्याच्या जवळ होत्या.त्याला अजून ही सलाईन सुरू होती आणि एक नर्स खुर्चीत बसलेली त्याच्या लक्षात आलं.
सविता,“ कसं वाटतंय बच्चा तुला?”
रुद्राक्ष,“ डोकं जड वाटतंय आणि दुखतंय ही.” तो डोक्याला हात लावत म्हणाला.
तोपर्यंत तिथे केतकी आणि रत्नमालाबाई आल्या.
केतकी,“ आज डॉक्टरांनी भात आणि मुगाची फिक्की डाळ द्यायला सांगितली आहे रुद्र तुला. ताई हे घ्या भरावा त्याला.” ती तिने आणलेला एक बाऊल सविताच्या हातात दिला.
सविता,“ हे घे खा बेटा.तीन दिवस झालं नुसतं सूप आणि भाताची पेज दिली तुला. आता हे पाचलं तर मग डॉक्टर सांगितल ते सॉलिड डाएट सुरू करू आपण.” त्या चमच्याने त्याला घास भरवत बोलत होत्या आणि रुद्राक्ष एक घास खाऊन चिडला.
रुद्राक्ष,“ मॉम काय आहे हे टेस्टलेस. मला नको हे रादर मला काहीच नको जा तुम्ही सगळे.” तो चिडचिड करत म्हणाला.
केतकी,“ असं काय करतो टिटू! अरे नाही खाल्लं तर मग अंगात शक्ती कशी येणार? एक तर किती विकनेस आला आहे तुला.” त्या काळजीने बोलत होत्या.
रुद्राक्ष,“ तुम्हाला कळत नाही का? मला नको आहे काही जस्ट गो टू हेल.” तो रागाने ओरडला. आणि इतका वेळ शांतपणे त्यांचे संभाषण ऐकत असलेली आद्या आता भडकली.
आद्या,“ तोंडातून पुढं शब्द जर काढले ना तर मुस्काड फोडेन मी तुमचं. एक तर आज अडीच दिवस होऊन गेले सगळे काळजीत आहेत. दोन रात्रं झालं मॉम आणि काकू झोपल्या नाहीत.गेले दोन दिवस आणि आत्तापर्यंत तुम्हाला तरी कळत होतं का तुम्ही कुठे आहात ते? एक तर हे आजारपण स्वतः ओढवून घेतले आहे. नुसतं रात्रंदिवस काम काम. नीट खायचं नाही प्यायचं नाही की झोपायचं नाही. तुमच्यामुळे सगळ्यांना त्रास झाला आजी ही या वयात टेन्शनमध्ये होत्या. आणि उठले की झाले यांचे नखरे सुरू. हे नको आणि ते नको म्हणून! आम्हाला ही हौस नाही तुम्हाला हे असलं टेस्टलेस खायला द्यायची. तुमच्याच मुळं ही वेळ तुमच्यावर आली आहे. काही नाही तुम्ही सगळ्यांनी जास्तच लाडावून ठेवलं आहे त्यांना. दोन रट्टे दिले असते ना तर हे असे वागले नसते. आता गपचुक खायचं हे. मॉम भरवा तो भात. मी बघते तसा उतरत नाही घशा खाली ते.”
ती रागाने तणतणत होती आणि सगळे गालात असत होते. ऑफिसमधून आल्यावर रुद्राक्षला भेटायला आलेले शरद आणि विनीत ही रूमच्या दारात उभं राहून आद्या रुद्राक्षला देत असलेला दम पाहून हसत होते. रुद्राक्षने मात्र आवंढा गिळला आणि त्या अवंढ्या बरोबर भात देखील.
विनीत,“ बरोबर बोलतेय आद्या. हा आपल्या लाडाने जास्तच शेफरला आहे. आद्या याला रट्टे दिले तरी आमची काही हरकत नाही बरं का!” ते हसून म्हणाले.
आद्या,“ नाही ते मी. …. ते खात नव्हते म्हणून…. तुम्ही बसा मी सगळ्यांसाठी कॉफी करून आणते.” ती नजर चोरत संकोचून म्हणाली आणि तिथून पळून गेली.
रुद्राक्षचे मात्र तोंड फुगलेलं होतं. तो कोणाशीच काही बोलला नाही. खाऊन तो झोपला. सगळे हॉलमध्ये आले. आद्याने सगळ्यांना कॉफी आणून दिली.
आद्या,“ झोपले का रुद्र?” तिने विचारलं.
सविता,“ हो झोपला पण तोंड फुगवून. त्याच्याशी आजपर्यंत असं कोणी बोललं नाही बरं का?” ती जरा राग आसल्याचा आव आणत म्हणाली.
