रुद्राक्ष सजवलेली रूम आणि बेड पाहून चक्रावून गेला होता. आता आद्या अजून त्याच्याबद्दल गैरसमज करून घेईल की काय अशी त्याला भीती वाटत होती.
रुद्राक्ष,“ हे सगळं मॉम- डॅड आणि काका-काकूचे काम दिसतेय. पण यात माझा कोणता ही हात नाही मला तर माहीत ही नव्हतं.” तो स्पष्टीकरण देत म्हणाला.
आद्या,“ इतकं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. हे मॉमनेच करून घेतलं आहे. आणि आल्या होत्या मला समजावत होत्या. त्यांच्या दृष्टीने त्यांचा मुलगा हळवा आणि निर्मळ मनाचा आहे. बिचाऱ्या त्यांना काय माहित त्यांचा मुलगा काय चीज आहे ते? किती प्रेम करतात सगळे तुमच्यावर आणि तुम्ही सगळ्यांना फसवत आहात इस्टेटीसाठी.” ती रागाने म्हणाली.
रुद्राक्ष,“ एक्स क्युज मी! तुम्हाला या गोष्टीशी काही देणं-घेणं नाही. मी माझ्या घरच्याबरोबर काय आणि कसा वागतो याच्याशी तुमच्या आणि माझ्यात एक डिल झाली आहे आणि तुम्ही त्याचे पैसे घेतले आहेत माझ्याकडून आणि मी दुपारी साठ लाख जमा केले आहेत तुमच्या अकाउंटवर डिल प्रमाणे तर असल्या गोष्ट मला सुनावायच्या नाहीत. जे काम करण्यासाठी पैसा मिळाला ते काम करायचं.” तो ही रागाने म्हणाला.
आद्या उठली आणि तिने टेबलवर ठेवलेले आज तिला सगळ्यांनी दिलेले दागिने आणि घेतलेल्या भारी साड्या सगळं काढलं आणि रुद्राक्षच्या समोर ठेवलं.
आद्या,“ हो आपल्यात तर व्यवहार झाला आहे. ज्यात भावनांना जागा नाही. असो मी माझं काम व्यवस्थित करेन. आणि हे दागिने आणि या महागड्या साड्या. मला आज भेट म्हणून दिल्या आहेत सगळ्यांनी हे तुमचं तुम्ही ठेवून घ्या.”
रुद्राक्ष,“ तुला भेट मिळालं आहे ना हे सगळं! आम्ही पोतदार आहोत दिलेली भेट माघारी घेत नसतो. तुलाच ठेवून घे हे सगळं एवढ्याने काय होणार आहे आमचं.” तो मुद्दाम बेफिकीरपणे म्हणाला.
आद्या,“ तुमच्यासाठी या वस्तू क्षुल्लक असतील. पण माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलीसाठी खूप महाग आहेत. आणि या भेटी सगळ्यांनी त्यांच्या सुनेला दिल्या आहेत ज्यावर माझा कोणताच अधिकार नाही. यात त्यांच्या भावना आणि आशीर्वाद आहेत त्यामुळे मी हे सगळं नाही घेऊ शकत. जेंव्हा तुम्ही खरंच लग्न करून बायको आणि या घरची सून आणाल तेंव्हा तिला द्या हे सगळं. हे अंगावरचे दागिने ही मी यातच ठेवते. फक्त मंगळसूत्र घालेन मी ते ही लग्नाच्या नाटकासाठी.” असं म्हणून तिने तिच्या अंगावरचे दागिने देखील काढून त्या दागिन्यांत ठेवले.
रुद्राक्ष तिच्याकडे फक्त आश्चर्याने आणि कौतुकाने पाहत होता. तिच्या जागी दुसरी मुलगी असती तर तिने हे दागिने स्वतःजवळ लगेच ठेवून घेतले असते कारण सगळ्या दागिन्यांची कमीत कमी किंमत साठ लाखाच्या वर होती. पण आद्याने तर तिला दिलेल्या महागड्या डिझायनर साड्या देखील परत केल्या होत्या. तिचा प्रामाणिकपणा पाहून रुद्राक्ष इंप्रेस मात्र झाला होता.
रुद्राक्ष,“ ठीक आहे ठेव ते सगळं माझ्या कपाटात पण अधून मधून घालत जा नाही तर घरातल्यांनी विचारल्यावर काय उत्तर देणार आहेस तू?”
आद्या,“ ठीक आहे हे मी कपाटात ठेवून देते आणि मला थोडी जागा द्या कपडे ठेवायला तुमच्या कपाटात. बरं मी आता कुठं झोपू? म्हणजे एकदा जागा ठरवून घेऊ. आधीच सांगून ठेवते की मी तुमच्याबरोबर बेड शेअर करणार नाही.”
रुद्राक्ष,“ उद्या तुला जागा करून देतो कपाटात आणि मला ही तुझ्याबरोबर बेड शेअर करण्यात इंटरेस्ट नाही. मी सोफ्यावर झोपेन तू झोप बेडवर.”
तो म्हणाला आणि बेड वरची एक उशी आणि कपाटातील ब्लॅंकेट घेऊन सोफ्यावर गेला.आद्या ही कपडे बदलून बेडवर झोपून गेली. मध्यरात्री धप्पकन काही तरी पडण्याचा आवाजाने तिला जाग आली तर रुद्राक्ष सोफ्यावरून खाली पडला होता आणि डोकं आणि हात चोळत होता तो खाली बसला होता. आद्या ते पाहून त्याच्यावर चांगलीच चिडली.
