Marathi love story अनोखे बंध भाग 18

    




आद्या पुन्हा हॉस्पिटलमध्ये रुद्राक्षबरोबर गेली. तिला आणि रुद्राक्षला पाहून वेदान्तला बरं वाटलं कारण त्याला अशा परिस्थितीत एकटं पडल्यासारखं झालं होतं. त्याने आद्याला पाहिले आणि तिला मिठी मारली.


आद्या,“ काय झालं वेदू आई ठीक आहे ना?”


वेदान्त,“ हो ती बरी आहे. पण दि मला या परिस्थितीत खूप एकटं पडल्यासारखं झालं होतं. बरं झालं तू आलीस.” तो डोळ्यातले पाणी पुसत म्हणाला.


आद्या,“ असं रडायचं नाही बच्चा आणि तू एकटा कुठे आहेस. तुझी दि कायम तुझ्याबरोबर आहे आणि आता आई देखील बरी होईल ना लवकरच.(ती त्याला समजावत होती.) रुद्राक्ष तुम्ही घरी जा आता. खूप थकला असाल ना. जाऊन आराम करा. मी सकाळी फोन करते तुम्हाला.” ती रुद्राक्षकडे पाहत म्हणाली.


रुद्राक्ष,“मी ठीक आहे. उलट तुम्ही दोघे आराम करा. खूप ट्रेसमध्ये गेला आहे आजचा दिवस तुमच्यासाठी.” तो म्हणाला.तो रात्रभर आद्या आणि वेदान्तबरोबर थांबला. 


           पुढचे चार दिवस आद्या रोज रात्रभर तर हॉस्पिटलमध्ये थांबतच होती पण ती सकाळी आवरून पुन्हा हॉस्पिटलमध्ये जात होती. चार दिवसांनी आद्याच्या आईला आय.सी.यु मधून बाहेर काढलं. त्या आता बऱ्या होत्या. त्यांना पूर्ण आराम घ्यायला सांगितलं असलं तरी त्या आता बऱ्याच स्टेबल होत्या. विनीत आणि सविता रुद्राक्षबरोबर आज त्यांना भेटायला आले होते.


आद्या,“ या ना. आई हे मॉम- डॅड यांचे.” तिने ओळख करून दिली. तशी तिची आई संकोचली.


आई,“ तुम्ही मला पाहायला आलात? किती कराल आमच्यासाठी? रुद्राक्षराव  तर असतातच इथे सारखं आणि आद्याची मनःस्थिती ओळखून तुम्ही तुमच्या घरच्या सुनेला सगळे रीतिरिवाज सोडून इथं थांबण्याची परवानगी दिली त्याबद्दल तुमचे आभार कसे मानू कळत नाही.” त्या हात जोडून थांबून थांबून बोलत होत्या.


सविता,“ हात काय जोडताय तुम्ही? अहो आद्या आत्ता चार दिवस झालं आमची सून होऊन. त्याआधी ती तुमची मुलगी आहे. तुम्ही सध्या कसलाच विचार करू नका. फक्त आराम करा.”


विनीत,“ हो आणि डिस्चार्ज मिळाल्यावर ही आद्या महिनाभर तुमच्याबरोबर  राहील. ताई मुलांनी आपल्याला नाही सांगितलं पण आपणच एकमेकांना समजून घ्यायला हवं आता. तुमची मुलगी आमच्या घरची लक्ष्मी आहे आता आणि आमचं कार्ट तुमचा नारायण. आपण एक महिन्यानंतर यांनी लग्न केलं असं समजू” ते हसून म्हणाले आणि आद्या पण हसायला लागली.


रुद्राक्ष,“ डॅड प्लिज नको ना.” तो तोंड बारीक करून म्हणाला.


आई,“ कार्ट काय म्हणता दादा? ते खूप चांगले आहेत.” त्या म्हणाल्या.


रुद्राक्ष,“ बरं तुम्ही आराम करा आता आम्ही येतो.”तो म्हणाला आणि  सगळे बाहेर आले.


सविता,“ताईंची तब्बेत कशी आहे आता?”


आद्या,“ती ठीक आहे आणि रिकव्हरी पण चांगली आहे.आठ दिवसांनी सोडतील तिला घरी.”