आद्या,“ सॉरी मॉम. मी जरा जास्तच बोलले रुद्रना. पण तुम्ही पाहत आहात ना त्यांनी स्वतःच स्वतःची अवस्था कशी करून घेतली आहे. गेले दोन- तीन महिने हा माणूस झोपला नाही. स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करून कोणी सांगितलं आहे इतकं काम करायला? आता त्रास कोणाला होतो आहे त्यांनाच ना?” ती खाली मान घालून बोलत होती.
सविता,“ अगं सॉरी काय म्हणतेस? तू जे केलंस ते योग्यच केलंस. त्याला कोणी तरी खडसवायला हवं होतंच आणि तू म्हणाली ते खरं आहे बेटा आम्ही जरा जास्तच लाड केला आहे त्याचा. काय करणार ना खूप तरसून आणि त्या देवाला विनवण्या करून तो आम्हाला मिळाला आहे गं. त्यात हुशार, कर्तबगार स्कुल-कॉलेजमध्ये पहिला नंबर कधी सोडला नाही. याचे मित्र पार्ट्या करत फिरायचे तेंव्हा हा अभ्यास करायचा. आर्किटेक्चर शिकायला अमेरिकेला गेला आणि तिथे ही गोल्ड मेडल मिळवलं. याचे मित्र बापाच्या पैशावर ऐश करतात आणि हा याने शिकून लगेच बिझनेस जॉईन केला. हा आजकालच्या मुलांसारखा तो पण पार्ट्या करतो. पबमध्ये जातो पण स्वतःची जबाबदारी ओळखून. आता तर वर्ष झालं ते ही बंद केलंय त्यानं. त्याच्यावर आम्हाला कधी ओरडायची किंवा रागवायची वेळच नाही आली.शांत आणि गुणी बाळ आहे गं आमचं. हा आजारपणामुळे चिडचिड होतेय त्याची पण तू त्याला दम दिलास ते मला तर आवडलं बाबा.” ती हसून म्हणाली.
शरद,“ वहिनी आद्या ओरडत होती तेंव्हा तोंड पाहिलंस का त्याच?” तो हसून म्हणाला.
विनीत,“ हो ना! आणि कार्ट नुसतं वर्को हॉलिक व्हायला लागलं आहे. आद्या तू असंच वाग त्याच्याशी म्हणजे ताळ्यावर येईल तो.” ते म्हणाले.
रत्नमालाबाई,“ हो पण विनू त्याला महिनाभर डॉक्टरांनी रेस्ट घ्यायला सांगितला आहे. त्याच्याशी उद्या बोल. मी काय त्याला दोन महिने तरी ऑफिसला पाठवणार नाही. ते त्याने घेतले आहे ना अमेरिकेचे काम तेच कर म्हणावं त्याला घरात बसून. ते पूर्ण झाल्यावर मग ऑफिसला येऊ दे.इतक्या कमी वयात हे असं आजारी पडणं चांगलं नाही त्याच्यासाठी.” त्या गांभीर्याने बोलत होत्या.
विनीत,“ हो मी बोलतो उद्या त्याच्याशी आणि तू काळजी करू नकोस आई तो तीन महिने तरी ऑफिसला येणार नाही.” त्याने अश्वस्त केलं.
★★★
दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्राक्षची सलाईन काढून नर्स तिची ड्युटी संपवून गेली होती दुसरी नर्स ड्युटीला यायला अजून अवकाश होता. आद्याने दहा दिवसाच्या रजेसाठीचा मेल पाठवला होता. तिला खरं तर बॉस तिची रजा मंजूर करेल की नाही याची शंका होती पण बॉसने तिला पंधरा दिवसांची रजा देऊन टाकली होती. त्यामुळे आद्या पंधरा दिवस घरातच राहणार होती. ती काही तरी करत होती तोपर्यंत तिथं सविता आली.
रुद्राक्ष,“ मॉम मी बाथ घेऊन येतो गेले तीन दिवस झालं ताप आला म्हणून तू नुसतं मला फ्रेश व्हायला लावलंस. आज ताप नाही मला तर मी अंघोळ करतो एक तर खूप वैताग आला आहे एका जागेवर पडून.” तो म्हणाला.
सविता,“ हो जा पण आतून कडी नको लावूस बाबा. तुला चक्कर वगैरे आली तर आम्हाला कळणार ही नाही.” ती काळजीने म्हणाली.
रुद्राक्ष,“ हो बाई.” तो म्हणाला आणि निघून गेला.
आद्या,“ मॉम रुद्रसाठी नाश्ता काय बनवायचा?”
