Marathi story अनोखे बंध भाग 10




 गीता तिला हॉस्पिटलच्या बाहेर घेऊन आली आणि दोघी एका बेंचवर बसल्या.


आद्या,“ गीता मला इथं का घेऊन आलीस? तुला कोणी माझी मदत करायला भेटले का… एक मिनिटं काल तुला भेटलेला तो समाजसेवक तो भेटला का तुला?” ती आशेने तिच्याकडं पाहत विचारत होती.


गीता,“ हो. आज पुन्हा तो विरेन मला भेटायला आला होता. आणि आज त्याने तुझ्यासाठी एक ऑफर दिली आहे. आद्या शांतपणे ऐकून घे आणि शांत डोक्याने विचार कर ऑफर खूप मोठी आहे.” ती तिचा हात धरून म्हणाली.


आद्या,“ ऑफर कसली ऑफर?” तिने विचारले.


गीता,“ तो विरेन सांगत होता की त्याचा बॉस पोतदार बिल्डर्सचा मालक रुद्राक्ष पोतदार! त्याची आजी लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागली आहे आणि रुद्राक्ष तिचं ऐकत नाही म्हणल्यावर त्याच्या आजीने विलचं तयार केली की जर त्याने सहा महिन्यात लग्न नाही केलं तर त्याच्या वाटणीची इस्टेट त्यांच्या समाजसेवी ट्रस्टला जाईल. तर हा रुद्राक्ष एक वर्षाचे काँट्रॅक्ट मॅरेज करणार आहे. त्यासाठी गेल्या चार महिन्यापासून तो मुलगी शोधत आहे. त्याला एक वर्ष त्याच्याबरोबर लग्नाचे  नाटक करायला एक मुलगी हवी आहे.” ती आद्याला सांगत होती.


आद्या,“ काय? तू काय मला पिच्चरची स्टोरी सांगत आहेस का? आणि हे असलं नाटक मी करेन असं वाटलंच कसं तुला?” ती रागाने म्हणाली आणि उठून जाऊ लागली.


गीता,“ पिच्चर देखील कुठे तरी सत्य घटनेवर आधारित असतात आद्या! आणि मोठ्या लोकांची मोठी काम आपल्याला काय त्याचं आपल्याला पैसे हवे आहेत. तुला चांगलंच माहीत आहे की कालच काकूचा ईसीजी काढला आहे आठ दिवसात सर्जरी करायची आहे आणि तुला माहीत आहे का? हे नाटक करण्यासाठी ते लोक एक कोटी देत आहेत.” ती पुढे चालत जाणाऱ्या पाठमोऱ्या  आद्याला  थोडी ओरडून बोलत होती आणि एक कोटी ऐकून आद्या थांबली आणि मागे गीता जवळ परत आली.


आद्या,“ काय? एक वर्ष बायकोचे नाटक करायला एक कोटी? डोक्यावर पडला आहे का पोतदार?”ती आश्चर्याने म्हणाली.


गीता,“मोठ्या लोकांची मोठी कामे. तुला बाकी काय करायचं गं! जर तू त्याला त्याच्या कामासाठी पसंत आलीस तर तुझे सगळे प्रॉब्लेम्स सुटतील. काकूंची सर्जरी होईल. तू भाड्याच घर सोडून स्वतःच घर घेऊ शकशील आणि वरून काही लाख तुझ्या आणि काकूंच्या भविष्यासाठी शिल्लक राहतील.”


आद्या,“ठीक आहे खरी बायको नाही होऊ शकत मी कोणाची त्या नराधमामुळे, मग कोणाची  खोटी बायको होऊन इतका पैसा मिळणार असेल आणि मेन म्हणजे माझ्या आईवर योग्य उपचार करता येणार असतील तर मी तयार आहे. पण माझ्या ही काही अटी असतील. फोन कर त्या वीर का कोण त्याला आणि मिटिंग फिक्स कर त्या पोतदार बरोबर.”


गीता,“ हो मी करते पण ऐक त्या पोतदारने म्हणे गेल्या चार महिन्यात खूप मुली रिजेक्ट केल्या आहेत. तुझ्याकडे ही एकच संधी आहे तर जरा सांभाळून. तुझ्या रागावर नियंत्रण ठेव.” ती तिला समजावत म्हणाली आणि विरेनला तिने फोन करून मिटिंग फिक्स करायला सांगितली.  विरेन रुद्राक्षच्या केबिनमध्ये आला.


विरेन,“ गीताचा फोन होता रुद्र! आद्याने मिटिंग फिक्स करायला सांगितली आहे.”


