रुद्राक्ष सुन्न होऊन कारमध्ये बसला होता. जणू काही त्याला शॉक लागला होता. आणि विरेन बडबड करत गाडी चालवत होता. पण विरेनचे शब्द रुद्राक्षच्या कानापर्यंत पोहचतच नव्हते. विरेनने गाडी रत्नमाला मेन्शनमध्ये नेऊन थांबवली. रात्रीचे आठ वाजून गेले होते. विरेन रुद्राक्षला म्हणाला.
विरेन,“ उतर रुद्राक्ष घर आलं..“तो उतरला आणि यंत्रवत घरात गेला.
सविता आणि रत्नमालाबाई हॉलमध्ये बसल्या होत्या. त्यांना रुद्राक्षच्या हाताला पट्टी दिसली आणि सविताने काळजीने विचारलं.
सविता,“रुद्र हाताला काय लागलं तुझ्या?”
पण रुद्राक्ष त्याला काहीच ऐकू गेलं नाही असं जिन्याकडे गेला आणि जिना चढू लागला. सविता आणि रत्नमालाबाई त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होत्या. घाईत गाडी बाहेर सोडून येणाऱ्या विरेनने सगळा प्रकार पाहिला होता.
रत्नमालाबाई,“ रुद्रला काय झालं अचानक? काहीच न उत्तर देता असा का निघून गेला? आणि त्याच्या हाताला काय लागलं?” त्यांनी विरेनला विचारलं.
विरेन,“ ते आजच्या डिलच थोडं टेन्शन आलं आहे त्याला; त्यामुळे अपसेट आहे आणि त्याचा हात गाडीत बसताना गाडीच्या दारात अडकला.” त्याने त्याला सुचेल ते उत्तर दिलं.
सविता,“ हा मुलगा पण ना नको त्या गोष्टीचे टेन्शन घेतो. तू जा विरेन त्याच्याकडे. मी डॉक्टरांना बोलावले. हाताला किती जखम आहे काय माहित?” त्या काळजीने बोलत होत्या आणि विरेन मनातून थोडा चरकला.
विरेन,“ डॉक्टर कशाला काकू? अहो इतकं काही लागलं नाही त्याला, मी मलम पट्टी केली आहे. उद्या मी त्याला हॉस्पिटलमध्ये येऊन धनुर्वाताचे इंजेक्शन देऊन आणतो.”
सविता,“ बरं. जा तू आणि आता रुद्रबरोबर जेवण करूनच घरी जा. मी तुमच्या दोघांचं जेवण पाठवून देते वर.” ती म्हणाली आणि
विरेन वर गेला. तो रुद्राक्षच्या रूममध्ये गेला तर रुद्राक्ष मूर्तीसारखा बेडवर बसला होता. त्याच्या डोळ्यातून मात्र अश्रू वाहत होते. ते पाहून विरेनने रूमचे दार लावून घेतले.
विरेन,“ आता काही बोलणार आहेस का? मी तुला म्हणालो होतो नको लागूस त्या मुलीच्या नादाला. ती मुलगी राक्षस झाली आहे. पाहिलेस ना कसं ढकलून दिलं तुला? बरं झालं तुझ्या पाठोपाठ मी तुला माहिती न होऊ देता कॅफेमध्ये आलो म्हणून, तुला वेळीच सावरलं. तू तोल जाऊन खुर्चीला धडकून खाली पडला असतास कुठं डोक्याला वगैरे लागलं असतं तर तुझ्या? तरी हाताला लागलंच बघ. शी इस बिईंग अ माऊस्टर रुद्र!” तो काळजीने बोलत होता.
रुद्राक्ष,“ हु इस मेक हर माउस्टर वीर? मी ..मी एका साध्या भोळ्या मुलीला असं बनवलं. फक्त काही मिनिटांची माझी वासना शमवण्यासाठी. राक्षस ती नाही मी आहे. आज मी तिच्या थोडं जवळ काय गेलो तिच्या डोळ्यात मी चीड, तिरस्कार आणि भीती एकत्रित पाहिली आहे. चूक तिची नाही वीर चूक माझी आहे. मी तिच्या इतकं जवळ जायला नव्हतं पाहिजे. मी आद्यासारख्या सुंदर, सालस आणि प्रामाणिक मुलीला हे काय बनवलं? तिच्या मनात पुरुषांविषयी तिरस्कार आहे. तिला वाटतं की पुरुषांना बाईच शरीर हवं असतं फक्त मग ते कधी जबरदस्ती करून तर कधी प्रेमाचे नाटक करून! तिने ही एका मुलावर प्रेम केलं पण माझ्यामुळे तिच्यापासून तो दुरावला आणि तिचा प्रेमावरचा विश्वासच उडाला. ती पण एक साधीच मुलगी होती ना रे! राजकुमाराच्या स्वप्नात रमणारी आणि तिच्या आयुष्यात माझ्यासारखा राक्षस आला आणि तिचं आयुष्य उध्वस्त झालं.
