दोन दिवस गीता विरेनला फोन करून आद्याला रुद्रक्षशी भेटायचं आहे म्हणून विनंती करत होती पण विरेन तिला रुद्रक्षला आद्याला भेटायचं नाही असं सांगत होता. शेवटी न राहवून आज आद्यानेच विरेनला फोन केला होता आणि नेमका विरेन रुद्राक्षच्या केबिनमध्ये होता.
विरेन,“ रूद्र आद्याचा फोन येतोय.”
रुद्राक्ष,“ मग उचल आणि स्पीकर वर टाक फोन.” तो म्हणाला आणि विरेनने फोन स्पीकर वर टाकला.
आद्या,“ विरेन मला मिस्टर पोटदारांना भेटायचं आहे. प्लिज फक्त एकदा.” ती आर्जवी सुरात बोलत होती.
विरेन,“ तुला आणि त्या गीताला एकदा सांगितलेलं कळत नाही का? रुद्राक्षला तुला भेटायचं नाही.” तो रागाने म्हणाला.
आद्या,“ तुला ही कळत नाही का? एकदा सांगितलेलं मला भेटायचं आहे त्यांना. बॉडीगार्ड आहेस ना त्यांचा तर मर्यादेत रहा. इथं चहापेक्षा केटलीच गरम आहे. तू मला त्यांचा मोबाईल नंतर दे. मी आणि ते पाहून घेऊ.” ती ही आता रागाने बोलत होती आणि रुद्राक्ष तिच्या बोलण्यावर हसत होता.
विरेन,“ समजतेस कोण गं तू स्वतःला? एकदा सांगितलं ना रुद्राक्षला नाही भेटायचं तुला.” तो चिडून म्हणाला.
आद्या,“ मला त्यांचा मोबाईल नंबर दे. नाही तर मी ऑफिसमध्ये येईन हा.”
विरेन,“ धमकी देतेस मला?”
आद्या,“ नाही खरं बोलतेय. प्लिज विरेन मला मोबाईल नंबर दे. तुला मी नाही देणार त्रास पुन्हा.”ती म्हणाली आणि विरेनने रुद्राक्षकडे पाहिले त्याने खुणेनेच त्याचा मोबाईल नंबर दे म्हणून सांगितलं.
विरेन,“ घे त्याचा नंबर 98…… . आणि हो जरा नीट बोलायला शिक, रिक्वेस्ट पण धमकी दिल्यासारखी करत जाऊ नकोस. असं ही त्याला फोन करून ही काही उपयोग होणार नाही कारण तो खूप चिडला आहे तुझ्यावर.”तो म्हणाला.
आद्या,“ थँक्स!” ती म्हणाली आणि फोन ठेवला. गीता तिथेच होती.
गीता,“ हा विरेन नाही तरी खूप भाव खातो त्या रुद्राक्ष पेक्षा जास्त. बरं झालं आता याच्या पाया पडायची गरज नाही. लाव त्या रुद्राक्षला फोन आणि नीट बोल बाई.” ती म्हणाली आणि आद्याने रुद्राक्षला फोन लावला.
रुद्राक्ष,“हॅलो! कोण बोलतय.” त्याने विचारलं.
आद्या,“ मी आद्या यादव. प्लिज प्लिज फोन कट करू नका. मला तुम्हाला भेटायचं आहे.”
रुद्राक्ष,“ एक तर तुम्हाला माझा पर्सनल नंबर कसा मिळाला? आणि मला तुम्हाला भेटायची अजिबात इच्छा नाही. इतकं रूड माझ्याशी आजपर्यंत कोणीच वागलं नाही.”
आद्या,“ मी समजू शकते तुम्हाला माझा राग येणं साहजिक आहे पण प्लिज एकदा भेटा ना मी पुन्हा तुम्हाला नाही देणार त्रास.” ती विनवणी करत बोलत होती.
रुद्राक्ष,“ अं sss ठीक आहे तुम्ही इतकं इंनसिस्ट करत आहात तर भेटू पण मी एकटा नाही भेटणार तुम्हाला. तुम्ही तुमच्या त्या नर्स मैत्रिणीला घेऊन या आणि मी विरेनला घेऊन येतो. मला आता कोणतीच रिस्क नाही घ्यायची. विरेन तुम्हाला वेळ आणि ठिकाण कळवले.” तो म्हणाला आणि त्याने फोन ठेवला.
