रूद्राक्ष नवरदेवाच्या वेशात पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह होते. ते सगळे त्यांच्याकडे पाहत होते आणि शर्वरीने त्याला विचारले.
शर्वरी,“ काय रे भाई कोणत्या फॅन्सीड्रेस कॉम्पिटीशनमध्ये गेला होतास?” तिने हसून विचारले.
सविता,“काय रे हे रुद्र? ही शेरवानी या मुंडावळ्या? लग्न करून आलास की काय तू?”तिने विचारलं.
रुद्राक्ष,“ हो मॉम मी लग्नच करून आलो आहे.” तो शांतपणे म्हणाला.
केतकी,“ प्रॅकं करतोस की काय आमच्याबरोबर रुद्र!”
रुद्राक्ष,“ नाही काकू मी खरंच लग्न करून आलो आहे. आद्या यादव माझी गर्लफ्रेंड ती आणि मी एक वर्ष झालं रिलेशनशिपमध्ये आहोत…” तो पुढे बोलणार तर विनीतने त्याचे बोलणे मध्येच तोडले आणि तो रागाने म्हणाला.
विनीत,“ हो पण घरच्यांना आधी कल्पना देणे, घरच्यांशी भेटवणे, रीतिरिवाज, घरच्यांची संमती काही पद्धत आहे की नाही की डारेक्ट लग्नच करून येणार तू?”
रत्नमालाबाई,“ विनीत त्याच पूर्ण बोलणं ऐकून तरी घे. असं अचानक तू लग्न करून का आलास रुद्र?” त्यांनी विचारलं.
रुद्राक्ष,“तेच तर सांगतोय ना आजी मी! अगं आद्याच्या आईला अचानक हार्ट अटॅक आला. त्यांना बायपास सर्जरी करायला सांगितली होती. पण त्यांची इच्छा होती त्यांच्या मुलीचे म्हणजे आद्याचे लग्न झालेले पहायचं. म्हणून मग त्यांच्या इच्छे खातर मला लग्नाचा डिसीजन घ्यावा लागला घाईत.”
सविता,“ अरे देवा! मग कशा आहेत त्या आता?”
रुद्राक्ष,“ आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांची सर्जरी झाली. त्या आता सेफ आहेत पण आय.सी.यु मध्ये.”
विनीत,“ आणि मग तुझी बायको काय नाव तिचं? ती कुठे आहे आता?” त्यांनी विचारलं.
रुद्राक्ष,“ ती बाहेर पोर्चमध्ये आहे वीरबरोबर.” तो म्हणाला आणि विनीत भडकला.
विनीत,“ काय? तू पोतदारांच्या सुनेला असं घरा बाहेर उभं करून आलास?”
शरद,“ चिडतोस काय रे दादा? त्याची मन:स्थिती तर लक्षात घे.”
रत्नमालाबाई,“ केतकी जा. त्या मालूला गृहप्रवेशाची तयारी करायला लाव आणि घेऊन ये सगळं दारात. तोपर्यंत आम्ही बाहेर आहोत बघू तरी आमच्या रुद्रची पसंती.” त्या म्हणाल्या आणि केतकी हो म्हणून निघून गेली.
बाकी सगळे बाहेर आले. त्यांना पाहून गाडीत बसलेली आद्या बाहेर येऊन उभी राहिली. सगळे तिला नखशिखांत न्याहाळत होते आणि ती संकोचून उभी होती.
शर्वरी,“ ही तर साऊथच्या हिरोईन सारखी सुंदर आहे की भाई! नाव काय रे हिच?” ती उत्साहाने म्हणाली.
शरद,“ हि काय म्हणतेस? तुझी वहिनी आहे ती.”
रुद्राक्ष,“ ही आद्या! ही आजी, हे डॅड, ही मॉम आणि हे काका आणि ही शर्वरी! काकू आत आहे. येतीलच इतक्यात.” तो सगळ्यांची ओळख करून देत होता आणि आद्या आणि तो सगळ्यांना वाकून नमस्कार करत होते.
रत्नमालाबाई,“ अगदी नक्षत्रासारखी आहे हो माझी नात सून. केतकी अगं आलीस का?” त्या मागे वळून म्हणाल्या. तोपर्यंत केतकी मालूला घेऊन औक्षणाचे ताट, धान्याने भरलेले माप घेऊन लगबकीने आली.
केतकी,“ ताई करा स्वागत आपल्या सुनेचे!” ती सविताच्या हातात औक्षणाचे ताट देत म्हणाली आणि उंबरठ्यावर धान्याचे माप ठेवले.
सविताने दोघांना ही ओवाळले आणि माप ओलांडून आद्याला आत घेतले. आद्याला असे स्वागत अनपेक्षित होते. ती कावरीबावरी होऊन सगळीकडे पाहत होती.
रत्नमालाबाई,“ घरच्या लक्ष्मीचे रितीप्रमाणे स्वागत करणे भाग होते. पण रुद्र तिचा चेहरा किती पडला आहे पाहिलेस का? अरे तिची आई आय.सी.यु मध्ये असताना तिचं मन इथं लागेल का? त्यात तिच्यासाठी सगळं नवीन किती कावरीबावरी झाली पोर. आद्या जा फ्रेश हो कपडे बदल आणि दोघे ही जेवण करा. रुद्र तिला तिच्या आई जवळ घेऊन जा.” त्या म्हणाल्या आणि आद्याचे डोळे पाण्याने भरून आले. तिचे हात आपसूकच कृतज्ञपणे जोडले गेले.
