रुद्राक्षने दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन लोनची प्रोसिजर पूर्ण केली आणि त्याने विरेनला पाठवून आद्या काम करत असलेल्या कंपनीच्या मालकाबरोबर बोलून डिल फायनल करायला सांगितली. आठ दिवसात तो त्याच्या अटींवर कंपनी खरेदी करणार होता. त्यासाठी पेपर्स ही त्याने त्याच्या वकिलाला बनवायला सांगितले होते. पण खरी कसोटी तर आद्याच्या नावावर कंपनी खरेदी करायची असल्याने तिच्या सह्या घ्याव्या लागणार होत्या त्या सह्या कशा घ्यायच्या ही होती. तो याच विचारात मग्न होता. विरेन नॉक करून त्याच्या केबिनमध्ये आला तरी रिद्राक्षचे लक्ष त्याच्याकडे नव्हते. विरेनने त्याला हात लावला आणि तो दचकला.
विरेन,“ कसला इतका विचार करत आहेस रुद्र? सगळं तर तुझ्या मनसारखं घडत आहे ना?”
रुद्राक्ष,“ हो सगळं माझ्या मनासारखं घडत तर आहे पण वीर आद्याच्या सह्या कशा घ्यायच्या कंपनीच्या खरेदी पत्रावर? ती डोळे झाकून तर सही करणार नाही आणि तिला कळलं की तिच्या नावावर मी कंपनी खरेदी करतोय तर ती कशी रियाक्ट होईल हे आपण सांगू शकत नाही.” तो विचार करत बोलत होता.
विरेन,“ इतकंच ना? मैं हूं ना!” तो स्टाईलमध्ये उभा राहत म्हणाला.
रुद्राक्ष,“ पण तू आद्या नाहीस ना! येडछाप कुठला!” तो तोंड वाकडं करत म्हणाला.
विरेन,“ तुला किंमत नाही रे मित्राची असो तू कसले तरी थातुरमातुर पेपर्स आद्याची सही घेण्यासाठी बनवून घे आणि खरेदीचे पेपर्स ही बाकी सगळं मी पाहून घेईन.” तो पुन्हा फुशारकी मारत म्हणाला.
रुद्राक्ष,“ तू काय करणार आहेस? ते आधी सांग मला. तू काही तरी उलट सुलट करशील आणि निस्तरावे मला लागेल.”
.विरेन,“ तुला माझ्यावर काडी मात्र विश्वास नाही ना? राहू दे मग तुला काय हवं ते कर.” तो तोंड फुगवून निघाला आणि रुद्राक्षने त्याला थांबवलं.
रुद्राक्ष,“ किती तो निरागसपणाचा आव! थांब आणि सांग आता जास्त फुटेज नको खाऊ आणि मला तुझ्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे वीर. हे तुला ही माहीत आहे.” तो म्हणाला आणि विरेन परत जाऊन त्याच्यासमोर खुर्चीवर बसला.
विरेन,“ तू कसले तरी पेपर्स बनवून घे. तुला काय डोमलं सुचनार आहे म्हणा मीच बनवतो पेपर्स त्यात तुझ्या प्रॉपर्टीवर तिचा काही हक्क नाही पुढे जाऊन हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई होईल असं काही तरी लिहलेले असेल खोटे पेपर्स पण अर्धवट पानांचे असतील सहीची जागा मी बरोबर कापतो आणि त्याच्या पानाखाली खरेदी पत्रक बेमालूमपणे लपवून सह्या घ्यायच्या. ते शूर्पणखेला काही डोंबल कळणार नाही.” तो स्वतः च्याच युक्तीवर खुश होऊन स्वतःची पाठ थोपटत होता.
रुद्राक्ष,“ इतका खुश होऊ नकोस. तिच्या लक्षात येणार नाही का पेपर्स कट केलेले. तिला इतकं अंडररेस्टींमेट करू नकोस तू.” तो गंभीरपणे म्हणाला.
विरेन,“ अरे तिला आपण काँट्रॅक्ट मॅरेजचे फेक पेपर्स तयार केलेलं कळलं नाही आणि हे कसं कळेल? आणि नेमकं पेपर्स तिच्या हातात तेंव्हा द्यायचे जेंव्हा ती घाईत असेल. ती घाईत सह्या करून रिकामी होईल.”