विनीत,“ बरं तरी मी इथल्या हार्ट स्पेशालिस्टशी चर्चा करतो. आद्या काही लागलं तर हक्काने सांगायचं. संकोच करायचा नाही.” ते तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाले आणि आद्याचे डोळे भरून आले.


सविता,“ रडायला काय झालं बेटा? या मूर्खाने आधी आम्हाला काही सांगितलं नाही. नाही तर आपण इथल्या बेस्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले असते. आणि तुमचं लग्न धुमधडाक्यात लावलं असतं ना. असो तुझ्यासारखी सुंदर सून दिली याने आम्हाला म्हणून रुद्रला माफ केलं.” त्या तिला समजावत होत्या आणि ती त्यांच्या कुशीत शिरली.


आद्या,“ थँक्स मॉम -डॅड ” ती म्हणाली.


रुद्राक्ष,“ हे बरं आहे मी मूर्ख आणि कार्ट!” तो तोंड फुगवून म्हणाला.


विनीत,“ चला उशीर होतोय आपल्याला. इतका मोठा झालास आता तर बायको करून आलीस स्वतःच्या मनाने. तरी तुझ्यातलं लहान मूल अजून जात नाही ना.” ते हसून म्हणाले.


रुद्राक्ष,“ मी लहानच आहे अजून. तुमच्यासाठी आणि आद्या मी येतो. संध्याकाळी येईनच आणि वेदान्तला आता जा म्हणावं कॉलेजला. या सगळ्यात त्याचं शैक्षणिक नुकसान व्हायला नको.” तो म्हणाला.


आद्या,“ हो मी सांगितलं आहे त्याला.” ती म्हणाली.


   आद्याच्या आईला पंधरा दिवसांनंतर डिस्चार्ज मिळाला आणि आद्या ही त्यांच्याबरोबर तिच्या घरी  एक महिन्यासाठी गेली. रुद्राक्ष रोज त्यांना भेटून जायचा कधी विनीत - सविता तर कधी रत्नमालाबाई  भेटायला यायच्या. वेदान्त त्याच्या अभ्यासाला लागला होता. आद्याच्या आईची सर्जरी होऊन  एक महिना होत आला होता. त्या आता बऱ्याच सावरल्या होत्या. एक दिवस आद्या त्यांना फळं कापून देत होती.


आई,“ आद्या तुला एक महिना होत आला इथं येऊन. नवीन लग्न आहे तुमचं जावई बापू आणि  तुझ्या सासरचे सगळे समजूतदार आहेत. पण ऊस गोड लागला म्हणून मुळासाहित खाऊ नये.रुद्राक्षराव यांच्या बायको म्हणून आणि तुझ्या सासू- सासऱ्यांच्या सून म्हणून तुझ्याकडून अपेक्षा असतीलच ना. आता मी ठीक आहे. उद्यापासून मदतनीस ही येईल. तू तुझ्या घरी जा. नवीन संसार आहे पोरी तुझा. वाटलं तर रोज एक चक्कर मारत जा.” त्या तिला समजावत होत्या.


आद्या,“ ठीक आहे आई मी इथली सगळी व्यवस्था लावून जाते.” ती म्हणाली.


   ती पुन्हा रत्नमाला  मेंन्शनमध्ये राहायला आली. आणि रत्नमालाबाईंनी म्हणजे रुद्राक्षच्या आजींनी डिनरच्या वेळी सगळ्यांना एकत्र बोलावून घेतले.


रत्नमालाबाई,“ मी या आधी काही बोलले नाही कारण ती वेळच तशी नव्हती. पण आता परमेश्वर कृपेने आद्याच्या आई ठीक आहेत. तर आपण आपले नवीन लग्न झालेल्या जोडप्याचे असलेले रीतिरिवाज करायला हरकत नाही. आद्या तू गेस्ट रूममध्ये शिफ्ट हो. खरं तर आधीच मी तुला रुद्रच्या रूममध्ये राहायचं नाही असं सांगणार होते पण ज्या परिस्थितीत तुम्ही दोघांनी लग्न केले ती परिस्थिती पाहता तुला रुद्रच्या आधाराची गरज होती आणि असं ही तू महिनाभर होतीस कुठं इथं? तर जोपर्यंत सत्यनारायण पूजा होत नाही तोपर्यंत तू गेस्टरूममध्ये राहायचं. मी आजच गुरुजींना मुहूर्त काढायला सांगते पूजेचा आणि विनीत- शरद तुम्ही रिसेप्शनची तयारी करा. सगळ्यांना कळायला हवं की माझ्या रुद्रच लग्न झालं आहे ते. निमंत्रण पत्रिका आणि पार्टी वगैरे सगळं साग्रसंगीत झालं पाहिजे. पोतदार स्टाईलने. आणि सावी तू आणि केतकी  तुम्ही दोघी, आपले कापडवाले काय ते फॅशन डिझायनर आणि सोनार यांना बोलावून घ्या घरी. आद्या आणि आपल्या सगळ्यांसाठी खरेदी करायची आहे. तर उद्यापासून लागा तयारीला.” त्या म्हणाल्या आणि सगळ्यांनी माना हलवल्या.


