Marathi love story अनोखे बंध भाग 15

 




  रुद्राक्षने एका मंदिरात लग्नाची व्यवस्था करून घेतली तसेच तिथून जवळच असलेल्या एका लॉजमध्ये लग्नासाठी दोन रूम देखील बुक करून घेतल्या. त्याने ऑफिस सुटल्यावर पाच वाजता जाऊन सगळी खरेदी करून घेतली. 


  आद्याला उद्या सकाळी नऊ वाजता पाठवलेल्या लोकेशनवर पोहोच. दहा वाजता लग्न आहे असा मेसेज करून ठेवला. तिने मेसेज पाहिला आणि त्याला अंगठा पाठवून दिला. आज रात्री ती  हॉस्पिटलमध्ये थांबणार होती.तिच्या आई जवळ. 


आद्या,“ आई उद्या दुपारी तीन वाजता तुझे ऑपरेशन आहे.  घाबरायचं काही कारण नाही. सगळं व्यवस्थित होणार आहे.” ती समजावत होती.


आई,“ मला भीती माझ्यासाठी नाही गं तुमच्यासाठी वाटते. मला काही झालं तर तुला आणि वेदूला कोण आहे सांग ना? खरं तर मला तुझं लग्न करायचं होतं अदू पण या रोगानी मला गाठलं आणि सगळंच खुंटल बघ.”त्या रडत म्हणाल्या.


आद्या,“ तुला काहीही होणार नाही आई. तू आराम कर आता.” ती त्यांचे डोळे पुसत म्हणाली. तोपर्यंत तिथं गीता आली.


गीता,“ आद्या बरोबर बोलतेय काकू तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्हाला माहित आहे का उद्या तुमची सर्जरी कोण करणार आहे? अहो फेमस हार्ट सर्जन आणि एशियातील नंबर वन डॉक्टर डॉ. सोडी! मला ही आत्ताच कळलं डॉक्टर राणेंनकडून. आता तुम्हाला काहीच होणार नाही तर निश्चिन्त रहा.” ती आनंदाने सांगत होती.


आई,“ काय बोलतेस गीता? अगं त्यांची फी लाखो रुपये आहे आणि त्यांची अपॉइंटमेंट सुद्धा दोन दोन महिने मिळत नाही.” त्या आश्चर्याने बोलत होत्या.


गीता,“ काकू ते एका कॉन्फरन्स निमित्त मुंबईत आले आहेत. त्यांना तुमची केस डॉ. राणेंनी दाखवली आणि ते चॅरिटी म्हणून एक ही रुपया न घेता तुमची सर्जरी करणार आहेत.” 


आद्या,“ काय? ही तर खूप चांगली बातमी दिलीस तू गीता.” ती म्हणाली आणि गीता तिच्याजवळ  जाऊन तिच्या कानात कुजबुजली.


गीता,“ रुद्राक्ष पोतदार तुला लकी ठरत आहे आद्या. ही इस युवर लकी चार्म.”


आद्या,“ कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ. बाकी लकी चार्म वगैरे काही नसतं.”ती तोंड फुगवून म्हणाली.


आई,“दोघीच काय खुसुरफुसुर करताय गं?” त्यांनी विचारलं.


आद्या,“काही नाही आई तू झोप बरं मी गीताबरोबर जरा खाली फेरफटका मारून येते.” ती म्हणाली.



  ती गीताबरोबर जाऊन फेरफटका मारून आली. तोपर्यंत तिची आई झोपली होती. ती ही खाली अंथरून टाकून आडवी झाली पण तिला काही झोप लागत नव्हती. तिला एक वेगळीच हुरहुर लागली होती. शेवटी कंटाळून ती उठून गॅलरीत जाऊन उभी राहिली. रात्रीचे बारा वाजून गेले होते आणि सगळीकडे निरव शांतता होती. वर काळ्या कुट्ट आकाशाची चादर  अंगावर अनेक चांदण्यांची नक्षी घेऊन लखलखत होते. त्या सगळ्यात चंद्र मात्र उठून दिसत होता. ती मनात विचार करत होती.