रुद्राक्ष,“ काय? मग लगेच तिला आजच  कॅफे  मिरॅकलमध्ये … आता चार वाजले आहेत सहा वाजता भेटायला सांग. तिला वेळ लागेल ना तिथे यायला.” तो उस्फुर्तपणे म्हणाला.


विरेन,“ रुद्र जरा शांत हो. आणि इतकी घाई करू नकोस तिला संशय येईल. आजच लगेच तू तिला भेटू शकत नाहीस जरा धीर धर. मी परवा भेटायला पाठव म्हणून सांगतो तिला. तू बिझी आहेस कळलं तुला?” 


रुद्राक्ष,“ अरे पण?परवा ती नाही आली तर?”


विरेन,“ तिला गरज आहे रुद्र ती येणार. आणि तू लक्षात ठेव तू अनेक मुली या कामासाठी नाकारल्या आहेत असं मी सांगितलं आहे गीताला तर तुला आद्याची गरज नाही असाच  एँटीट्युड ठेवायचा कळलं तुला? तू तिलाच सिलेक्ट करणार आहेस असे तिला अजिबात जाणवू द्यायचं नाही समजलं?” तो सिरीयसली बोलत होता आणि रुद्राक्ष त्याला म्हणाला.


रुद्राक्ष,“ हो साहेब जशी तुमची आज्ञा!(तो म्हणाला आणि दोघे हसायला लागले.) जोक अपार्ट पण तू बरोबर बोलत आहेस वीर. मी पोतदार आहे तर तसा माज तर दाखवायलाच हवा.”


विरेन,“ हो. पण रुद्र आणखीन एकदा विचार कर.  मला खूप काळजी वाटत आहे तुझी. तू आगीशी खेळायला निघाला आहेस ते ही तूच भडकवलेल्या. असं नको व्हायला की ही आग विजवण्याच्या नादात तुझेच हात भाजायचे.” तो काळजीने बोलत होता.


रुद्राक्ष,“ एकदा उचललेलं पाऊल मला मागे घ्यायचं नाही आता.” तो म्हणाला.


   रुद्राक्ष आद्याला भेटण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता. एकच दिवसमध्ये होता पण तो ही त्याला खूप जड जात होता. शेवटी कसाबसा तो दिवस सरला. विरेनने  भेटण्यासाठी संध्याकाळी पाचची वेळ फिक्स केली होती. आणि गीताला आद्याला  पाठवण्यासाठी लोकेशन ही पाठवून ठेवले होते. तसेच रुद्राक्षला ओळखण्यासाठी  रुद्राक्षचा एक फोटो ही विरेन पाठवला आणि रुद्राक्षल देण्यासाठी आद्याचा फोटो देखील मागवून ठेवला. रुद्राक्ष चार वाजताच ऑफिसमधूनच  निघाला होता.


विरेन,“ रुद्र तिच्याशी बोलताना अगदी प्रोफेशनली बोल. अगदी एँटीट्युडमध्ये तिला कोणत्याही प्रकारे संशय यायला नको. खूप चाणाक्ष दिसते ती. आणि तिला सिलेक्शनचे विचार करून कळतो असं सांग. लगेच काहीच बोलू नकोस. भाव खायचा आहे आपल्याला. हे सगळं तिच्याचसाठी  सुरू असलं तरी तिला कळू द्यायचं नाही आपल्याला. गरज तिला आहे तुला नाही याची पुरेपूर जाणीव करून द्यायची तिला. कळतंय का मी काय बोलतोय?” तो त्याला समजावत म्हणाला.


रुद्राक्ष,“ हो समजतंय मला. निघतो मी” तो निघाला आणि विरेनने त्याचा हात धरला


विरेन,“ रुद्र नको वागूस ना असा! तुला आद्याला मदतच करायची आहे ना मग आपण अशी ही ती करू शकतो. नको उडी घेऊस या आगडोंबात. प्लिज ना. माझं सिक्स सेन्स सांगत आहे की या सगळ्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.” तो डोळ्यात पाणी आणून बोलत होता.


रुद्राक्ष,“ वीर एक मित्र आणि हितचिंतक म्हणून तुला माझी वाटणारी काळजी मला कळतेय पण मी एक अक्षम्य अपराध केला आहे ज्यात एक निष्पाप आयुष्य होरपळून निघत आहे आणि मला माझ्याच मुळे होरपळून निघणाऱ्या त्या आयुष्याला बाहेर काढायचं आहे मग त्यासाठी मला त्या आगीत जळावे लागले तरी चालेल.” तो त्याचे डोळे पुसत त्याला मिठी मारून म्हणाला आणि निघून गेला.



