रुद्राक्ष आज ऑफिसला तर गेला होता पण त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. डोकं प्रचंड ठणकत होतं आणि मळमळ होऊन उलटी होते की काय असं वाटत होतं. पण आज पहाटेच विनीत पुण्याला काही कामानिमित्त गेला होता तर शरद आज साईड ऑफिसमध्ये जाणार होता. त्यामुळे ऑफिसमध्ये तो एकटाच होता. त्यामुळे त्याला ऑफिसमध्ये थांबणे भाग होते. त्याने तशीच कामाला सुरुवात केली पण त्याला उलटी आल्यासारखे वाटले म्हणून तो वॉशरूमध्ये गेला आणि त्याला उलट्या व्हायला लागल्या. तो कसा बसा बाहेर आला आणि खुर्चीवर बसला त्याला खूप थकल्यासारखे वाटत होते. तोपर्यंत विरेन काही तरी काम आहे म्हणून त्याच्या केबिनमध्ये आला. त्याचा चेहरा पाहून त्याने काळजीने त्याच्याजवळ जात विचारलं.
विरेन,“ काय झालं रुद्र बरं वाटत नाही का तुला?”
रुद्राक्ष,“ काही नाही थोडी एसीडीटी झाली आहे. तू बोल काही काम होतं का तुझं?” तो म्हणाला.
विरेन,“ दिवस रात्र काम करत राहिल्यावर काय होणार दुसरं? हे काही प्लॅन्स पुन्हा चेक करून अप्रुव्हल हवं आहे तुझं.” तो फाईल टेबलवर ठेवत म्हणाला.
रुद्राक्ष,“ तू डोकं नको खाऊस माझं अधिच खूप दुखत आहे. मी चेक करून पाठवून देतो फाईल तू जा.”
विरेन,“ रुद्र मी गोळी देतो तुला आणून एसिटी कमी व्हायची ती खा म्हणजे त्रास कमी होईल.”
रुद्राक्ष,“ हो घेऊन ये रे प्लीज.” तो म्हणाला आणि विरेन निघुन गेला.
विरेनने रुद्राक्षला गोळी आणून दिली त्याने ती खाल्ली तर त्याला गोळी देखील पचली नाही. त्याला आता तर जास्तच उलट्या होऊ लागल्या. आता त्याला चांगलाच ताप देखील भरला होता. हे सगळं होई पर्यंत लंच ब्रेक झाला होता.
विरेन,“ रुद्र तुला ताप पण आलाय बघ. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ मी शरद सरांना ऑफिसमध्ये बोलावून घेतो.”
रुद्राक्ष,“ तू काकाला फोन करून बोलाव. आपण हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा घरी जाऊ. डॉक्टरांना घरी बोलावून घेऊ.” तो कसाबसा बोलत होता.
विरेनने शरदला फोन करून रुद्राक्षची तब्बेत ठीक नाही. त्याला घरी घेऊन जातोय तर तुम्ही ऑफिसमध्ये या असं सांगितलं. रुद्राक्ष मात्र पुन्हा उलट्या करत होता. आता त्याच्यात उभं राहण्याचे ही त्राण राहिले नव्हते. विरेनच्या आधाराने तो कसा बसा गाडीपर्यंत गेला. विरेनने त्याला गाडीत बसवलं आणि तो त्याने रुद्राक्षला घरी नेलं.
विरेन,“ रुद्र चल घर आलं.”
तो रुद्राक्षला म्हणाला पण रुद्राक्ष काहीच बोलत नव्हता. ते पाहून त्याने रुद्राक्षला हलवलं तर तो बेशुद्ध झाला होता. विरेन ते पाहून घाबरला आणि रुद्राक्षला घरात घेऊन जाण्यासाठी ओरडून नोकरांना बोलावू लागला. त्याचे ओरडणे ऐकून रत्नमालाबाई आणि सविता बाहेर आल्या.
रत्नमालाबाई,“ काय झालं वीर आरडा-ओरडा का करत आहेस?”