आद्या,“ काय हो लहान आहात का झोपेत पडायला?”
रुद्राक्ष,“ मला सवय नाही इतक्या छोट्या जागेत झोपायची.” तो तोंड बारीक करून म्हणाला.
आद्या,“ कशी असेल म्हणा इतक्या मोठ्या किंग साईज बेडवर लोळायची सवय आहे ना. या तुम्ही बेडवरच झोपत जा मी सोफ्यावर झोपते मला सवय आहे झोपायची छोट्या जागेत.”
रुद्राक्ष,“ नको होऊल मला सवय.”तो एका हाताने दुसरा हात दाबत सोफ्यावर उठून बसत म्हणाला.
आद्या,“ एकदा सांगितलेलं कळत नाही का? उद्या असं सोफ्यावरून पडून हात पाय फ्रॅक्चर झाले तर सेवा कोण करणार? खोटी बायको असले तरी खरी सेवा करावी लागेल मला. या राजकुमार झोपा तुमच्या बेडवर किंग सारखं.” ती नाक उडवून म्हणाली आणि रुद्राक्ष गप्प जाऊन बेडवर झोपला आणि ती सोफ्यावर.
दुसऱ्या दिवशी दोघे ब्रेकफास्ट करायला गेले तर सगळे त्यांना चिडवण्याच्या मूडमध्ये होते.
केतकी,“ काय आद्या झोप झाली की नाही रात्री?” त्यांनी हसून विचारलं.
शरद,“ कदाचित झाली नसेल ना रुद्र? तू आज ऑफिसला नाही आला तरी चालेल बरं का?”ते चिडवत म्हणाले.
रुद्राक्ष आणि आद्या फक्त खाली मान घालून ऐकत होते.
रत्नमालाबाई,“ गप्प बसा कशाला चिडता रे दोघांना? बाकी रुद्र पूजा के बाद क्या क्या हुआ?” त्यांनी ही त्याची खेचत हसून विचारलं.
रुद्राक्ष,“ आजी तू पण का आता? मी जातो मला नको नाश्ता.” तो तोंड फुगवून म्हणाला.
सविता,“ रुद्र बस आणि नाश्ता कर. आणि नका चिडवू रे दोघांना!” त्या म्हणाल्या आणि सगळे नाश्ता करायला लागले
तसं विनीतने दोन विमानाची तिकिटे आणि एक ब्रोशर रुद्राक्षच्या समोर ठेवले.
विनीत,“ हे सीमल्याचे हनिमून पॅकेज आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला दोघांना गिफ्ट. आज रात्रीची फ्लाईट आहे रुद्र. खरं तर मला तुम्हा दोघांना स्वीजरलँडलाच पाठवायचं होतं पण आद्याकडे पासपोर्ट आहे की नाही मला माहित नाही म्हणून सिमला.जा आणि हनिमून एन्जॉय करून या. हेच दिवस असतात एकमेकांबरोबर वेळ घालवण्याचे.” ते म्हणाले आणि आद्याला ठसका लागला. सविताने तिला पाणी दिले.
रुद्राक्ष,“ डॅड अरे आद्याचे मन लागणार आहे का तिच्या आईला अशा अवस्थेत इथं सोडून? तिची आई अजून पूर्ण बरी नाही झाली. इथं असल्यावर ती त्यांना किमान भेटू तरी शकते ना. हनिमून वगैरे काय होत राहील.” तो त्याला समजावत म्हणाला.
सविता,“ खरं आहे रुद्रचं आपण आद्याचा ही विचार करायला हवा ना! विनीत तू कॅन्सल कर तिकीटं.” त्या म्हणाल्या आणि दोघांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आद्या,“ माझी रजा संपत आली आहे. आधीच दोन महिने होत आले मी रजा काढून. तर मी जॉब कंन्टीन्यू करू का?” तिने संकोचत विचारलं.
तिने विचारलं आणि रुद्राक्षच्या ही डोक्यात विचारांचे काहूर माजले.
‛ आपण तर हा विचारच केला नव्हता. डॅड आणि आजी आद्याला आपल्याच कंपनीत काम कर म्हणाले तर? तिला जॉब सोड म्हणाले तर? पुढे जाऊन विपरीत काही घडले तर आद्याच्या भवितव्याचे काय होणार? मी आद्याचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठीच ती काम करत असलेली कंपनी तिच्या नावावर खरेदी करण्याचा विचार करतोय पण तिने जॉबच सोडला तर काय होणार? आणि आद्या जॉब सोडेल असं वाटत नाही कारण अजून वेदान्त शिकतोय. तिच्या घराची जबाबदारी तिच्यावर आहे आणि ती घरच्या कंपनीत काम ही करणार नाही. एक तर खूप फटकळ आणि तिखट आहे ही, आता घरात संघर्ष सुरू व्हायला नको. मी माझ्याच गिल्टशी रोज झगडतोय ते कमी आहे का? म्हणून आणखीन एक झगडा? मलाच मध्यस्थी करून डॅडला समजवावे लागेल.’
विनीत स्वतःची कंपनी असताना आद्याला दुसऱ्याच्या कंपनीत काम करू देईल का? आणि तो नाही म्हणाला तर आद्या गप्प बसेल का? की आता आद्या आणि रुद्राक्षच्या घरचे असा संघर्ष होणार होता का?
©स्वामिनी चौगुले
