दोघांनी भटजीच्या सांगण्यावरून मंदिरात जाऊन महादेवाला नमस्कार केला आणि दोघे गुरुजींच्या पाया पडले त्यांनी आशीर्वाद दिला.तोपर्यंत दुपारचे बारा वाजून गेले होते. कोणीच नाश्ता केला नव्हता त्यामुळे आता सगळ्यांनाच चांगलीच भूक लागली होती.
रुद्राक्ष,“वीर काही तरी नाश्ताल्या बघ रस्त्यात. गाडीत आणून दे नाश्ता या दोघींना.”
आद्या,“ नको मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. वेदान्त आहे आई जवळ पण या वेळी मला तिच्याजवळ असलं पाहिजे. तिच्या ऑपरेशनसाठीच्या टेस्ट सुरू झाल्या असतील.” ती आता डोळ्यातले पाणी अडवत बोलत होती.
रुद्राक्ष,“ ठीक आहे.” तो म्हणाला आणि विरेनने गाडी हॉस्पिटलकडे वळवली.
रुद्राक्षला आद्याचे वागणे पाहून आश्चर्य वाटत होते. काही वेळापूर्वी तावातावाने विरेनशी भांडणारी आणि त्याच्या अंगावर जाणारी आद्या हीच आहे का? असा प्रश्न त्याला पडला कारण आता आईच्या आठवणीने आणि तिची सर्जरी होणार आहे या विचाराने हळवी झालेली आद्या तो पाहत होता. थोड्याच वेळात गाडी हॉस्पिटलच्या आवारात होती.
आद्या,“ जसं तुमच्या फॅमिलीसाठी हे लग्न खरं आहे तसंच माझ्या आई आणि भावासाठी देखील हे लग्न खरं आहे. तर पहिले तर मला आरे तुरे करा कारण आपले मी तुमची बायको आहे. आणि दुसरं माझ्या आई आणि भावासमोर कृपा करून माझा नवरा असल्याची ऍक्टिग करा.” ती हात जोडून म्हणाली.
रुद्राक्ष,“ हो मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते.”तो म्हणाला.
दोघे लेडीजच्या जनरल वॉर्डमध्ये गेले. वधू-वराच्या वेशात असलेल्या दोघांना लोक आश्चर्याने पाहत होते. आद्याची आई तिचीच वाट पाहत बसली होती आणि तिचा भाऊ वेदान्त देखील तिथेच होता. आद्याला आणि तिच्या बरोबर एका राजबिंड्या तरुणाला लग्नाच्या कपड्यात येताना पाहून दोघांना ही आश्चर्य वाटत होते. आद्या तिच्या आईच्यासमोर येऊन उभी राहिली.
आद्या,“ तू काल म्हणाली होतीस ना की तुला माझं लग्न करायचं आहे. बघ तुझी इच्छा मी पूर्ण केली. तुझ्या ऑपरेशनच्या आधी मी लग्न करून आले. हे तुझे जावई रुद्राक्ष पोतदार आहेत.” ती म्हणाली.
आई,“ पण असं अचानक कसं आद्या? आणि हे …” त्या आश्चर्याने तिला विचारत होत्या.
आद्या,“ अचानक नाही आई. अगं मी म्हणाले होते ना तुला काही महिन्यांपूर्वी की माझं एका मुलावर प्रेम आहे त्याला तुला भेटायला घेऊन येईन. तेच हे रुद्राक्ष आम्ही एका बिझनेस मिटिंगच्या वेळी भेटलो आणि प्रेमात पडलो. गेलं एक वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. यांना मी तुझी इच्छा बोलून दाखवली आणि हे म्हणाले लग्न आज तर करायचं आहे आणि उद्या तर मग आजच करून तुझ्या आईची इच्छा पूर्ण करू. हवं तर विचार गीताला!” ती सांगत होती.
वेदान्त,“ पण दि हे कोण आहेत? तू आम्हाला काहीच सांगितलं नाहीस!” त्याने विचारले.
रुद्राक्ष,“ मी सांगतो ना मी रुद्राक्ष विनीत पोतदार, पोतदार बिल्डर्सचे मालक विनीत पोतदारचा मुलगा.”