विरेन,“ आजी रुद्र! तो उठतच नाही. त्याला ऑफिसमध्ये आल्यापासून उलट्या होत होत्या आता तर खूप ताप पण आला आहे.” तो घाबरून बोलत होता.
सविता,“ काय? (त्यांनी गाडी जवळ येऊन रुद्राक्षच्या कपळाला हात लावला तर त्यांना चटका बसला.) खूप ताप आहे रुद्रला. वीर त्याला त्याच्या रूममध्ये घेऊन जाऊ रमेश जरा मदत कर रे. आई आपल्या फॅमिली डॉक्टरांना फोन करून बोलावून घ्या.” ती रुद्राक्षला गाडीतून बाहेर काढायला विरेनला मदत करत बोलत होती.
रत्नमालाबाई,“ हो मी करते फोन.” त्या म्हणाल्या.
सविताने विरेन आणि रमेशच्या मदतीने रुद्राक्षला त्याच्या बेडरूममध्ये नेले. तोपर्यंत रत्नमालाबाईंनी डॉक्टरांना फोन केला. तोपर्यंत केतकीला ही रुद्राक्षला ताप आला आहे हे कळलं होतं. ती मिठाचे थंड पाणी आणि रुमाल घेऊन गेली. सविता रुद्राक्षच्या कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत होती. तोपर्यंत रत्नमालाबाई डॉक्टरांना घेऊन आल्या. डॉक्टरांनी रुद्राक्षचे चेकअप केले.
डॉक्टर,“ खूप जास्त उलट्या झालेल्या दिसत आहेत त्यामुळं डिहायड्रेशन झालं आहेच. ताप ही शंभरच्या पुढे आहे. मला वाटतंय की खूप जास्त जागरण झालं आहे बहुतेक त्यामुळं खूप जास्त एसीडीटी झाली असावी. आपण ब्लड ही चेक करून घेऊ. संध्याकाळपर्यंत रिपोर्ट्स येतील. मी एक इंजेक्शन देतो आणि नर्स आणि वॉर्डबॉयला काही औषधं आणि सलाईन घेऊन फोन करून बोलावून घेतो.” ते सांगत होते.
रत्नमालाबाई,“ पण रुद्र डोळे का उघडत नाही?” त्यांनी काळजीने विचारलं.
डॉक्टर,“ खूप विकनेस आला आहे त्याला त्यामुळे तो बेशुद्ध आहे. संध्याकाळपर्यंत शुद्ध येईल.”
सविता,“ डॉक्टर त्याला काही होणार तर नाही ना?” तिने रडत विचारलं.
डॉक्टर,“ तसं तर ब्लड रिपोर्ट्स आल्यावरच आपल्याला सांगता येईल. उलट्या फूड पॉयजनींगमुळे ही होऊ शकतात त्यात रुद्रला ताप ही खूप आहे. तसं असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये एडमीट ही करावे लागू शतके. तुम्ही विनीत सरांना बोलावून घ्या प्लिज.” ते म्हणाले.
केतकी,“ ताई तुम्ही भाऊजींना फोन करा मी आहे रुद्रजवळ. पण ते घाबरून जाणार नाहीत याची काळजी घ्या.” ती म्हणाली आणि सविता हो म्हणून फोन करायला गॅलरीत गेली.
डॉक्टरांच्या सुचने प्रमाणे एक वॉर्ड बॉय आणि नर्स सामान घेऊन हजर झाले. डॉक्टरांनी लगेच रुद्राक्षला सलाईन लावली आणि पुढची ट्रिटमेंट सुरू केली. शरदने रुद्राक्षची तब्बेत कशी आहे म्हणून चौकशी करायला फोन केला आणि रत्नमालाबाईंनी त्याला सगळं सांगितलं तसा तो ताबडतोब ऑफिसमधून निघून आला. आत्ता दुपारचे तीन वाजून गेले होते. विनीतला हे कळताच तो पुण्यातून नॉन स्टॉप फाईटने मुंबईला निघाला. तो साडे चारपर्यंत घरी पोहोचणार होता. सविता रुद्राक्ष जवळ बसली होती आणि अचानक तिला आद्याची आठवण झाली.