ती आता साधी मुलगी नाही राहिली. तिचा विश्वास उडाला आहे जगावरून. तिला सतत असुरक्षित वाटतं. खरं तर हे चिडणं, हा तिरस्कार आणि हे असं एग्रेसिव्ह होणं सगळं वरवरचं आहे. स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी. या मुखवट्या मागे एक घाबरलेली मुलगी आहे. जी मला आज तिच्या डोळ्यात दिसली. आणि तिला असं मी बनवलं आहे.” तो बोलत होता पण त्याच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू ओघळत होते.
विरेन,“ रुद्र। स्टॉप टू ब्लेम युअर सेल्फ. ठीक आहे ना तुझ्याकडून झाली चूक. आता मग त्यासाठी तू काय तुझं आयुष्यपणाला लावणार आहेस का? तुझा हा वेडेपणा बास झाला; मी इथून पुढं तुला असं वागू देणार नाही.” तो त्याला समजावत होता.
रुद्राक्ष,“ चूक? माझ्याकडून एक अक्षम्य गुन्हा घडला आहे. आणि त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी. आद्याला पुन्हा माणसात आणण्यासाठी. तिच्या मनात पुन्हा त्याच हळुवार भावना निर्माण करण्यासाठी. तिचा पुन्हा प्रेम आणि पुरुषांवर विश्वास बसण्यासाठी मी कोणती ही किंमत मोजायला तयार आहे.” तो ठामपणे बोलत होता.
विरेन,“ वेड लागलं आहे तुला! तुला विषाची परीक्षा घ्यायची आहे पुन्हा पुन्हा. मूर्ख आहेस तू रुद्र.” तो चिडून म्हणाला.
रुद्राक्ष,“ तसं समज हवं तर. गीताचा फोन येईल तर तिला सांग की मी रागावलो आहे. मला भेटायचं नाही आद्याला. ती किंवा आद्या पुन्हां फोन करेल तर तेच उत्तर दे. दोन दिवस जाऊ दे मग मिटिंग फिक्स कर तिच्याबरोबर या वेळी कॅफेमध्ये नाही तर ब्यु आईज हॉटेलमध्ये! तिच्याबरोबर गीताला घेऊन यायला सांग. म्हणजे ती घाबरणार नाही.” तो हाताची पट्टी बघत म्हणाला.
विरेन,“ म्हणजे तुला माझं ऐकायचंच नाही? ठीक आहे तुला काय करायचं ते कर. आणि मूर्ख माणसा घाबरायला तुला हवं त्या आद्यापासून. सुरवातच जखमेने झाली आहे पुढं जाऊन काय होणार देवच जाणे.” तो चिडून म्हणाला.
रुद्राक्ष,“ हो ना! सुरवात तर जखमेने झाली आहे आमच्या नात्याची पण माझ्या नाही तिच्या. मी तिला जी जखम दिली आहे ना त्या बदल्यात ही जखम तर खूप छोटी आहे.” तो हाताच्या पट्टीकडे पाहत खिन्नपणे म्हणाला.
विरेन मात्र त्याच बोलणं ऐकून चिडून तिथून निघून गेला.
★★★★
आद्या विरेन; रुद्राक्षला घेऊन गेल्यावर पाच मिनिटं तिथं बसली आणि घाबरून तिथून पळत सुटली. तिने रिक्षा केली तिने सरळ गीताचे घर गाठले. गीताची आज डे शिफ्ट होती त्यामुळे ती घरीच होती. आद्या रडतच घाबरून गीताच्या घराची बेल वाजवत होती. गीताने दार उघडलं आणि आद्या तिच्या गळ्यात पडून रडू लागली. ती बरीच घाबरलेली होती. गीताला कळत नव्हतं की तिला काय झालं आहे. तरी गीताने तिला काहीच न विचारता शांत होऊ दिले. थोड्या वेळाने आद्या शांत झाली. गीताने तिला पाणी प्यायला दिलं.आद्याने ते घटाघट पिले.
गीता,“ काय झालं आद्या तू इतकी घाबरलेली का आहेस? तू त्या रुद्राक्ष पोतदारला भेटायला गेली होतीस ना… एक मिनिटं त्या रुद्राक्षने तुझ्याशी काही आगळीक तर केली नाही ना? थांब त्या विरेनला फोन करून जाब विचारते.” ती रागाने मोबाईल घेऊन म्हणाली.