‛ आयुष्यात कधी विचार ही केला नव्हता की मला असं काँट्रॅक्ट मॅरेज करून लग्नाचं नाटक करावे लागेल. स्वतःच्या लग्नाची  किती स्वप्नं पाहिली होती मी! आणि उद्या लग्नाचं चक्क नाटक करणार आहे तेही एक वर्षासाठी एका अनोळखी माणसाबरोबर! ती नियती कोणते रंग दाखवेल काही सांगू शकत नाही. असो आईचा जीव वाचेल. तिच्यावर योग्य उपचार होतील आणि माझ्या बऱ्याच आर्थिक अडचणी सुटतील. एखादं छोटंसं घर घेता येईल स्वतःच. तो रुद्राक्ष आहे खडूस आणि माजोरडा पण माणूस म्हणून बरा वाटला त्याच्या नजरेत इतरांसारखी वासना दिसत नाही. द रुद्राक्ष पोतदार, पोतदार बिल्डर्सचा मालक त्याने माझ्याकडे पहायला त्याला कुठं मुलींची कमी असेल म्हणा. तो त्या आकाशातल्या चंद्रासारखा तर आहे. त्याला फक्त पाहता येईल दुरून बाकी खूप देखणा आहे तो. असो आद्या मॅडम त्याचा विचार नको करायला. त्याच्याबरोबर एक बिझनेस डिल केलं आहे त्या व्यतिरिक्त त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. चला झोपू उद्या खूप वेगळा दिवस असणार आहे.’ ती विचार करत येऊन पुन्हा झोपली.


 इकडे रुद्राक्षची ही काही वेगळी अवस्था नव्हती. त्याला ही झोप लागत नव्हती. त्याने  गॅलरीत बसून आत्तापर्यंत तीन सिगारेट पिल्या होत्या आणि चौथी त्याच्या हातात होती. त्याला ही एक प्रकारची हुरहूर लागली होतीच.


‛ उद्या माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. उद्या मी केलेल्या चुकीची मी जबाबदारी घेत आहे. आद्या आणि तिचे कुटुंब आता माझी जबाबदारी असेल. आद्या! काय बोलावं या पोरीबद्दल नुसता  खदखदता ज्वालामुखी आहे. नुसती आग! ती आधीपासूनच अशी होती की त्या रात्रीनंतर अशी झाली असेल? काय माहित. पण आता जशी आहे तशी तिला स्वीकारून तिचे आयुष्य जास्तीत जास्त सुखकर कसे होईल ते पाहायला हवं. त्यासाठी मला तिचेच चटके बसले तरी चालतील. पण एक वर्ष होता होता जेंव्हा तिला सत्य सांगायला लागेल किंवा तिला जेंव्हा सत्य समजेल की मीच तो तिचं आयुष्य खराब करणारा नराधम आहे तेंव्हा ती कशी रियाक्ट होईल? ती मला शिक्षा करेल की मोठ्या मनाने मला माफ करेल? रुद्र किती भाबडा आहेस तू? अरे आद्या आहे ती आद्या, तिच्याकडे चुकीला माफी नाही. ती नक्कीच तुला शिक्षाच देणार. असो जेंव्हाच तेंव्हा पाहायला येईल पण उद्या क्वीबीला मला वधू वेशात पहायची घाई झाली आहे. तिच्यासाठी हे लग्नाचं नाटक आहे पण माझ्यासाठी खरं लग्न. तशी आहेच ती सुंदर म्हणा कोणता ही मुलगा तिच्यावर भाळेल अशी. इतकंच की राहत नाही नीट. असो आपण तिला शिकवू सगळं. एका वर्षानंतर तिच्यात इतका बदल व्हायला हवा की तिला स्वतःलाच ओळखता येऊ नये. असो आता झोपायला हवं. उद्या लवकर उठायचं आहे.’

★★★★


    आज रुद्राक्षने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. तो लवकरच तयार होऊन घरातून बाहेर पडला. काल केलेल्या खरेदीच्या बॅगा त्याने गाडीतच ठेवल्या होत्या. त्यामुळे घरात कोणी काही विचारण्याचा प्रश्न नव्हता. आद्या ही सकाळी लवकर आवरून गीताबरोबर रुद्राक्षने पाठवलेल्या हॉटेलच्या पत्त्यावर पोहोचली. तिथे रुद्राक्ष आणि विरेन आधीच हजर होते. 


रुद्राक्ष,“ या बॅगांमध्ये सगळं आहे. ही ब्युटीशियन तुम्हाला तयार करेल.”