      रुद्राक्षच्या आजीने सांगितल्या प्रमाणे आद्या गेस्ट रूममध्ये शिफ्ट झाली. दोन दिवसांनी सत्यनारायण पूजेचा मुहूर्त निघाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी रिसेप्शन पार्टी ठरली. सविता आणि केतकीने आद्याला कपडे आणि ज्वेलरी पसंत करायला सांगितली पण आद्या संकोचत होती. शेवटी जबरदस्तीने तिला सगळं खरेदी करावं लागलं. हे सगळं करत असताना आणि सून म्हणून त्या घरात वावरत असताना तिच्या मनात आपण या चांगल्या माणसांना फसवत आहोत ही अपराधीपणाची भावना घर करत होती. पण तिला ना कोणाला सांगता येत होतं. ना बोलता येत होतं. 


   पूजेचा दिवस उजाडला. सकाळी दहा वाजता पूजेचा मुहूर्त होता. पहाटेपासूनच सगळ्यांची लगबग सुरू होती. आज गीता, आद्याची आई आणि वेदान्त पूजेसाठी येणार होते. विरेन तर सकाळी लवकरच आला होता. सविताने शर्वरीला सांगून ब्युटीशीयन बोलावून  घेतली होती.  ती आद्याला तयार करत होती. रुद्राक्ष आधीच तयार होऊन पूजेला जाऊन बसला होता. आद्याला शर्वरी घेऊन आली.


    अबोली रंगाच्या भरजरी नव्वारी साडीचा काष्टा, केसांचा खोपा, कानात झुबे,वेल, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, साजेसा केलेला मेकअप,गळ्यात ठुशी, मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, हातात हिरवा चुडा, त्यात सोन्याच्या बांगड्या, तोडे, दंडात बाजूबंद,पायात घुंगरांचे पैंजण, जोडावी, खांद्यावर शेला अशा पारंपारिक वेशात असलेली आद्या रुद्राक्षच्या जवळ येऊन बसली आणि रुद्राक्ष तिला पाहतच राहिला. 

.

शर्वरी,“ भाई तुझीच बायको आहे. आधी पूजा कर मग हवं तर तासभर पाहत बस तिला.” ती चिडवत म्हणाली आणि रुद्राक्षने त्याची नजर वळवली. पूजा साग्रसंगीत पार पडली. गीता आणि वेदान्त, आद्याच्या आईला रत्नमाला मेन्शनमाध्ये घेऊन आले. तिथले वैभव पाहून तिघांचे डोळे दिपले. आद्याला इतकी नटलेली आणि दागिन्याने मढलेल्या पाहून तिच्या आईला भरून आले.


आई,“ आदू नशीब काढलंस पोरी. मी स्वप्नात ही विचार केला नव्हता की माझी लेक इतक्या मोठ्या घरची सून होईल. कोणत्या जन्मीचे पुण्य कामी आले काय माहित.” त्या भारावून बोलत होत्या.


गीता,“ याच जन्मीचे पुण्य कामी आले काकू. माझ्यासारख्या गावाकडून शिक्षणानासाठी आलेल्या बऱ्याच मुलींना तुम्ही घासातला घास काढून दिला. ते पुण्य कामी आले.” ती म्हणाली.


सविता,“ गप्पा  तर होतच राहतील तुम्ही सगळे जेवून घ्या.”त्या म्हणाल्या.


आद्या,“ मॉम मी गीताला आमची रूम दाखवून येऊ का?” तिने विचारलं.


