Marathi story अनोखे बंध भाग 14

 




दोघी जेवण करून निघून गेल्या आद्या आज ही गीताच्या घरी थांबणार होती कारण तिचा भाऊ वेदान्त त्याला आठवडाभर सुट्टी होती आणि त्यानेच तो आई बरोबर थांबेल तू जरा ब्रेक घे म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे ती आज दोन चार दिवस गीताकडे राहायला आली होती. दोघी घरी आल्या.


गीता,“ यार तो रुद्राक्ष पोतदार कसला चिकना आहे. त्याचे ते केशरी डोळे. तो मादक आवाज आणि ती बोलण्याची स्टाईल, मध्येच केसातून हात फिरवनं, मध्येच मोबाईल हातात फिरवनं आणि हसणं! बापरे तो हसला की असं वाटतं मोत्यांची उधळणच होत आहे.” ती तिच्याच नादात बोलत होती.


आद्या,“ओ मॅडम जाग्या  व्हा. आणि  हो ना. तू तर रुद्राक्ष आल्यापासून त्याच्याकडेच पाहत बसली होतीस. तो आहे देखणा पण एक नंतर खडूस आहे. स्वतःच्या श्रीमंतीचा माज दाखवायचा एक चान्स सोडत नाही.” ती तोंड वाकडं करत म्हणाली.


गीता,“ अगं त्याच्या जागी आपण असलो असतो तर तेच केलं असतं ना! आदू तू ना हे लग्नाचं नाटक खरं कर आणि त्याची खरंच बायको हो. खूप भारी आहे गं तो.” ती हसत म्हणाली.


आद्या,“ गीता अगं आपण सामान्य माणसांनी स्वप्नं पहावीत पण आपल्या आवाक्यात असणारी. तो कुठे आणि मी कुठे? अगं त्याच्यासाठी मुलींची लाईन लागत असेल. आणि मी … मला तर एका सामान्य मुलाने नाकारलं ते ही प्रेम करून. का तर माझ्यावर बलात्कार झाला म्हणून मग तो रुद्राक्ष त्याला आत्तापर्यंत विरनने माझ्याबद्दल सगळं सांगितलं असेल ना! मग तो का स्वीकारेल माझ्या सारख्या मुलीला? खरं तर लग्न प्रेम या सगळ्यावरचा माझा विश्वास केंव्हाच उडाला आहे. माझ्या नशिबात हे सुख  नाही हे मी केंव्हाच मान्य केले आहे. खरं तर आईचे ऑपरेशन करायचे नसते आणि मला त्यासाठी पैशाची गरज नसती तर मी या काँट्रॅक्ट मॅरेजच्या फंद्यात पडलेच नसते. असो एका वर्षाचा तर प्रश्न आहे. गीता आपण चंद्राला फक्त लांबून पाहू शकतो आणि नेत्र सुख घेऊ शकतो. ना आपण चंद्राला आपल्याजवळ आणू शकतो ना आपण चंद्राजवळ जाऊ शकतो. रुद्राक्ष पोतदार म्हणजे  तोच चंद्र आहे.” ती दुःखी होऊन बोलत होती.


गीता,“सॉरी गं! माझ्यामुळे तुझ्या जखमेवरच्या खपल्या निघाल्या.” ती तिचा हात धरून म्हणाली.


आद्या,“ असं काही नाही बाई. बरं चल झोपू आता उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आईच्या ऑपरेशनसाठीच्या फॉर्मेलिटी पूर्ण करायच्या आहेत आणि तो रुद्राक्ष बोलावणार आहे ना त्या  काँट्रॅक्टवर सह्या करायला. तर तू त्यावेळी माझ्याबरोबर हवीस. उद्या खूप कामं आहेत मॅडम तर झोपू आपण.” ती म्हणाली.

★★★★


इकडे रुद्राक्ष घरी आला. त्याच्या बरोबर विरेन ही होता. दोघे रुद्राक्षच्या रूममध्ये गेले. रुद्राक्षने गॅलरीत जाऊन सिगारेट पेटवली. त्याने एक झुरका ओढला आणि त्याच्या शेजारी उभ्या विरेनच्या हातात सिगारेट दिली.


विरेन,“ साल्या तू दारू सोडल्यापासून माझी खूप गोची झाली आहे. तुझ्या शिवाय प्यायची मजा येत नाही रे! तरी बरं आमचे महाराज सिगारेट अजून पितात.” तो सिगारेटचा  झुरका सोडून म्हणाला.


