आद्या,“ माझी रजा संपत आली आहे. आधीच दोन महिने होत आले मी रजा काढून. तर मी जॉब कंन्टीन्यू करू का?” तिने संकोचत विचारलं.
तिने विचारलं आणि रुद्राक्षच्या ही डोक्यात विचारांचे काहूर माजले.
‛ आपण तर हा विचारच केला नव्हता. डॅड आणि आजी आद्याला आपल्याच कंपनीत काम कर म्हणाले तर? तिला जॉब सोड म्हणाले तर? पुढे जाऊन विपरीत काही घडले तर आद्याच्या भवितव्याचे काय होणार? मी आद्याचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठीच ती काम करत असलेली कंपनी तिच्या नावावर खरेदी करण्याचा विचार करतोय पण तिने जॉबच सोडला तर काय होणार? आणि आद्या जॉब सोडेल असं वाटत नाही कारण अजून वेदान्त शिकतोय. तिच्या घरची जबाबदारी तिच्यावर आहे आणि ती घरच्या कंपनीत काम ही करणार नाही. एक तर खूप फटकळ आणि तिखट आहे ही, आता घरात संघर्ष सुरू व्हायला नको. मी माझ्याच गिल्टशी रोज झगडतोय ते कमी आहे का? म्हणून आणखीन एक झगडा? मलाच मध्यस्थी करून डॅडला समजवावे लागेल.’
तो काही तरी बोलणार तोपर्यंत विनितच बोलू लागला.
विनीत,“ व्हाय नॉट बेटा! या घराबाहेर तुझं असं अस्तित्व आणि जग आहे. तर ते तू टिकवायला आणि वाढवायला हवंस. आपल्यात सावी सोशल वर्क करते. तर केतकीचा स्वतःचा इंटिरिअरचा बिझनेस आहे. आई आधी बाबांना बिझनेसमध्ये मदत करत होती. तिने आता रिटायरमेंट घेतले आहे आणि आपली शरू आर्किटेक्चर करते. दोन वर्षात ती आपला बिझनेस जॉईन करेल. तू रिसेप्शन झाल्यावर ऑफिसला जाऊ शकतेस.” ते सहज बोलत होते.आणि रुद्राक्षने सुटकेचा निःश्वास सोडला.
आद्या,“ थँक्स डॅड!” ती म्हणाली. तिला वाटलं होतं की तिला हे लोक म्हणतील काय गरज एका छोट्या कंपनीत काम करायची त्यापेक्षा घरात बस पण विनीतचे विचार ऐकून ती पुन्हा एकदा प्रभावित झाली होती.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रिसेप्शन होते. एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आले होते. दुपारीच घरातील सगळ्या स्त्रियांना तयार करायला ब्युटीशीयनची फौजच मेंन्शनमध्ये दाखल झाली होती. आद्यासाठी हे सगळं नवीन होतं. तिच्यासाठी आधीच सविताने एक वनपिस सिलेक्ट करून ठेवला होता राणी कलरचा. तो सविताने तिला घालायला लावला. त्यावर फ्रेंच रोल आणि साजेसा मेकअप, गळ्यात छोटे मंगळसूत्र आणि नाजूक डायमंड नेकलेस,कानातले, एका हातात तसेच नाजूक ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात नाजूक घड्याळ. आद्याला स्वतःलाच ती आरशात पाहून ओळखू येत नव्हती. रिसेप्शनची वेळ झाल्याने पुरुष मंडळी गेस्टच्या स्वागतासाठी तयार होऊन आधीच हॉटेलवर गेली होती. मागून या सगळ्या स्त्रिया गेल्या. जशी आद्या सविताबरोबर गाडीतून बाहेर पडली तसे कॅमेराच्या फ्लॅशने तिचे डोळे दिपले. ती गडबडून गेली. सविताने तिचा हात धरून चालत होती आणि बॉडी गार्ड वाट करून देत होते. आणि या चौघी हॉटेलच्या लॉन मध्ये पोहोचल्या. जिथे पार्टीची व्यवस्था केली होती. रुद्राक्ष, विनीत आणि शरद गेस्टशी गप्पा मारण्यात आणि त्यांचा पाहुणचार करण्यात मग्न होते. ड्रिंक्स आणि स्टार्टर घेऊन वेटर्स फिरत होते. सगळे उंची कपड्यातील हायफाय लोकं आजूबाजूला फिरत होते आणि गायक-गायिका वाद्याच्या तालावर गाणे गात होते. हे सगळे वातावरण आद्यासाठी नवीन होते. त्यामुळे ती नर्व्हस दिसत होती. सविताच्या ते लक्षात आले होते. तिने आद्याला रुद्राक्ष जवळ नेले आणि त्याच्या कानात काही तरी सांगितले. ‛तो मी पाहतो.’ इतकच म्हणाला आणि सविता निघून गेली. आद्याची नजर मात्र रुद्राक्ष वर स्थिरावली. तिच्या कपड्याला मॅचिंग असा त्याचा सूट होता. तो नेहमीपेक्षा आज जरा जास्तच हँडसम दिसत होता. त्याच्या केशरी डोळ्यात तो हसताना एक वेगळीच चमक दिसत होती. ती त्याला इतकी मंत्रमुग्ध होऊन पाहत होती की आजूबाजूला काय सुरू आहे हे देखील तिला कळत नव्हते. शेवटी गीताने तिला हलवले आणि तिची तंद्री भंगली.