आद्या,“ पण इतकी सगळी तयारी कशासाठी? आपण खरोखरच लग्न नाही करत. नाटक करणार आहोत लग्नाचं.” ती म्हणाली.


रुद्राक्ष,“ हो पण ज्यांच्यासाठी आपण लग्नाचं  नाटक करत आहोत त्यांच्यासाठी तर हे खरं लग्न असणार आहे ना आणि माझी आजी खूप आगाऊ आणि कजाग बाई आहे. तिला कोणत्याही संशय यायला नको म्हणून आपल्याला हे सगळं करावं लागेल. मी फोटोग्राफर देखील बोलावला आहे.” तो तोंड वाकडं करत म्हणाला.


आद्या,“ लाज नाही वाटत स्वतःच्या आजीबद्दल असं बोलायला? एक तर तुम्ही इस्टेटीसाठी त्यांना खोटं लग्न करून फसवत आहात आणि वरून त्यांनाच नावं ठेवता. त्यांना काही बोलण्यापेक्षा स्वतः कडे बघा एकदा. तुम्ही तर फसवे आणि नालायक आहात.” ती रागाने म्हणाली आणि गीताने गप्प बस म्हणून तिला खुणावले.


विरेन,“ ये तोंड सांभाळून बोल. कोणाशी बोलतेस त्याचे भान ठेव. तुला कालच पंधरा लाख दिले आहेत याने. तू काम करणार आहेस रुद्रसाठी.” तो उचकला.


आद्या,“ मला पैसे दिले म्हणून मी चुकीला बरोबर म्हणेन असं होणार नाही कळलं का तुला? आणि उपकार नाही केले माझ्यावर, पैसे देऊन त्याबदल्यात मी एक वर्ष यांची बायको असल्याचे नाटक करणार आहे.” ती पुन्हा रागाने म्हणाली


रुद्राक्ष,“ तुम्ही दोघे गप्प बसा जरा. गीता मॅडम यांना घेऊन जा आणि या ब्युटीशियन यांना तयार करतील. यांना तयार करून घेऊन या. ही चावी रूमची.” तो गीताकडे  चावी देऊन म्हणाला आणि गीता आद्याला जवळजवळ ओढतच घेऊन गेली.


विरेन,“ रुद्र अजून ही वेळ गेलेली नाही थांबव हे सगळं. लय तिखट आणि जहरी प्रकरण आहे हे. तुझ्या सारख्या शांत माणसाला  झेपायच नाही.”


रुद्राक्ष,“ वीर उलट कौतुक वाटतं मला तिचं अरे पैशासाठी माणसं किती लुब्रेपणा करतात पण ही हिने खरं ते न डगमगता मला सुनावलं. आणि चल आता.” 


विरेन,“ मूर्ख आहेस तू. जा मर त्या आगीत होरपळून. कौतुक वाटतं म्हणे?” तो रागाने तोंड वाकडं करून म्हणाला आणि निघून गेला.


   रुद्राक्ष आणि विरेन गाडीजवळ उभं राहून त्यांची वाट पाहत होते. रुद्राक्षने पिस्ता कलरची शेरवानी घातली होती. त्यात त्याचे व्यक्तीमत्त्व आणखीनच खुलून दिसत होते. अर्ध्या तासाने गीता. आद्याला घेऊन खाली आली. आणि रुद्राक्ष आद्याला पाहतच राहिला. फेंट पोपटी रंगांची मोठी गोल्डन किनार असणारी  कांजीवरम साडी. केसांची सागर वेणी,चेहऱ्यावर हलका मेकअप, गळ्यात नाजूक नेकलेस, कानात झुबे, हातात हिरव्याकंच बांगड्या त्यात सोन्याच्या बांगड्या आणि मागे तोडे, दंडावर बाजूबंद. किंचित सावळ्या रंगांची आणि मोठ्या बोलक्या डोळ्यांची आद्या वधू वेशात अप्सरे पेक्षा कमी दिसत नव्हती. दोघी गाडीजवळ आल्या.


आद्या,“ किती महागडी साडी आहे ही आणि हे दागिने बाप रे बाप लग्नाच्या नाटकासाठी इतका खर्च? बापाने कमवून ठेवले आहे तर उधळा कसे ही! यातली एक ही वस्तू मी ठेवून घेणार नाही. तुमच्या तुम्हाला माघारी देणार.” ती तोंड उघडले की आग ओकत होती.