    रुद्राक्षबरोबर पाचला पंधरा मिनिटं कमी असताना कॅफे मीरॅकलच्या समोर पोहोचला होता पण तो मुद्दाम गाडीत बसून होता. आद्या बरोबर पाच वाजता पोहोचली होती पण रुद्राक्ष मुद्दाम पंधरा मिनिटं उशिरा गेला. त्याने  केफेत जाऊन मुद्दाम मोबाईलमध्ये पाहून कोणाला तरी शोधतो आहे असं दाखवलं. आद्याला त्याने कॉर्नरच्या  टेबलवर बसलेलं पाहिलं होतं. आद्याचे लक्ष ही दाराकडे होतं. तिने रुद्राक्षला हात केला. तिने फोटोत रुद्राक्षला पाहिले होते पण ती त्याला दाराकडून येताना प्रत्येक्ष पाहत होती


   रुद्राक्ष म्हणजे हँडसम व्यक्तिमत्त्व! सहा फूट उंची.,गोरा रंग,पिळदार शरीरयष्टी, उभट चेहरा, सरळ नाक,डोळ्यांवर गॉगल होता त्याच्या, अंगावर लाईट ब्यु सूट,पायात बूट आणि हातात रोलेक्स घड्याळ. ती त्याच्याकडे  आ वासून पाहतच होती. आणि तो तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाचवली. गॉगल काढून ठेवत खुर्चीवर बसून तो तिला म्हणाला.


रुद्राक्ष,“  तोंड बंद करा मॅडम ते, नाही तर माशी जायची. त्यात तुमचा काही दोष नाही म्हणा.” तो तिला तिरकस पाहत थोडा मग्रूरीने हसत म्हणाला.


   तरी आद्या त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच होती. गॉगल काढल्यामुळे आणि अगदी समोर बसल्यामुळे तिला त्याच्या डोळ्यांचा केशरी रंग,क्लिन शेव केल्यामुळे तुकतुकीत त्वचा आणि ओठांची थोडी जाड महिरप स्पष्ट दिसत होती. 


आद्या, ‛“यार कसला चिकना आहे हा!” ती तोंडातल्या तोंडात पुटपुटली.


रुद्राक्ष,“ काय म्हणालात?” त्याने विचारले.


आद्या,“ काही नाही. बोला तुम्ही.” ती स्वतःला सावरत म्हणाली.


रुद्राक्ष,“ मिस…काय नाव आहे तुमचं..एनी व्हे! जे असेल ते…” तो एटीट्यूडमध्ये म्हणाला.


आद्या,“ एक्स क्यूस मी माझं नाव आद्या दिनेश यादव आहे. तुम्हाला ओळख करून घेण्याचे आणि देण्याचे मॅनर्स दिसत नाहीत मिस्टर व्हॉट इस युवर गुड नेम?” ती ही तोऱ्यात म्हणाली.


रुद्राक्ष,“ ओ बराच एटिट्यूड दिसतोय तुम्हाला मिस आद्या. मी मिस्टर रुद्राक्ष विनीत पोतदार! पोतदार बिल्डर्सचा सी.ई. ओ. मला जास्त वेळ वाया घालवलेला आवडत नाही. तुम्ही काय घेणार?” 


आद्या,“ हॉट कॉफी आणि माझ्याकडे ही वेळ नाही.” ती तोंड वाकडं करत म्हणाली.


रुद्राक्ष,“आय एम इंप्रेस! ओके व्हेटर वन हॉट कॉफी अँड वन कोल्ड कॉफी प्लिज. तर मिस आद्या तुम्हाला वीरकडून सगळं कळलंच असेल. मला एक वर्षासाठी काँट्रॅक्ट मॅरेज करायचं आहे. माझी आजी लग्न कर म्हणून मागेच लागली आहे  त्याशिवाय ती मला प्रॉपर्टी देणार नाही आणि मला लग्नात अडकायचं नाही आत्ताच. त्यामुळे हा काँट्रॅक्ट मॅरेजचा घाट! मला माझ्या आजीला पसंत पडेल अशी मुलगी हवी आहे. यु नो सुंदर, सुशील, वगैरे वगैरे… मी खूप मुलींना भेटलो या संदर्भात पण मला एक ही पसंत पडली नाही. माझ्याकडं वेळ खूप कमी आहे. तर बोला तुमचं काय म्हणणं आहे? मी या कामासाठी तुमची निवड का करावी? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तो तिला त्या दिवशी त्या अवतारात पहिल्या नंतर दुसऱ्यांदा निरखून पाहत  होता.