सविता,“ अरे देवा! या सगळ्या टेन्शनमध्ये आपण आद्याला फोन करायचा विसरलोच की. ती पोरगी काय म्हणेल आपल्याला तिच्या नवऱ्याला इतकं बरं नाही आणि आपण तिलाच कळलं नाही.” त्या डोक्याला हात लावत म्हणाल्या.
.रत्नमालाबाई,“ जा फोन कर तिला.” त्या म्हणाल्या आणि सविता पुन्हा गॅलरीत गेली
सविता,“ हॅलो आद्या. बेटा मी काय सांगते ते शांतपणे ऐक. रुद्रची तब्बेत ठीक नाही. तू ताबडतोब घरी ये.”
आद्या,“ काय झालं अचानक त्यांना? सकाळी तर ते ठीक होते ना?”
सविता,“ सगळं आपण तू घरी आल्यावर बोलू.” त्या म्हणाल्या.
आद्या,“ठीक आहे. ”
तिने बॉसला सांगितलं आणि रजेचा अर्ज मेल करते म्हणून ती ऑफिसमधून निघाली आणि टॉक्सित बसली.
‛ बरं नाही म्हणजे साधारण काही तरी झालं असेल. नाही तरी घरात रुद्र जरा जास्तच लाडाचा आहे. थोडं काही झालं की लगेच सगळे गोळा झाले असतील त्याच्या भोवती. तू बायको आहेस ना त्याची म्हणून तुला फोन करून कळवलं असेल.’ ती या विचारात घरी पोहोचली.
ती बेडरूममध्ये गेली आणि समोरचे दृश्य पाहून घाबरली. रुद्राक्ष बेडवर निपचित पडून होता. त्याच्या हाताला सलाईन लावली होती. केतकी त्याच्या उशाला बसून कपाळावर घड्या ठेवत होती तर सविता त्याच्या पायाला काही तरी लावत होती. शरद आणि रत्नमालाबाई, विरेन टेन्शनमध्ये दिसत होते. डॉक्टर आणि नर्स त्याला थोड्या थोड्या वेळाने मॉनिटर करत होते. तिने हातातली पर्स तिथेच टाकली आणि बेडजवळ गेली.
आद्या,“ काय झालं मॉम रुद्रना? सकाळी ते ठीक होते आणि अचानक हे सगळं? ते असे निपचित का पडले आहेत? त्यांना उठवा ना प्लिज.” ती घाबरून रडत बोलत होती.
सविता,“ ऑफिसमध्ये गेल्यावर त्याला उलट्या झाल्या म्हणे खूप. म्हणून विरेन घरी घेऊन आला तर गाडीतच तो बेशुद्ध झाला. ताप ही खूप आहे. तू घाबरू नको बेटा डॉक्टर आहेत ना. ते म्हणाले की रात्रीपर्यंत त्याला शुद्ध येईल.” त्या तिला समजवत होत्या.
साडे चार वाजले आणि पुण्याला गेलेला विनीत ही घरी आला. तोपर्यंत रुद्राक्षचे ब्लड रिपोर्ट्स ही आले होते.
विनीत,“ काय आहेत ब्लड रिपोर्ट्स डॉक्टर? काही घाबरण्यासारखे तर नाही ना?” त्याने काळजीने विचारलं.
डॉक्टर,“ चांगली गोष्ट ही आहे की फूड पॉयजनींग वगैरे काही झालेलं नाही. पण प्रचंड प्रमाणात पित्त वाढले आहे. कदाचित रुद्राक्ष बरेच दिवस झालं नीट झोपला नाही. जेवण खाणे ही नीट केलेलं दिसत नाहीत कारण सगळे पॅरॅमिटर हलले आहेत. हिमोग्लोबिन ही खूप कमी झाले आहे. या सगळ्याचा परिणाम त्याच्या तब्बेतीवर दिसून येत आहे. उलट्या झाल्यामुळे बॉडी डिहायड्रेट झाली आहे. काळजी करण्यासारखेच आहे हे सगळं.” ते गांभीर्याने बोलत होते.