आद्या,“ तू?…. कधी आलीस? आणि आई, वेदू कुठे आहेत?”
गीता,“जेंव्हा तू त्या चंद्राला भान हरपून पाहत होतीस. म्हणा खूपच चिकना दिसतोय तो आज.” ती मिश्किलपणे म्हणाली. तोपर्यंत त्यांच्यापासून जरा दूर उभा असलेला रुद्राक्ष त्यांच्याजवळ आला.
रुद्राक्ष,“ हाय गीता! आणि आई, वेदू कुठे आहेत?”
गीता,“ ते काय तुमच्या आजीशी बोलत आहेत.”
रुद्राक्ष,“ मी आलोच. तू येणार का त्यांना भेटायला आद्या?” त्याने विचारलं.
आद्या,“ अ…नको मी परत भेटते.” ती भानावर येत म्हणाली आणि गीता हसायला लागली. आणि रुद्राक्ष निघून गेली.
गीता,“ अगं गेला तो.” ती पुन्हा हसत म्हणाली.
आद्या,“ गीता आता तू मार खाणार. चल आईला भेटायचं आहे मला.”
गीता,“ आत्ता तर म्हणालीस की नको म्हणून काय आद्या रुद्राक्षच्या चार्मची जादू होतेय की काय तुझ्यावर?” ती तिला चिडवत म्हणाली.
आद्या,“ असं काही नाही. तो इतकाही चार्मिंग नाही. हा आज जरा जास्तच हँडसम दिसतोय गं! आपण नुसतं चंद्राला लांबून पहायचं. बरं मी जाते तू थांब इथंच.” ती तिच्याच विचारत म्हणाली आणि निघाली गीता तिच्या पाठोपाठ गेली.
सगळे गेस्ट आलेले पाहून रत्नमालाबाईंनी रुद्राक्ष आणि आद्याला स्टेजवर बोलावले.
रत्नमालाबाई,“ हाय फ्रेंड्स!तुम्हाला माहित आहे की आपण इथं का जमलो आहोत? मिट माय गोर्जीअस डॉटर इन लॉ आद्या रुद्राक्ष पोतदार!(त्या म्हणाल्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला आणि एक स्पॉट लाईट रुद्राक्षबरोबर उभ्या आद्यावर आली.) तुम्ही आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी इथे आमच्या इंव्हीटेशनला मान देऊन आलात त्याबद्दल थँक्स आणि लेट्स एन्जॉय द पार्टी.” त्या म्हणाल्या आणि तिघे खाली उतरले.
सगळ्यांचे लक्ष मात्र आता रुद्राक्ष आणि आद्यावर खिळले होते. रुद्राक्ष आद्याची सगळ्यांशी ओळख करून देत होता. पार्टी रंगली. आद्या रुद्राक्षला खुणावून सविताकडे जात होती तर सविताला एक बाई बोलतानाचे शब्द तिच्या कानावर पडले.
“ काय गं सविता? रुद्रचे लव मॅरेज दिसतंय तरी ही यु नो! तुझी सून नाही शोभत गं रुद्रला! रुद्र कसा अगदी दुधासारखा पांढरा शुभ्र आणि किती हँडसम आहे. आणि ती मुलगी ब्राऊनिश आहे हा दिसायला आहे सुंदर आणि स्मार्ट पण तरी रुद्रला गोरी मुलगी शोभली असती. जाऊ दे शेवटी ज्याची त्याची पसंती.”
“ अगं नुसता गोरा रंग घेऊन काय करतेस? आद्याला नीट पाहिलं नाहीस वाटतं तू? शी इस सो ब्युटीफुल! आणि खूप गुणी आहे ती.” सविताला खरं तर राग आला होता पण ती तसं न दाखवता नाटकीपणे हसून म्हणाली.