रुद्राक्ष,“ बरं पण बी केअर फुल ती महामाया कसली आहे माहीत आहे ना तुला? मला तर तिची भीतीच वाटते बाबा.” तो तोंड वाकडं करून बोलत होता.
विरेन,“ ते मी नाही तू राहायचं पेपर्सवर सह्या घेताना. आणि जगातला प्रत्येक नवरा बायकोला घाबरतो त्यात काही विशेष नाही. हा आता तुझी बायको शूर्पणखा आहे त्यामुळे तुला जास्त भीती वाटणे साहजिक आहे. मी पेपर्स बनवून घेतो आणि तो त्या फायनान्स कंपनीचा मालक तुला कधी भेटायचं विचारत होता. ते तुझं स्केड्युल पाहून मी सांगतो तीन दिवसात सगळं काम आटोपून टाकू. मी पेपर्स तयार करतो. ती घाईत केंव्हा असेल तेंव्हा सह्या घे तिच्या.” तो म्हणाला.
रुद्राक्ष,“ बरं चालेल.” तो म्हणाला आणि विरेन निघून गेला.
दोन दिवसात रुद्राक्षने सगळी बोलणी करून घेतली आणि कंपनी जुन्याच मालकाने म्हणजे रमेश देशमुखला चालवायची पण ती पगारावर असं ही काँट्रॅक्ट तयार केलं. तसेच कंपनी त्याने रुद्राक्षला विकली आहे हे देखील मार्केटमध्ये कळायला नको असं बजावलं. कंपनीचा मालक खुश झाला एक तर त्याला वीस करोडचा फायदा झाला होता. त्यातून आहे त्याच पोस्टवर त्याला सहा आकडी पगार मिळणार होता आणि तो इतक्या पैशात दुसरा बिझनेस ही सुरू करू शकत होता. त्याने रुद्राक्षच्या सगळ्या अटी मान्य केला. खरेदी पेपर्स तयार झाले आणि त्यावर आद्याचे नाव वाचून त्याला धक्काच बसला.
रमेश,“मिस आद्या जाधव? ती अकाऊंटंट? ती तुमची कोण आहे?” त्याने विचारलं
रुद्राक्ष,“ हो. ती माझी बायको आहे आणि ती इथं काम करतेय म्हणून मी ही कंपनी वीस करोड जास्त देऊन खरेदी करत आहे. पण ही कंपनी तिच्या नावावर आहे किंवा ती या कंपनीची मालकीण आहे हे तिला कळायला नको. काय आहे माझी बायको खूप स्वाभिमानी आहे तिला आवडणार नाही हे. पण आम्ही पोतदार आहोत तिला असं दुसऱ्याच्या कंपनीत काम कसं करू देणार ना? मी तिला योग्य वेळ आल्यावर सांगेन सगळं. पण तोपर्यंत तिचं डिपार्टमेंट हेड म्हणून प्रमोशन करून टाका.” तो बोलत होता.
रमेश,“ तरीच तुमच्या सारख्या कंस्ट्रक्शन बिझनेस असणाऱ्यांना माझ्या फाईनान्स कंपनीत काय इंटरेस्ट असेल? तर हे सगळं असं आहे? ठीक आहे मिस्टर पोटसदार तुम्ही म्हणाल तसं.” तो हसून म्हणाला.
सगळ्या फॉर्मेलिटी पूर्ण झाल्या पण मेन आणि सगळ्यात अवघड काम अजून बाकी होतं ते म्हणजे आद्याच्या सह्या खरेदी पत्रावर घ्यायच्या. त्याशिवाय खरेदीचे रजिस्ट्रेशन करता येणार नव्हतं. दोघे ही ऑफिसमध्ये आले आणि विरेनने रुद्राक्षच्या हातात पेपर्सची फाईल दिले. रुद्राक्ष पेपर्स पाहत होता.वर असलेले एक पान आणि त्याच्या मागे नकळतपणे दुसरे पण होते आणि वरचे पण सही करण्याच्या ठिकाणी बेमालूमपणे कट करून खालच्या पानांचा भाग तिथे जोडण्यात आला होता. खूप निरीक्षण केल्यावर ही गोष्ट लक्षात येत होती अन्यथा काहीच कळत नव्हतं.