सविता,“ मी केतकीला ओट्स बनवायला सांगितले आहेत. येईल ती आत्ता.”
रुद्राक्ष अंघोळ करून आला.तोपर्यंत केतकी ही ओट्स घेऊन आली. सविताला अपेक्षित होतं की आता रुद्राक्ष पुन्हा खाण्यासाठी नखरे करणार. पण त्याने एक ही शब्द तोंडातून न काढता ओट्स खाल्ले आणि सविता आणि केतकी एकमेककींडे आश्चर्याने पहायला लागल्या. तोपर्यंत विनीत, शरद रत्नमालाबाईंबरोबर तिथे आले.
विनीत,“ कसं वाटतंय आता तुला रुद्र थोड्याच वेळात दुसरी नर्स येईल ड्युटीला. अजून दोन दिवस तरी ड्रीप लावावी लागणार आहे.”
रुद्राक्ष,“ डॅड मी आता ठीक आहे. आता उलट्या तर बंद झाल्या माझ्या आणि ताप ही कमी झाला आहे मग अजून ड्रीप वगैरे कशाला?” तो म्हणाला.
विनीत,“ स्वतःच तोंड पाहिलंस का आरशात? सगळी रया गेली आहे आणि मी ठीक आहे म्हणे. ब्लड रिपोर्ट्स पाहिलेस का तुझे? सगळे पॅरामीटर बिघडले आहेत. हिमोग्लोबिन सुद्धा कमी झाले आहे. पाच दिवसांची ट्रीटमेंट आहे ती पूर्ण करायची कळलं तुला!” तो काळजीने बोलत होता.
रत्नमालाबाई,“ हो ना छोटे सरकार चेहरा किती उतरला आहे बघा जरा. आणि तब्बेत ही ढासळली आहे.” त्या रुद्राक्षच्या शेजारी बसून त्याच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवून बोलत होत्या.
शरद,“ रुद्र तू आता तीन महिने ऑफिसला येणार नाहीस. एक महिना तर तुला रेस्टच घ्यायला सांगितला आहे डॉक्टरांनी.”
रुद्राक्ष,“ काय तीन महिने? काका अरे मी ठीक आहे आता इतकं ही काही झालं नाही मला. अजून आठ दिवस आराम केला की मी ठणठणीत होईल.” तो वैतागून बोलत होता.
विनीत,“ हो ना ठीक आहेस म्हणे तू? तुला गोडीत सांगितलेलं कळत नाही का? एक तर स्वतः हे आजारपण ओढवून घेतलंस तू. रात्रंदिवस काम केल्यावर काय होईल? दिवसभर ऑफिसमध्ये आणि रात्री त्या अमेरिकेच्या प्रोजेक्ट वर. काय गरज होती ते प्रोजेक्ट हातात घ्यायची. एक तर कंपनी खरेदी करायची होती तुला तर मी देतो म्हणालो पैसे पण नाही साहेबांना स्वतःच्या जीवावर करायचं आहे सगळं. मग लोन दिलं तर हा उपद्याप केलास तू! तुझ्या लोनचे हफ्ते जात होते ना पगारातून! तुला कोणी लोन फेडण्यासाठी तगादा लावला होता का? पण नाही आपल्याला तर लोन लगेच फेडायचं होतं. म्हणून घेतला प्रोजेक्ट मी म्हणालो होतो की विचार कर कसं मॅनेज करणार आहेस सगळं तर मी करतो मी करतो म्हणून नाचलास. तुला कळतंय का या सगळ्याचा तुझ्या तब्बेतीवर किती परिणाम झाला आहे ते? फक्त सत्तावीस वर्षाचा आहेस तू रुद्र! जर असच सुरू राहिलं तर तुझ्या स्टमकवर दूरगामी परिणाम होतील याचे मग काय करणार आहेस? आत्ताच लग्न झालं आहे तुझं बायकोला वेळ द्यायचा कुठं तरी फिरायला जायचं सोडून बसलाय कामं करत. या आद्याच्या ही काही अपेक्षा असतील की नाही नवरा म्हणून तुझ्याकडून? पण नाही आपल्याला तर स्वतःला सिद्ध करायचं आहे पैसा कमवायचा आहे. ही सगळी इस्टेट तर मी माझ्या डोंबलावर घेऊन जाणार आहे ना! उद्या तुला काही कमी जास्त झालं तर या सगळ्याला शून्य किंमत आहे तुला कळत कसं नाही? तीन महिने ऑफिसकडे फिरकलास तर याद राख! आराम करायचा आणि ते घेतलं आहे ना प्रोजेक्ट मित्राचं फक्त त्यावर काम करायचं कळलं तुला? आणि इथून पुढे तू घेचं असली बाहेरची कामं मग तू आहे आणि मी आहे.” ते रागाने तणतणत होते.