विनीत,“ रात्रंदिवस चोवीस तास नुसतं काम काम केल्यावर काय होणार आहे दुसरं! चूक माझी आहे या मूर्खाला मी जास्तच सूट दिली.” तो काळजीने बोलत होता.
रत्नमालाबाई,“ डॉक्टर माझ्या रुद्रच्या जीवाला काही धोका तर नाही ना?” त्यांनी घाबरून विचारलं.
डॉक्टर,“ तसा धोका नाही रुद्राच्या जीवाला पण त्याच्या प्रकृतीची अशीच हेळसांड सुरू राहिली तर मात्र त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील. इतकी एसीडीटी होणं चांगलं नाही. पुढे जाऊन याचा पचनसंस्था आणि आतड्यावर गंभीर परिणाम होईल. सध्याच म्हणाल तर ताप खूप जास्त आहे. डिहाइड्रेशन ही झाले आहे आणि हिमोग्लोबिन कमी त्यामुळे त्याची काळजी घ्यावी लागेल. महिनाभर तरी संपूर्ण रेस्ट आणि खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे लागेल. आपण पाच दिवस ट्रिटमेंट देऊ. सलाईन पाच दिवस लावावीच लागेल. कारण एसीडीटी इतकी झाली आहे तोंडा वाटे औषधं दिली तर उलटून पडतील. आता शुद्ध आल्यावर थोडी तांदळाची पेज देऊन पाहू. ती पचली तर मग उद्या सूप वगैरे देता येईल. मी रुद्र शुद्धीवर आल्यावर जातो. पण नर्स असेल इथं रात्रभर. ” ते म्हणाले.
सविता,“आम्ही सगळी काळजी घेऊ त्याची. आता हलगर्जीपणा होणार नाही. याची मनमानी करून खूप झाली.” त्या डोळे पुसून म्हणाल्या.
सगळे रुद्राक्षच्या बेडरूममध्ये बसून होते. संध्याकाळी सात वाजता त्याला शुद्ध आली. तो डोळे उघडून सगळीकडे पाहत होता.
सविता,“ बेटा तू तुझ्याच रूममध्ये आहेस. कसं वाटतंय तुला आता?” त्यांनी त्याचा हात धरून काळजीने विचारलं.
रुद्राक्ष,“ मी ठीक आहे मॉम! फक्त डोकं खूप दुखतंय आणि तुम्ही सगळे इथं काय करताय? डॅड पुण्यावरून लगेच आला?” तो सगळ्यांकडे पाहून हळू आवाजात विचारत होता.
विनीत,“ तू पराक्रमच इतका मोठा केला मग यायलाच लागणार ना! आराम करा आता डोकं दुखतंय ना मग शांत राहायचं.” ते थोडं चिडून पण काळजीने म्हणाले.
रुद्राक्ष,“सॉरी ना. मला वाटलं नव्हतं माझी तब्बेत इतकी बिघडेल.” तो हळूच म्हणाला.
विनीत,“ हो ना आपल्याला तर काहीच वाटतं नसतं ना!” तो पुन्हा चिडून म्हणाला.
रत्नमालाबाई,“ विनू बास चिडचिड. एक तर रुद्रची अवस्था पाहतोयस ना कशी आहे आणि त्यात काय रे त्याला असं तिरकस बोलत आहेस. वीर तू ही घरी जा आता. सविता तू थांब इथं रुद्र आणि आद्याबरोबर. तुम्ही सगळे आराम करा आता चला. त्याला ही आराम करू द्या.”
त्या म्हणाल्या आणि सगळे निघून गेले डॉक्टर ही रुद्राक्षचे चेकअप करून निघून गेले नर्स मात्र तिथेच होती. आद्याला आज पहिल्यांदा रुद्राक्षची काळजी वाटली होती. ही काळजी प्रेमात तर बदलणार नाही ना? हे तर येणारा काळच ठरवणार होता.
©स्वामिनी चौगुले