विरेन,“ कसली तिखट आहे रे ही. मला म्हणते चहा पेक्षा केटली गरम! जास्तच आगाऊ आहे ही मुलगी रुद्र.”
रुद्राक्ष,“हुंम. इथून पुढे खूप सावध रहावे लागेल. तू तिला फोन करून परवा दिवशी संध्याकाळची मिटिंग फिक्स कर.” तो म्हणाला आणि विरेन बरं म्हणून निघून गेला.
★★★
ठरल्याप्रमाणे विरेनने आज संध्याकाळी सहा वाजता हॉटेल ब्यु आईजमध्ये आद्याला भेटायला यायला सांगितले. तिला हॉटेलमध्ये आल्यावर रुद्राक्ष पोतदार नाव सांग. ते तुला योग्य ठिकाणी पोहोचवतील म्हणून सांगितलं.
आद्या गीताला घेऊन हॉटेलमध्ये पोहोचली. ती तिथल्या रिसेप्शनिस्टला म्हणाली.
आद्या,“ आम्ही रुद्राक्ष पोतदारना भेटायला आलो आहोत.”
रिसेप्शनिस्ट,“ वेल कम मॅडम! हे तुम्हाला घेऊन जातील. यांच्याबरोबर जा.” ती एका वेटरकडे बोट करत हसून म्हणाली.
तो वेटर अदबीने त्यांना चला म्हणाला. दोघी वेटरच्या मागे चालत होत्या आणि सगळीकडे पाहत होत्या. पूल साईड एरियाच्या थोडं पुढे विस्तीर्ण पसरलेले लॉन होते. तिथे मधोमध कारंजे थुई थुई नाचत होते. बरेच लांब लांब टेबल ठेवलेले होते. तो हॉटेलचा प्रायव्हेट एरिया वाटत होता. तिथे गायक संगीताच्या तालावर गाणं गात होता. उंची कपडे घातलेले लोक निवांत बसून गप्पा मारत ड्रिंक्सचा आस्वाद घेत होते तर कोणी स्नॅक्स खात होते. सगळीकडे नुसता श्रीमंतीचा थाट दिसत होता. दोघी सगळं मंत्रमुग्ध होऊन पाहत होत्या आणि त्यांना वेटर म्हणाला.
वेटर,“ हा तुमचा ठेवलं नंबर सत्तावीस मॅडम! तुम्ही काय घेणार?” त्याने अदबीने विचारलं.
आद्या,“ काही नको.” ती खुर्चीवर बसत म्हणाली आणि वेटर निघून गेला.
गीता,“ आपण तर हे हॉटेल आजपर्यंत बाहेरूनच पाहिलं आहे गं. हा प्रायव्हेट एरिया दिसतोय. कसलं भारी आहे ना हे सगळं.” ती इकडे तिकडे पाहून बोलत होती.
आद्या,“ हो मला तर खूप तहान लागली आहे पण इथलं पाणी तरी आपल्याला परवडणारं आहे की नाही काय माहित? हा रुद्राक्ष कधीच वेळेवर येत नाही कायम लेट येतो. खडूस कुठला.”
गीता,“ खरं आहे आणि तुझ्याबरोबर यायचं म्हणजे आता काही खायला काय प्यायला देखील मिळणार नाही कारण तुमचं तत्त्व टी. टी. एम.एम आणि इथलं काहीच आपल्याला परवडणारं नाही. असो तो रुद्राक्ष आला की त्याचा कोट देऊन टाक त्याची माफी माग आणि चल बाई. असं ही जे काय झालं त्यामुळे तो काय तुला आता काम देणार नाही.”
आद्या,“ हो ते तर आहेच.” दोघी बोलत होत्या तोपर्यंत समोरून रुद्राक्ष आणि त्याच्या पाठोपाठ विरेन त्यांना येताना दिसला.