रुद्राक्ष,“ पण आपले दोन प्रोजेक्ट मी हॅन्डल करतोय त्याचं काय?” तो हळूच म्हणाला.
विनीत,“ त्याची काळजी तू करायची गरज नाही. तुझ्या जन्माच्या आधीपासून आम्ही दोघे बिझनेस सांभाळत आहोत.” ते चिडून म्हणाले.
रुद्राक्ष,“ पण इतके दिवस मी घरात बसून काय करू?” त्याने आता केविलवाणे होत विचारलं.
शरद,“ देवा! काय करायचं रे दादा या पोराचं. महिनाभर आराम कर. एन्जॉय युवर मरीड लाईफ! वर्ड टूरला जातोस का आद्याबरोबर? असं ही हनिमूनला गेलाच नाहीत तुम्ही. तीनच महिने झाले ना लग्नाला तुमच्या? आणि याला घरी राहून काय करू म्हणून प्रश्न पडला आहे येडछाप कुठला!” तो हसून बोलत होता.
रुद्राक्ष,“ आता तू पण हो डॅडच्या बाजूने! मला नाही जायचं कुठं. आणि तुम्हाला काय करायचं ते करा. मी आजारी पडलो म्हणजे गुन्हाच केला ना.” तो चिडून तोंड वाकडं करून बोलत होता.
केतकी,“ चुडू नकोस रे. तुझी काळजी वाटते सगळ्यांना म्हणून बोलत आहेत ना.” ती त्याला समजावत म्हणाली.
सविता,“ बरं खूप बोललात माझ्या बच्चूला सगळे. जा आता तुमच्या तुमच्या कामाला.” ती लटक्या रागाने म्हणाली.
रत्नमालाबाई,“ हो ना. ते बघा नर्स पण आली. रुद्र तू आराम कर आता.” त्या म्हणाल्या आणि विनीत, शरद निघून गेले.
आत्तापर्यंत आद्याच्या आईपर्यंत रुद्राक्ष आजारी आहे ही खबर पोहोचली होती. त्या संध्याकाळच्या वेळी गीता आणि वेदान्तला घेऊन रुद्राक्षला पाहायला आल्या होत्या. विरेन ही रुद्राक्षला भेटायला आला होता. आद्याच्या आईने रुद्राक्षच्या तब्बेतीची चौकशी केली. वेदान्त रुद्राक्ष आणि विरेनशी गप्पा मारत बसला होता. आद्या तिच्या आईला आणि गीताला हॉलमध्ये घेऊन आली. आद्याची आई रागात होती. तिथे कोणी नाही ते पाहून त्या बोलू लागल्या.
आद्याची आई,“ रुद्र इतका आजारी पडू पर्यंत तू काय करत होतीस? नवरा आहे आद्या तो तुझा. त्याची काळजी घेणे तुझी जबाबदारी आहे. तू कमी पडलीस त्याची काळजी घ्यायला. इथून पुढे सारखं माहेरी यायचं नाही. तू ठेवली आहेस ना मदतनीस मग ती करते सगळं व्यवस्थित आणि वेद आहे माझी काळजी घ्यायला. तुझं लग्न झालं आहे आता तर नीट संसार कर.” त्या रागाने तणतणत होत्या. आद्या निमूटपणे त्यांचं बोलणं ऐकून घेत होती.
आद्या,“ सॉरी आई अशी चूक पुन्हा नाही होणार माझ्याकडून.” ती वरवर म्हणाली
पण तिला रुद्राक्षचा मनोमन प्रचंड राग आला होता. त्याने त्याच्या हाताने हे आजारपण ओढावून घेतले आणि बोलणं मात्र मला खावे लागले.म्हणून ती चिडली होती. तोपर्यंत तिथं रत्नमालाबाई आणि सविता आल्या.
साविता,“ ही कॉफी आणि स्नॅक्स विरेन आणि वेदान्तसाठी घेऊन जा(ती एका मोलकरणीला म्हणाली.) आद्या तुम्ही दोघी मैत्रिणी बऱ्याच दिवसांनी भेटल्या आहात तर निवांत बाहेर पोर्चमध्ये बसून गप्पा मारा. मी तुमच्यासाठी ही कॉफी आणि स्नॅक्स पाठवून देते. आम्ही आहोत इथं ताईंशी गप्पा मारतो.” ती म्हणाली आणि आद्या हो म्हणून गीताबरोबर पोर्चमध्ये झोपाळ्यावर जाऊन बसली.
