विरेन रुद्राक्षला घेऊन तिथून बाजूच्या एका कोपऱ्यात गेला. त्याने रुद्राक्षला हलवले आणि रुद्राक्षची तंद्री भंग झाली.
रुद्राक्ष,“ ती तीच आहे वीर कोल्हापूरमध्ये त्या पडक्या गेस्ट हाऊसमधली तिच आहे ती. आज माझा शोध संपला.” तो ठामपणे बोलत होता.
विरेन,“ अरे तू इतक्या ठामपणे कसा सांगू शकतोस की ती हीच मुलगी होती म्हणून ते ही नुसत्या आवाजावरून? तुझा काही गैरसमज ही होऊ शकतोच ना?” तो अविश्वासाने त्याच्याकडे पाहत बोलत होता.
रुद्राक्ष,“ तो नुसता आवाज नव्हता वीर ती आर्त किंकाळी होती. तिच्या असह्यतेतून आणि माझ्या पाशवीवृत्तीतुन निर्माण झालेली. तो आवाज रोज मला छळतो. माझे काळीज चिरत जातो तो आवाज आणि तो आवाज याच मुलीचा आहे. माझ्याकडून तो आवाज ओळखण्यात कधीच गफलत होणार नाही. ऐक तो डॉक्टर काय म्हणाला त्या नर्सचे नाव… हा गीता आणि ती गीता नर्स त्या मुलीची म्हणजेच आद्याची मैत्रीण आहे. आज तू त्या गीताला भेट आणि आद्या विषयी सगळी माहिती काढ. मला खात्री आहे की ती आद्याच होती. आता माहिती कशी काढायची ते मी तुला सांगायला नको. मी निघतो. त्या आद्याने मला इथे बघता कामा नये.”तो मनाशी काही तरी ठरवत निघून गेला. विरेन मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला.
विरेनने आता त्याचा मोर्चा गीता नर्सकडे वळवला. आत्तापर्यंत ती आद्या नावाची मुलगी आणि ती गीता नर्स देखील तिथून गायब होत्या. त्याने रिसेप्शनिस्टकडे गीता नर्स कुठे आहे म्हणून चौकशी केली आणि तिने ती जनरल वॉर्डमध्ये ड्युटीवर आहे असे सांगितले. विरेन जनरल वॉर्डमध्ये पोहोचला. तिथे ती पेशंट्सना औषधे देत होती. विरेन तिच्याजवळ गेला.
विरेन,“एक्स क्यूज मी सिस्टर.” तो म्हणाला आणि गीता येस म्हणून त्याच्याकडे वळली. एक सावळ्या रंगाचा दणकट बांध्याचा तरुण तिच्यासमोर सुटा-बुटात उभा होता. तिला त्याने सिस्टर म्हणलेले आवडले नव्हते बहुदा कारण तिच्या कपाळावर आठ्या होत्या. विरेन पुन्हा पुढे बोलू लागला.
विरेन,“ मॅडम मला तुमच्याशी थोडे बोलायचे होते. तुम्ही माझ्याबरोबर इथल्या कँटीनमध्ये याल का?” त्याने विनम्रपणे विचारले.
गीता,“ माझ्याकडे तुमचे काम आहे? काय?” तिने आश्चर्याने विचारले.
विरेन,“ ते मी इथे असं नाही सांगू शकत नाही ना. प्लिज मॅडम तुमची मला फक्त काही मिनिटं हवी आहेत.” तो विनंती करत बोलत होता.
गीता,“ ठीक आहे दोन मिनिटं थांबा मी माझ्या सहकाऱ्याला सांगून येते.” ती म्हणाली आणि तिच्याबरोबर असलेल्या नर्सला काही तरी सांगून त्याच्याबरोबर निघाली.
दोघे कँटीनमध्ये एका कोपऱ्याल्या टेबलावर पोहोचले.
विरेन,“ तुम्ही काय घेणार चहा, कॉफी की आणखीन काही.”
गीता,“ कॉफी चालेल.” विरेनने दोन कॉफीची ऑर्डर दिली आणि तो बोलू लागला.