रुद्राक्ष,“ नालायका मित्र तुझ्यासारखा असावा बघ व्यसनं करायला लावणारा म्हणजे आयुष्याचे कल्याण होईल ना? बरं उद्या मला दुपारपर्यंत पेपर्स रेडी हवेत ते ही फेक आणि हो त्या डॉ. सोडीला फोन करून बोलावून घे. ही इस द बेस्ट! किती पैसे मागेल तितके दे पण परवा तो कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये असला पाहिजे.आद्याची आई वाचायला हवी.” तो म्हणाला.


विरेन,“ तू लेक्चर नको देत जाऊ आ मला. आणि एस बॉस  परवा डॉ.सोडी मुंबईमध्ये असेल. आणि उद्या मिळतील पेपर्स तुला वेळेवर. आणखीन काही ऑर्डर?” त्याने विचारलं.


रुद्राक्ष,“ वीर मला एक समजत नाही की आद्या माझ्या परफ्युमच्या वासाने एग्रेसिव्ह झाली. ती म्हणाली की तिला काही तरी आठवले नको असणारे. पण त्या रात्री मी पावसाने चिंब भिजलो होतो मग माझ्या कपड्यांना परफ्यूमचा वास राहिला असेल का रे? मला प्रश्न पडला आहे.” त्याने विचारलं.


विरेन,“ साहेब तुम्ही सत्तेचाळीस हजाराचा रोजा ब्रॅडचा परफ्युम वापरता. त्याचा वास कपडे धुतले तरी जात नाही. आणि तू तर नुसता पावसात भिजला होतास. त्यात मुलींची  वास घेण्याची आणि ओळखण्याची क्षमता आपल्या पेक्षा किती तरी पट  जास्त असते. त्यामुळे तिच्या नाकात तो वास त्या रात्री बसला असेल आणि तोच वास  त्या दिवशी तुझ्या कपड्यांना येत होता. तो ओळखीला असेल त्यामुळे तिला त्या रात्रीची आठवण झाली असेल.” तो म्हणाला.


रुद्राक्ष,“ बरोबर आहे तुझं मग आता महागडे परफ्युम वापरणे बंद. आता मी फॉग वापरणार. चार पाच दिवसांपूर्वीच मी माझ्या आवडत्या ब्रँडचे परफ्युम खरेदी केले आहेत. तुला हवा असेल तर घेऊन जा.”


विरेन,“ नको रे बाबा इतका महागडा परफ्युम पाहून माझा बाप माझी धुलाई करेल आणि तू दिला आहेस सांगितलं तर मग तर दोन चपल्या आणखीन मारेल आधीच त्यांना वाटतं मी तुझ्या मैत्रीचा मी नको तितका फायदा घेतो. तू काकांना देऊन टाक.”


रुद्राक्ष,“ नको घरात कोणालाच द्यायला नको. अद्याला त्या वासाने ती रात्र आठवत राहील मी कोणत्या तरी मित्राला देऊन टाकतो.” तो म्हणाला.


विरेन,“ धन्य आहात महाराज तुम्ही. आज त्या आद्यासाठी परफ्युमचा ब्रँड बदलला पुढे अजून काय काय बदलणार आहात तुम्हालाच माहिती. बरं निघतो मी. अकरा वाजून गेलेत. उद्या लवकर उठून तुझे फेक पेपर्स बनून आणायचे आहेत ना. त्या आद्याला  उद्या बाराच्या पुढे कधी ही बोलाव पेपर्स तयार असतील आता कुठं बोलवायच  ते तू  ठरव. बाय अँड गुड नाईट.” तो सिगारेट त्याच्या हातात देत म्हणाला आणि निघून गेला.

★★★


   दुसऱ्या दिवशी रिद्राक्षने विरेन करवी एका वकीलाकडून फेक काँट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स बनवून घेतले. आता त्याला आद्याला  ते पेपर्स साइन करायला कुठे ही बाहेर भेटायला बोलावून चालणार नव्हते. कारण बाहेर त्याला सविस्तर चर्चा करता आली नसती म्हणून मग त्याने तिला त्याच्या एका फ्लॅटवर यायला सांगितलं.


 आद्या ठरल्याप्रमाणे बरोबर बारा वाजता. गीताला घेऊन त्याच्या फ्लॅटवर पोहोचली. रुद्राक्ष आणि विरेन एका वकीला बरोबर तिथे आधीच हजर होते. विरेनने वकिलाला आधीच पढवून ठेवले होते.