गीता,“ किती बोलशील गं! ते तुझे बॉस आहेत असं समजून तरी मान ठेव की त्यांचा.”


विरेन,“ तुझ्या मैत्रिणीला जरा समजाव. आणि मॅडम हे रुद्राक्ष पोतदार आहेत. पोतदार बिल्डर्सचे सी.ई.ओ. यांना ही पगार मिळतो म्हणलं.”


रुद्राक्ष,“ हे बघा तुम्ही खोटं का असेना  पोतदारांच्या सून होणार आहात त्यामुळे आमच्या नावाला साजेशे सगळे करावे लागणार आहे. आणि हे सगळं मी माझ्या डॅडच्या पैशातून नाही तर माझ्या स्व कमाईतून घेतले आहे. मला पगार आहे ओ मॅडम आणि राहिला प्रश्न हे सगळं परत करण्याचा तर ते आपण नंतर पाहू. आता चला.” तो शांतपणे म्हणाला. आणि गीता आद्याच्या कानात म्हणाली.


गीता,“ कसला चिकना दिसतोय हा आद्या शेरवणीत, जरा बघ तरी.”


 इतका वेळ त्याला नीट न पाहता बोलणाऱ्या आद्याचे त्याच्याकडे लक्ष गेले. ती त्याला न्याहाळत होती. खरंच रुद्राक्ष एखाद्या राजकुमारा सारखा राजबिंडा दिसत होता. दोघांची नजरानजर झाली आणि आद्याने नजर दुसरीकडे वळवली.


विरेन,“ चला आता की इथेच थांबायचं आहे?” तो म्हणाला आणि सगळे गाडीत बसले.


    हॉटेलपासून जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात ते पोहोचले. भटजी त्यांचीच वाट पाहत होत्या.


भटजी,“ या या वेळेवर आलात नाहीत तर म्हणलं मुहूर्त टळतो की काय आता! चला बसा विधी सुरू करू. ” ते म्हणाले.


   रुद्राक्ष आणि आद्या प्रज्वलीत केलेल्या होमासमोर बसले आणि गुरुजींनी मंत्रोच्चारण सुरू केले. एक एक विधी होत होते आणि आद्याला मात्र प्रश्न पडला.


आद्या,“ हे लग्नाचे नाटक आहे तर मग आपण लग्न इतकं विधिवत का करत आहोत?


विरेन,“ या मुलीचं तोंड एक मिनिटं बंद राहत नाही. ये ते बोलणे आणि मधला शॉट कट कर रे.” तो वैतागून व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या मुलाला ओरडला.


रुद्राक्ष,“ अहो आपण लग्न खोटं करत असलो तरी माझ्या फॅमिलीला ते खरं वाटायला हवं ना म्हणून मग होत आलेल्या  व्हिडीओ शूटिंग आणि फोटोसाठी आपण विधी करत आहोत.”तो तिला समजावत म्हणाला.


आद्या,“बरं! पण तुमच्यासारखं नीट सांगायला काय होतं हो या विरेनला? जिभेवर विस्तव धरला आहे का याने?” ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली.


विरेन,“ बाप रे बघा कोण बोलतंय हे? डायनासोरसारखं नुसती स्वतः तर आग ओखत असते ही आणि मी म्हणे विस्तव धरला आहे काय जिभेवर!” तो तणतणला आणि आद्या रागाने लाल झाली ती उठून त्याच्या अंगावर जाणार तर रुद्राक्षने तिचा हात धरला.


रुद्राक्ष,“ वीर गप्प बस ना बाबा! आद्या तुम्ही कुठं निघालात बसा.” 


आद्या,“ याला सांगा एक दिवस असला तुडवेन याला ना की स्वतःलाच आरशात ओळखू शकणार नाही.” ती रागाने ओरडलीच.


भटजी,“ असं काय करताय मुहूर्ताची वेळ टळून जाईल. गठबंधन कोण करणार?” त्यांनी विचारलं.


रुद्राक्ष,“ गीता मॅडम तुम्ही करा गठबंधन.” तो म्हणाला आणि गीताने पुढे येऊन तिच्या पदराशी त्याच्या उपरण्याची गाठ बांधली आणि भटजींनी पुन्हा मंत्रोच्चार सुरू केले.