विरेन,“ ती मघाशी जी मुलगी आरडाओरडा करून त्या माणसाला मारत होती ती कोण आहे?”
गीता,“ ती आद्या आहे माझी मैत्रीण पण तुम्ही का विचारत आहात तिच्याबद्दल?” तिने त्याच्याकडे संशयाने पाहत विचारले.
विरेन,“ प्लिज मॅडम मला तुम्ही चुकीचे समजू नका. पण तुमच्या मैत्रिणीचा अवतार पाहून त्यांना काही तरी प्रॉब्लेम आहे असे वाटले मला म्हणून मी चौकशी केली. बाकी विशेष काही कारण नाही.”
गीता,“ हुंम. ते तर आहेच आद्या आधी अशी नव्हती तिच्याबरोबर जे काय झाले त्यामुळे ती अशी वागत आहे.” ती सुस्कारा सोडत उदास होऊन म्हणाली.
विरेन,“असे काय घडले आहे तिच्या बाबतीत?” त्याने विचारले.
गीता,“ पण तुम्ही का इतक्या चौकशा करत आहात. सॉरी मी अशी कोणाची ही माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. निघते मी.” ती सावध पवित्रा घेत म्हणाली.
विरेन,“ थांबा मॅडम. तुमची मैत्रीण खूप अग्रेसिव्ह झाली होती. ते पाहून मला जाणवले की काही तरी प्रॉब्लेम आहे त्यांना. मी विरेन पवार मी एका समाजसेवी संस्थेसाठी काम करतो. जी अशा महिलांची मदत करते.”
गीता,“ तुम्ही काही ही सांगाल पण मी तुमच्यावर विश्वास का ठेऊ?”
विरेन,“ तुम्हाला पोतदार बिल्डर्स माहीत आहेत का?”त्याने विचारले
गीता,“ हो नाव ऐकून आहे पण त्यांचा इथे काय संबंध?”तिने त्याला रोखून पाहत उलट प्रश्न केला.
विरेन,“ पोतदार बिल्डर्समध्ये मी काम करतो हे माझे आय कार्ड आणि हे माझे व्हिजिटिंग कार्ड.”
गीता,“ पण आत्ता तर तुम्ही म्हणालात की तुम्ही समाजसेवी संस्थेत काम करता म्हणून.” तिने कार्ड पाहून त्याच्याकडे संशयाने पाहत विचारले.
विरेन,“ हो हो सांगतो की मी पोतदार बिल्डर्समध्ये काम करतो आणि फावल्या वेळात रत्नमाला पोतदार ट्रस्ट या त्यांच्या समाजसेवी संस्थेत देखील काम करतो.( त्याने मोबाईल काढला आणि त्यातली रत्नमाला पोतदार समाजसेवी संस्थेचे संकेतस्थळ काढून दाखवले. त्यात पोतदार फॅमिलीबरोबर त्याचा ही फोटो होता.) हे बघा ही रत्नमाला पोतदार समाजसेवी संस्थेची वेबसाईट तुम्ही ही तुमच्या मोबाईलवर सर्च करू शकता. आता तरी माझ्यावर विश्वास ठेवा.” तो तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी गीताने तिचा मोबाईल काढला त्यावर तो सांगत असलेले संकेतस्थळ उघडलं आणि तिच्या चेहऱ्यावर थोडा विश्वास दिसला.
गीता,“ खरं तर मी सहसा कोणावर विश्वास ठेवत नाही पण तुम्ही पुरावे दाखवलेत म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेवते. आद्या खूप चांगली मुलगी आहे पण गेल्या सहा सात महिन्यापासून तिच्यामागे कोणते शुक्लकाष्ट लागले आहे काय माहीत? तिच्यावर येणारी संकटं काही संपतच नाहीत. ती अशी नव्हती आधी म्हणजे तिच्या स्वभावात तिखटपणा होता पण इतकी अग्रेसिव्ह नव्हती ती आज पाहिलंत ना त्या वॉर्डबॉयचा तिला जाता जाता धक्का काय लागला ती चवताळली. त्या दुर्दैवी घटनेनंतर ती अशी वागायला लागली आहे.” ती सांगत होती.