रुद्राक्ष,“ या बसा. बाहेर सविस्तर बोलता आलं नसतं म्हणून इथं बोलावून घेतलं तुम्हाला. हे ऍडव्हॉकेट म्हात्रे आहेत. मिस आद्या तुम्ही आधी पेपर्स वाचून घ्या. कायदेशीर भाषा असल्यामुळे तुम्हाला नाही समजली तर हे तुम्हाला सगळं समजावून सांगतील. काल आपलं बोलणं झाल्या प्रमाणे मी पंधरा लाख तुम्ही दिलेल्या बँक अकाऊंटवर जमा केले आहेत. राहिलेले पासष्ट लाख लग्न होऊन आठ दिवस झाल्यावर मिळतील आणि उरलेले तीस लाख एक वर्ष झाल्यानंतर  म्हणजे काँट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर. ते सगळं ही या पेपर्समध्ये नमूद केलं आहे.” त्याने तिच्यासमोर पेपर्स ठेवले. तिने ते वाचले.


आद्या,“ ठीक आहे. तरी वकिलांना मला परत एकदा सगळे क्लाजेस समजावून सांगायला सांगा.” ती म्हणाली आणि रुद्राक्षने वकिलांना इशारा केला.


ऍड. म्हात्रे,“ या पेपर्स प्रमाणे तुम्ही मिस्टर रुद्राक्ष पोतदार यांच्याबरोबर एक वर्षाचे काँट्रॅक्ट मॅरेज करत आहात त्या बदल्यात ते तुम्हाला एक कोटी देणार आहेत त्यातले पंधरा लाख तर ऑल रेडी तुम्हाला मिळाले आहेत. या पेपर्समध्ये  असं लिहलं आहे की एक वर्षानंतर तुमचा मिस्टर पोतदार आणि त्यांच्या कोणत्याही प्रॉपर्टीवर कायदेशीर अधिकार असणार नाही. तुम्हाला हे काँट्रॅक्ट मॅरेज मान्य असेल तर तुमची संमती आहे म्हणून यावर सही करा. हे काँट्रॅक्ट मॅरेज  तुम्ही तुमच्या पूर्ण संमतीने आणि कोणत्याही दबावा शिवाय करत आहात ना?  ” त्यांनी विचारलं.


आद्या,“ हो मी माझ्या संमतीने हा करार विवाह करत आहे. ”असं म्हणून तिने पेपर्सवर सही केली आणि रुद्राक्षने ही त्या पेपर्सवर सही केली.वकील निघून गेले. 


रुद्राक्ष,“ उद्या आपल्याला विधिवत लग्न म्हणजे लग्नाचे नाटक  करावे लागणार आहे. तर त्यासाठी आज खरेदी करावी लागेल.” 


आद्या,“ तुम्ही काल दहा लाख ट्रान्स्फर करणार म्हणाला आणि आज पाच लाख जास्त का दिलेत? आणि खरेदी वगैरे साठी माझ्याकडं वेळ नाही आज मला कोणते डॉक्टर आईचे ऑपरेशन करणार आहेत? ते पहावे लागेल. तसेच फॉर्मेलिटी पूर्ण कराव्या लागतील. आणि आईच्या काही टेस्ट आज करून घ्याव्या लागतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या मनाची तयारी करावी लागेल मला या ऑपरेशनसाठी. त्यामुळं तुम्हीच माझी ही खरेदी करा. लग्नाचं नाटकचं तर करायचं आहे मग त्यासाठी माझी चॉईज कशाला हवी?” ती म्हणाली.


रुद्राक्ष,“ ठीक आहे मी करतो सगळी खरेदी. तुम्ही तुमच्या आईची काळजी घ्या.” तो म्हणाला आणि दोघे आपापल्या वाटेने निघून गेले.

★★★★


    आद्या हॉस्पिटलमध्ये गेली. तर रुद्राक्ष ऑफिसमध्ये.


रुद्राक्ष,“ वीर उद्या तो डॉ. सोडी येतोय ना? कमला नेहरू हॉस्पिटलमधून तिथल्या डॉक्टरकडून आद्याच्या आईच्या रिपोर्टच्या सॉफ्ट कॉपी घेऊन तू त्या डॉ.सोडीला मेल केल्या होत्यास ना?”