  किंचित सावळा रंग, मोठाले काळे डोळे, कारी नाक, नाजूक जीवनी, लांब केसांची बांधलेली उंच पोनीटेल, कपाळाला नाजूक टिकली. अगदी चार-चौघित उठून दिसेल अशी होती ती. अंगावर साधा पण नीट इस्त्री केलेला लाईट ऑरेंज कलरचा पंजाबी सूट होता. त्याची ओढणी व्यवस्थित दोन्ही खांद्यावर घेतली होती आणि ती उजव्या हाताने त्या ओढणीच्या टोकाशी चाळा करत बोलत होती.


आद्या,“ खरं सांगायचं तर मला असं कोणाला तरी फसवून पैसे कमावणे पटत नाही पण माझा नाईलाज आहे. माझी आई हार्ट पेशंट आहे त्यामुळे मला पैशांची गरज आहे. आता तुम्ही मला ही संधी का द्यावी याचे उत्तर म्हणाल तर मी अगदी तुमच्या आजीला हवी तशी नात सून होऊ शकते. मी मिडलक्लास आहे त्यामुळं उपजतच आमच्यावर संस्कार असतात.” तो आत्मविश्वासाने बोलत होती.


रुद्राक्ष,“ व्हॉट डू यु मीन बाय फसवून? तुम्हाला काय म्हणायचं आहे मी माझ्या आजीला फसवत आहे?”त्याने मुद्दाम रागाने विचारले.


आद्या,“ हो तुम्ही खोटं लग्नाचं नाटक करून तुमच्या आजीला फसवतच आहात आणि हेच सत्य आहे.  मला पैशाची गरज आहे म्हणून मी तुमच्या चुकीच्या गोष्टीला बरोबर म्हणेन असं अजिबात नाही.” ती ही तावातावाने म्हणाली आणि तोपर्यंत  वेटर कॉफी देऊन गेला. रुद्राक्ष तिच्या बोलण्यावर इंप्रेस झाला होता आणि तो गालात हसत होता.


रुद्राक्ष,“ माझा माझ्या आजीवर खूप जीव आहे. पण माझा ही नाईलाज झाला आहे.  आजीने तशी सीच्युएशनच क्रिएट केली आहे. तिला सूनमुख पहायचं आहे आणि मला इतक्यात लग्नाच्या बेडीत अडकायचं नाही. मला माझं स्वतंत्र प्रिय आहे पण आजी तिने सरळ विल करून टाकली ना  म्हणून एक वर्षाचे काँट्रॅक्ट  मॅरेज करून हा खोट्या लग्नाचा घाट घालावा लागत आहे. एक वर्ष झालं की आमचं पटलं नाही म्हणून डिव्होर्स घेतला असं म्हणून मी मोकळा!” तो सांगत होता.


आद्या,“ हो ते समजले मला.”


रुद्राक्ष,“ ओके मी माझा निर्णय तुम्हाला कळवतो.”


    तोपर्यंत वेटर बिल घेऊन आला रुद्राक्ष बिल पे करत होता तर आद्याने तिच्या कॉफीचे पैसे स्वतः दिले आणि ती पर्स घेऊन निघाली. त्या दिवशी  ही ती बसलेली असल्याने आणि आज ही तिला दुरून पाहिल्याने रुद्राक्षला तिच्या उंचीचा अंदाज आला नव्हता पण आता तो पाठमोऱ्या तिला पाहत होता.  सडपातळ बांध्याची ती साडे पाच फूट पेक्षा जास्त उंच होती. 


“ लय बेक्कार आग आहे बाबा! वीर बरोबर म्हणत होता. कोल्हापुरी भाषेत जाळ अन धूर संगटच.”  रुद्राक्ष हसून तिला जताना पाहून स्वतःशीच बोलत होता.



रुद्राक्षने प्लॅनिंग तर केले होते पण सगळे त्याच्या प्लॅनिंगनुसार घडणार होते का?


©स्वामिनी चौगुले






 



Swamini

वाचकांनो या ब्लॉग मध्ये तुम्हाला सुंदर आणि मनोवेधक कथा, प्रेम कथा, रहस्यमय कथा, पाहायला मिळणार तेही आपली मातृभाषा मराठी मध्ये

Post a Comment (0)
Previous Post Next Post