विरेन,“ असं काय घडलं आहे आद्याच्या बाबतीत?” त्याने विचारले.
गीता,“ आद्या माझी बालमैत्रीण आहे. आमचा मित्र मैत्रिणीचा ग्रुप आहे. त्यातल्या एका मित्राचे लग्न अंदाजे सहा सात महिने आधी कोल्हापूरमध्ये होते. आम्ही सगळे मित्र - मैत्रिणी गाडी करून कोल्हापूरला गेलो होतो. म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते आणि पाऊस सुरूच होता. मित्राचे लग्न झाले आम्ही मुंबईसाठी निघालो पण पाऊस इतका जास्त होता की पंचगंगेला पूर आला आणि आमची गाडी पुलावरून वाहून गेली. आम्ही सगळे गाडीत अडकलो होतो पण आद्या कशीतरी गाडीतून बाहेर पडली. वेळ संध्याकाळची चार-पाचची होती. आम्ही पुढे वाहत गेलो आणि सुदैवाने रेस्क्यू टीमने आम्हा सगळ्यांना वाचवलं. त्यानंतर आम्ही एका शाळेत आश्रय घेतला पाऊस इतका होता की आम्हाला तिथून बाहेर पडणे अशक्य होते. सकाळी पाऊस आणि पूर दोन्ही ही ओसरला आणि आम्ही दुसरी गाडी पाहून मुंबईसाठी निघालो. तर त्याच पुलाच्या एक दोन किलोमीटरवर आम्हाला आद्या बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिचे कपडे फाटले होते. अंगावर जखमा होत्या तिच्या बाबतीत काही तरी विपरीत घडले आहे हे आम्हाला कळून चुकले होते. पण पुन्हा पाऊस वाढला तर आम्हाला पुरात अडकायचे नव्हते म्हणून मी तिला फस्ट एड दिले तिचे कपडे बदलले आणि तिला बेशुद्ध अवस्थेत मुंबईत घेऊन पोहोचलो. तिला मी इथेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले. तिच्या मेडिकल टेस्ट केल्या आणि माझी शंका खरी ठरली. तिच्यावर कोणी तरी नराधमाने अत्याचार केला होता.” ती रडत पण रागाने म्हणाली. विरेनने तिच्यासमोर पाण्याचा ग्लास सरकवला. तिने थोडे पाणी पिले.
विरेन,“ पुढे काय झाले मग?”
गीता,“ पण तो नराधम कोण होता? ती रात्र भर कुठे होती? हे ती शुद्धीवर आल्याशिवाय कळणार नव्हते. मी पोलीस कंप्लेन्ट करण्यापासून डॉक्टरांना थांबवले कारण शेवटी काय करायचे हा निर्णय सर्वस्वी तिचा होता. मी स्टाफ असल्याने डॉक्टरांनी माझे ऐकलं. आद्या संध्याकाळच्या वेळी शुद्धीवर आली. ती खूप घाबरलेली होती. बिथरली होती ती. ती कुठे आहे याचे ही भान नव्हते तिला. शेवटी मी तिला सावरले आणि ती मला मिठी मारून हुंदके देऊन रडू लागली. तिच्याकडून मला कळले की तिने पावसामुळे आणि पुरामुळे पंचगंगेच्या पुलाच्या थोडं पुढे तिने उंचावर असलेल्या एका पडीक गेस्ट हाऊसमध्ये आश्रय घेतला. रात्र झाली आणि तिथे एक पुरुष आला. तिथे एक छोटा मातीचा दिवा होता तो तिने लावला होता पण त्याचा काय उजेड असणार? सगळा अंधारच होता. तिला फक्त त्या पुरुषाची सावली दिसली. तो म्हणे दारू पित होता आणि त्याने दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला. तिने खूप विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्या पशु पुढे तिचे काही चालले नाही. शेवटी तो बाजूला पडला आणि तो उठल्यावर पुन्हा काही करेल म्हणून ती जीव मुठीत घेऊन पळत सुटली. पडली धडपडली. खूप लागले होते तिला शेवटी ती रस्त्याच्या कडेला बेशुद्ध झाली.” ती सांगून थांबली.