गीता,“ काय झालंय इतकं रुद्राक्षला आद्या? सलाईन सुरू आहे नर्स आहे ड्युटीला. काही सिरीयस आहे का?” तिने काळजीने विचारलं.
आद्या,“ चार दिवसांपूर्वी खूप उलट्या झाल्या त्याला ऑफिसमध्ये. वीर घरी घेऊन आला तर बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी सांगितलंय की खूप जास्त जागरण आणि खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष केल्याने खूप जास्त पित्त झालं. उलट्यामुळे डिहायड्रेशन झालं.त्यातच ताप आला आणि हिमोग्लोबिन वगैरे कमी झालं.” ती म्हणाली.
गीता,“ पण इतकं जागरण आणि बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष झालंच कसं? खूप एसीडीटी आणि पित्त होत राहिले तर त्याच्या पचनसंस्थेवर याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात आदू.” ती काळजीने बोलत होती.
आद्या,“ तेच डॉक्टरांनी ही सांगितलं. या बाबाने कुठली तरी कंपनी खरेदी केली आहे बाई.डॅड म्हणत होते मी देतो पैसे ते नाही घेतले. मग त्यांनी याला लोन रुपात पैसे दिले आणि ते लोन फेडण्यासाठी याने याच्या कुठल्यातरी अमेरिकन मित्राच्या कंपनीचे प्रोजेक्ट घेतले आहे त्याला दहा लाख डॉलर्स म्हणजे एक्केचाळीस करोड पेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत. त्यातले वीस करोड तर आधीच मिळाले आणि याने लगेच वीस करोडच लोन फेडलं ही. पण आपला त्यांचा टाईम झोन वेगळा. हा रुद्र दिवसा यांच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करतो आणि रात्री त्या अमेरिकी प्रोजेक्टवर रात्र रात्र जागाच असतो. पहाटे कधी तरी झोपतो आणि मग सकाळी पुन्हा ऑफिसला जातो. मग या सगळ्याचा परिणाम तब्बेतीवर होणार नाही का?” ती सांगत होती.
गीता,“ कसला सॉलिड आहे गं हा. मला तर वाटलं होतं बापज्याद्याच्या पैशावर ऐश करणारा असेल हा. पण हा तर स्वाभिमानी वगैरे आहे की. पण इतकं कष्ट करायला सांगितलं आहे कोणी? यांच्या पोतदार अँपायरचा व्याप कमी आहे का नवीन कंपनी खरेदी करायला?” ती कौतुकाने बोलत होती.
आद्या,“ तुला बरं त्या रुद्रच कौतुक वाटतं. मला ही पहिल्यांदा वाटलं कौतुक पण पुन्हा खोलवर विचार केल्यावर मला तरी हा त्याचा हावरटपणा वाटतो बघ. देवानं सगळं दिलं आहे याला पैसा, प्रॉपर्टी, मायेची माणसं पण हा असमाधानी आहे याची हाव संपतच नाही बघ. आणि याच्यामुळे मला आज आईचे विनाकारण बोलणे खायला लागले. तिच्या नजरेत रुद्र माझा नवरा आहे त्यामुळे तिच्या जागी ती बरोबर आहे.. याने कंपनी विकत घेतली तर त्यात माझा काय फायदा गं? पण हा आजारी पडल्यामुळे माझं स्केड्युल फिस्कटल. आता आई तर मला महिना दोन महिने घरी येऊ देणार नाही. वरून त्याच्या घरच्यांना दाखवायला मला ही याची सेवा करावी लागत आहे. हे असं झालं आहे करे कोई और भरे कोई! तरी ही त्याच्याबद्दल आदर वाटतो गीता कारण आजकालची मुलं जितकं ऐते मिळेल तितकं पाहतात पण हा नुमान वेगळा आहे.” ती चिडून बोलत होती.
आणि घरी निघालेला विरेन दारात उभं राहून तिचं बोलणं ऐकत होता. खरं तर त्याला आद्याचा खूप राग आला होता पण तो काहीच बोलला नाही आणि घरी निघून गेला.तसं पाहायला गेलं तर हे सगळं रुद्राक्ष आद्यासाठीच करत होता पण तिला या सगळ्याची थोडी देखील कल्पना नव्हती. उलट तिला रुद्राक्ष हावरट आणि असमाधानी वाटत होता.
आद्याचा रुद्राक्ष बाबतीत आणखीन एक गैरसमज तर झाला होता पण तिच्या मनात कुठे तरी त्याच्याबद्दल आदर मात्र निर्माण झाला होता हे ती नकार शकत नव्हती.
©स्वामिनी चौगुले