आज रुद्राक्ष कॅज्युअल कपड्यात होता. ब्लॅक जीन्स आणि त्यावर टाईट व्हाईट टी शर्ट त्यातून त्याची पिळदार शरीरयष्टी उठून दिसत होती, जेल लावून सेट केलेले केस, हातात आज वेगळेच घड्याळ होते मोठ्या डायलचे, पायात शूज तो त्याच्या स्टाईलमध्ये चालत येत होता आणि त्याच्या मागे विरेन होता. त्या दोघी तो जवळ येई पर्यंत त्याला पाहत होत्या. गीताचा तर आ वासला होता. तो जवळ येऊन खुर्चीवर बसला तरी गीता त्याला टक लावून पाहत होती. आद्याने तिला हळूच चिमटा काढला आणि ती भानावर आली.
रुद्राक्ष,“खूप वाट पहावी लागली का तुम्हाला?” त्याने विचारलं.
आद्या,“ नाही. तुमचा हात कसा आहे? त्या दिवशीसाठी सॉरी! तो सेंटचा वास माझ्या नाकात गेला आणि मला कळलंच नाही की मी कधी तुम्हाला धक्का दिला.” ती खाली मान घालून त्याच्या पट्टी बांधलेल्या हाताकडे पाहत बोलत होती.
विरेन,“ हो ना. तुम्हाला कसं कळणार ना?” तो कुजकटपणे म्हणाला.
रुद्राक्ष,“ वीर विल यु किप क्वायट! माझा हात आता ठीक आहे आणि सॉरी चूक माझी ही होती. मी तुमच्या इतक्या जवळ यायला नव्हतं पाहिजे.”
आद्या,“ हा तुमचा कोट त्या दिवशी कॅफेत राहिला होता. मला माहित आहे की जे काय घडलं त्यानंतर तुम्ही मला काम नाही देणार. पण माझ्यामुळे तुम्हाला लागलं म्हणून एकदा तुम्हाला भेटून तुमची माफी मागायची होती. सॉरी वन्स अगेन.” तिने त्याच्यासमोर टेबलवर त्याचा कोट ठेवला आणि हात जोडून म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाट ही न पाहता गीताचा हात धरून निघाली.
रुद्राक्ष,“ एक्स क्युज मी! तुम्ही माझ्या तर्फे ही सगळं स्वतःच ठरवून टाकलं? कोणाला ही इतकं गृहीत धरणे योग्य नाही मिस आद्या.” तो म्हणाला आणि आद्याचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती थांबली आणि म्हणाली.
आद्या,“म्हणजे?”
रुद्राक्ष,“म्हणजे डिल इस स्टील ऑन फॉर यु मिस आद्या! इफ यु स्टील इंटरेस्टेड.” तो तिच्याकडे पाहत म्हणाला.
आद्या,“ व्हॉट? पण त्या दिवशी जे काही घडले त्यामुळे तुम्ही मला साधं भेटायला ही तयार नव्हता. मला वाटले की तुम्ही आता डिल कॅन्सल केली असेल. पण तुम्ही तर…” ती आश्चर्याने म्हणाली.
रुद्राक्ष,“ हो मी अपसेट होतो खूप कारण जे घडलं ते अनपेक्षित होते. पण नीट विचार केल्यावर मला लक्षात आले की चूक माझी ही होतीच की, कारण मी तुमच्या इतका जवळ आलो. आणि कदाचित तुम्हाला ते सहन झाले नसेल म्हणून तुम्ही तशा वागलात.”
आद्या,“ सॉरी पण तुमचा तो सेंटचा वास मला कशाची तरी आठवण करून गेला आणि मी स्वतःवरच कंट्रोल गमावला. खरं तर मला पैशांची खूप गरज आहे. माझ्या आईची सर्जरी मला या तीन दिवसात करून घ्यावी लागेल आणि तसं नाही झालं तर ती नाही वाचणार.” ती डोळे पुसत म्हणाली.
रुद्राक्ष,“ तुम्ही तयार असाल तर आपण डिल फायनल करू आज.” तो म्हणाला.
आद्या,“ हो मी तयार आहे.”
रुद्राक्ष,“ ओके मी उद्याच काँट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स बनवून घेतो आणि तुमचा बँक अकाउंट नंबर सांगा मी दहा लाख आजच ट्रान्स्फर करतो. पण आपल्याला लग्न मात्र म्हणजे लग्नाचे नाटक मात्र तुमच्या आईच्या सर्जरी आधी सुरू करावे लागेल कारण मला माझ्या घरी तुमच्या आईची इच्छा होती सर्जरी आधी आपले लग्न झालेले पहायचे म्हणून आपण तातडीने लग्न करायचा निर्णय घेतला रादर तो घ्यावा लागला असं सांगावं लागणार आहे.” तो बोलत होता.