विरेन,“ मग त्या पुरुषा विरुद्ध तुम्ही पोलिसात कंप्लेन्ट का केली नाही?”
गीता,“ कंप्लेन्ट कोणाच्या विरुद्ध करायची होती आम्ही? जे काही घडले होते ते अंधारात घडले होते. आद्याने तर त्या नारधमाचा चेहरा देखील पाहिला नव्हता.तो कोण? कुठला? काहीच माहीत नव्हतं तिला. पोलिसांनी तक्रार घेतली ही असती पण अज्ञात व्यक्ती विरुद्ध त्याने काय साध्य होणार होते. तिचा गुन्हेगार पकडला जाणार होता का? त्यात तिची आई हार्ट पेशंट आहे. आपल्या मुलीवर बलात्कार झाला हे तिला कळले असतं तर ती माऊली त्या धक्क्याने मेली असती की. म्हणून शेवटी तिने पोलिसात तक्रार करण्याचा विचार सोडून दिला. पण या सगळ्यामुळे तिचे लग्न देखील मोडले.” ती म्हणाली
विरेन,“ तुमच्या शिवाय ही गोष्ट कोणाला माहीतच नव्हती तर मग तिचे लग्न कसे मोडले?” त्याने आश्चर्याने विचारले.
गीता,“ आमच्या आद्या मॅडमची तत्त्व! ती खूप स्वाभिमानी आहे. मनोज तिचा बॉयफ़्रेंड दोघे लवकरच लग्न करणार होते पण त्याच्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवून लग्न करणे तिला पटलं नाही म्हणून तिने त्याला सांगून टाकले की तिच्यावर एका अज्ञात पुरुषाने बलात्कार केला आहे आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. मनोजने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि संबंध तोडले. या सगळ्यामुळे आद्या आतून तर खचली पण वरून ती कठोर आणि पोलादी झाली आहे.” ती डोळे पुसून म्हणाली
विरेन,“ मग आता आद्या हॉस्पिटलमध्ये काय करत होती? तिच्या घरी कोण कोण असते आणि ती काय काम करते?”
गीता,“ तिचे वडील तर लहानपणीच गेले. आईने तिला आणि तिच्या लहान भावाला नर्सची नोकरी करून कसेबसे वाढवले पण त्यांना हार्ट प्रॉब्लेम झाला आणि सगळी जबाबदारी आद्यावर आली. आद्या एका खाजगी कंपनीत अकाऊंटची नोकरी करतेय. तिचा भाऊ इंजिनिअरिंग करतोय पण भित्या पाठी मसोबा म्हणतात तसं तिच्या आयुष्यातली संकटांची शृंखला संपतच नाही. तिच्या आईच्या हृदयाला ब्लॉकेजेस आहेत. ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार आहे. हे हॉस्पिटल चॅरिटेबल असले तरी औषध गोळ्या आणि बाहेरून हार्ट सर्जन बोलवावा लागणार आहे त्याची फी कमीत कमी पाच लाख खर्च येणार आहे.ती तिच्या आईच्या सर्जरीसाठी कर्ज काढण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. तिची आई इथेच ऍडमिट आहे महिन्या भरात सर्जरी करावी लागणार आहे. मी तरी पन्नास हजाराच्या वर मदत नाही करू शकत तिला. माझी मजल तितकीच आहे. तुमच्या ओळखीत कोणी चॅरिटी करणारे असतील तर प्लिज बघा आद्याला खूप गरज आहे हो.” ती त्याला कळकळीने सांगत होती.
विरेन,“ मी नक्कीच काही तरी मदत करेन तुमच्या मैत्रिणीला विश्वास ठेवा माझ्यावर.”
तो म्हणाला आणि निघून गेला.
आता रुद्राक्षला आद्या सापडली आहे तर तो पुढचे पाऊल काय उचणार आहे?
©स्वामिनी चौगुले