सविता,“ विचारायचं काय त्यात? अगं तुझं घर आहे. तुझी रूम आहे. जा की बिनधास्त घेऊन. पण लवकर या आम्ही जेवायला बसत आहोय.” त्या म्हणाल्या आणि आद्या गीताला घेऊन गेली.


    गीता आद्या आणि रुद्राक्षची बेडरूम पाहत होता.


गीता,“ किती मोठी आणि प्रशस्त आहे गं रूम! याच्या निम्मं आहे आपलं वन आर के. हे घर म्हणजे तर राजमहालच आहे.” ती म्हणाली.


आद्या,“ कोणाचं काय आणि कोणाचं काय? गीता अगं मला गिल्ट यायला लागलं आहे. मी रुद्राक्ष आणि माझ्या दोघांच्याही फॅमिलीला फसवत आहे. आज सगळे किती खुश होते पाहिलेस ना? अगं पण हे सगळं खोटं आहे. मी या चांगल्या माणसांना फसवत आहे. ते ही फक्त आणि फक्त  त्या नीच रुद्राक्षमुळे! तो इतक्या चांगल्या त्याच्या कुटुंबाला फसवूच कसा शकतो? पाहिलेस ना मॉम- डॅड, आजी, काका-काकू, शर्वरी किती प्रेमळ आणि चांगली माणसं आहेत. किती प्रेमाने आणि विश्वासाने त्यांनी मला स्वीकारलं आणि मी काय करतेय त्यांना फसवतेय. रुद्राक्ष एक नंबर स्वार्थी आणि नीच आहे बघ.” ती बडबडत होती.


गीता,“ आद्या रुद्राक्षला शिव्या आणि दोष देण्यासाधी स्वतःकडे बघ जरा. त्याने काही तुझ्यावर जबरदस्ती केली नव्हती. ही डिल तू स्वतः च्या मर्जीने केलीस. कारण तुला गरज होती पैशांची, तुझ्या आईच्या सर्जरीसाठी. तू दहा लाख मागितले तर त्याने पंधरा लाख दिले तुला. आज काकू जिवंत आहेत तर त्याच्याचमुळे. आद्या कृतघ्न नको होऊस कळलं तुला? आणि हा व्यवहार आहे तर तुला गिल्टी वाटतं त्यात त्याचा दोष नाही. तो एक कोटी देणार आहे तुला या नाटकासाठी. इतकी रक्कम तू आयुष्यात कधीच कमवू शकली नसतीस तर  त्याचा मान ठेव जरा.” ती तिची कानउघाडणी करत होती आणि आद्या खाली मान घालून ऐकत होती.


   बाहेर त्यांना बोलवायला आलेला रुद्राक्षने दोघींचे सगळे बोलणे ऐकलं होतं. तरी त्याने काहीच ऐकले नाही अशा थाटात तो रूममध्ये आला.


रुद्राक्ष,“ आजीने जेवायला बोलावले आहे. आणि तुझी आई त्यांना घरी जायचं आहे. आराम करायचा आहे तर या लवकर.” तो म्हणाला आणि निघून गेला.


      जेवणं झाली. रुद्राक्षच्या आईने आद्याच्या आईचा, वेदान्तचा आणि गीताचा यथोचित मानपान केला. आद्याच्या आईने संकोचतच एक सोनसाखळी आणि सोन्याचे कानातले काढले.


आई,“ खरं तर आमची ऐपतच नाही तुम्हाला काही देण्याची पण तरी ही आद्याच्या लग्नासाठी मी काही दागिने करून ठेवले होते. त्यातले सगळे तर आद्याने माझ्याच आजारपणात विकले त्यातले हे दोन राहिले आहेत. ही चैन रुद्राक्षरावांसाठी आणि हे कानातले आद्यासाठी.” त्या बोलत होत्या.


रत्नमालाबाई,“ ऐपतीच काय घेऊन बसलीस आद्याची आई? अगं तू देशील तो आशीर्वाद आहे पोरांसाठी. आशीर्वाद द्यायला संकोचायच कशाला? हक्काने द्यायचा.” त्या म्हणाल्या आणि त्यांनी रुद्राक्ष आणि आद्याला खुणावले. 