आई,“ काय? इतक्या श्रीमंत घरातले तुम्ही? आद्या अगं काय हे? लग्न करण्याआधी विचारायचं तर ना? आणि आपण गरीब लोकं यांच्या घरातील माणसं तुला स्वीकारतील तरी का?” त्या काळजीने बोलत होत्या. आणि रुद्राक्ष त्यांच्याजवळ गेला. त्यांचा हात हातात घेऊन बोलू लागला.
रुद्राक्ष,“ त्याची काळजी तुम्ही करू नका आई. माझ्या घरचे लोक आद्याला स्वीकारतील. आजपासून आद्या माझी जबाबदारी आहे. तुम्ही काळजी नका करू. फक्त आम्हाला आशीर्वाद द्या आणि निश्चिन्त मनाने सर्जरीला सामोरे जा. आम्ही बाहेर वाट बघतोय तुमची.” तो आपुलकीने त्यांच्याशी बोलत होता. त्याने आद्याला खुणावले आणि त्यांना वाकून नमस्कार केला.
आई,“सुखी राहा. माझी आद्या किती छान दिसत आहे वधूच्या वेशात अगदी लक्ष्मीसारखी आणि जावई तर काय राजकुमारच आहे. अगदी लक्ष्मी- नारायणाचा जोडा. माझीच नजर लागायची कुठं तरी. गीता दोघांची नजर काढ बाई.” त्यांनी डोळेतले पाणी पुसत दोघांच्या आलाबला घेतल्या. वेदान्त तसाच संकोचून उभा होता त्याला काय बोलावे सुचत नव्हते.
रुद्राक्ष,“आईची नजर कधी लागत असते का मुलांना? आणि वेदान्त तू का इतका लांब उभा? तू काय म्हणणार मग मला सालेसब? भाऊजी की जीजू?” त्याने त्याला हसून विचारलं आणि वेदान्त ही थोडा खुलला.
वेदान्त,“ काय म्हणू बरं जीजू म्हणू चालेल ना तुम्हाला?” त्याने विचारलं.
रुद्राक्ष,“ चालेल काय धावेल.” तो म्हणाला.
हे सगळं होई पर्यंत सर्जरीची वेळ जवळ आली होती. आद्याच्या आईला सर्जरीसाठी तयार करण्यासाठी नेले. आईसमोर आद्या रडली नाही पण त्यांना नेले आणि तिचा बांध फुटला. ती गीताला मिठी मारून रडत होती.
गीता,“ सगळं ठीक होईल आद्या. नको काळजी करुस इतकी, काकू सगळ्यातून सुखरूप बाहेर पडतील.”
तीन वाजले आणि सर्जरी सुरू झाली. डॉक्टर सोडी सर्जरी पूर्वीच दोन तास आधीच हजर होते. सर्जरी तीन तास चालली आणि सहा वाजता ओ. टीचा लाल दिवा बंद झाला. डॉक्टर बाहेर आले आणि आद्या ,वेदान्त त्याच्याकडे धावत गेले.
आद्या,“ कैसी है मेरी आई?” तिने थोडं घाबरत विचारलं.
डॉ.सोडी,” शी इस स्टेबल. ओ खतरे से बाहर है. सर्जरी ठीक से हो गई है। बस उन्हे दो दिन आय.सी.यु में अंडर अब्जरर्व्हेशन लखना होगा।” ते म्हणाले आणि निघून गेले.
आद्याच्या मात्र आता जीवात जीव आला. ती तिथेच खुर्चीवर बसली. विरेन सगळ्यांसाठी चहा आणि बिस्कीट घेऊन आला. तो चहा आणि बिस्कीट तिच्यासमोर धरत म्हणाला.
विरेन,“ काय आहे जबरदस्तीने का होईना बहीण बनवून कन्यादान केलं ना तुझं शूर्पणखा मग काळजी तर घ्यावी लागेल ना!” तो तोंड फुगवून म्हणाला आणि आद्या फसकन हसली. आणि तिच्या बरोबर गीता आणि रुद्राक्ष ही.