सविता,“ अगं हात काय जोडतेस अशी. आमच्या रुद्रची बायको आहेस तू मग तुझ्या मनाचा विचार आम्हालाच करावा लागणार ना. तुझ्या घरी कोण कोण असते? म्हणजे तुझ्या आईची काळजी घ्यायला कोणी आहे का?”
आद्या,“ नाही, मी, आई आणि लहान भाऊ तिघेच आहोत आम्ही. वडील आमच्या लहानपणीच गेले.”
विनीत,“ रुद्र मग आद्याला तिच्या आईजवळच राहू दे. महिनाभर तरी. त्यानंतर मग आपण बाकी रितीरिवाज आणि रीतसर अनौन्समेंट करू लग्नाची. जा आता फ्रेश व्हा आणि जेवण करा आणि निघा हॉस्पिटलमध्ये. आम्ही त्यांना आय.सी.युमधून बाहेर काढल्यावर येऊ पाहायला.” ते म्हणाले.
आणि रुद्राक्ष आद्याल लिफ्टने त्याच्या रुममध्ये घेऊन गेला. आद्या रुद्राक्षच्या कुटूंबाच्या वागणुकीमुळे भारावून गेली होती. तिने कधी विचार ही केला नव्हता की श्रीमंत लोक मनाने ही इतके श्रीमंत असू शकतात. ती रुद्राक्षची बेडरूम न्याहाळत होती.मोठी प्रशस्त अशी मास्टर बेडरूम, भलामोठा किंग साईज बेड ज्यावर चार माणसं आरामात झोपू शकतील. एका बाजूला वॉशरूम तर त्यालाच लागून गॅलरी दिसत होती. त्याच्या विरुद्ध दिशेला ड्रेसिंग टेबल, स्टडी टेबल होता. त्याच्याच समोरच्या भिंतीला दोन मोठे वॉर्डरोब होते. आणि त्याला लागून पुस्तकांचे एक शेल्फ होते. एक सोफा आणि दोन खुर्च्या देखील तिथे होत्या. तिला अजून ही उभीच पाहून रुद्राक्ष म्हणाला.
रुद्राक्ष,“ जा फ्रेश होऊन ये. तोपर्यंत तुझी कपड्यांची बॅग घेऊन येईल नोकर.”
आद्या,“पण मी कुठं कपडे आणले आहेत माझे?” तिने विचारलं
रुद्राक्ष,“ मला माहित होतं असं काही घडू शकत म्हणून मी तुझ्यासाठी कालच कपडे खरेदी केले आहेत. हा आता तुला पसंत पडतील की नाही ते माहीत नाही पण तूर्त चालवून घे.” तो हसून म्हणाला.
आद्या,“ पण तुम्हाला माझी साईज कशी कळली? एक मिनिटं तुम्ही गीताला विचारलं?” तिने विचारलं.
रुद्राक्ष,“ हो. तो बघ आलाच गणू बॅग घेऊन. बघ यातले कोणते घालतेस आणि आवर लवकर मला पण आवरायचं आहे. आणि खूप भूक लागली आहे मला एक तर सकाळपासून काहीच खाल्ले नाही.” तो तोंड बारीक करून म्हणाला. ती बॅग उघडून त्यातले कपडे पाहत होती. काही पंजाबी सूट, काही लेगिंग टॉप तर काही साड्या-ब्लाऊज-परकर असे कपडे त्या बॅगेत होते. सगळे अगदी सोफ्ट कलर आणि मऊ सुताचे पण तितकेच महाग ही.
आद्या,“ तुम्ही किती कपडे खरेदी केलेत माझ्यासाठी! इतक्या कपड्यांची गरज नव्हती. मी माझे कपडे आणले असते.” ती त्यातला एक पंजाबी सूट उचलून म्हणाली.
रुद्राक्ष,“ एक्स क्युज मी! तुझे ते कपडे तिथेच ठेव. तू रुद्राक्षची बायको आहेस तर त्या लेव्हलने राहायचं पुढचं वर्षभर.” तो तोऱ्यात म्हणाला. त्यावर आद्या काहीच बोलली नाही. एक तर तिला ही भूक लागली होती आणि तिच्या आईकडे जाण्याची ओढ देखील. त्यामुळे तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले पण तोंडातल्या तोंडात पुटपुटत निघून गेली.
आद्या, “ माजुरडा आणि खडूस!इतके चांगले लोक आहेत घरातले आणि हा त्यांना फसवतोय.”
ती तयार होऊन आली आणि तिच्या पाठोपाठ रुद्राक्ष! दोघं ही जेवले आणि हॉस्पिटलमध्ये निघून गेले.
आद्याल रुद्राक्षच्या घरच्यांची वाटणारी भीती थोडी कमी झाली होती. उलट ती त्यांच्या वागण्यामुळे भारावून गेली होती. पण ती रुद्राक्ष आणि विरेनशी जशी वागली तशीच रुद्राक्षच्या घरातील लोकांशी वागली तर काय होणार मग?
©स्वामिनी चौगुले