    आद्याची आई, वेदान्त आणि गीता निघून गेले.आद्याला आजींनी हिऱ्याच्या बांगड्या, व

विनीत- सविताने नेकलेस तर केतकी-शरदने हिऱ्यांचा नेकलेस सेट दिला. आद्याला मात्र हे सगळं नकोस झालं होतं. हे सगळं होई पर्यंत संध्याकाळचे सात वाजले होते. आद्या आणि रुद्राक्ष सगळ्यांबरोबर हॉलमध्येच गप्पा मारत बसले होते.सगळ्यांनी नऊ वाजून गेल्यावर रात्रीचे जेवण केले. विनीतने रुद्राक्षला त्याच्या रूममध्ये नेले. आणि सविता आद्याला रुद्राक्षच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. फुलांनी संपूर्ण सजवलेली रूम पाहून आद्या मनातून चरकली.


सविता,“ आजकाल तुम्हा मुलांना काही सांगायची गरज लागत नाही. त्यात तुमच्या दोघांचे लव मॅरेज आहे. त्यामुळे मी काय सांगणार तुला? तरी ही सांगते नवरा बायकोचे नाते सगळ्या नात्यांपेक्षा वेगळं असतं. त्यात खूप पदर असतात आद्या. तू आता माझ्या रुद्रची प्रेमिका नाही तर पत्नी झाली आहेस. पत्नी म्हणजे एका पुरुषाची सखी, सोबती, सल्लागार आणि माता ही असते. एक पुरुष प्रेमाचा भुकेला असतो आद्या त्याला जर प्रेम मिळाले तर तो त्याच्या पत्नीसाठी काहीही करू शकतो. माझा रुद्र थोडा अल्लड आहे. जरा जास्तच लाडात वाढला आहे गं तो पण मनाने निर्मळ आणि हळवा आहे माझा बच्चा! त्याला समजून घे. तो जर चुकला तर त्याला फटकार पण पुन्हा माफ कर. हे क्षण खरं तर प्रत्येक मुलाच्या आईसाठी खूप कठीण असतात पण मुलाच्या सुखासाठी तिला हे करावेच लागते. आज मी माझा रुद्र माझ्या काळजाचा तुकडा तुझ्या स्वाधीन करते. माझ्या मायेच्या सावलीतून त्याला तुझ्या प्रेमाच्या सावलीत देते. सांभाळ त्याला.( त्या डोळ्यातले पाणी पुसत बोलत होत्या आद्याने त्यांच्या हातावर हात ठेवला.) अगं हे आनंदाचे अश्रू आहेत.  आणि हो मला सासू नाही तर तुझी मैत्रीण समज, तू मला काहीही सांगू शकतेस आणि हो रुद्रची तक्रार ही करू शकतेस.  बेटा बरं मी जाते. नवीन आयुष्यासाठी ऑल द बेस्ट.” त्या म्हणाल्या आणि निघून गेल्या. आद्या मनातच विचार करत होती.


‛ देवा हे आयुष्याच्या कोणत्या वळणावर आणून सोडलेस मला? पैशासाठी मी किती लोकांच्या भावनांशी खेळणार आहे अजून. मॉम किती सोप्या शब्दात नवरा-बायकोच्या नात्यातील मर्म सांगून गेल्या. त्यांच्या मुलाला  मी सुखी करावं म्हणून किती अपेक्षेने पाहत होत्या माझ्याकडं! यांना यांचा मुलगा निर्मळ मनाचा आणि  हळवा वाटतो पण तोच मुलगा यांना आणि सगळ्या कुटुंबाला फसवत आहे. यांच्या भावनांशी खेळत आहे आणि मी मी तरी दुसरं काय करतेय यांना फसवत आहे. का तर माझा नाईलाज आहे? पण रुद्राक्ष? तो त्यांना इन्स्टेटीसाठी फसवत आहे पण करोडोच्या इस्टेटीपेक्षा ही अनमोल माणसं त्याच्याकडे आहेत त्याला मात्र त्यांचे मोल नाही. अशी सासू ज्या मुलीला मिळेल ती  सून किती भाग्यवान असेल! माझ्या भाग्यात मात्र हे सुख नाही.’


   ती या सगळ्या विचारात गढली होती आणि रुद्राक्ष रूममध्ये आला. सजवलेली रूम आणि बेड पाहून तो चक्रावून गेला. आद्याला  आधीच रुद्राक्षचा राग आला होता त्याला आता समोर बघून तिचा राग उफाळून येईल का?

©स्वामिनी चौगुले






   











 






 





Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post