भटजी,“ मुलीचे कन्यादान कोण करणार?” त्यांनी विचारले आणि आद्याबरोबर सगळ्यांच्याच तोंडावर प्रश्नचिन्ह दिसू लागले.


रुद्राक्ष,“ वीर तूच हे काम आद्याचा भाऊ म्हणून  करू शकतोस. ये ना प्लिज.” तो विनंती करत म्हणाला.


विरेन,“ मी….. मी नाही करणार या शूर्पणखेचे कन्यादान.” तो हाताची घडी घालून तोंड फिरवत म्हणाला.


आद्या,“ काय म्हणालास तू? मी शूर्पणखा काय? तू समजतोस कोण स्वतःला? रावण व्हायची लायकी तरी आहे का तुझी?” ती आता चांगलीच भडकली आणि उठून विरेनच्या अंगावर धावली. रुद्राक्षची मात्र तिला आवरून आवरून पुरेवाट लागली.


रुद्राक्ष,“ वीर आता तू खूप बोलत आहेस आ!” तो चिडून म्हणाला.


आद्या,“ या माणसाकडून मी कन्यादान करून घेणार नाही.” ती रागाने म्हणाली.


विरेन,“ मला ही या महामायेचे कन्यादान करून हिचा भाऊ होण्यात इंटरेस्ट नाही.” तो म्हणाला.


आद्या,“ मला महामाया म्हणालास? तुझ्या तर आता.” तू पुन्हा रागाने गरजली. 


  रुद्राक्ष मात्र डोक्याला हात लावून बसला. आता ऐन वेळी कन्यादान कोण करणार? हा प्रश्न होता. 


रुद्राक्ष,“ वीर अरे या काय खरोखरच तुझ्या बहीण होणार नाहीत हे नाटक आहे ना बाबा आणि तुम्ही पण आद्या ऐका ना जरा प्लिज.” 


   तो दोघांना ही विनवत बोलत होता. गीताला रुद्राक्षची या दोघांच्या भांडणात झालेली गोची कळत होती शेवटी तिचं पुढे झाली.


गीता,“ कधी पासूनचे भांडताय काय रे तुम्ही दोघे कुत्र्या-मांजरासारखे? आता ऐन वेळी कुठून उभा करायचा भाऊ? आद्या लग्नाचे नाटक सुरू आहे हे. जसे तू आणि मिस्टर पोतदार या लग्नामुळे खरोखरचे नवरा बायको होणार नाही तसेच विरेनकडून नाटक म्हणून तू कन्यादान करून घेतले तर तो काय तुझा भाऊ होणार नाही. विरेन तुम्हीच आला होता ना हे प्रपोजल घेऊन आद्यासाठी? मग हातात घेतलेले काम पूर्ण करा चला करा बरं कन्यादान.” तिने मध्यस्थी केली आणि विरेन गुपचूप पुढे आला. आद्या ही गप्प बसली.


 मंगळसूत्रचा विधी, सातफेरे,कन्यादान सगळं विधिवत झालं. आणि रुद्राक्षने सुटकेचा निःश्वास सोडला.


   आता इथून पुढे मात्र रुद्राक्षचा कस लागणार होता. आद्या प्रचंड एग्रेसिव्ह आणि शॉर्ट टेंपर होती. तिचा स्वभाव त्या घडनेनंतर पूर्ण बदलून गेला होता. एक प्रकारे मानसिक रुग्ण ती झाली होती. त्यामुळे तिला सांभाळणे आणि शांत करणे म्हणजे खायची गोष्ट नव्हती आणि रुद्राक्षसारख्या शांत स्वभावाच्या माणसाला ते जमणार होते का? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देणार होता.


तासीर दोनो की अलग है। 

एक पानी तो दूजा आग है।

कैसे होगा दोनों का मिलन 

ये देखना अभी बाकी है।


 या पानी होगा फ़ना

या आग की किस्मत में बुज़ना है।

ये तो वक्त ही बताये गा जनाब

क्योंकि येतो अनोखी प्रेम कहानी है।

©स्वामिनी चौगुले


अनोखे बंध असलेली  अनोखी कहाणी आहे आणि अनोखी जोडी आहे त्यामुळे यांचे लग्न ही अनोखे असणार यात शंकाच नाही. काय समजलाव? मग कसं वाटलं हे अनोखे लग्न? कमेंटमध्ये नक्की सांगा😆









 











       



Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post