आद्याचा चेहरा मात्र उतरला होता. पार्टी संपली आणि ते घरी आले. पार्टीवरून यायला तसा बराच उशीर झाला होता. आद्या चेंज करून सोफ्यावर आडवी झाली. ती इतकी थकली होती की तिला कधी झोप लागली तिला ही समजले नाही. तिला तहान लागल्याची जाणीव झाली आणि ती उठली. घड्याळात पहाटेचे चार वाजले होते. बेड मोकळाच होता आणि गॅलरीची लाईट सुरू होती. म्हणून ती गॅलरीत केली तर रुद्राक्ष तिथे सिगारेटचे झुरके सोडत होता. ऍश ट्रेमध्ये चार पाच पिलेल्या सिगारेटचे थोटके दिसत होते. ते तो रात्रभर झोपलाच नाही याची ग्वाही देत होते. तिची चाहूल लागताच त्याने घाईने सिगारेट विझवली.
आद्या,“ पहाटेचे चार वाजले आहेत. आणि इथं तुम्ही काय करताय? आणि तुम्ही सिगारेट ओढता? मग ड्रिंक्स ही घेत असाल? मला दारू पिणाऱ्या माणसांची खूप भीती वाटते. तुम्ही जर दारू पिलीत तर घरी येत जाऊ नका. त्या तुमच्या फ्लॅटवर झोपत जा.” ती थोडी चिडून बोलत होती.
रुद्राक्ष,“ ये बाई मी नाही घेत ड्रिंक्स वगैरे आधी घेत होतो पण खूप दिवस झालं सोडून. सिगारेट ही मला टेन्शन आल्यावर पितो मी, एरवी नाही.” तो वैतागून म्हणाला.
आद्या,“ तुम्हाला आणि टेन्शन? काय चेष्टा करता का माझी? तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलात तुम्ही. प्रेमळ कुटुंब आहे. ते इतकं प्रेम करतात तुमच्यावर की त्यांनी तुमच्या प्रेमाखातर माझ्यासारख्या तिऱ्हाईत मुलीला ही स्वीकारले. त्यात देवाने देखणं रूप दिलं. इतका मोठा बिझनेस आहे की रोज ऑफिसमध्ये जाऊन बसलं तरी बास. आमच्यासारखा जगण्याचा झकडा तुमच्या वाट्याला नाही. आज एक बाई म्हणत होती पार्टीत की तुमचा रंग दुधासारखा आहे. खूप हँडसम आहात तुम्ही आणि मी ब्राऊनिष कलरची तुम्हाला शोभत नाही. इतकं सगळं देवाने तुम्हाला दिलं आहे आणि तुम्हाला कसलं आलंय टेन्शन?” ती थोडं उपहासाने हसत म्हणाली.
रुद्राक्ष,“ हो दिलंय ना सगळं मला देवाने पण आपण कोणाला तरी फसवत आहोत ही जाणीव रात्रभर झोपू देत नाही. एखाद्या टोकदार भाल्यासारखी ती सतत मनाला बोचत राहते. आपण कोणाचे तरी गुन्हेगार आहोत ही बोच तुला नाही कळणार. आपण ज्याला फसवत आहोत त्याला उद्या सत्य कळल्यावर काय होईल? हा भेडसावणारा प्रश्न जेंव्हा पडतो तेंव्हा आपल्याला काय वाटतं ते शब्दात नाही सांगता येणार. तुझ्यासारख सगळं खरं बोलण्याची हिम्मत सगळ्याकडे असतेच असं नाही आद्या! आणि राहिला प्रश्न दिसण्याचा तर काही वेळा आपल्याकडून अशी काळी कर्म होतात की आपला गोरा चेहरा सुद्धा आरशात पाहायला भीती वाटते. आणि जे कोणी तुला असं म्हणलं ते मूर्ख आहेत कारण तू खूप सुंदर आहेस. तुझा नितळ शामल रंग तुझ्या व्यक्तिमत्वाला आणखीन खुलवतो आणि तुझं निर्मळ आरशासारखं मन तुझ्या डोळ्यांत दिसतं. जे माझ्याकडे नाही ते तुझ्याकडं आहे.” तो थोडा खिन्नपणे बोलत होता.
आद्या,“ काळजी करू नका तुम्ही घरातल्यांना फसवत आहात हे त्यांना कधीच कळणार नाही. त्यामुळे टेन्शन नका घेऊ. आणि बघा पहाटेचे पाच वाजले झोपा आता.” ती त्याला समजावत म्हणाली.
रुद्राक्ष जे काही बोलत होता त्याचा अर्थ आद्याने तिच्या परीने लावला होता आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता पण रुद्राक्ष त्याला त्याचं सत्य चांगलं माहीत होतं जे त्याला रात्ररात्र झोपू देत नव्हतं. जेंव्हा ते सत्य आद्याला कळेल तेंव्हा आद्या काय करणार हे तर येणारा काळच ठरवणार होता.
©स्वामिनी चौगुले.