आद्या,“ ठीक आहे. तुम्ही पेपर्स तयार करा उद्या आणि आपण परवाच दुपारी लग्न करू. त्यानंतर त्याच दिवशी माझ्या आईची सर्जरी होईल. मी उद्याच सर्जरीच्या सगळ्या फॉर्मेलिटी पूर्ण करते. पैसे नव्हते म्हणून सगळं अडलं होतं” ती म्हणाली.
रुद्राक्ष,“ बरं पण त्या आधी तुम्ही माझ्या फॅमिलीची सगळी माहिती करून घ्या. लक्षात ठेवा आपण गेले एक वर्ष रिलेशनशिपमध्ये आहोत त्यामुळे माझ्या घरच्यांविषयी मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे. गुगलवर माझ्या फॅमिली विषयी तुम्हाला माहिती मिळेल कमीत कमी तोंड ओळख तरी होईल. बाकी मी सांभाळून घेईन आणि हो तुम्ही मला एक वर्षांपूर्वी एका बिझनेस मिटिंगमध्ये भेटला होता. तुमच्या बॉस बरोबर तुम्ही आला होता. तिथेच आपली ओळख झाली. तुम्ही मला आवडला आणि मग मैत्री पुढे प्रेम आणि आता लग्न ही आपली लव्हस्टोरी समजा.दोघांच ही उत्तर एक असायला हवं.” तो सांगत होता.
आद्या,“ थांबा थांबा इतकं फास्ट सगळं सांगू नका. मी इतकी हुशार नाही लगेच सगळं लक्षात ठेवायला. आधी मला सांगा तुमच्या घरात कोण कोण असते? म्हणजे बाकी माहिती मी गुगलवरून सर्च करेन.”ती म्हणाली आणि रुद्राक्ष हसला. त्याला हसताना पाहून ती पाहतच राहिली.
रुद्राक्ष,“ माझ्या घरी माझी आजी, माझे मॉम -डॅड, काका-काकू आणि त्यांची मुलगी म्हणजे माझी बहिण आणि मी असतो आणि हो हा वीर हा माझा बेस्टफ्रेंड आहे आणि माझ्याबरोबर काम ही करतो आणि माझा बॉडीगार्ड पण आहे. ही इस अल सो माय फॅमिली.” तो म्हणाला आणि आद्याने त्याला पाहून नाटकीपणे स्माईल दिली तसंच विरेनने देखील तिला खोटी खोटी स्माईल दिली.
आद्या,“इतकी मोठी फॅमिली आहे तुमची?” तिने थोडं घाबरून विचारले.
रुद्राक्ष,“ हो जॉईन फॅमिली आहे आमची पण त्यात इतकं घाबरायला काय झालं? आणि तुमच्यात कोण कोण असतं? ते ही मला माहित हवं ना!” तो म्हणाला.
आद्या,“ म्हणजे मी मिडलक्लास आहे तुमच्या घरातील लोक माझ्याशी नीट वागतील ना? नाही म्हणलं तरी खोटी खोटी का असेना मी त्यांची सून होणार, एक वर्ष काढावं लागणार आहे मला तुमच्यात. म्हणून थोडी भीती वाटतेय.” ती घाबरून बोलत होती.
विरेन,“ हिला भीती वाटतेय? उलट त्यांना हिची भीती वाटायला हवी.” तो तोंड वाकडं करून म्हणाला.
आद्या,“ व्हॉट डू यु मीन?” तिने रागाने विचारलं.
रुद्राक्ष,“ वीर प्लिज यार नको ना. आणि तुम्ही घाबरू नका इतकं. माझ्या घरचे लोक चांगले आहेत. सीरिअल्समध्ये गरीब सुनेला त्रास देतात तसे नाहीत हो. आणि माझे आजी- आजोबा मिडलक्लासच होते. आजोबांनी बिझनेस सुरू केला आणि त्यांना यश मिळत गेले पुढे बाबांनी आणि काकांनी तोच बिझनेस वाढवला. तर या सगळ्या गोष्टींचे टेन्शन घेऊ नका तुम्ही.” तो तिला समजावत होता.