विरेन,“ हो रुद्र त्यांनी पाहिले आहेत सगळे रिपोर्ट्स पण इतक्या शॉर्ट नोटीसवर येण्यासाठी ते पाच लाख अजून मागत आहेत आणि येण्याजाण्याचा खर्च ही. म्हणजे बघ कमीत कमी सदूषष्ठ लाख तरी जातील. हा डॉ.सोडी आपल्याला कोंडीत पकडतोय.” तो सांगत होता.


रुद्राक्ष,“ तो जितके पैसे मागतो तितके आपण देऊ पण आद्याच्या आईचा जीव वाचला पाहिजे. त्याला मी पैसे पाठवतो अर्धे आत्ता आणि सर्जरी झाल्यावर अर्धे. पोस्ट चार्जरी ट्रीटमेंट देखील त्याच्याच मार्गदर्शना खाली व्हायला हवी.आणि त्याला सांगून ठेव तो एका कॉन्फरन्ससाठी भारतात आला होता. त्याने ही केस पाहिली आणि चॅरिटी म्हणून तो ही सर्जरी करत आहे.असं सांगायला. आपलं नाव कुठेच नको.” तो सांगत होता.


विरेन,“ ते सगळं मी करतो मॅनेज तू काळजी नको करुस. पण लग्नाच्या खरेदीच काय करायचं? एकापाठोपाठ एक तुझ्या मिटिंग आहेत पाच वाजेपर्यंत.”


रुद्राक्ष,“ आपण दोघे पाच नंतर जाऊ खरेदीला. त्या गीताला आद्याच्या कपड्याचा साईज आणि ब्लाउजचे माप ही पाठवायला सांग. लग्न झाल्यावर तिला नवीन कपडे आणि साड्या देखील लागतीलच ना.” तो म्हणाला.


विरेन,“ हो मी मागून घेतो. रुद्र नाही तर तूच माग ना. असं ही ती तुझ्यावर फुल्ल लट्टू आहे. काल हॉटेलमध्ये ती पूर्णवेळ नुसती तुलाच पाहत बसली होती. आता म्हणलं नजर लावते की काय तुला! ती लगेच देईल तुला आद्याबद्दल जी काही माहिती हवी ती.” तो हसून म्हणाला.


रुद्राक्ष,“ इथं जी लट्टू व्हायला हवी ती नुसती आग ओकते आणि नाही ती लट्टू  होते.नको बाबा तूच विचार तिला.” तो म्हणाला.


विरेन,“ ती आग्या मोहळाची राणी तुझ्यावर लट्टू होईल असं तुला वाटत असेल तर विरस.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.


रुद्राक्ष,“ नाव भारी दिलंस रे तिला आता मी पण तेच म्हणते क्वीन ऑफ हनी बी खूप मोठं झालं ना! तिला मी क्वीबी म्हणत जाईन शॉर्ट आणि स्वीट. माझी क्वीबी.” तो हसून म्हणाला.


विरेन,“ हो का तुझी क्वीबी डसली ना तुला तर पाणी पण मागू देणार नाही. याची क्वीबी म्हणे. जास्त हसू नको.” तो तोंड फुगवून म्हणाला.


रुद्राक्ष,“ डसू दे अधिकार आहे समज तिचा तो.”


विरेन,“ येडा झालास तू! तुला बोलण्यात काही अर्थ नाही मी जातो.” तो वैतागून निघून  गेला. रुद्राक्ष मात्र हसत होता.


 विरेन खरं तर बोलत होता. रुद्राक्ष आद्या नावाची आग पदरात बांधून घ्यायला निघाला होता. आज ना उद्या त्याच आगीत तो होरपळून निघणार हे तर निश्चित होते. पुढे काय काय घडणार आहे हे मात्र भविष्याच्या  अंधाऱ्या गर्भात अजगरासारखे पडून होते. ज्याचा फास हळूहळू रुद्राक्षच्या गळ्या भोवती आवळला जात होता. आता रुद्राक्ष यात मरणार की तरणार हे तो अजगरच ठरवणार होता.


 उद्या लग्न! अनोख्या बंधचे हे अनोखे लग्न कसे असेल? ज्यात एक आग तर एक पाणी आहे. आता पाणी आगीला विझवून स्वतःच्या कवेत घेईल की आग पाण्याला वाफ बनवून उडवून टाकेल हे पाहायला मजा येणार आहे.

पाहूया पुढच्या भागात

©स्वामिनी चौगुले


   



 

Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post