रुद्राक्ष,“ वीर अरे दोन्ही पानं चिटकवलीस की काय? तसं असेल तर सह्या घेऊन काय उपयोग?( तो पानं चाचपत म्हणाला आणि थोड्या प्रयत्नाने दोन्ही पाने वेगळी झाली. तसं विरेनच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य आले.) हुंम गुड!” तो उसणे अवसान आणत म्हणाला आणि दोघे ही हसायला लागले.
विरेन,“ हो पण हा झोल त्या शूर्पणखेच्या लक्षात येऊ शकतो. तिचे डोळे म्हणजे स्कॅनर आहेत तर जरा जपून. ती घाईत असतानाच तिची सही घे बाबा. नाही तर ती काय करेल आपण काही सांगू शकत नाही.” तो म्हणाला.
रुद्राक्ष,“ तिचं नाव आद्या आहे आणि मी पाहतो काय करायचं ते.” तो म्हणाला.
तो रात्री जाताना फाईल घरी घेऊन गेला. आद्या नुकतीच ऑफिसमधून आली होती. ती फ्रेश होऊन आली आणि रुद्राक्षला म्हणाली.
आद्या,“ तुम्ही फ्रेश व्हा तोपर्यंत मी कॉफी आणते तुमच्यासाठी आणि हो उद्या मी आईकडे जाऊन मग ऑफिसला जाणार आहे. उद्या रेग्युलर चेकअप आहे तिचं तर लवकरच निघेन.” ती म्हणाली आणि रुद्राक्ष विचारात हरवला. तो काहीच उत्तर देत नाही पाहून तिचं म्हणाली
आद्या,“ ऐकलत का रुद्र? मी काय म्हणतेय ते? लक्ष कुठं आहे तुमचं?” ती त्याला हलवत म्हणाली आणि तो भानावर आला.
रुद्राक्ष,“ अ sss हं ठीक आहे.” तो भानावर येत म्हणाला.
“ येडच हाय.”ती तोंडात पुटपुटत निघून गेली.
‛ उद्याच चांगला चान्स आहे रुद्र! उद्या सकाळी ही घाईत असणार तेंव्हा सह्या घ्याव्यात हिच्या’ तो विचार करत होता.
★★★★
दुसऱ्या दिवशी रुद्राक्ष रूममध्येच घुटमळत होता. तो आज वर जिममध्ये व्यायाम करायला ही गेला नव्हता. आद्या मात्र तिच्या कामात मग्न होती.
‛आज घरी जाऊन आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं त्यानंतर तिला वेदबरोबर घरी पाठवायचं आहे. हॉस्पिटलमध्ये जाताना ही टॅक्सी करावी आणि पाठवून देताना ही वेदकडे पैसे देऊन टॅक्सी करून द्यावी. आईला दगदग व्हायला नको. तिच्या मदतनीस बाईला ही सांगून ठेवले आहे सकाळी लवकर ये आणि वाटलं तर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुझ्या घरी जाऊन ये.’
ती या सगळ्या विचारात स्वतःच आवरत होती. तोपर्यंत ब्रेकफास्टसाठी नोकर बोलावून गेला आणि तिचे लक्ष रुद्राक्षकडे गेले. तो ही त्याच्याच विचारात दंग होता. तिने त्याला हाक मारली पण त्याचे लक्ष नव्हते.ती त्याच्याजवळ गेली. आणि त्याच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवत म्हणाली.
आद्या,“ ओ खोया खोया चांद! कालपासून चंद्रावरच मुक्काम आहे का तुमचा? आजूबाजूला काय सुरू आहे हे पण कळत नाही.”
रुद्राक्ष,“ तुझं तुझं काम कर ना. तुला काय करायच्या गं नसत्या चौकशा?” तो चिडल्याचा आव आणत म्हणाला.
आद्या,“ मला काही करायचं नाही पण तुम्हाला नाश्ता करायचा असेल ना? तर चला नाही तर बसा इथंच.” ती तोऱ्यात म्हणाली आणि निघून गेली.
रुद्राक्ष,“ रुद्र पाहिलास ना तोरा! जर आज पकडला गेलास तर मेलास तू. चला नाश्ता करू मग ही निघायच्या घाईत असेल तेंव्हा आपलं काम करून घेऊ.”