आद्या,“ मग ठीक आहे आणि माझ्या घरी मी, माझी आई आणि भाऊ वेदान्त तिघेच आहोत वडील लहानपणीच गेले.”ती म्हणाली.
विरेन,“ कोणाच्या तुमच्या की त्यांच्या?”
आद्या,“ तुमचा हा बॉडीगार्ड एक दिवस मार खाणार माझ्याकडून.” ती चिडून म्हणाली.
विरेन,“ आता काय चुकलं माझं? आता कोणाच्या लहानपणी गेले हे हिने सांगायला नको का?” तो पुन्हा साळसूदपणे म्हणाला.
आद्या,“ आमच्या लहानपणी गेले. झालं का समाधान.” ती चिडून म्हणाली.
रुद्राक्ष,“ वीर किती वेळा सांगायचं तुला? असो तुम्ही काय घेणार. आता डिनरची वेळ झाली तर डिनर करूनच जाऊ.” तो घड्याळ पाहत म्हणाला.
आद्या,“ या हॉटेलमधील डिनर आम्हाला परवडणार नाही. आम्ही निघतो. तुम्ही मला पेपर्स तयार झाले की उद्या फोन करून सांगा कुठं भेटायचं ते.” ती उठत म्हणाली.
रुद्राक्ष,“ बसा हो. मी आजचे बिल तुमच्या एक कोटीमधून वजा करून घेईन आणि लग्न झाल्यावर हे असं चालणार नाही कारण लग्नानंतर तुमची सगळी जबाबदारी माझी होणार ना.” तो म्हणाला.
आद्या,“ काय?”
रुद्राक्ष,“ अहो खोटं खोटं का असे ना तुम्ही बायको होणार माझ्या, एक वर्ष आपल्याला एकत्र काढावं लागणार त्यात रोज मी कुठे तरी फिरायला जात असतो त्यामुळे तुम्हाला ही माझ्याबरोबर यावे लागणार आणि तुम्ही जर हे टी-टी- एम- एम धरून बसलात ना तर तुमचे एक कोटी सहा सात महिन्यातच खर्च होऊन जातील.” तो थोडा हसून पण घमेंडीत बोलत होता.
आद्या,“ खडूस! एक चान्स सोडत नाही. श्रीमंतीचा माज दाखवायचा.”ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली.
रुद्राक्ष,“ काही म्हणालात का?”
आद्या,“ नाही. बरोबर आहे तुमचं. जेवण ऑर्डर करा ना प्लिज आम्हाला उशीर होतोय. हो ना गीता?” ती नाटकीपणे हसत गीताला कोपराने ढोसत म्हणाली कारण गीता रुद्राक्ष आल्यापासून हातावर हनुवटी ठेवून नुसती त्यालाच पाहत बसली होती. आद्याने तिला ढोसले आणि ती भानावर आली.
रुद्राक्ष,“ हो करूयात ना ऑर्डर पण आज तुम्ही आमचे गेस्ट आहात तर चॉईज इस युवर्स.” तो मेन्यू कार्ड तिच्यासमोर सरकवत म्हणाला आणि त्यातल्या पदार्थांच्या किंमती पाहून आद्याचे डोळे विस्फारले तरी तिने त्यातल्या त्यात कमी किंमतीचे पदार्थ ऑर्डर केले.
आता चौघे शांतपणे जेवण करत होते आणि तिथला गायक गाणं म्हणत होता.
अजीब दास्ताँ है ये
कहा शुरू कहा ख़तम
ये मंजिले है कौन सी
ना वो समझ सके ना हम
यह रौशनी के साथ क्यों
धुआं उठा चिराग से
यह रौशनी के साथ क्यों
धुआं उठा चिराग से
यह ख्वाब देखती हु मै
के जग पड़ी हूँ ख़्वाब से
अजीब दास्ताँ है ये
कहा शुरू कहा ख़तम
ये मंजिले है कौन सी
ना वो समझ सके ना हम
खरंच तर होतं ही सुरू होणारी अजीब दास्ता आद्या आणि रुद्राक्षला कुठे घेऊन जाणार होती? हा येणारा काळच ठरवणार होता.
©स्वामिनी चौगुले