आद्या,“ त्याची काही गरज नाही. आगळीक त्या रुद्राक्षने नाही केली तर मीच त्याच्याबरोबर केली आहे. गीता तो बोलत बोलत अगदी माझ्यासमोर आला आणि त्याचा तो सेंटचा वास माझ्या नाकात गेला. मला त्या रात्रीच सगळं आठवलं आणि मी घाबरले, आणि त्याला रागाने जोरात ढकलून दिलं. बेसावध तो स्वतःला सावरण्यासाठी टेबलचा आधार शोधत होता आणि त्याच्या हातात टेबलवरचा फोक घुसला. तो पडणार तोपर्यंत त्या विरेनने त्याला सावरलं. नाही तर तो खुर्चीसहित खाली पडला असता आणि त्याला खूप लागलं असतं.” ती रडत सांगत होती.
गीता,“ काय? अगं तू हे काय केलंस आद्या? तुला मी म्हणाले होते स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेव. आता तुझ्या हातातुन ही संधी गेली. आता काकूंचे ऑपरेशन कसं होणार. आपल्याकडे वेळ नाही आद्या. तुला कसं कळत नाही? माझी शांत समंजस आद्या इतकी रागीट आणि रानटी कशी झाली? की ती एका निष्पाप माणसाला आज जखमी करून आली आहे.” ती आद्याला जवळ घेऊन तिचे डोळे पुसत बोलत होती.
आद्या,“ मलाच माहीत नाही गीता मी अशी कधी झाले? पण मी अशी झाले ती त्या नराधमामुळे. तो राक्षस एक रात्र काही तासांसाठी माझ्या आयुष्यात आला आणि माझं सगळं आयुष्य उध्वस्त करून गेला. आईच्या ऑपरेशनचे काय करायचं ते मी पाहीन. पण त्या आधी मला रुद्राक्षची माफी मागायची आहे. तो मला आता समोर ही नाही उभं करणार मला माहित आहे. पण मला त्याची माफी मागायची आहे. माझ्यामुळे त्याच्या हाताला लागलं. त्याचा हा कोट ही परत करायचा आहे मला. विरेनला फोन करून दोन मिनिटांसाठी का होईना माझी भेट घालून दे ना रुद्राक्षशी.” ती रडत अपराधीपणे बोलत होती.
गीता,“ बरं आपण पाहू काय करायचं ते. तू जा फ्रेश हो आणि जेवण कर आज इथेच झोप आदू. मी हॉस्पिटलमध्ये फोन करून काकूंवर लक्ष ठेवायला सांगते माझ्या कलीगला. तू जा. काय अवतार करून घेतला आहेस गं.” ती मायेने तिच्या विस्कटलेल्या केसांत हात पुरवून बोलत होती.
आद्याने तिला मिठी मारली आणि ती फ्रेश व्हायला निघून गेली. पण तो सेंटचा वास ज्यामुळे ती अग्रेसिव्ह झाली होती. तो तिच्या डोक्यात पक्का बसला होता. ती फ्रेश होऊन आली.
गीता,“ चल जेवण कर आणि झोप हा अदू.” ती जेवायला ताट वाढूत बोलत होती.
आद्या,“ गीता तो सेंटचा वास… या कोटमधून ही तसाच वास येतोय अगदी मंद सुगंध. तो मला त्या रात्रीची आठवण करून देतो. म्हणून मी इतकी अग्रेसिव्ह झाले. तोच सेंट रुद्राक्ष ही वापरतो. किती विचित्र योगायोग आहे ना.” ती म्हणाली.
गीता,“ अगं अदू एक सारख्या वासाचे सेंट खूप लोक वापरत असतात. त्यात काय नवल. तू जास्त विचार करू नकोस. जेव आणि निवांत झोप. मी पाहते पुढं काय करायचं ते.”
आद्या,“ थँक्स. तू नसती तर मी काय केलं असतं गीतू?”
गीता,“ चल आली मोठी थँक्स म्हणणारी. मैत्रिणी असतातच कशाला? अशा वेळी साथ नाही दिली तर मैत्रीला काय अर्थ आहे मॅडम? तू आणि काकूंनी ही मला खूप मदत केली आहे. आज मी जी काही आहे ती तुमच्या दोघींमुळेच ना.जेव आता.” ती म्हणाली.
जे काही घडले होते ते रुद्राक्ष आणि आद्या दोघांसाठी ही अनपेक्षित होते. रुद्राक्ष स्वतःच्याच पश्चात्तापाच्या अग्नीत जळत होता कारण त्याच्यामुळे एका मुलीचे भावविश्व उध्वस्त झालं आणि त्याच्यातून तिच्या स्वभावात कमालीचा आक्रमकपणा आला. ती एक प्रकारे मानसिक रुग्ण झाली. तर आद्याला अपराधी वाटत होते की तिच्यामुळे आज रुद्राक्षला लागलं. पण काही केल्या तो सेंटचा वास मात्र तिच्या डोक्यातून जात नव्हता.
रुद्राक्षच्या सेंटच्या वासामुळे ती त्याला ओळखू शकेल का? आणि आता रुद्राक्षचे पुढचे पाऊल काय असेल?
©स्वामिनी चौगुले