तिच्या पाठोपाठ तोही नाश्ता करायला गेला. सगळ्यांशी जुजबी गप्पा झाल्या. आद्या तयारच होती. ती तिची पर्स आणायला रूममध्ये गेली आणि रुद्राक्ष देखील तिच्या पाठोपाठ गेला. ती पर्स घेऊन निघाली आणि रुद्राक्षने तिला आडवलं.
रुद्राक्ष,“ हे पेपर्स माझ्या वकिलांनी तयार करून दिले आहेत. त्यांचे असे मत आहे की यावर तू सह्या कराव्यात म्हणजे पूढे मला कोणतीच अडचण येणार नाही.”
आद्या,“ कसले पेपर्स आहेत ते? आणि ठेवा मी संध्याकाळी वाचते आणि मग सह्या करते. आत्ता मला घाई आहे आईला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे.” ती मनगटी घड्याळ पाहत म्हणाली.
रुद्राक्ष,“ यात असं लिहलं आहे की तुझा माझ्या कोणत्याही प्रॉपर्टी आणि कमाईवर हक्क नाही.” तो म्हणाला.
आद्या,“ पण हे तर काँट्रॅक्ट मॅरेजच्या पेपर्समध्ये ही नमूद होतं ना? मग अजून वेगळं कशासाठी?” तिने विचारलं.
रुद्राक्ष,“ वकिलांचं असं मत आहे की ते किती जरी झालं तरी काँट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आहेत. त्यामुळे उद्या तू मला हक्क मागू शकतेस म्हणून हे सेपरेट पेपर्स आहेत. मला आजच हे पेपर्स वकिलांना द्यायचे आहेत पुढच्या प्रोसिजरसाठी त्यामुळे सह्या कर त्यावर वाचून.” तो म्हणाला.
आद्या,“ इतक्या घाईत मी पेपर्स वाचल्याशिवाय सह्या करणार नाही. मी संध्याकाळी आल्यावर करते सह्या पेपर्स ठेवा स्टडी टेबलवर.” ती वैतागून म्हणाली.
रुद्राक्ष,“ इथं पेपर्स ठेवले आणि कोणी रूममध्ये आले त्यांची नजर या पेपर्स वर पडली तर गहजब होईल. नाही मी हे रिस्क नाही घेऊ शकत. आणि काय वाचल्याशिवाय सही करणार नाही लावलं आहेस गं? असा काय खजिना आहे तुझ्या नावावर की मी तुला फसवून तो माझ्या नावावर करून घेईल?” तो मुद्दाम तिला डिवचत म्हणाला. आणि घाव वरमी लागला. आद्याच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं.
आद्या,“ बरोबर आहे घाबरायला तर तुम्हाला हवं मी तुमची फसवणूक करेन म्हणून. तुमच्याकडे करोडोंची प्रॉपर्टी आहे ना! आणा ते पेपर्स मी सह्या करते.”
ती पेपर्स आणि पेन त्याच्या हातातून घेत म्हणाली आणि स्टडी टेबलवर पेपर्स ठेवून पेपर्स न वाचताच भराभर सह्या गेल्या. फाईल रुद्राक्षच्या हातात दिली.रुद्राक्षने सगळीकडे सह्या झाल्या आहेत का ते चेक केलं कारण तो पुन्हा तिला पेपर्स दाखवू शकत नव्हता. तोपर्यंत आद्या थांबली होती.
रुद्राक्ष,“ थँक्स.” तो म्हणाला.
आद्या,“ जाऊ मी आता?” तिने विचारलं.
रुद्राक्ष,“ हो” तो म्हणाला आणि ती निघून गेली.
‛ मला माहित आहे मी तुला आज दुखावलं. तुझ्या डोळ्यात ते दिसत होतं. पण आद्या मला असं वागणं गरजेचं होतं गं! नाही तर मला या खरेदी पत्रावर तुझ्या सह्या घेता आल्या नसत्या आणि तुझे भवितव्य सुरक्षित करता आले नसते. उद्या काय होणार आहे मला माहित नाही पण आज तुझ्या भविष्याचा विचार करून ते सिक्युअर करणे तर माझ्या हातात आहे ना.’ तो मनात विचार करत होता.
रुद्राक्षचा विचार बरोबर होता पण ज्या माणसाने तिचे आयुष्य बरबाद केले. सत्य कळाल्यावर त्या माणसाकडून ती काही घेईल का? हा मात्र प्रश्नच होता!
©स्वामिनी चौगुले