आद्या,“ हो ना. रावण कुठला!”
इकडे रुद्राक्ष दिवसभर गायब होता. तो ऑफिसमध्ये ही नव्हता. त्यात त्याचा आणि विरेनचा ही फोन लागत नव्हता त्यामुळे घरातले सगळे काळजीत होते. त्याने ऑफ केलेला मोबाईल फोन सुरू केला आणि सविताचा फोन लगेच आला.
सविता,“रुद्र सकाळपासून कुठं आहेस बेटा तू? तुझ्या आणि वीरचा देखील फोन लागत नव्हता. ऑफिसमध्ये ही नव्हतास. काळजी वाटते ना रे आम्हाला.” त्या काळजीने बोलत होत्या.
रुद्राक्ष,“अगं फोन चुकून ऑफ झाला असेल. मी ठीक आहे मम्मा.”
सविता,“ बरं लवकर ये. तुला माहीत आहे ना तुझ्या डॅडला तुला पाहिल्याशिवाय चैन नाही पडणार.”
रुद्राक्ष,“ हो मी येतो.” तो म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. आद्या त्याचं फोनवरच बोलणं ऐकत होती.
गीता,“ आद्या तू आणि वेदान्त काकूंना पाहून या आणि तू जा मिस्टर पोटदारांबरोबर. मी आहे इथं. तू काळजी करू नकोस. तुला यांच्याबरोबर जावेच लागेल ना!” ती तिला समजावत होती.
आद्या,“ पण आईला अशा अवस्थेत सोडून?” ती रडत म्हणाली.
वेदान्त,“ दि डॉक्टर काय म्हणाले आई आता सेफ आहे. तू जा जिज्जूबरोबर मी आहे ना इथं आणि शिवाय गीताताई ही आहेच की. आम्ही तुला आईच्या सगळ्या अपडेट्स फोनवर देऊ. जा तू.”तो म्हणाला .
आद्या,“मी फोन करेनच पण काही लागलं तर लगेच मला फोन करा. वेदू चल आईला पाहून येऊ.” ती म्हणाली. आणि आईला पाहून आली.
आणि जड पावलांनी आद्या निघाली. ती गाडीत जाऊन बसली पण आता रुद्राक्षच्या घरी काय वाढून ठेवले आहे या विचाराने तिची गाळण उडाली. तिला घाबरलेलं पाहून रुद्राक्ष म्हणाला.
रुद्राक्ष,“ इतकं घाबरू नकोस. अगं माझ्या घरचे काय तुला खाणार नाहीत.”
विरेन,“ शूर्पणखेला पण भीती वाटत असते का? अगं ती एकटी फिरत होती ती श्रीलंका ते इंडिया.” तो तिची खेचत म्हणाला.
आद्या,“ तू गप्प ये रावणा. इथं मला भीती वाटतेय. यांच्या घराचे मला हकलवून तर देणार नाहीत ना?” ती घाबरून म्हणाली.
रुद्राक्ष,“ असं काही होणार नाही. बघ आलेच घर.”
आद्या डोळे विस्फारून रत्नमाला मेंन्शन पाहत होती. ती मनातल्या मनात म्हणाली.
‛ हे घर आहे की राजवाडा!’
रुद्राक्षची गाडी पाहून वॉचमनने एक सलाम ठोकून गेट उघडले. विरेनने गाडी सरळ पोर्चमध्ये उभी केली.
रुद्राक्ष,“ वीर तू आद्याला घेऊन इथंच उभा रहा मी आलोच.” असं म्हणून तो आत गेला.
रात्रीचे नऊ वाजले होते त्यामुळे सगळे डिनरला गोळा झाले होते. रुद्राक्ष आत आला आणि त्याला नवरदेवाच्या वेशात पाहून सगळे त्याच्या भोवती गोळा झाले.
रुद्राक्ष आद्याशी घरात कोणाला ही न सांगता लग्न करून आला हे जेंव्हा त्याच्या कुटुंबाला कळेल तेंव्हा ते कसे रियाक्ट होतील? ते आद्याला स्वीकारतील का?
©स्वामिनी चौगुले
